Sunday 23 February 2014

वेचलेली फुले…



विस्मृतीच्या अंधारात चालताना मनावरचे मळभ कधीतरी अचानक दूर होते. काळोखाच्या सावल्यांतून दूरवर स्मृतींचे दीपक खुणावू लागतात. पाणावलेल्या पापण्यांच्या कडांशी प्रतारणा करणारे शब्द वैरी होतात, ते सैरावरा धावतात. त्यांच्या शिस्तबद्ध रांगा लागत नाहीत. मन आक्रंदू लागते. क्षणभंगाने आठवणींचे तरंग विरतात व परत सारे स्तब्ध होते. स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलताना जे हाती गवसले ते तुमच्या समोर ठेवित आहे. जे विस्मृतीच्या गर्तेते गेले ते प्रभूचे देणे होते. त्याचे त्यानेच सव्याज परत नेले...

आज आयुष्याच्या सोनेरी संध्याकाळी आम्ही नर्मदेच्या कुशीत विसावलो आहोत. विवाहाच्या मंगल वेदीवरील सप्तपदीतून सुरु झालेली ही वाटचाल आम्हांवरील, आमच्या कार्यावरील सर्वांनी केलेल्या निखळ-निर्व्याज-अकृत्रिम प्रेमाने भिजलेली आहे. आपणा सर्वांच्या सद्भावनांच्या प्राजक्ताची फुले त्यावर विखुरलेली आहेत. बाबांचा वेग आणि आवेग आयुष्यभर सांभाळल्यावर आज मागे वळून पाहताना युवक-युवतींच्या समुदायांचे पदरव या वाटेवर गुंजन करताना कानी पडत आहेत. हा श्रमसाफल्याचा क्षण आहे... तशी आम्ही सामान्य माणसेच – माणूसपणाच्या सर्व तृटी असलेली पण कार्यावरील निष्ठेच्या सद्गुणांचा देवस्पर्श झालेली, वाटचाल करीत आहोत. आमचे जीवन हे कष्टायन आहे. आम्ही मातीशी नाते जोडलेली माणसे आहोत. काळ्या मातीचा व जुन्या स्मृतींचा गंध कधी लुप्त होत नाही. आयुष्यभर त्यांची साथसंगत तुम्हाला लाभते. कष्ट, संकटे आयुष्यभर झेलली पण त्याच बरोबर आमच्यावर खूप खूप प्रेम करणारी माणसेही मिळाली...

हातून जेवढे घडले तेवढे केले. बाबांच्या या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे.

 साधनाताई आमटे (‘समिधा’)

Monday 6 January 2014

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग ३)

Approach road हा बिल्डरच्या दृष्टीने शक्यतोवर टाळण्याचा मुद्दा होता. लोकं मात्र याबद्दल समाधानी नव्हते. मुळीक काकांनी कुठलाही आलाप न घेता सरळ द्रुत लय गाठली आणि बिल्डरला प्रश्न केला, “आमच्या सोसायटीच्या Approach road चं काय? कधीपर्यंत complete होणार? आत्ता उत्तर हवंय. बोला.” बिल्डरने स्वतःच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक चिन्ह उमटवले. जणू काही ह्याबाबत काहीच माहित नाही असा त्याचा अविर्भाव होता. विधातेंनी एवढ्यात त्याच्याशी कानात काहीतरी कुजबुज केली आणि तो बोलू लागला, “हे बघा, पहिल्या फेजचा आणि तुमचा रस्ता एकच ठेवलाय. अतिशय सुंदर रस्ता झालाय. पावलोपावली street lights आहेत. कडेला jogging track सुद्धा आहेत. हा point तसा मला गौण वाटतो.” हे ऐकून मुळीक काकांचा पारा चढला. “आम्ही आमच्या फेजच्या separate रस्त्याबद्दल बोलतोय. तो अजून तसाच आहे. तुम्ही फक्त गेट करून ठेवलंय. पक्का road कधी होणार?”, ते म्हणाले. तेलंग काकांनीही जोर लावला. “तो entrance मिळाला की आम्हाला येणं-जाणं सोपं होईल. We’re waiting for that actually.” बिल्डरचा चेहरा अजूनही expressionless होता. अपेक्षित response मिळत नसल्याचे बघून लोकांनी बिल्डरच्या दिशेने १५० च्या स्पीड नी pace bowling सुरु केली, ती अशी-

“प्रत्येक गोष्टीसाठी कटकट बुआ तुमची.”
“कुठल्याही परिस्थितीत आम्हाला हा रस्ता हवाय. बास.”
Do you really care for our convenience?
It was your selling point. आम्हाला flat घेताना हे सांगण्यात आलं होतं की हा तुमचा Approach road राहील म्हणून.”
“आणि सध्याचा common road किती विचित्र आहे. भूल-भुलैय्या. Design करताना तुम्हाला कळलं नाही का की रस्ता सोपा, सरळ हवा.”
“आमचे पाहुणे जेव्हा ह्या रस्त्याने येतात तेव्हा नावं ठेवतात...किती complicated रस्ता आहे म्हणून... प्रत्येकाला काही न काही उत्तर देऊन निभवावं लागतं.”
“जो वादा किया वो निभाना पडेगा, सर.” (वातावरणात कमालीचे गांभीर्य आले असल्याने या वाक्याला हशा किंवा प्रतिसाद मिळाला नाही.)
“तुम्हाला problem काय पण हा रस्ता तयार करून देण्यात?”
होणार... होणार... सुरुय तुमचं कधीपासून. पण कधी होणार? आम्हाला तर नातू पण झाला या वेळात.” (नाही म्हणायला इथे चार-दोन लोकं फिदीफिदी हसली.)
“खूप मागे लागावं लागतं तुमच्या साहेब.”
“सध्याचा road तर काहीच्या काही आहे. एवढे turns तर कोकणातल्या रस्त्यांना सुद्धा नसतात. RTO ला rent वर द्या हा रोड driving tests साठी. ते काही नाही. आम्हाला separate road हवाय.”

या प्रकारचा rapid-fire round बघून नाही म्हटलं तरी बिल्डर थोडासा हललाच.
“एक मिनिट. शांत... शांत व्हा... ऐका... please. हे बघा, आपल्या इथे आता 3rd फेजचे काम सुरुय. जो रस्ता तुम्ही म्हणताय तो सध्या त्या कामासाठी reserved आहे. तिथून जेसीबी, ट्रक्स वगैरे जातात. तुमच्यासाठी जर तो सुरु केला तर तुमच्या गाड्या खराब होतील. सतत धूळ असते त्या जागेत.” बिल्डरने ढालीसारखं हे वाक्य उच्चारलं.
चालेल. आम्ही धुळीत रखडलो तरी हरकत नाही...” एक जण आवेशात म्हणाला. हे ऐकून दुसरा मनुष्य त्याला हळूच आवाजात म्हणाला, “अरे काही काय... धुळीत रखडू म्हणजे काय? गाड्या धुवायला जागा दिली नाहीये बिल्डरनी. कोण साफ करणार रोजच्या रोज गाडी? आहे तो रस्ता ठीक आहे ना भाई.”
“अरे yes, हा पण point राहिलाय.”
पुन्हा बिल्डरला उद्देशून तो म्हणाला, “आणि हो... car wash साठी वेगळी जागा हवीय.”
हा मुद्दा तर बिल्डरने सरळ धुडकावून लावला. “That is impossible. एखाद्या ठिकाणी जागा करून जरी दिली तरी त्या जवळचे लोकं ओरडतील... त्रास होतो म्हणून. त्यामुळे हे शक्यच नाही. प्रत्येकाने आपली गाडी आपल्या parking मध्ये धुवावी.”

एवढ्या धुमश्चक्रीतही काही संदर्भहीन संवाद ऐकू आलेच-
“(फोनवर) Pole position काय आहे रे? काय?... वेटेल मागे आहे? Cover करेल रे तो... no doubt...chill मार.
“तू घरी जा बरं... आजी एकटी असेल. भुणभूण नको लावू इथे.”
“तो भारी खेळतो shares मध्ये... परवाच KYC चे shares विकले त्यानी.”
“(फोनवर) अबे लेका, तो काय अल्लाउद्दिनचा दिवा आहे काय?... घासला की पेटला !! रॉकेल नको !!”
“पंचमदा best होते... on कर ना Bluetooth...लगेच transfer करतो.”
इकडे रस्त्याबद्दल अजूनही आश्वासन मिळाले नव्हते. पण प्रश्नांचा भडीमार थांबत नसल्याचे बघून बिल्डर वैतागला होता. अखेर त्याने Approach Road चा मुद्दा मान्य करून तो रस्ता तयार करून देण्याचे कबूल केले आणि सभेत टाळ्यांचा कडकडाट झाला. MoM मध्ये ह्याची रीतसर नोंद झाली. महत्वाचे मुद्दे आता संपले होते. सभा संपायची वेळ तर कधीच उलटून गेली होती. तरीही बिल्डरने आणखी काही विचारायचे असल्यास विचारा असे सांगून लोकांच्या good books मध्ये यायचा प्रयत्न केला.

हंगामी समितीतल्या मान्यवर सदस्यांनी आपसांत चर्चा करून office garden बद्दल विचारणा सुरु केली.
“आम्हाला office पण करून हवंय. सगळे documents ठेवायला office लागेलच.”
“ते तर plan मध्ये असतेच. जागा देखील pre-decided आहे. लगेच काम सुरु करूया.”, विधाते म्हणाले.
आणि garden चं काय? झाडं तरी लावायला सुरु करा.” इति तेलंग काका.
“करूया की...”
मुळीक काका उत्तरले, “कधी? garden पूर्ण होईपर्यंत आमची पोरं मोठी होतील.” इथे अर्थातच जोरदार हशा पिकला. बिल्डर देखील माफक हसला. एवढ्यात कुणीतरी ‘आम्हाला मंदिर पण हवंय’ अशी मागणी केली. मंदिर बांधून दिलं तरी ‘रोज पूजा कोण करणार?’ अशी बिल्डरने defensive विचारणा केली. तेलंग काकांनी लगेच ‘मी’ असे उत्तर देऊन प्रश्न मिटवला. शैव, वैष्णव आणि शाक्त असे तिन्ही पंथ बाजूला सारत शेवटी प्रथमपूज्य गणपतीचे छोटे देऊळ बांधायचे असा ठराव मंजूर झाला. आतापावेतो बरेच ठराव मंजूर झाले होते. MoM चे कागद संपायला आले होते. चार तास सभा चालली. देशपांडे काकांनी कंटाळून एक पुडी सोडलीच, “सभेच्या समारोपाचा ठराव तेवढा आता मंजूर करा. मुंग्या आल्या पायांत बसून बसून.”

विधातेंनी माईक हातात घेतला आणि बोलू लागले, “आपण सर्व जण एवढ्या आपुलकीने इथे आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. MoM तयार आहे. एक copy हंगामी समितीकडे सुपूर्द करतोय आम्ही. तुम्ही कधीही बघू शकता. पुढच्या सभेची तारीख आता तुमची समितीच देईल. काहीही लागलं तरी आम्ही आमच्या office भेटूच. Thank you very much.”  विधातेंचे बोलणे संपताक्षणी अध्यक्षांनी भेट म्हणून ‘बिल्डर आणि मंडळींना’ अत्तराची एकेक कुपी भेट दिली. पुन्हा टाळ्यांचा कडकडाट झाला. तेलंग आणि पुरंदरे काकांनी MoM तपासून घेतले. कागदपत्रांचा गठ्ठा आपल्या हाती घेतला. सभा संपल्याची घोषणा झाली. अर्ध्याधिक लोकं पट्कन सटकायच्या तयारीत असतानाचा विधातेंनी परत माईक हातात घेतला आणि म्हणाले, “पलीकडे मला खमंग वास येतोय. Buffet is ready. न जेवता मुळीच जाऊ नका. जेवणाचा आस्वाद घ्या.”

पलीकडून खरंच पक्वान्नांचा सुगंध दरवळत होता. फुकट खायला मिळतंय पाहून बऱ्याच लोकांनी परतीचा प्रवास लांबवला. मी मात्र निघायच्या बेतात होतो कारण सिंहगड रोडवरची अभेद्य traffic फोडून मला कोथरूड सर करायचे होते. घरून फोन खणखणत होता. उशीर झालाच होता. ‘आत्ता निघतोय’ असे घरी कळवून मी निघालो. Community Hall च्या लॉंन बाहेर पडताच नेमके माझ्या सख्ख्या शेजाऱ्याने अडवले आणि खेचत पुन्हा आत घेऊन गेला.
अरे shift होशील तेव्हा होशील... आता जेवून घे. स्वतःच्या सोसायटीची मिटिंग होती ना... असाच चाललास काय!!” इति Mr. रामटेके... सख्खे शेजारी. त्याच्या आग्रहाखातर थोडेबहुत खाऊन मी तिथून finally बाहेर पडलो.

कागदोपत्री सर्वसाधारणअसलेली ही सभा खरतरं सर्वसाधारण नव्हतीच. मिटिंगला आलो तेव्हा सगळं अनोळखी होतं... नवी जागा... नवे लोक. परंतु आपल्यासारखीच गुण-दोषांनी संपन्न असलेली मजेशीर माणसं इथे राहायला आली आहेत हा विचार करून हायसं वाटलं. ह्यांच्या सहवासातच आता आयुष्य व्यतीत होणार आहे. आता गणेशोत्सवही इथे साजरा करायला मिळणार आणि अगदीच नळावरची नसली तरी मिटिंग मधली भांडणं सुद्धा अनुभवायला मिळणार. भावी जीवनातले सुख दुख्खाचे प्रसंग याच जागेत पिंगा घालत येणार हेही तेवढंच खरं. पुण्यात स्वतःचे घर होईल असे कधीच वाटले नव्हते पण अपेक्षांना छेद देणे हा तर नियतीचा अगदी आवडता खेळ आणि आपल्यासारख्या सामान्यांना तो कधी कळणार नाही हेच सत्य !! 

(समाप्त)

Thursday 12 December 2013

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग २)

Conveyance deed हा पराकोटीचा complicated आणि गूढ मुद्दा असतो. घराच्या किंवा सोसायटीच्या नावे जागा हस्तांतरीत करणे किंवा सरळ शब्दांत सांगायचे झाल्यास ‘मालकीची’ करणे हे बिल्डरचे खरंतर कर्तव्य असते पण इथेच ही लोकं आडमुठेपणा आणि टाळाटाळ करतात. जेव्हा जेव्हा या मुद्द्याची चर्चा होते तेव्हा बिल्डरकडे संशयाच्याच चष्म्यातून बघितल्या जाते. विधातेंनी या मुद्द्याला हात घालत शांत स्वरात बोलणे सुरु केले. ‘त्याचं कसंय की आपल्या इथे फेज-१ आणि फेज-२ अशा दोन्ही फेज साठी आता सोसायटी निर्माण झाल्या आहेत. यांच आता एक फेडरेशन होईल. विविध ठिकाणी या फेडरेशनचे आपल्याला registration करावे लागेल. असे ठरवण्यात आलेय की हे Conveyance deed या फेडरेशनच्या नावे करण्यात येईल. त्याचं कारण की दोन्ही फेज साठी एकच रस्ता वापरण्यात येतो... त्या road वरचे lights वगैरे हे common amenities मध्ये येतात. पुन्हा मार्किंग इत्यादी भानगडी असतात. त्यामुळे दोन Conveyance deeds वेगळे करण्यापेक्षा एकाच फेडरेशन च्या नावे करूया...’
हे ऐकून सभेत एकच गहजब झाला. ‘नाही...नाही’... ‘हे शक्य नाही’...’अमान्य आहे’... not done असे आवाज ऐकू येऊ लागले. विधातेंनी सगळ्यांना शांत बसण्याचे आवाहन केले पण कुणी ऐकण्याच्या मूड मध्ये नव्हते. थोडक्यात बिल्डरने बॉम्ब टाकला होता. शेवटी हंगामी समिती मधल्या एक-दोन लोकांनीच सभेला शांत करण्याचे प्रयत्न सुरु केले. ह्या घटनेचे संक्षिप्त रेकोर्डिंग येणेप्रमाणे-

‘मी म्हटलं होतं ना... हा आडी टाकणार.’
‘हे फार serious आहे बरं का देवकाते साहेब... आपल्याला सांभाळून आणि strategically पुढे जावे लागेल.’
Strategy गेली मसणात... direct सांगा जमणार नाही... सभेला अमान्य आहे म्हणून.’
‘अहो पुरंदरे वहिनी... आमच्या रोहिणीच्या बिल्डरनी पण केवढा वेळ लावला होता... बापरे... सगळे बिल्डर मेले सारखेच...आणि तिचं तर 4BHK Row House आहे.’ (प्रस्तुत वाक्य कानामात्रेसहित जसे च्या तसे इथे लिहितोय कारण हे मला edit करावेसे वाटले नाही... खासकरून “4BHK Row House...असते एकेकाची प्रवृत्ती... जाऊ द्या.)
‘(फोनवर) अगं सुनयना... मला वेळ होईल यायला बहुतेक... लांबेल ही मिटिंग... तुम्ही लोकं जाऊन या मिनेकडे.’
‘ये उल्लू बना राहा भाई अपनको. इसको तो accept करना ही नही किसीभी हाल में.
No..No..No
‘काय फालतुगिरी आहे राव...’
एक मनुष्य उभा राहून विधातेंना तार सप्तकात ओरडून सांगू लागला, ‘पुण्यात या घडीला ८५% Conveyance deed pending आहेत. आम्हाला आमच्या सोसायटीच्या नावे हे deed पाहिजे... फेडरेशन बीडरेशन आम्हाला माहित नाही.’
Finally गेम केलाच यांनी.’
‘तुम्ही reputed बिल्डर आहात... This wasn’t expected from you, sir.’
‘च्यामारी ... तुम्ही कशाला सर बीर म्हणताय त्याला.’ (एक खालच्या पट्टीतला स्वर)
‘काय झालं... काय म्हणाला हा विधाते Advocate? मी call वर होतो.’
(आजूबाजूच्या मोजून चार लोकांनी कपाळावर हात मारला.)
‘हे असंय... ह्याचं आपलं फोनवर वेगळंच deed सुरु आहे.’
Deed नाही, Deal चालू असेल... हाहाहाहा.’
‘निशा, समोरच्या लाईनीत ये ना... तुला ऐकू येतेय का तिथे?... important point आहे हा.’
‘मम्मीSSS... चल ना... भूक लागली ना.’

विधातेंनी सभेचा ‘राग’रंग बघून अखेरचा प्रयत्न म्हणून कारणे सांगायला सुरुवात केली, ‘Individual Conveyance deed द्यायचे झाल्यास Remarking करावे लागेल. तसा plan तयार करून submit करावा लागेल. हा वेळखाऊ प्रकार आहे...’. विधातेंचे बोलणे अर्धवट तोडत भाई तेलंग करारी आवाजात त्यांना उद्देशून म्हणाले, ‘अहो विधाते, कसलं demarcation? Plan sanction होतो तेव्हाच हे सगळं केलं जातं. दुधखुळे समजले की काय आम्हाला? म्हणे Remarking. स्पष्ट बोला.’ एव्हाना विधातेंची बोबडी वळली होती. ते पाहून बिल्डरने स्वतः माईक हाती घेतला.
बिल्डर ने गंभीर आवाजात बोलणे सुरु केले, ‘तुमचा रोष मी समजू शकतो पण ही सगळी कामं शक्य तितक्या लवकर complete व्हावीत एवढाच आमचा हेतू आहे. त्याकरीताच फेडरेशनच्या नावे deed करायचा विचार होता. शेवटी सर्व तुमचंच आहे. आम्ही हातचं राखून थोडीच काही करणार आहोत.’

तेलंग काकांनी उत्तरादाखल असे सांगितले की अजून दोन wings चे काम सुरुय. ते कधी होईल ते सांगता येत नाही. या तिसऱ्या फेज च्या completion नंतर समजा बिल्डरने फेडरेशन करायचे ठरवले तर सगळी कामं ‘अनिश्चित काळासाठी’ स्थगित होतील. ज्या दोन फेज पूर्ण झाल्या आहेत, त्यांची कामं मार्गी लागणे ही priority आहे.
बिल्डरचे ‘हो-नाही’ सुरूच होते. विविध प्रकारे तो लोकांना समजावयाचा प्रयत्न करत होता पण लोकांनी त्याच्या म्हणण्याला अजिबात भिक घातली नाही. अखेरीस बिल्डरला नरमाईची भूमिका घ्यावी लागली आणि प्रत्येक सोसायटीच्या नावे खरेदीखत करायचे ठरवल्या गेले.

MoM मध्ये लिहून घ्या... put it down on paper आणि वाचून दाखवा आम्हाला... शिंदे काका बघा बरं जरा काय लिहिलंय त्यांनी’, एक चतुर माणूस ओरडला. बिल्डर शेजारी बसलेल्या एकाने सगळे व्यवस्थित टिपले होते आणि ते त्याने हंगामी समितीतल्या काही सदस्यांना वाचून पण दाखवले. आमचा बिल्डर मुरलेलं जुनं लोणचं असल्याने त्याला या गोष्टींची सवय असावी. त्याच्या चेहऱ्यावर कुठलेच भाव उमटले नव्हते. लोकांच्या चेहऱ्यावर मात्र विजयश्रीचा आनंद ओसंडून वाहत होता. तेलंग काकांनी उगाच आपल्या भरगोस मिशीला पिळ दिले. झालं, एकदाचा समेट घडला. संसदेत मांडली असतात तसली बाकं तिथे असती तर या महत्वाच्या मुद्द्याला approval देताना खरोखर ‘आव्वाज’ झाला असता. आता लोकांचे टेंशन जरा कमी झाले होते. सभेतील वातावरण जरा निवळतेय असा भास होत असतानाच, मुळीक नावाच्या एका इसमानी आणखी एक ज्वलंत मुद्द्यात रॉकेल ओतले... Approach Road.


(क्रमशः)

Tuesday 26 November 2013

‘सर्वसाधारण’ सभा: (भाग १)

मागील शनिवारी भर दुपारी दाराची बेल वाजली. वामकुक्षीचा बोऱ्या वाजवायला आता कोण आलंय हा विचार करीत दार उघडलं. कुरियर होतं. नव्या flat च्या बिल्डर कडून पत्र आलं होतं. सोसायटीची नोंदणी झाली होती. ‘सहकारी गृहरचना संस्था मर्यादित’ असे बिरूद आता लागले होते. बिल्डरने पहिल्या सर्वसाधारण सभेचं आयोजन केले होते. नव्या सोसायटीच्या हंगामी समितीची स्थापना होणार होती. एकदा सोसायटी निर्माण झाल्यावर विविध बाबींची हस्तांतरण प्रक्रिया महत्वाची असते. एकूण प्रकार तसा क्लिष्ट असतो आणि तो समजावून घेणे आवश्यक असतं. त्यामुळे हजेरी लावणं क्रमप्राप्त होतं. सभेचं आयोजन पुढल्या आठवड्यात रविवारी करण्यात आलं होतं. दिवस सगळ्यांसाठी सोयीस्कर होता.

रविवारी नियोजित वेळेला पोहोचलो. सभेच्या ठिकाणी जाण्याआधी Club House मध्ये सहज डोकावून गेलो. TT टेबल आणि कॅरम बोर्डची भर पडलेली दिसली. जिम मध्ये देखील एखाद-दोन यंत्रांची संख्या वाढलेली होती. ‘चला, आता लवकर इथे राहायला यायला हवं’ अशी मनाशी खुणगाठ बांधत Community Hall जवळ आलो. त्याशेजारी एक मोठा लॉन आहे. तिथे खुर्च्यांची मांडामांड सुरु होती. शे-दीडशे खुर्च्या होत्या. गर्दी तशी नव्हतीच. कामगार वर्ग त्यांच्या कामात गर्क होता. सभासदांपैकी १०-१२ लोकं आली होती आणि एक ग्रुप करुन बसली होती. बिनओळखीचे चेहरे जास्त. पण एवढ्यात एक ओळखीचा चेहरा दिसला. पांडेजी... आमच्या बिल्डरचा हा उजवा हात. कुठलीही समस्या असेल तर हमखास पांडेजीनां फोन करा. हा माणूस ती समस्या सोडविण्यासाठी काहीतरी खटपट करतोच असा माझा तरी अनुभव आहे. ‘दबंग’ मनुष्य. ‘तोटीतून पाण्याची धार कमी येतेय’ इथपासून ते ‘अमुक ठिकाणचा power point बदलून तमुक ठिकाणी लावायचा आहे’ पर्यंत कुठलेही काम असेल; त्याकरीता पांडेजी हे Single Point of Contact. पांडेजीनां तीन-चार वेळा मी कामानिमित्त त्रास दिला असल्याने ते मला चांगलं ओळखतात. त्यांच्याशी हस्तांदोलन करून पुढे आलो. खुर्च्यांच्या रांगांसमोर सन्माननीय व्यक्तींसाठी छोटं स्टेज बनविण्यात आलं होतं. त्याच्याच उजव्या बाजूला माईक वगैरे करिता लागणारी यंत्रसामग्री ठेवली होती. Wires अजूनही अस्ताव्यस्त पडून होत्या. नेहमीप्रमाणे त्या wires मध्ये पाय अडकून मी अडखळलो. हे माझ्याबाबतीत नेहमीच घडतं. का ते कुणास ठाऊक !! अखेर तिसऱ्या रांगेतील एक जागा मी पटकावली आणि सभा कधी सुरु होते याची वाट बघत बसलो. अशा सभेला येणे ही काही माझी पहिली वेळ नाही. सध्या जिथे राहतोय तिथे सोसायटी मिटिंगच्या अनेक हिंस्र आवृत्त्या मी पाहिल्या आहेत. तिथल्या किस्से-कहाण्यांवर मी पूर्वीही लिहिले आहे. परंतु ही स्वतःच्या घरच्या सोसायटीची पहिली मिटिंग !! त्यामुळे वेगळाच उत्साह होता.

भारतीय परंपरेनुसार हळूहळू लोकं यायला सुरुवात झाली होती. थोड्या वेळात एक professional फोटोग्राफर आणि video shooting करणारा इसम अशा दोन व्यक्ती आत आल्या. हे नवीनच होतं. यांची खरंतर काहीच गरज नव्हती. ह्या मिटिंग चे Live Telecast तर होत नाहीयेना अशी धास्ती वाटून, मागे एखाद्या वृत्तवाहिनीची OB Van दिसतेय का, ते मी पाहू लागलो. पण तसे काही नव्हते. काही वेळाने पलीकडे ठेवलेल्या यंत्रसामुग्रीतून संगीताचे मंद (की सांद्र?) सूर ऐकू येऊ लागले. हे सगळं करण्यामागे नक्की कुणाचं डोकं याचा विचार मी करू लागलो. कारण सभेसाठी उत्तम arrangement करण्यात येत होती. ‘सवाई गंधर्वला’ आमचा बिल्डर sponsorship देतो म्हटल्यावर त्याच्यासाठी असं काही करणं ही क्षुल्लक गोष्ट असावी. बिल्डरच्या ‘व्यावसायिकतेला’ दाद देण्यापलीकडे पर्याय नव्हता. खरा धक्का तर पुढे होता. एव्हाना बरीच लोकं जमली होती. केवळ मागच्या काही रांगा रिकाम्या होत्या. मागून एक कामकरी पोऱ्या पुढे आला आणि एक एक करून प्रत्येकाच्या हातावर अत्तर लावू लागला. मला संगीत-नाटकाला आल्यासारखे वाटत होते. समोर कुणीतरी चकोर उभा ठाकून, ‘गुंतता हृदय हे कमलदलांच्या पाशी... हा प्रणयगंध परिमळे तुझ्या अंगाशी’ हे प्रासादिक नाट्यपद आता गाणार अशी खात्री वाटत होती. ‘आपण नक्की सोसायटी मिटिंगलाच आलो आहोत ना?’ याची एकदा खातरजमा करावी असे वाटू लागले कारण वातावरण एखाद्या समारंभाचेच होते. बिल्डरच्या Image Management’ चे कौतुक करावे तेवढे कमीच होते.

सुमारे अर्ध्या पाउण तासानंतर मान्यवर व्यक्तींचे आगमन झाले... निदान असे वाटत तरी होते. स्टेजवरील खुर्च्यांवर तीन-चार लोकं स्थानापन्न झालेली होती. माईक टेस्टिंग झाले. आणखी एक-दोन जणं आली... त्यांच्या हातात फाईल्सचा गठ्ठा होता... शिल्लक असलेल्या खुर्च्यांवर ती दोघं बसली. त्या मानाच्या खुर्च्यांमध्ये एक खुर्ची पांडेजींची होती हे वेगळे सांगायला नको. विशेष म्हणजे पांडेजी बिल्डरच्या ‘उजव्या’ हाताला बसले होते. हा निव्वळ योगायोग होता की त्यांची नेहमीची सूचक सवय ते मात्र माहित नाही. समोर बसलेल्या मान्यवरांमध्ये पांडेजी आणि बिल्डर हे दोघेच लोकांच्या ओळखीचे होते. इतर चेहरे परिचित नव्हते. इकडे जमलेल्या लोकांच्या आपापसात चर्चा, गप्पा वगैरे सुरु होत्या. माईकवरून आता hello..hello चे आवाज येऊ लागले होते. लोकांचा कोलाहल कमी झाला. स्टेजवर एक इसम हातात कागद घेऊन बोलू लागला. बिल्डरचा  Legal Adviser अशी त्याने स्वतःची ओळख करून दिली. सभेची आवश्यकता आणि प्रारूप सांगायला त्याने प्रारंभ केला. अटल बिहारी वाजपेयींपेक्षा याचे pauses मोठे असल्या कारणाने लोकांत चुळबुळ सुरु झाली. 
त्या pauses दरम्यान काही संवाद मला ऐकू आले ते असे-

‘याचा मराठीचा मेजर problem दिसतोय.’
‘अहो, मराठीच आहे. भाषेवरून सोलापूरचा वाटतोय.’
‘हा पाठ करून आलाय का?... सगळं विसरलेला दिसतोय.’
‘ह्याने Legal Adviser म्हणून इतकी वर्षं कशी काय नोकरी केली काय माहित !!’
‘अहो मला माहितीये हा... साधा माणूस आहे बिचारा...प्रामाणिक आहे... बोलताना सावकाश विचार करून बोलतो तो.’
‘ह्या... हा Advocate आहे असे वाटतंच नाही. एक केस तरी जिंकलाय का विचारा त्याला जरा... बावळट.’
‘जाऊ द्या हो... आपल्या कामाशी मतलब ठेवावा आपण... उगाच फाजील टीका काय कामाची.’
‘आम्ही काय बोलणार !! तुमच्या line मधला ना तो.’
‘(फोनवर) अगं, gas बंद केलाय का बघ जरा. मी आलेय खाली.’

या दरम्यान Legal Adviser Mr. विधाते शांतपणे, सभेपुढे प्रस्तुत असलेले मुद्दे एकेक करून समजावून सांगत होता. सगळ्यात अगोदर सहकार खात्याकडून मंजुर होऊन आलेल्या नियमांची माहिती तो सांगू लागला. आतापर्यंत जमा झालेला maintenance चा पैसा आणि बिल्डर ने केलेला खर्च यामध्ये तफावत आढळली. सगळा हिशेब त्याने सोबत आणला होता. लोकांची पुन्हा कुजबुज सुरु झाली. आज सभासदांची नवी हंगामी समिती स्थापन होणार होती. त्यासाठी विधातेंनी आवाहन केले की तुम्ही आधीच ठरवलं असेल तर यादी द्यावी अन्यथा लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्याची तरतूद आहे. हे ऐकून एक काका लगेच उभे राहिले आणि बोलू लागले... 
‘मी भाई तेलंग... आम्ही आमच्यात दोन-तीन मिटिंग घेतल्या होत्या. सर्वानुमते नावांची एक यादी अगोदरच बनवलीये.’ काका बहुतेक Retd. कर्नल असावे... झुबकेदार मिश्या, धिप्पाड शरीरयष्टी आणि आवाजातील जरब पाहून असेच वाटत होते. विधाते यादी वाचता वाचता कुठलेतरी एक-दोन मुद्दे मांडत होता. माझे लक्ष मागील रांगेतल्या लोकांच्या बोलण्यावर !! विधाते च्या long pauses दरम्यान मला ऐकू आलेले काही short संवाद असे-

‘तेलंग फारच dashing दिसतोय. हा माणूस हवा कमिटीत... कारण कसं आहे की बिल्डर च्या उरावर बसणारी व्यक्ती कमिटीत असणे गरजेचे असते.’
‘कसलं काय... काही लोकांना पुढे पुढे करण्याची सवय असते... show off.
‘अरे... तेलंग काका जबरी आहे...सांगतोय ते ऐक.’
‘पण आधीच कशी नाव ठरवली?... काही पत्ताच नाही... आपण पण दिली असती नावं.’
‘देशपांडे.. जरा नोटीस बोर्ड वाचावं... बोर्डात होते ना तुम्ही नोकरीला!!...हाहाहाहा.’
‘अहो, तुम्ही नाव द्यायला पाहिजे होतं.’
I’m too busy to handle these worldly affairs, you know.’


विधातेंनी सभेचा सूर पकडून असं जाहीर केलं की आणखी तीन नावं सुचवावी... मुख्यतः जे समोर बसलेले आहेत त्यांच्यातून !! एकूण १५ नावं हवी होती. देशपांडे काकांना उद्देशून त्यांचा बाजूचा म्हणाला- ‘आता chance आहे की तुम्हाला. तुमचं नाव सुचवतो.’ लगेच देशपांडे काका घाबरून म्हणाले,’नको...नको. जाऊ द्या. आता काही इच्छा नाही माझी. Next year बघू.’ जमलेल्या लोकांतून दोन काकू आणि एक काका अशा तिघांनी पुढाकार घेतला आणि स्वतःचे नाव नोंदवले. झालं... समिती गठीत झाली. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि कोषाध्यक्ष इत्यादी पदांचे वाटप झाले. पुढील एक वर्षासाठी ‘बिल्डर आणि आम्ही’ यांच्यामधील दुवा किंवा multiple point of contact हे १५ शिलेदार असणार होते. हंगामी संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले. टाळ्यांचा कडकडाट झाला. हास्याचे काही स्फोट झाले आणि तशातच विधातेंनी आपला मोर्चा पुढील महत्वाच्या व संवेदनशील मुद्द्याकडे वळवला... ‘खरेदीखत’... अर्थात conveyance deed’.

(क्रमशः)

Monday 21 October 2013

अजानवृक्षाच्या छायेत


‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या उक्ती प्रमाणे ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मी पदरात पाडून घेतले आणि माउलींच्या भक्तिरसात न्हाहून निघाल्याची चैतन्यमय अनुभूती झाली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि दिव्यतेने उजळून निघालेल्या त्यांच्या अलौकिक आयुष्याबद्दल, दोन ओळी देखील लिहिण्याची पात्रता माझ्यात नाही; हे पूर्णपणे जाणून प्रस्तुत लिखाण करीत आहे. ‘मोगरा फुलला’ ही विलक्षण कथा आणखी चार लोकांनी वाचावी एवढे सांगण्यासाठीचा हा केलेला अट्टाहास !! हे पुस्तक माझ्या हाती पडणे हा मी तरी एक शुभसंकेतच मानतो. ‘धर्म’ ह्या मानवनिर्मित संकल्पनेचा मूळ गाभा सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून सर्वत्र गोंधळाची व अविश्वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वयंघोषित बाबा आणि साधू लोकांनी सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. जन-मानसामध्ये निवास करीत असणाऱ्या नकारात्मकतेचे आणि भयाचे भांडवल करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सोय ह्या लोकांनी चतुराईने करून ठेवली आहे. ह्या एवढ्या पसाऱ्यात मोठ मोठी धार्मिक संस्थाने कशी काय मागे असणार? कुठलेही कष्ट न उचलता अमाप काळ्या पैशाचे ते धनी बनले आहेत. विविध राजकीय पक्षही धर्माची (आणि सर्वधर्मसमभावाची) पताका आम्हीच उंचावली आहे असे भासवीत आहेत. प्रत्येकवेळी विवेकाचा पराभव होत आहे. ‘स्व’त्व हरवलेल्या सामान्य माणसानी यातून कसा मार्ग काढावा यासाठी एकच तरणोपाय आहे आणि तो म्हणजे संत-साहित्याच्या ‘अभ्यासाचा’ व तद्नुसार आचरण करण्याचा... खासकरून ‘श्री ज्ञानेश्वरीचा’ !! महाराष्ट्राला संतांची आणि संत-साहित्याची विशाल परंपरा लाभली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ तर सर्व ग्रंथांचा शिरोमणी... कालातीत महाग्रंथ... ज्ञानदेवांच्या स्वानुभूतीतून, प्रज्ञेतून, प्रतिभेतून, ज्ञानातून, वाग्यज्ञातून, जाणीव-नेणीवेतून प्रसवलेला महाग्रंथ... नुसतं पारायण करून गंध, फुले वाह्ण्यासाठीचा नव्हे तर त्यात लिहिलेलं प्रत्यक्ष जीवनात आचरण्याचा. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात ते उगाच नाही.

‘मोगरा फुलला’ ही कहाणी त्या ज्ञानेश्वरीच्या राजमार्गाकडे नेणारी एक सुबक पाउलवाट आहे. गो. नि. दांडेकरांनी ही कादंबरी लिहून आपल्यासारख्यांचे एक प्रकारे पथ-प्रदर्शनच केले आहे. हे लिखाण पुन्हा आपल्याला त्या ‘ज्ञानियांच्या राजाची’ महती आणि गरज सांगून प्रकाशाची नवी कवाडे उघडी करते. ही गाथा आहे अवघ्या ब्रह्मांडाची ‘माउली’ झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची, त्यांच्या माता-पित्याची, त्यांच्या भावंडांची... त्यांनी सोसलेल्या अपरिमित हालअपेष्टांची... आणि ह्या सगळ्यांची आयुष्ये अगदी जवळून बघितलेल्या भट्टदेव व कावेरी या पात्रांची. सन्यस्त धर्माचे पालन करीत हिंडणारा भट्टदेव नावाचा जोगी आणि ज्ञानेश्वरांच्या मातेची सखी असलेली कावेरी ह्यांच्या मुखाद्वारे या कुटुंबाचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरांचे पिता श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीदेवी ह्यांचे पुर्वायुष्य, विवाहोत्तर कष्टप्रद जीवन, विठ्ठलपंतांनी धरलेली विरक्तीची कास, ‘प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडून मग परमार्थ साधावा’ असा त्यांच्या गुरूंनी दिलेला आदेश, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमाकडे परतताना विठ्ठलपंतांना करावे लागलेले प्रायश्चित्त, धर्मशास्त्री आणि पांडित्याचा टेंभा मिरविणाऱ्या ब्राह्मणांकडून कुळकर्णी कुटुंबाला वाळीत टाकणे, चार अलौकिक पुत्रांचा जन्म, श्री निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर जवळ अकल्पित व अद्भूतपणे प्राप्त झालेली ‘नवनाथां’तील श्री. गहिनीनाथांची दीक्षा व ईश्वरानुभूती, “मुलांच्या भवितव्याची काळजी असेल तर देहत्याग करावा लागेल” असा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीदेवीला ब्राह्मणांनी दिलेला आदेश, त्या दोघांचा देहत्याग, त्यानंतर उघड्यावर पडलेल्या चारही भावंडांची झालेली फरफट आणि वानवा, संन्याशाची पोरे म्हणून त्यांच्या वाटेला आलेला अपमान आणि घृणा, विपरीत परिस्थितीतही समाजाचेच हित चिंतण्याची ह्या भावंडांची वृत्ती, श्री सार्थ ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि माउलींच्या संजीवन समाधी पर्यंत प्रत्येक घटनेचे रसाळ आणि हृदयस्पर्शी वर्णन गो.नि. दांडेकरांनी करून ठेवले आहे.

‘मोगरा फुलला’ चे निमित्त होऊन कालच आळंदीला माउलींच्या भेटीला जाऊन आलो. वेगळ्याच प्रसन्नतेचा अनुभव आला. किती पवित्र जागा !! ७००-८०० वर्षं उलटून गेलीत. आजही माउलींच्या प्रेमापोटी लोक इथे भक्तिभावाने येतात... आणि यायलांच हवं. जातीपातींच्या कक्षेत गुरफटलेल्या समाजात सगळे भेदभाव विरून ज्ञानाची गंगा वाहती व्हावी आणि ‘मनुष्य धर्म’ वृद्धिंगत व्हावा यासाठी किती सोसलंय माउलींनी !! विद्वत्ता, कर्तुत्व, मान-सन्मान, अश्रद्धा, अहंम ह्या प्रवृत्ती त्यागून त्यांच्या चरणी लीन व्हावं. ज्या अजानवृक्षाखाली माउलींनी संजीवन समाधी घेतली त्याच्या छायेत क्षणभर विसावलो. नाना विचारांचे मोहोळ उठले—

सुवर्णपिंपळाखाली विराजमान असलेले ज्ञानदेवांचे कुलदैवत श्री सिद्धेश्वर महादेव कितीतरी प्रसंगांचे साक्षीदार असतील !! कशी असतील ही भावंड?... कसे असतील यांचे माता-पिता?... किती अवहेलना आणि अपमान सहन केला त्यांनी !! घरात अठरा विश्वे दारिद्र्य... वडील भिक्षा मागत... निरुपण, प्रवचन करीत... असल्या अवघड परिस्थितीतही चारही मुलांना या माता-पित्याने सांख्य, उपनिषद, वेदांतापासून ते तर्क, मीमांसा, भगवद्-गीते पर्यंत अध्यात्मशास्त्राच्या सगळ्या विषयात पारंगत केले... उत्तम संस्कार केले... त्यावेळी ग्रंथ उपलब्ध नव्हते... जे पाठ केले ते सांगावे लागे... माता-पित्याच्या देहत्यागानंतर कसे काढले असतील या मुलांनी दिवस?... उन्हातान्हात, थंडी-पावसात एवढीशी ही पोरं माधुकरी मागत हिंडायची... काय दिलं समाजानी यांना?... उपेक्षा... छळ... बहिष्कार... ब्राह्मण वर्गाने वाळीत टाकले यांना... का? तर धर्म भ्रष्ट होईल म्हणून !! हा कुठला धर्म?... कर्मकांड आणि तथाकथित ब्रह्मवृन्दांच्या अहंकाराला पोषित ठेवणाऱ्या रूढी यांच्या आहारी जाऊन धर्म, शास्त्र आणि नीती च्या गफ्फा मारणाऱ्या ब्राह्मण वर्गाने केवढे मोठे पातक करून ठेवलेय... ती पोरं भिक्षा मागायला आलेली असताना ही लोकं त्यांच्या झोळीत शेण, कचरा इत्यादी टाकत असत... कुठलीही प्रतिक्रिया न देता, शांतपणे समस्त जनांच्या कल्याणाची कामना करीत ही पोरं पुढे चालू लागत... ह्या सगळ्याचा विचार करता करता, मन विषण्ण झाले. ज्या पापाला कुठलेही प्रायश्चित्त नाही असे काम आमच्या पूर्वजांनी करून ठेवले आहे हे खेदाने सांगावेसे वाटते... ह्यांचीच पापं आम्ही आता धुवत आहोत का?... खरोखर संताप येतो... बरीच लोकं संपूर्ण कुळातील मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी वगैरे भव्य-दिव्य असे अनुष्ठान, पूजा-अर्चा, भंडारा वगैरे करतात... मनात एक असा प्रश्न उपस्थित झाला की, का म्हणून ‘अशा’ पूर्वजांसाठी वेळ वाया घालवायचा? महाराष्ट्राचा गेल्या हजार वर्षांचा इतिहास बघता; सोवळे ओवळे, जेवणावळी, मिथ्याहंकार, रूढी, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद अशा भ्रामक कल्पनांमध्येच ब्राह्मणांनी आपल्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या आहेत...
माउलींनी मात्र अशा खल प्रवृत्तीच्या लोकांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या ठायी सत्कर्म करण्याची इच्छा होओ ही प्रार्थना करून त्यांना क्षमा केली आहे. ‘माउलीच’ ती !!

ही कादंबरी वाचता वाचता बरेच ठिकाणी थबकलो... एक प्रसंग असा--
समाजाने वारंवार ज्ञानदेवांच्या माता-पित्यास निंदिले... एके दिवशी क्षुब्ध होऊन ज्ञानदेवांनी कुटीची ताटी लावून घेतली आणि ते आसनस्थ झाले. काळजीपोटी निवृत्तीनाथ कुटीबाहेर येरझरा घालू लागले... तेव्हा मुक्ताईने ताटीचे अभंग म्हणून ज्ञानदेवांची समजूत घातली... “योगियांचा योगी तू... ज्ञानियांचा ज्ञाना... तू का म्हणून स्वतःस क्लेश करून घेत आहेस?”
ती भरभरून गाऊ लागली--
                               योगी पावन मनाचा |
                               साहे अपराध जनांचा ||
                               विश्व रागे झाले वन्ही |
                               संती सुखें व्हावे पाणी ||
                               शब्द-शस्त्रें झाले क्लेश |
                               संती मानावा उपदेश ||
                               विश्व पट, ब्रह्म दोरा |
                               ताटी उघडा ज्ञानेश्वरां ||

केवढीशी ही मुलगी !! आपल्या थोरल्या भावाला समजावत त्याला सांत्वनपर, प्रेमळपणे उपदेश देत आहे. कुठून स्फुरले तिला हे?... केवढी ही प्रगल्भता !! हा केवळ प्रतिभेचा अविष्कार नाही... हे स्वयंभू असे संचित आहे... आणि त्याचे उदात्त आणि सुंदर प्रकटीकरण आहे. हे कल्पनातीत आहे... कुठल्याही तर्काच्या आणि बुद्धीच्या तराजुतून हे तोलता येत नाही... प्रज्ञा, मेधा, प्रतिभेच्या पलीकडील आहे हे सर्व... ती म्हणतेय, ‘विश्व पट, ब्रह्म दोरा’... अचानक Quantum Physics मधील ब्रह्मांडाचे कोडे सोडवायच्या प्रयत्नांत असलेल्या String Theory व त्या निगडीत framework ची आठवण झाली... आश्चर्यकारक अशी analogy... ७००-८०० वर्षांपूर्वी एवढे गूढ सत्य ही छोटीशी मुलगी बोलून जाते... काय म्हणावं याला?... पृथ:करण करणे आपल्या क्षमते बाहेरचे आहे !!

आणखी एक प्रसंग... निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जेव्हा संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांसाठी मुक्त करण्याचा आदेश देतात तो प्रसंग किती सुरेखपणे वर्णिला आहे !!
भोवताली जनसमुदाय. ज्ञानेश्वर निरुपणास सुरुवात करतात... मनुष्यात विद्यमान असलेल्या सामर्थ्याचे ते वर्णन करतात--
“जन्म मृत्युरूपी चक्रावर घातीलेले हें मृतीकापात्र- आगी लागल्यावरी ज्याची चिमुटभरी राख होवोन आकाशी उधळते- ऐसें हे शरीर-
मात्र त्यातील “प्रज्ञा”-
जिच्यामध्ये ब्रह्मांड कव घालायचे सामर्थ्य !
केवळ तिच्या बळावरी आकाशींच्या नक्षत्र तारकांचे वेध घेता येताती-
पृथ्वी म्हणजे काय... आप म्हणजे काय... तेजाचे रूप काय... वायू कैसा, केवढा?
हे सर्व आकळण्यायेवढा ज्या बुद्धीचा आवाका-
तिणे या आवघ्यातून थोर जो परमात्मा- त्याचे ध्यान काय म्हणोन न करावे?
मत्त गजास आकळण्याचे ज्याचे अंगी सामर्थ्य, त्याने मुखावर घोंगावणारी मुरकुटे काय मारीत बैसावे?
साती सागर पैल जाण्याऐसा जो बळीवंत त्याने थिल्लरातं काय म्हणोन तृप्तता अनुभवावी?
दाही दिशा ओलांडण्याची शक्ती ज्याच्या पंखांमध्ये त्याने येका पिंजऱ्यात काय म्हणोन संतुष्ट असावे?
जो सगुण आणि निर्गुणही आहे-
जो साकार आणि निराकार-
जो सूक्ष्म आणि स्थूल-
जो दृश्य आणि अदृश्य- किंबहुना जो परेपलीकडला, तो जर भक्तीमुळे वश करिता येतो, तर काय म्हणोन करू नये?”
अमोघ वाणी... ज्ञानामृत.

असेच एकदा, पंढरीच्या ‘नामदेव’ नामक वेड्या विठ्ठलभक्त भेटीला माउली स्वतः तिथे गेली... त्यास काही गुज बोलावयास.
ज्ञानदेव म्हणाले, “नामा, कुणीही कर्म त्यागू नये. देव, तीर्थयात्रा, भजन हे जाणत्याने सांडो नये. तीर्थयात्रा केल्याने प्रवास घडतो. जनलोकांचे कळते. कष्ट सोसावे लागताती. तितिक्षा अंगी बाणते.”
नामा म्हणाला, ”देव सर्वत्र येकच. हा पंढरीशच नानां रूपे नटला आहे. तीर्थयात्रेसी येवोन मी काय करू?”
“पण हे ध्यानी येण्यासाठी ती नानां रूपे डोळेभरी पाहिली पाहिजेती. ती अवलोकील्याविना त्याचे व्यापकपण नेटके ध्यानी-मनी येत नाही”.

संत नामदेवांचा अर्धवट डूचमळणारा कुंभ माउलींना पुर्ण भरावयाचा होता. 

‘देव सगळीकडे आहे’; पण हे नुसतं बोलून कसं भागेल !! 

विविध क्षेत्रांचे तीर्थाटन, तिथल्या दैवतांची, लोकांची नाना रूपे, विविधता, सहवास, कथा, श्रवण-कीर्तन हे अनुभवल्याशिवाय ही उक्ती सार्थ होत नाही. एकाच फळाच्या जशा वेगवेगळ्या प्रजाती आणि प्रत्येकाची वेगळी चव... तसेच हे आहे. प्रत्येक जागेचे एक स्थान-महात्म्य असते... एक इतिहास असतो... तो प्रवास, तो अनुभव गाठीशी बांधणे हे महत्वाचे असते. ‘वारी’ या संकल्पनेचे हेच मूळ आहे.

असे कितीतरी प्रसंग... कितीतरी घटना...
ज्ञानावर श्रद्धा ठेवून, ज्ञानोपासना करून, भक्तिमार्गाचे दीप प्रज्वलित करून अंतरीचे ‘स्व’त्व जाणून घ्या आणि विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवा असा मोलाचा उपदेश माउलींनी आपल्या सगळ्यांना दिला आहे.
ज्ञानेश्वरीची सांगता करताना माउलींनी एक मागणं मागितलं... आपले गुरु असलेल्या विश्वेश्वररुपी श्री. निवृत्तीनाथांना. ही नुसती प्रार्थना नव्हे... नुसतं मागणं नव्हे, तर एक प्रसाद... फक्त तुमच्या-आमच्या कल्याणासाठीचा नव्हे, तर ‘विश्वकल्याणाचा’...

                        ‘दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
                         जो जे वांछील, तो ते लाहो | प्राणिजात ||’

त्या विश्वात्मक निवृत्तीनाथांनी तात्काळ ‘हा होईल दान पसाओ’ असा आशीर्वाद देऊन ‘पसायदान’ सिद्ध केले.
‘पसायदान’... हाच तो मनुष्याला अभिप्रेत असलेला खरा ‘धर्म’... व्याख्या, रूढी, नियम, कर्मकांड व तत्वप्रणालीच्या निरुपयोगी परिघाला छेदून दशांगुळ उरलेला...
या व्यतिरिक्त उदात्त आणि निर्मळ असं काय असणार? काही नाहीच.
सत्य, शिव आणि सुंदरतेचे हेच ते ‘ज्ञानेश्वरीय’ अधिष्ठान.

आणखी काय बोलावें?
‘कहाणी मागची कहाणी’ या पुस्तकांत गो.नि. दांडेकर ‘मोगरा फुलला’ बद्दल सांगतात--
“अठराव्या वर्षी मी आळंदीस गेलो. तेथें अडीच वर्षे माधुकरी मागून राहिलो. त्या परमपित्याच्या छत्राखाली मी विसावलो. अन्याया विरुद्ध झगडावं, सत्याग्रह करावा, कारावास भोगावा, ही प्रेरणा मला ज्ञानदेवांनी दिली. हातून अनेक अपराध घडले; पण ज्ञानेश्वरीचं विस्मरण झाले नाही. अशी ज्ञानेश्वरी माझं सर्व अस्तित्व व्यापून दशांगुळ उरली आहे. अगदी बाल्यदशेत या मायबोलीला एक मधुर स्वप्न पडलं. त्याचं नावं ‘ज्ञानेश्वरी’. जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत ती या, अतिशय सोसांव लागलेल्या ‘लहानग्याच्या’(ज्ञानदेव) ऋणांत राहील.
मी वारकरी. मजवरचं ज्ञानदेवांचं तत्वज्ञान विषयक ऋण न फिटण्याजोगं आहे. अत्यंत उदार, सर्व समावेशक, कुणाचाही द्रोह न करणारा आणि प्रसंगी प्राणांची बाजी लावणारा असा हा धर्म- असं तत्वज्ञान. त्याचा आदिगुरु ज्ञानदेव आहे. त्यांचं आणखी एक ऋण आहे. आपलं नियोजित काम संपताक्षणी उठून बाजूला सरावं, तिथे रेंगाळू नये, हे ज्ञानोबांनी शिकवलं.
अशी ही ऋणं सांगू तरी किती? ती अंशतः फिटावीत, म्हणून मी ‘मोगरा फुलला’ लिहिली. तो दीड महिना माझा मी नव्हतो. एका तंद्रेंत होतो. झपाटल्यासारखा लिहित होतो. दुसरं कशाचं भान नव्हतं. ‘मोगरा फुलला’ हे एका अर्थें देवकृत्य आहे.”

मराठी सारस्वतात याहून सुंदर, लयबद्ध आणि भावोत्कट गद्य-लिखाण कुणीही केलं नाही आणि कुणी करणारही नाही. गो.नि. दांडेकर लिखित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मराठी साहित्याचा कळससाध्य असा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे. ज्ञानदेवांच्या आई-वडिलांच्या विवाहा आधीच्या जीवनापासून ते ‘माउलींच्या’ संजीवन समाधी पर्यंतचा हा प्रवास केवळ ‘कादंबरी’ न राहता खरोखर ‘अमृतानुभव’ होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, परस्परांमध्ये ‘मैत्र जीवांचे’ जडण्यासाठी आणि लोकोद्धारासाठी ज्ञानदेवांनी ‘गुरु’रुपी विश्वात्मक विश्वेश्वराला पसायदान मागितले होते... त्याचे स्मरण करूनच; ‘मोगरा फुलला’ लिहून ‘गोनिदां’नी मराठी भाषेला अमूल्य साहित्याचे असेच एक दान दिले आहे. हे पुस्तक वाचून मनात पहिल्यांदाच कधी नव्हे ती ‘कृतार्थतेची’ आणि ‘धन्यतेची’ भावना दाटुन आली. कुठलेही पुस्तक वाचताना या आधी असे झाले नव्हते आणि पुढे होणारही नाही... कारण आता ‘अजानवृक्षाच्या छायेत’ मन अभुतपूर्व तृप्ततेने व समाधानाने भरले आहे. अधिक सांगण्यासारखे काहीच नाही... जे आहे, ते शब्दांपलीकडले आहे. ‘ज्ञानियांचा राजा’ या अभंगात श्री. तुकोबाराय जे म्हणतात ते स्मरून समारोप करतो.
                                   
                                    “मज पामरासीं काय थोरपण,

                                    पायींची वहाण, पायीं बरी |”



(संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी)