Sunday 23 February 2014

वेचलेली फुले…



विस्मृतीच्या अंधारात चालताना मनावरचे मळभ कधीतरी अचानक दूर होते. काळोखाच्या सावल्यांतून दूरवर स्मृतींचे दीपक खुणावू लागतात. पाणावलेल्या पापण्यांच्या कडांशी प्रतारणा करणारे शब्द वैरी होतात, ते सैरावरा धावतात. त्यांच्या शिस्तबद्ध रांगा लागत नाहीत. मन आक्रंदू लागते. क्षणभंगाने आठवणींचे तरंग विरतात व परत सारे स्तब्ध होते. स्मृतींच्या हिंदोळ्यावर झुलताना जे हाती गवसले ते तुमच्या समोर ठेवित आहे. जे विस्मृतीच्या गर्तेते गेले ते प्रभूचे देणे होते. त्याचे त्यानेच सव्याज परत नेले...

आज आयुष्याच्या सोनेरी संध्याकाळी आम्ही नर्मदेच्या कुशीत विसावलो आहोत. विवाहाच्या मंगल वेदीवरील सप्तपदीतून सुरु झालेली ही वाटचाल आम्हांवरील, आमच्या कार्यावरील सर्वांनी केलेल्या निखळ-निर्व्याज-अकृत्रिम प्रेमाने भिजलेली आहे. आपणा सर्वांच्या सद्भावनांच्या प्राजक्ताची फुले त्यावर विखुरलेली आहेत. बाबांचा वेग आणि आवेग आयुष्यभर सांभाळल्यावर आज मागे वळून पाहताना युवक-युवतींच्या समुदायांचे पदरव या वाटेवर गुंजन करताना कानी पडत आहेत. हा श्रमसाफल्याचा क्षण आहे... तशी आम्ही सामान्य माणसेच – माणूसपणाच्या सर्व तृटी असलेली पण कार्यावरील निष्ठेच्या सद्गुणांचा देवस्पर्श झालेली, वाटचाल करीत आहोत. आमचे जीवन हे कष्टायन आहे. आम्ही मातीशी नाते जोडलेली माणसे आहोत. काळ्या मातीचा व जुन्या स्मृतींचा गंध कधी लुप्त होत नाही. आयुष्यभर त्यांची साथसंगत तुम्हाला लाभते. कष्ट, संकटे आयुष्यभर झेलली पण त्याच बरोबर आमच्यावर खूप खूप प्रेम करणारी माणसेही मिळाली...

हातून जेवढे घडले तेवढे केले. बाबांच्या या समर्पित जीवनयज्ञातील एक लहानशी समिधा हेच माझे स्थान आहे.

 साधनाताई आमटे (‘समिधा’)