Thursday 7 March 2013

हृदयस्थ



‘शिव’ या विषयावर लिहिणे म्हणजे एका अर्थी शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे पण ‘महाशिवरात्री’ निमित्त थोडंफार लिहिण्यावाचून राहवणार नाही हे देखील खरंय.

‘शिव’... चराचर सृष्टीचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा स्वामी... मांगल्याचा स्रोत.

हा ‘विश्वेश्वर’ अनादी.. अनंत.. अद्वितीय आणि अगम्य !! अव्याहत पणे सुरु असलेल्या कालचक्राचा केंद्रबिंदू आणि परिघही. पण या परिघाचा प्रारंभ नाही आणि अंतहि कुठेच नाही. आदी-अंत नसल्याने सगळ्या ऋणातून स्वतः मुक्त असलेला आणि त्याच्या भक्तांचेही ऋण मुक्त करणारा हा ‘ऋणमुक्तेश्वर’. हा सृजनाचा प्रतिक आणि लयाचा आविष्कार.

‘काळावर’ याचे अधिपत्य...म्हणूनच हा ‘महाकालेश्वर’.

जितका सरळ आणि सहज तेवढाच तो गूढरम्य... अगदी आकलना पलीकडचा !!

बर्फाळलेल्या पर्वतशृंखलान्च्या अज्ञात गुहेमध्ये वास्तव्य करून ध्यानमग्न असलेला विजनवासी ‘महादेव’ आणि वेळप्रसंगी रौद्ररूप धारण करून वाईट प्रवृत्तींचे निर्दालन करणारा हा ‘रुद्रनाथ’...
गंगेचा अजस्त्र स्त्रोत जटांमध्ये धारण करण्याचे सामर्थ्य असलेला ‘गंगाधर’... सश्रध्द भक्तांच्या हाकेला ओ देणारा ‘आशुतोष’... संगीत-नृत्यप्रिय ‘नटराज’ ...आणि जनकल्याणासाठी हलाहल विष प्राशन करणारा ‘निळकंठ’ सुद्धा तोच...

प्रकृती रूपाने विद्यमान असलेल्या शक्तीचा हा पुरुष. त्याच शक्तीच्या कणाकणात प्रस्फुटीत होणारा ‘अर्धनरनारीश्वर’ तोच. अद्वैत असूनही द्वैत असलेला ‘शंकर’ देखील तोच आहे.
नाट्यशास्त्र, संगीत, नृत्य, दर्शनशास्त्र, तर्कशास्त्र, व्याकरण, योग इत्यादींचा प्रारंभ व अधिष्ठाता असलेला ‘महेश्वर’ हि तोच. पंचमहाभूतांना प्रतीरुपित करणारे सद्योजत, वामदेव, ईशान, तत्पुरुष आणि अघोरही तोच...

गळ्यात धारण केलेला सर्प, रुद्राक्षमाळा, हातात त्रिशूल, डमरू, भस्मविभूषित त्रिनेत्रधारी, चंद्रमौळी असे हे त्याचे रूप जेवढे विलोभनीय तेवढेच रूपकात्मक. त्या रूपकांचा उलगडा सहज शक्य नाहीच. ह्याचा त्रिनेत्र म्हणजे अंतर्दृष्टी, दूरदृष्टी, तपस्या, विवेक आणि आत्मज्ञानाचे प्रतिक. अंगावरचे भस्म प्रत्येकाला जाणीव करून देतं की जन्मेलेल्या जीवाचा अंतही निश्चित आहे. त्रिशूल हे त्रिकाळाचे प्रतिक. सर्प हे चिरंतनाचं प्रतिक. उगवती चंद्रकोर प्रगतीचं लक्षण... तर डमरू चा नाद, सतर्कतेचं !! त्याचे असे सारेच अतुल्य !!!

शिव हे खऱ्या अर्थाने आद्यदैवत... वेद, पुराण, अवतार किंबहुना धर्म संकल्पनेच्या पलीकडे असलेले. शिवलिंग स्वरुपात त्याचे केले जात असलेले पूजन ही हजारो वर्ष जुनी परंपरा आहे. आर्य संस्कृती रुजायच्या आधीपासून त्याची उत्तरेत ‘आदिनाथ’ किंवा ‘पशुपतीनाथ’ या स्वरुपात पूजा होत असे. द्रविड संस्कृतीत शिव आणि शक्तीचे पूजन सारख्याच प्रमाणत होत असावे. वेदांमध्ये शिवाचा ‘रुद्र’ (संहाराची देवता) असा उल्लेख केला आहे. त्यात असलेल्या ऋचा त्याच्या ‘संहाराच्या’ एकाच वैशिष्ट्या भोवती फिरतात. त्याहून त्याची  असलेली व्याप्ती वेदांच्या नशिबी नसावी. तसेही शिवाला यज्ञ, पूजाविधींपासून बहिष्कृत करण्याचा घाट आर्य संकृतीतल्या 'त्यावेळच्या' संकुचित आणि propagandist वैष्णवांनी घातलाच होता. ‘स्मशानात निवास करणारा... शूद्र, भणंगांसोबत फिरणारा... चिताभस्म लावून फिरणारा हा कसला पूजेस पात्र?’ असा अपप्रचारही करण्यात आला. आपल्याच ‘संस्कृतीचा’, ’देवतेचा’ प्रभाव सर्वत्र असावा... त्याचंच पालन लोकांनी करावं हा अट्टाहास करणे विशिष्ट पंथात किंवा संप्रदायात दिसून येते. हे नवीन नाही...अनादीकाळापासून सुरु आहे. आजही अशा कीड लागलेल्या मनोवृत्तीचा उदोउदो करणाऱ्या ‘धार्मिक’ missions, society, organizations सर्वत्र दिसतात. असो. परंतु ‘शिव’ या सगळ्यांना पुरून उरले. ‘शिव’ या विलक्षण व्यक्तित्वाच्या प्रचितीचे वर्णन महर्षी व्यास, पाणिनी, पतंजली, दधिची, आदीशंकराचार्य, नवनाथ किंवा द्रविड संस्कृतीतले ६३ नयनार अशा ऋषिमुनिंपासून ते स्वामी विवेकानंदांपर्यंत कित्येक व्यक्तींनी केले आहे. रावणाचे शिवतांडव स्तोत्र असो की शंकराचार्यांचे ‘शिव-आनंद लहरी’ असो; अशा अनेक स्तोत्रांमधून शिवाची महती सांगण्यात आली आहे. कुठलीही ‘शिवस्तुती’ ही vacuum मध्ये निर्मित केलेली रचना नव्हेच; हे ते वाचल्यावर कळतंच.


कालांतराने ‘शिव’ हिंदू सनातन धर्माचा भाग झाले असले तरी कुठल्याही अवडंबरापासून शिव मुक्त आहे... कुठल्याच होम-हवन किंवा तत्सम पूजेची गरज नसलेला व केवळ श्रद्धेच्या ताकदीवर प्राप्त होणारा हा शिव खरोखर अनोखाच आहे.

पुराण, सूक्त, उपनिषद, संहिता, सूत्र किंवा वेद या सर्वांपलीकडे जाऊन मी महादेवांकडे एक personality  म्हणून विचार करायचं ठरवलं....(देवत्व बाजूला ठेवून)... तरीही शिव अद्भुतच !! कारण अविचल एकाग्रतेपासून ते स्वतःच्या पूर्णत्वा पर्यंतची त्याची वाटचाल लक्षणीय आहे. व्यक्तीविशेषत्व (individuality) आणि सायुज्यता (global oneness) इथे एकत्र नांदतात. भेदभावाला इथे स्थान नाही. ‘गृहस्थ’ असूनही ‘वैराग्य’ हा त्याचा मूळ गाभा आहे. इच्छा आणि गरज यांचे उत्कृष्ट संयोजन तसेच सत्व,रज व तम यांचा अनोखा मिलाफ त्याच्या ठायी दिसून येतो. तो सर्वोत्तम पती आहे आणि कमालीचा विरक्त सुद्धा आहे. अतिशय सौम्य असलेला हा सदाशिव प्रसंगानुरूप कठोर आणि उग्रही होतो. ‘महायोगी’ हा त्याचा ‘स्व-भाव’ आहे. 

व्यक्तिमत्वाच्या परस्पर विरोधी छटा इथे एकत्र दिसून येतात. एका इंग्रजी पुस्तकातल्या ह्या ओळी हेच सांगतात- 

Shiva beckons sweetly… Shiva inspires awe.
Shiva is the foremost of ascetics… Shiva, the greatest of lovers.
Shiva spells the cosmic dance… yet Shiva signifies the 
wordless silence.
Shiva is lord of Time… but, Shiva Himself is eternal.
Shiva is infinite…yet Shiva manifests everywhere.
From the great heights of Kailas to the golden sands of Rameshwaram, millions of hearts overflow with the devout supplication to the deity who spans the opposites & shows the way to transcendence.

प्रेमळ पती आणि कर्तव्यदक्ष पिता दोहोंची भूमिका यशस्वीपणे पार करताना स्व-भावाशी असलेली नाळ तो तोडत नाही. उत्कृष्ट संतुलन !! पत्नीला समान दर्जा, अधिकार, स्वायत्तता देणारा आणि तीवर स्वतःचे श्रेष्ठत्व न गाजवणारा शिव एकमेवआहे. असे उदाहरण इतरत्र कुठेही दिसून येत नाही. त्याचमूळे रुष्ट होणे, एकमेकांना मनवणे, समेट घडणे आणि पुन्हा एकत्र येणे हा त्यांच्याही दाम्पत्य जीवनाचा अविभाज्य भाग आहे. समतावादाच्या याच आधारावर गौरी-शंकराचे हे अतूट संबंध प्रस्थापित आहेत.

मध्यंतरी एक लेख वाचनात आला होता. लेखकाने शिवाची तुलना Nuclear Reactor सोबत केली होती. माझ्या मते अगदी योग्य तुलना आहे ती. शिवपिंड किंवा ज्योतिर्लिंग एका प्रकारचे Nuclear Reactor च आहे. त्यातली Analogy मांडली तर लगेच लक्षात येईल. त्या शक्तीचे आवाहन तुम्ही कसे करता आणि कशासाठी करता यावर सगळं अवलंबून आहे. सदुपयोग कराल तर ते भरभरून देईल... दुरुपयोग केल्यास सर्वनाश निश्चित. खरे श्रद्धावंत अर्थातच दुरुपयोग करत नाही.  

शिवाचे भक्त त्या भोलेनाथची आदरयुक्त भीती वगैरे बाळगत नाहीत, त्यापासून प्रतिष्ठित अंतरदेखील ठेवत नाही... ते फक्त त्याच्यावर प्रेम करतात... निस्सीम प्रेम... आपल्यापैकीच एक समजतात. त्यामुळे शिवोSहमहा नुसता जपाचा मंत्र नव्हे तर आपल्यातल्या शिवतत्वाच्या प्रत्यंतराचे एक साधन आहे.

हे सर्व चराचर त्या परम शिवतत्वापासून निर्मित झाले आहे असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्यातही तो अंश असणारच. फरक एवढाच कि जसे जलपर्णीने तळं झाकलं असतं तसंच काहीसं आपलं झालं आहे. अंतर्मनात विद्यमान असलेला तो शिव पडद्याआड लुप्त झालाय. तो शोधण्याचा आणि जागृत करण्याचा प्रयत्न करावा.  कशावरही आश्रित न राहता, भयमुक्त होऊन समोर उभ्या ठाकलेल्या समस्यांची, प्रश्नांची उत्तर शोधण्याकरिता स्वतः कष्ट घावे. जबाबदारीचे भान ठेवावे. नकारात्मक दृष्टीकोन नष्ट करावा. जीवात शिव आहे असे समजून पीडितांची सेवा करावी. उपदेश, सल्ले, टीका जरूर ऐकावी पण स्वतः स्वतःची वाट निवडावी आणि मार्गक्रमण करत राहावे; हेच त्या महादेवाकडून शिकण्यासारखं आहे.

अंततः हृदयस्थशिव जागृतहोवो हीच महाशिवरात्री च्या निमित्ताने प्रार्थना !!

|| ओम नमः शिवाय ||

No comments:

Post a Comment