Tuesday 26 November 2013

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग १)

मागील शनिवारी भर दुपारी दाराची बेल वाजली. वामकुक्षीचा बोऱ्या वाजवायला आता कोण आलंय हा विचार करीत दार उघडलं. कुरियर होतं. नव्या flat च्या बिल्डर कडून पत्र आलं होतं. सोसायटीची नोंदणी झाली होती. ‘सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ असे बिरूद आता लागले होते. बिल्डरने पहिल्या सर्वसाधारण सभेचं आयोजन केले होते. नव्या सोसायटीच्या हंगामी समितीची स्थापना होणार होती. एकदा सोसायटी निर्माण झाल्यावर विविध बाबींची हस्तांतरण प्रक्रिया महत्वाची असते. एकूण प्रकार तसा क्लिष्ट असतो आणि तो समजावून घेणे आवश्यक असतं. त्यामुळे हजेरी लावणं क्रमप्राप्त होतं. सभेचं आयोजन पुढल्या आठवड्यात रविवारी करण्यात आलं होतं. दिवस सगळ्यांसाठी सोयीस्कर होता.

रविवारी नियोजित वेळेला पोहोचलो. सभेच्या ठिकाणी जाण्याआधी Club House मध्ये सहज डोकावून गेलो. TT टेबल आणि कॅरम बोर्डची भर पडलेली दिसली. जिम मध्ये देखील एखाद-दोन यंत्रांची संख्या वाढलेली होती. ‘चला, आता लवकर इथे राहायला यायला हवं’ अशी मनाशी खुणगाठ बांधत Community Hall जवळ आलो. त्याशेजारी एक मोठा लॉन आहे. तिथे खुर्च्यांची मांडामांड सुरु होती. शे-दीडशे खुर्च्या होत्या. गर्दी तशी नव्हतीच. कामगार वर्ग त्यांच्या कामात गर्क होता. सभासदांपैकी १०-१२ लोकं आली होती आणि एक ग्रुप करुन बसली होती. बिनओळखीचे चेहरे जास्त. पण एवढ्यात एक ओळखीचा चेहरा दिसला. पांडेजी... आमच्या बिल्डरचा हा उजवा हात. कुठलीही समस्या असेल तर हमखास पांडेजीनां फोन करा. हा माणूस ती समस्या सोडविण्यासाठी काहीतरी खटपट करतोच असा माझा तरी अनुभव आहे. ‘दबंग’ मनुष्य. ‘तोटीतून पाण्याची धार कमी येतेय’ इथपासून ते ‘अमुक ठिकाणचा power point बदलून तमुक ठिकाणी लावायचा आहे’ पर्यंत कुठलेही काम असेल; त्याकरीता पांडेजी हे Single Point of Contact. पांडेजीनां तीन-चार वेळा मी कामानिमित्त त्रास दिला असल्याने ते मला चांगलं ओळखतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करून पुढे आलो. खुर्च्यांच्या रांगांसमोर सन्माननीय व्यक्तींसाठी छोटं स्टेज बनविण्यात आलं होतं. त्याच्याच उजव्या बाजूला माईक वगैरे करिता लागणारी यंत्रसामग्री ठेवली होती. Wires अजूनही अस्ताव्यस्त पडून होत्या. नेहमीप्रमाणे त्या wires मध्ये पाय अडकून मी अडखळलो. हे माझ्याबाबतीत नेहमीच घडतं. का ते कुणास ठाऊक !! अखेर तिसऱ्या रांगेतील एक जागा मी पटकावली आणि सभा कधी सुरु होते याची वाट बघत बसलो. अशा सभेला येणे ही काही माझी पहिली वेळ नाही. सध्या जिथे राहतोय तिथे सोसायटी मिटिंगच्या अनेक हिंस्र आवृत्त्या मी पाहिल्या आहेत. तिथल्या किस्से-कहाण्यांवर मी पूर्वीही लिहिले आहे. परंतु ही स्वतःच्या घरच्या सोसायटीची पहिली मिटिंग !! त्यामुळे वेगळाच उत्साह होता.

भारतीय परंपरेनुसार हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली होती. थोड्या वेळात एक professional फोटोग्राफर आणि video shooting करणारा इसम अशा दोन व्यक्ती आत आल्या. हे नवीनच होतं. यांची खरंतर काहीच गरज नव्हती. ह्या मिटिंग चे Live Telecast तर होत नाहीयेना अशी धास्ती वाटून, मागे एखाद्या वृत्तवाहिनीची OB Van दिसतेय का, ते मी पाहू लागलो. पण तसे काही नव्हते. काही वेळाने पलीकडे ठेवलेल्या यंत्रसामुग्रीतून संगीताचे मंद (की सांद्र?) सूर ऐकू येऊ लागले. हे सगळं करण्यामागे नक्की कुणाचं डोकं याचा विचार मी करू लागलो. कारण सभेसाठी उत्तम arrangement करण्यात येत होती. ‘सवाई गंधर्वला’ आमचा बिल्डर sponsorship देतो म्हटल्यावर त्याच्यासाठी असं काही करणं ही क्षुल्लक गोष्ट असावी. बिल्डरच्या ‘व्यावसायिकतेला’ दाद देण्यापलीकडे पर्याय नव्हता. खरा धक्का तर पुढे होता. एव्हाना बरीच लोकं जमली होती. केवळ मागच्या काही रांगा रिकाम्या होत्या. मागून एक कामकरी पोऱ्या पुढे आला आणि एक एक करून प्रत्येकाच्या हातावर अत्तर लावू लागला. मला संगीत-नाटकाला आल्यासारखे वाटत होते. समोर कुणीतरी चकोर उभा ठाकून, ‘गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी... हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी’ हे प्रासादिक नाट्यपद आता गाणार अशी खात्री वाटत होती. ‘आपण नक्की सोसायटी मिटिंगलाच आलो आहोत ना?’ याची एकदा खातरजमा करावी असे वाटू लागले कारण वातावरण एखाद्या समारंभाचेच होते. बिल्डरच्या Image Management’ चे कौतुक करावे तेवढे कमीच होते.

सुमारे अर्ध्या पाउण तासानंतर मान्यवर व्यक्तींचे आगमन झाले... निदान असे वाटत तरी होते. स्टेजवरील खुर्च्यांवर तीन-चार लोकं स्थानापन्न झालेली होती. माईक टेस्टिंग झाले. आणखी एक-दोन जणं आली... त्यांच्या हातात फाईल्सचा गठ्ठा होता... शिल्लक असलेल्या खुर्च्यांवर ती दोघं बसली. त्या मानाच्या खुर्च्यांमध्ये एक खुर्ची पांडेजींची होती हे वेगळे सांगायला नको. विशेष म्हणजे पांडेजी बिल्डरच्या ‘उजव्या’ हाताला बसले होते. हा निव्वळ योगायोग होता की त्यांची नेहमीची सूचक सवय ते मात्र माहित नाही. समोर बसलेल्या मान्यवरांमध्ये पांडेजी आणि बिल्डर हे दोघेच लोकांच्या ओळखीचे होते. इतर चेहरे परिचित नव्हते. इकडे जमलेल्या लोकांच्या आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या. माईकवरून आता hello..hello चे आवाज येऊ लागले होते. लोकांचा कोलाहल कमी झाला. स्टेजवर एक इसम हातात कागद घेऊन बोलू लागला. बिल्डरचा  Legal Adviser अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली. सभेची आवश्यकता आणि प्रारूप सांगायला त्याने प्रारंभ केला. अटल बिहारी वाजपेयींपेक्षा याचे pauses मोठे असल्या कारणाने लोकांत चुळबुळ सुरु झाली. 
त्या pauses दरम्यान काही संवाद मला ऐकू आले ते असे-

‘याचा मराठीचा मेजर problem दिसतोय.’
‘अहो, मराठीच आहे. भाषेवरून सोलापूरचा वाटतोय.’
‘हा पाठ करून आलाय का?... सगळं विसरलेला दिसतोय.’
‘ह्याने Legal Adviser म्हणून इतकी वर्षं कशी काय नोकरी केली काय माहित !!’
‘अहो मला माहितीये हा... साधा माणूस आहे बिचारा...प्रामाणिक आहे... बोलताना सावकाश विचार करून बोलतो तो.’
‘ह्या... हा Advocate आहे असे वाटतंच नाही. एक केस तरी जिंकलाय का विचारा त्याला जरा... बावळट.’
‘जाऊ द्या हो... आपल्या कामाशी मतलब ठेवावा आपण... उगाच फाजील टीका काय कामाची.’
‘आम्ही काय बोलणार !! तुमच्या line मधला ना तो.’
‘(फोनवर) अगं, gas बंद केलाय का बघ जरा. मी आलेय खाली.’

या दरम्यान Legal Adviser Mr. विधाते शांतपणे, सभेपुढे प्रस्तुत असलेले मुद्दे एकेक करून समजावून सांगत होता. सगळ्यात अगोदर सहकार खात्याकडून मंजुर होऊन आलेल्या नियमांची माहिती तो सांगू लागला. आतापर्यंत जमा झालेला maintenance चा पैसा आणि बिल्डर ने केलेला खर्च यामध्ये तफावत आढळली. सगळा हिशेब त्याने सोबत आणला होता. लोकांची पुन्हा कुजबुज सुरु झाली. आज सभासदांची नवी हंगामी समिती स्थापन होणार होती. त्यासाठी विधातेंनी आवाहन केले की तुम्ही आधीच ठरवलं असेल तर यादी द्यावी अन्यथा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याची तरतूद आहे. हे ऐकून एक काका लगेच उभे राहिले आणि बोलू लागले... 
‘मी भाई तेलंग... आम्ही आमच्यात दोन-तीन मिटिंग घेतल्या होत्या. सर्वानुमते नावांची एक यादी अगोदरच बनवलीये.’ काका बहुतेक Retd. कर्नल असावे... झुबकेदार मिश्या, धिप्पाड शरीरयष्टी आणि आवाजातील जरब पाहून असेच वाटत होते. विधाते यादी वाचता वाचता कुठलेतरी एक-दोन मुद्दे मांडत होता. माझे लक्ष मागील रांगेतल्या लोकांच्या बोलण्यावर !! विधाते च्या long pauses दरम्यान मला ऐकू आलेले काही short संवाद असे-

‘तेलंग फारच dashing दिसतोय. हा माणूस हवा कमिटीत... कारण कसं आहे की बिल्डर च्या उरावर बसणारी व्यक्ती कमिटीत असणे गरजेचे असते.’
‘कसलं काय... काही लोकांना पुढे पुढे करण्याची सवय असते... show off.
‘अरे... तेलंग काका जबरी आहे...सांगतोय ते ऐक.’
‘पण आधीच कशी नाव ठरवली?... काही पत्ताच नाही... आपण पण दिली असती नावं.’
‘देशपांडे.. जरा नोटीस बोर्ड वाचावं... बोर्डात होते ना तुम्ही नोकरीला!!...हाहाहाहा.’
‘अहो, तुम्ही नाव द्यायला पाहिजे होतं.’
I’m too busy to handle these worldly affairs, you know.’


विधातेंनी सभेचा सूर पकडून असं जाहीर केलं की आणखी तीन नावं सुचवावी... मुख्यतः जे समोर बसलेले आहेत त्यांच्यातून !! एकूण १५ नावं हवी होती. देशपांडे काकांना उद्देशून त्यांचा बाजूचा म्हणाला- ‘आता chance आहे की तुम्हाला. तुमचं नाव सुचवतो.’ लगेच देशपांडे काका घाबरून म्हणाले,’नको...नको. जाऊ द्या. आता काही इच्छा नाही माझी. Next year बघू.’ जमलेल्या लोकांतून दोन काकू आणि एक काका अशा तिघांनी पुढाकार घेतला आणि स्वतःचे नाव नोंदवले. झालं... समिती गठीत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष इत्यादी पदांचे वाटप झाले. पुढील एक वर्षासाठी ‘बिल्डर आणि आम्ही’ यांच्यामधील दुवा किंवा multiple point of contact हे १५ शिलेदार असणार होते. हंगामी संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट झाला. हास्याचे काही स्फोट झाले आणि तशातच विधातेंनी आपला मोर्चा पुढील महत्वाच्या व संवेदनशील मुद्द्याकडे वळवला... ‘खरेदीखत’... अर्थात conveyance deed’.

(क्रमशः)