Tuesday 23 July 2013

चांभार चौकशी

मॉन्सूनच्या काळात शहरामध्ये ‘पावसाच्या थेंबओल्या खुणा’ शोधायचा माझा (साहित्यिक) प्रयत्न बरेचदा फसला आहे. हा नाद मी आता सोडून दिला आहे. ‘सकाळी ऑफिसला जाताना पाऊस असेल का?’, ‘परत येताना traffic jam मुळे घरी जायला आज किती उशीर होणार?’, ‘weekend पावसाच्या पाण्यात वाहून तर नाही जाणार?’, ‘पावसामुळे आवश्यक ती कामं अपूर्ण तर नाही ना राहणार?’, ‘बाहेरचं काही खाल्याने पोट तर नाही ना बिघडणार?’ असले (अरसिक) प्रश्न आणि शंका कितीही नाही म्हटलं तरी मनात डोकावतातच! ‘पाऊस कधीचा पडतो...झाडांची हलती पाने’ अशी कविवर्य ग्रेस ह्यांची एक सुंदर कविता आहे. आजकाल पावसाची सतत सुरु असलेली रिपरिप बघता, ‘कधीचा पाऊस पडतो’ असे कंटाळून म्हणावेसे वाटते... परंतु याला इलाज नाही. तद्दन शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनोविश्वाचं हे पावसाळी प्रतिबिंब आहे. सुरुवातीच्या काळातला मृद्गंध श्वासात भरून घेणे, निळ्या नभात ढगांची चादर ओढली जाताना बघणे आणि फार फारतर weekend ला बाहेर पाऊस पडत असताना, कॉफीच्या झुरक्यासोबत ‘मल्हारातली’ प्रथितयश गायकाची एखादी बंदिश ऐकणे; एवढीच काय ती शहरातल्या पावसाळी सुखाची अनुभूती! इतरवेळी पाऊस म्हणजे अडथळाच! आणि या दिवसांत मला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटत असेल तर ती म्हणजे रस्त्यावर चालत असताना नेमकी चप्पल तुटणे किंवा हवेचा जोर सहन न झाल्याने छत्रीने स्वतःचा आकार बिघडवून घेणे. एकवेळ रेनकोट घरी विसरल्यामुळे भिजलेलं परवडेल पण नको त्या ठिकाणी, अवेळी चप्पल आणि छत्रीने दगा देणे मला नाकबूल आहे. हे प्रसंग ओढवले म्हणजे चेहरा खाड्कन उतरतो !!

मागच्या आठवड्यात चपलेनी धोका दिला. नशीब मी घराजवळ हिंडत होतो त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक चांभार बसतो. दोन छोटे बांबू आणि कम्पौंड च्या सहाय्याने त्यांना बांधलेला प्लास्टिकचा पत्रा एवढाच काय तो त्याचा जामानिमा. चपला-जोडे दुरुस्त करावयास लागणाऱ्या साहित्याची portable पेटी वेगळी. आतापावेतो चप्पल तुटण्याचा प्रसंग घराशेजारी न आल्याने त्या चांभाराच्या वाटेला जायची वेळ अद्याप आली नव्हती. तसेही माझ्या राशी-स्वभावानुसार मी आसपासचे दुकानदार, वाणी, मेडिकलवाला, भाजीवाला, धोबी ह्यांच्याशी गरजेपेक्षा जास्त संवाद साधल्याचे मला स्मरत नाही. चांभाराशी उगाच बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर समोरच्या दुकानदाराचे ‘नुकतेच’ लग्न कधी झाले आणि त्याच्या अनुपस्थितीत दुकान सांभाळणारी त्याची बायको गळ्यात कुठले दागिने घालते ह्याची देखील माहिती असते. ह्यांना दुसऱ्यांच्या बायकांमध्ये फारच इंटरेस्ट. घोर कलियुग!! माणसाची नजर कशावर खिळेल ह्याचा नेम नसतो. आमच्या सोसायटीतल्या त्या व्यक्तीही ‘दिव्य’ आहेत!!

तर त्यादिवशी एकदाचा पाय फरफटत कसाबसा त्या चांभारापाशी पोहोचलो. तो कामात गुंग होता. मान वर करून पाहायला त्याने मोजून एक मिनिट लावला. मी रीतसर चप्पल सोपवली.
‘वेळ लागंल भाऊ’ असं सांगून तो गप्प झाला. किती ते सांगितलंच नाही.
मी विचारलं ‘किती वेळ?’
‘अर्धा पाउन तास’, तो उत्तरला.
‘कुठं राहता?’, त्याचा लगेच प्रश्न.
‘इथेच... पाठीमागच्या बिल्डींगमध्ये’, मी.
‘या जाऊन निवांत’, तो म्हणाला.
‘असू द्या... थांबतो’, माझे उत्तर.

घर मागेच असूनही चिखल तुडवत अनवाणी जायची माझी काही इच्छा झाली नाही. बिना चपलेचं फिरणं जीवावर आलं होतं. इतका वेळ आता करायचं काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. तिथेच उभं राहून timepass करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. खिशातून मोबाईल काढून twitter चे updates आणि whatsapp चे मेसेजेस चेक करावे असा विचार मनात आलाच होता की एका (“भाऊ, तुमच्यासाठी कायपन” छाप) दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवून, गाडी थांबवत त्या चांभाराला हाक मारली.
‘ओ आढळराव, जमलं काय?’
‘सगळं जमते आण्णा... हे घ्या’ असे म्हणत त्याने polish लाऊन चकचकीत केलेले जोडे त्याच्या स्वाधीन केले आणि कामाचे पैसे घेतले. दुचाकीस्वार भर्रकन निघूनही गेला. चांभाराचे नाव आढळराव असल्याचे समजले. मग आढळरावांनी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली.
‘हा आपल्या नगरसेवकाचा बारका भाऊ... गाडी हाकत फिरत आसतो गावभर... काम ना धंदा... हे राजकारनी लोग सगळे एक जात... गळ्यात चैनी घालून फिरायचं नुसतं... स्वतःचं थोबाड बेकार असूनही पोस्टर चढवतात... काय म्हनावं आता!! आन मला तर वाटते ह्यांच्या घरात एवढा पैसा असेल का ही लोकं आंगनात झोपत असतील’, असं म्हणून ते जोरात हसायला लागले.

पुढचा प्रश्न मला उद्देशून होता.
‘कधीपासून राहता दादा इथं?’
‘झाले ४ वर्षं या एरियात’
‘हितले बरेच गिऱ्हाईक हायेत आपल्याकडं... सगळे हिकडं येतात... आपलं कामंच हाय तसं... थोडीशिबी चूक व्हत नाय... आन आपल्याला आख्खी माहिती हाये इथली... आत्ताच तुमच्या समोरच्या बिल्डींग मधला flat गेला... ऐंशी लाख... रेट तर आसले भिडलेत ना सध्या आभायाला... काई विचारू नका... तुमचं घर स्वतःचं की भाड्याचं?’
'भाड्याचं आहे... पण shift होऊ काही महिन्यात सिंहगड रोडला', मी पुस्ती जोडली.
'तिकडं घेतला काय flat?... तसा तो एरिया शहरातच आलाय आता... एकेकाळी जंगल व्हतं... आता पुन्यात मानसंच येवढी वाढतायेत भसाभसा... त्याला कोन काय करनार. हितं जमवायला पाहिजे व्हतं... C विंग मध्ये होता ना flat एक... ४५ लाखात गेला फक्त... मालक पंजाबी होता... रग्गड पैसा... अर्जंट मध्ये विकायचं होतं घर... हातोहात गेला flat तीन दिवसांत... तुमची चप्पल तेव्हा तुटली असती तर पत्ता लागला असता याचा माझ्याकडून... सौदा पक्का झाला असता... कोथरूडला ४५ लाख... कोन सोडते!... डोळे झाकून घ्यायचा item होता न राव'.
योग्य वेळी चप्पल तुटायला देखील भाग्य लागतं हे मला कळून चुकलंय.

‘तुम्ही कुठे राहता?’, मी विचारले.
‘पाच मिनिटांवर... सुतारदरा... म्हनून तर सगळी माहिती असते आपल्याला.’
आढळराव तसे सुदृढ. पावणे-सहा फुट उंची असावी. भरघोस मिशी. बसके नाक. कपाळावर हलक्या हाताने काढलेले उभे गंध. हातात तांब्याचे कडे. कुर्ता, पायजमा आणि टाळ मृदंगाने नटविल्यास थेट वारकरी शोभेल असे व्यक्तिमत्व. वय जवळपास पंचेचाळीस असावे. थोडक्यात, रेखाटनासाठी उत्तम caricature material !! माझ्या डोक्यात रेखाचित्रांची जुळवा-जुळव सुरु असताना गावठी वळणाचे म्हातारबुवा आणि एक म्हातारी तिथे अवतरले. मी भानावर आलो. त्या म्हातारीची चप्पल तुटली होती.
‘जोडून दे बरं दादा जरा हे... किती घेशील?’, म्हातारीने आढळरावास विचारले.
‘चाळीस रुपये’.
‘चाळीस?... काहीपन सांगतोय... नवी घेते मी चप्पल’, म्हातारी जरा उखडली.
‘ओ आजी... चाळीस रुपयात चप्पल येते काय कधी? शंभरच्या खाली येत नाही नवीन... कुठंपन जा’.
‘एक नग तर येईल... एकंच घेईन... कोन बघतोय म्हातारीच्या पायाकडं’, म्हातारीचं लॉजिक!!
‘आजीsss, निसती एक चप्पल कुनी विकल का?... उगा वाद करतीय... जाऊ दे, आन हिकडं’, आढळरावांच्या कपाळावर एव्हाना आठ्या पडायला सुरुवात झाली होती.
‘हां... राह्यलं आता ... आला मोठा’, असे फटकारत म्हातारी तरातरा निघून गेली. म्हातारबुवा तिच्या मागून काही न बोलता चालू लागले.
‘हे असंय बघा यांचं... शिस्तीत सांगाव तर आपल्यावर ओरडतात. लई येतात असे गिऱ्हाईक... रोजचं हाय हे’.
आढळराव पुन्हा नॉर्मल झाले आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

‘मी काय म्हनत होतो... कुनी दोस्त बिस्त किंवा ओळखीतल्या मानसाला rent वर flat बीट पाहिजे आसल ना तर बिनधास्त सांगा मला... आपले हायेत contacts. लोड नाई... आनी कसंय आपलं मानुस असलं म्हंजे फिकीर नाई. पोरं-पोरी नको. family पाहिजे. कमीजास्त करता येते deal च्यावेळी... नाई का !! बिल्डींग मध्ये पोरंपोरी आसली की सगळ्यांना tension. आता ती दोन फेमस कबुतरं ठाऊक असतीलच तुम्हाला’.
मी विचारात पडलो. एकतर कोथरूडच्या भागात कबुतरं भरपूर. खिडक्यांवरच्या टीन शेड्स वर कायम वास्तव्यास असलेली. आढळराव अचानक कबुतरांच्या मागे कसे काय धावू लागले ते काही कळेना. मी म्हणालो, ‘कुठली कबुतरं?’
‘दादा, ती नाय का पार्किंग मध्ये गुलुगुलू गप्पा मारीत बसतात दिवस-रात्र... त्रास नाई होत लोकांना?...कळायला पाहिजे आपन कुठं हाओत... काय करतोय... कशाची चाड नाय. परवा तर लई खेटून उभी व्हती दोघं. काय म्हंजे पोरं आजकालची...आन तेबी काय करनार!!...सारं जगच डान्स बार झालंय’.
आढळरावांची ही गुगली समजायला मला वेळ लागला पण नंतर tube पेटली.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही दोघं college going हीर-रांझा सतत बोलत बसलेली असतात. याबद्दल आढळराव सत्य तेच सांगत होते. त्यांना हे कळलंय म्हणजे या प्रेमीयुगुलाची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली असेल ह्याचा मी अंदाज बांधित होतो. आमच्या बिल्डींग मधली लोकं कुठवर झेंडे गाडतील हे सांगणे अवघड आहे.

आढळरावांची बडबड चालूच होती... आणि चप्पल दुरुस्तीचे कामही. मध्येच काहीतरी गुणगुणणे सुरु होते. एकदम मला विचारलं, ‘माहिती हाये का हा अभंग?’
‘कुठला?...नीट ऐकू नाही आला’, मी.
“सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे... “
राजकारण, Real Estate व प्रेमप्रकरणा वरून एकदम अभंगात त्यांनी gear shift केल्यामुळे मला तात्विक धक्का बसला.
‘तुमचं चांगलं पाठांतर दिसतेय’, मी उगाच म्हणालो.
‘हां मग... वारकरी आम्ही तसे... पनजोबा पासून वारी करायची परंपरा सुरु झाली घरी... कुनी ना कुनी दरवर्षी वारी करतोच... ह्या खेपेला मोठा भाऊ गेला व्हता’.
त्यांनी म्हटलेला तो अभंग कुणाचा आहे ते मला माहित नव्हते पण काही विचार करण्याआधीच आढळरावांचे न थांबणारे विलक्षण निरुपण चालू झाले.

‘कसंय माहितीये का... संत महंत खूप काई सांगून गेलेत... आपल्याला कुठं वेळ आसतो खोलात शिरायला... डोक्यात निसते पैशाचे विचार... मी म्हनतो मानसानं नेटका प्रपंच करावा. गरजूस जमल तेवढी मदत करावी. उगा वाह्यात गोष्टींवर पैसा खर्च करन्यापेक्षा जमा करून ठेवावा... अडीअडचनीला कामी येतो मग. हाये ती जबाबदारी प्रामानिकपने पार पाडावी. कमी जास्त तर नेहमीचं असते आयुष्यात... तुकोबाराय म्हनले ना ‘मन करा रे प्रसन्न...’ लाख मोलाची गोस्ट सांगून गेले... सगळं मनाशी निगडीत हाये... देहूला गेले व्हते का कधी?’
‘नाही’, माझे उत्तर.
‘जाऊन या. अधून मधून जात राहावं अशा ठिकानी... तुम्हाला सांगतो, तो विटेवरचा बघत असतो... चुकलं-माकलं, दुखलं-खुपलं की त्याच्यावरची भक्ती शक्ती देते... आनी आपलं काम चोख पायजे... वेव्हारच्या जागी वेव्हार... लबाडी आपल्याला खपत नाई... खऱ्याची दुनिया नाय हे मान्य... जशास तसं वागायचं पन आपला पाय वाकडा नाय पडला पाहिजे, हां’.
‘बरोबर आहे’ एवढेच मी म्हणालो. (कारण ह्या दोन शब्दांमध्येच माझी dictionary संपली होती.)

‘हे घ्या... झाली चप्पल... या पावसाळ्यात तर खराब होनारच नाई’. आढळरावांनी त्यांचं काम संपवलं होतं.
मी अजूनही त्यांच्या बोधपर आणि अनपेक्षित प्रवचनातून बाहेर आलो नव्हतो. मुकाट्याने पैसे दिले आणि ‘येतो’ असं म्हणून घरी परतलो. रस्त्यावरचा एक चांभार नकळत चार महत्वाच्या गोष्टी ऐकवून गेला होता. मला तरी कुठे ठाऊक होतं की चप्पल तुटण्याचं निमित्त होऊन “प्रपंच ते परमार्थ” असा प्रवास घडेल म्हणून!!

आयुष्यात पूर्वग्रहांना स्थान देऊ नये ही एक नवी शिकवण मिळाली. 
आता रोज ऑफिस मधून परतताना कामात गर्क असलेल्या आढळरावांकडे नजर जाते. त्यांचं लक्ष असेल तर राम-राम, नमस्कार इत्यादी सोपस्कार पार पडतात. रस्त्याच्या कडेला बसून काम करणाऱ्या त्या चांभाराकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन एव्हाना डोळसझाला आहे. पु. ल. म्हणतात ते खरं आहे स्वतःच्या लोकप्रियतेच्या, ज्ञान-अज्ञानाच्या, प्रतिभेच्या व सामर्थ्याच्या संकल्पना कधीही धुळीस मिळू शकतात.