Thursday 28 March 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-२)


रात्री त्या guest house वर भयाण वाटू लागले. थंडी भयानक होती. इतर रूम्स मध्ये कुणीच नसल्याने आम्ही तिथली पांघरुण, रजई, एकत्र केली. प्रत्येकाने अंगावर ३-४ रजई घेतल्याशिवाय पर्याय नव्हता. मुख्य म्हणजे आमच्या रूम ला कडी नव्हती. ज्या खोल्यांमध्ये कडी-कोयंडे होते तिथली वीज गायब होती. सगळा गोंधळ होता. रात्री नोकराने कहर केला. २-३ च्या दरम्यान battery चा एक मोठा झोत चेहऱ्यावर पडला. बघतो तर समोर नोकर. !! सगळं काही ठीक चाललंय का; असे विचारयला तो आला होता. त्याने उगाच झोपमोड केली होती. पैसे वगैरे चोरायला हा आलाय की काय अशी शंका सुद्धा आमच्या मनात येऊन गेली. पहाटे ५ वाजता आम्हाला पाण्याचा आवाज ऐकू आला. पुन्हा झोपमोड झाली. खोलीच्या बाल्कनी मधून खाली पाहिले तर नोकर अंगणातल्या नळाखाली बसून थंड पाण्याने अंघोळ करीत होता. बाहेरच्या दाट धुक्यात आणि कमालीच्या थंडीत ह्याचे अघोरी प्रताप चालू होते. !! हा नोकर खरंच माणूस आहे की अजून कुणी आहे हे तपासणे आता गरजेचे वाटत होते.

सकाळी ९ वाजता जाग आली. ११ पर्यंत कंपनीत रिपोर्टिंग करायचे होते. Guest house पासून bus stand पर्यंत उलट जाऊन कुठलीही बस पकडून Ranbaxy ला जाता येते. बसने जवळपास २० मिनिटे लागायची. एकेक दिवस असा मागे सरत होता. काम वाढले होते. नव्या ठिकाणी रुळायला हळूहळू सुरुवात झाली होती. दुपारचे जेवण तिकडेच होत असल्याकारणाने तो एक प्रश्न मिटला होता. रात्रीच्या जेवणाचा धाबाही ठरलेला असे. Project च्या कामात दिवस कसे जात ते कळत नसे. रोज रात्री परतल्यावर मात्र वेगळीच भीती वाटायची. ते guest house खायला उठायचे. नोकराचे काहीतरी उपद्व्याप सुरूच असायचे. मालकाचे आम्हाला अजून पर्यंत दर्शन झाले नव्हते. 

त्यात माझ्या एका colleague ने निराळाच डाव रचला. पळून जायची नामी युक्ती शोधून काढली होती. नोकराचे पाय त्याने एकदा उलटे बघितले आहेत अशी भीतीयुक्त अफवा आमच्यात पसरवायला सुरुवात केली. या वक्तव्याला अनुसरून तो acting करू लागला. कंपनीतल्या काही लोकांना तो ही कथा मुद्दाम सांगत असे. त्याला इथे राहायचे नाही आहे हे मला समजून आले होते. त्याला वेड्यात काढणे म्हणजे आपलाच वेळ घालवणे होते. अपेक्षेप्रमाणे आजोबा वारल्याचे कारण सांगून तो तिथून चालला गेला. त्याने फोनवरून manager ला तसे कळवले होते. तो एकूणच नोकराला आणि त्या ‘हवेली’ला भिला होता हे सत्य होते. उरलेल्या आम्ही दोघांनी त्याचा विचार न करता routine चालू ठेवले.

दोन आठवडे उलटून गेले होते. एक दिवस मित्राला थोडे बरे वाटत नव्हते. तो guest house वरच थांबला होता. त्यादिवशी मी संध्याकाळी उशिरा परतलो. तो अंथरुणावर पडून होता. त्याच्या पोटात खूप दुखत होते. तो आजारी आहे म्हणून नोकराने चहा आणून दिला होता. त्या चहात तर काही टाकले नव्हते ना अशी शंका आम्हा दोघांनाही आली पण ते सध्या महत्वाचं नव्हतं. त्या एकाट जागेत डॉक्टर मिळणे अवघड होते. मी मोबाईल वरून पुण्यातल्या आमच्या family doctor ला फोन लावला. त्याला सर्व details सांगितले आणि medicines लिहून घेतले. नशीब बलवत्तर होते. Bus stand पासून medical १० मिनिट अंतरावर होते.

निर्जन रस्त्यावर, धुक्याने वेढलेल्या त्या सतलज काठच्या परिसरात रात्री-अपरात्री फिरणे म्हणजे धैर्याची परीक्षा होती. ‘रात्री medical उघडे असेल का?’ हा विचार करता करता तिथे पोहोचलो. ते उघडे असल्याचे पाहून जीव भांड्यात पडला. औषधे मिळाली. Medical मधल्या chemist ने सांगितले की या भागात संध्याकाळी ७ नंतर सगळं सुनसान होतं. एवढे Medical चालू असते. रोज रात्री १० वाजता एक पोलीस मित्र कामावरून येताना त्या chemist ला घरी जाई पर्यंत सोबत करत असे. मी गप्पागोष्टींमध्ये अधिक वेळ न घालवता guest house वर परतलो.

त्या मधल्या वेळात नोकराने मित्रासाठी औषध म्हणून कुठल्यातरी जडीबुटींचा काढा आणून दिला होता. आमचा नोकरावरील संशय दिवसागणिक वाढत होता त्यामुळे मित्राने हुशारीने तो काढा मोरीत ओतला. मित्राला औषधं दिली. परीणामस्वरूप, सकाळी त्याला व्यवस्थित बरे वाटू लागले. 

(क्रमशः)



No comments:

Post a Comment