Thursday 28 February 2013

वेचलेली फुले...




"रात्री आई करुणाष्टके म्हणत जुन्या सोप्यात बसे. ती अंथरुणात पडल्या-पडल्या ऐकली की 'रघुपती मति माझी आपलीशी करावी' असे म्हणत आपणही तिच्या शेजारी बसावे असे वाटे.
पहाटे उठून वडील जेव्हा 'उठा उठा हो सकळिक' अशी भूपाळी म्हणत तेव्हा अंथरुणात पडल्याची लाज वाटून अंगण साफ करण्याचा हुरूप येई.
तो वाडा, तो सकाळचा सडा,ती जात्यावरची गाणी,तांब्या-पितळी ची घंगाळं,ते पहाटेचे शेकणे या गोष्टींना आगळेच सौंदर्य येई.त्या घरात 'असणे' म्हणजे बाळपणात फिरून येणे,प्रत्येक वस्तूवर पडलेल्या आजोबांच्या छापाविषयी भीतीयुक्त आदर बाळगणे व आजीच्या कुशीत झोपणे...
नोकरी करण्यासाठी, शिक्षणासाठी सगळे जण कुठे कुठे फुटले तरी या घराविषयीचे प्रेम कमी झाले नाही. वर्षातून एकदातरी आम्ही सारी भावंडे एकत्र जमत असू. मग चांदण्या रात्री अंगणात लिंबाचा गार वर घेत सर्वांनी बसावे, वडिलांनी रसाळ गोष्टी सांगाव्यातसकाळी नव्या सोप्यात न्याहारी करीत बाळपण आठवावे, दुपारी लिंबावरच्या साळून्क्याचे मंजुळ बोलणे ऐकत डुलकी घ्यावी...संध्याकाळी दिवस कलल्यावर मावळतीचे रंग पाहावेत..."

 'गोष्टी घराकडील' - (व्यंकटेश माडगुळकर)

बयो






कोकणातल्या नीरव दुपारी घुमत जाणार्या नाखव्याच्या हाळीसारखं लहानपण गेलं माझं... झाडामाडाच्या झावळ्या-फाट्यांना चुकवून जमिनी पर्यंत पोहोचलेल्या त्या कवडश्यांसारखं... किनार पट्टीवर पसरलेली ओळी वाळू अजून जाणवते तळव्यांना मधेच... एकदम पोकळ पोकळ होऊन जातं आत काहीतरी... अजून कुठूनतरी कवड्या घातलेल्या वासुदेवाची घुंगुर किणकिण ऐकू येते... पांगीर्याच्या बिया... त्या जाणवतात हातात... खाचा-पाणी, बिल्लर, शंख शिंपली.... केवढी संपत्ती होती...सारं सुटलं...कुठेतरी हरवलं.
दरवेळी कोकणात जाताना ही वाक्य आठवतात मला... बयोह्या चित्रपटातलं हे एक मनोगत पिच्छा पुरवतेय अजून...३ वर्षं झाली हा चित्रपट पहिल्यांदा बघून... आतापावेतो ११ वेळा बघितलाय... इतक्यावेळा मी पाहिलेला हा एकमेव मराठी सिनेमा...काही चित्रपट असे असतात की त्यांच भुत मानगुटीवर जे बसतं ते कायमचं. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित बयोहा असाच एक अप्रतिम चित्रपट. ह्यातल्या कथानकाची तुलना गो. नि. दांडेकरांच्या शितूया कादंबरीशी करता येईल.

१९४० ची पार्श्वभूमी...कोकणात कुठेतरी बयो नावाची एक वेडसर पोर कुण्या विश्वनाथची कित्येक वर्षं वाट पाहत आहे...विश्वनाथवर तिचे निर्व्याज प्रेम...तो यायचे काबुल करून गेला पण परत आला नाही...तो आज किंवा उद्या येईल या आशेवर ती जगतेय...रोजची मीठ भाकर मिळायची भ्रांत... तिला पर्वा नाही त्याची... ती विश्वनाथ च्या प्रेमात आकंठ बुडालेली...वेड लागेपर्यंत...त्याला नियमित पत्र पाठवणारी...त्याच्या पत्रोत्तराची रोज वाट पाहणारी...स्वतःच्या मनोराज्यात गुरफटलेली...त्याने एकही पत्र पाठवलं नाही...तो विसरला तिला
? ...तो अजूनही आलाच नाहीये...
बयो अनाथ असते...जन्माने मुस्लीम... बाळपणी गावात दंगल घडली असताना शिक्षक असलेले आप्पा तिला आसरा देतात... पोटच्या पोरीप्रमाणे वागवतात... तिला शिकवतात... शास्त्रीय संगीतातही तरबेज करतात... विश्वनाथ हा आप्पांचा दत्तक मुलगा... शिकून कोकणात परत येतो...बयो वर प्रेम जडते... स्वातंत्र्याचे वारे वाहत असतात... ते प्रथम कर्तव्य समजून ब्रिटीश सरकार विरोधात वेगवेगळे छुपे कारस्थानं पूर्णत्वास नेण्याची मनीषा तो बाळगून असतो...

आप्पांच्या नजरेतून हे सगळं सुटत नाही... ते त्याला शपथ घालून विलायतेस पुढील शिक्षणासाठी पाठवतात...मी परत येईन असे बयोला आश्वासन देऊन तो हा देश सोडतो... इकडे आप्पांविरुद्ध कट रचून ब्रिटीश सरकार त्यांना जेलमध्ये टाकतं... त्यातच ह्रदय विकाराच्या झटक्याने ते निवर्ततात... बयो एकटी पडते... सोबतीला असतो तो बाबुल नावाचा आप्पांचा गडी... दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ मागे लागले असतानासुद्धा तिला सांभाळण्याची जबाबदारी स्वतःकडे घेणारा... पण तोही दुर्दैवाने नारळाच्या झाडावरून पाठीच्या भारावर पडतो... बयोची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत जाते... मिळेल ते काम तिला करावे लागते... रोज विश्वनाथची वाट पाहता पाहता ती वेडीपिशी होते... त्याला भेटायला जायला म्हणून वायफळ प्रयत्न देखील करते...

बयोची ही कहाणी तिच्या पत्रांच्या माध्यमातून उलगडत जाते ...रावी समोर...

रावी आणि प्रसाद हे इंग्लंड मध्ये काही काळासाठी स्थलांतरित झालेलं जोडपं... नवा देश
, नवी माणसं, नवी आव्हानं यांची ओढ असलेला प्रसाद त्याच्या कामात अधिकाधिक व्यस्त होत जातो... रावीला एकटेपण खायला उठतं... तिला कोकण आठवू लागतं... कोकणातला निसर्ग, पाऊस, समुद्र किनारा, सणवार... ह्या सगळ्या आठवणींनी ती व्याकूळ होत जाते... घरी एकटी असताना तिला काही जुनी पत्र सापडतात...असंख्य !! ...बयोने विश्वनाथला लिहिलेली... विश्वनाथ याच घरात आधी राहत होता... ती पत्र रावीला आणखी अस्वस्थ करतात... रावी विश्वनाथचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करते... बयोला भेटण्यासाठी म्हणून प्रसादला मुंबईला स्थलांतर करण्यास भाग पाडते... अखेर कोकणात जाऊन ती बयोला हुडकून काढण्यात यशस्वी होते... बयो अजूनही तशीच... शून्यात कुठेतरी हरवलेली... विश्वनाथच्या येण्याकडे आस लाऊन बसलेली... बयोच्या या आयुष्यावर रावी कादंबरी लिहिते... पुढे तिला खूप प्रसिद्धी मिळते... ओघाने विश्वनाथच्या वाचनात ही कादंबरी येते आणि तो रावीला भेटायला जातो... रावी त्याच्यावर खूप चिडते... बयोच्या पत्रांना का नाही उत्तर दिलंस ते खडसावून विचारते... विश्वनाथला ती पत्रं मिळालीच नसतात... ब्रिटीश सरकार विरोधी कारवायांत सहभागी असल्याने त्याला तिकडे अटक झालेली असते...

रावी विश्वनाथला बयोला भेटावयास सांगते... पण तोपर्यंत उशीर झाला असतो...ह्या
बदललेल्याविश्वनाथला बयो वेडसरपणामुळे ओळखू शकत नाही... हाच तिचा विश्वनाथ आहे हे तिच्या गावीही नसतं... तोविश्वनाथ एकदिवस नक्की येईल हे ती सतत सांगत असते... समुद्राकडे नजर लाऊन ती त्याची आतुरतेने वाट बघत असते... अखेरीस विश्वनाथ तिला तिथून आपल्यासोबत घेऊन जातो... प्रेमात वेड्याझालेल्या बयो ची ही मन हेलावून टाकणारी अशीही एक प्रेमकथा...

चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय सुंदर आहे... पावसातल्या हिरव्यागार कोकणाचे... तिथल्या टुमदार कोकणी घरांचे... फेसाळलेल्या समुद्राचे सुरेख छायाचित्रण केले आहे... पुर्णगडाच्याआसपास पावसाळ्यात हे चित्रीकरण केलंय... काही संवाद आणि स्वगत साहित्यिकदृष्ट्या उच्च दर्जाचे आहेत... पार्श्वसंगीत सुद्धा जमेची बाजू... शास्रीय संगीताच्या काही श्रवणीय बंदिशी अधेमधे पेरल्या आहेत... सगळ्यांचा अभिनय उत्तम... खासकरून बयोची भूमिका साकारलेल्या मृण्मयी लागूचा अभिनय उत्कृष्ट !!! पटकथा आणि दिग्दर्शन फारच उजवे... चित्रपटाचा वेगही नियंत्रित...

अभिजातचित्रपटांच्या चाहत्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. कायम स्मरणात राहील असा हा नात्यांचे भावबंध दर्शवणारा नितांत सुंदर चित्रपट !!

वेचलेली फुले...




माणसं मोठी झाली की लहानपण विसरतात.
वयाबरोबर त्यांची मनेही प्रौढ होतात.

तर्काचा जाड भिंगाचा चष्मा लाऊन ते किलकिल्या डोळ्यांनी जगाकडे बघतात.

मग निंबोणीच्या  झाडामागे थकून भागून लपणारा चंद्र त्यांना दिसत नाही.

पाऊस = पाणी = H2O हेच त्यांना कळते; परंतु श्रावणाच्या नाजूक सरीत चंद्र कसा भिजतो,खोटा पैसा दिला की चिडून पाऊस कसा मोठा होतो हे त्यांना कळू शकत नाही. जादूचे हे सारे जग त्यांना हास्यास्पद वाटते.
  
    -  (कविवर्य मंगेश पाडगावकर)

गुरुदत्त : अभिजात प्यासा




विलक्षण खेळ मांडला होता सेट वर प्रकाश परावर्तीत करणारे पत्रे, भले मोठे आरसे, काचा, Reflectors हे सगळं सुरु होतं महालक्ष्मी च्या फेमस studioमध्ये कारण फिल्म studio हाच चित्रीकरणाचा विषय होता अख्खा सिनेमा एका दिग्दर्शकाच्या जीवनावर बेतला होता... 35mm ...सिनेमास्कोप...कृष्ण-धवल …’कागज के फुल’!! भारतीय सिनेमाच्या इतिहासात ज्याची milestone म्हणून गणना केली जाते असा तो कागज के फुल’… ज्याचा रिमेक करण्याचा कुणीही फाजील प्रयत्न करू नये असा कागज के फुल’..box office वर सपशेल अयशस्वी ठरलेला कागज के फुल’… इतका सुंदर चित्रपट पडण्याचे कारण गुरुदत्त सकट कुणालाही आजवर समजू शकले नाही असा कागज के फुल’… सीने सृष्टीत ठिकठिकाणी भरून राहिलेल्या पोकळपणाची जाणीव करून देणारा कागज के फुल’… गुरुदत्त, अब्रार अल्वी, व्ही. के मूर्ती, एस.डी.बर्मन, कैफी आझमी, गीता दत्त यांसारख्या दिग्गज कलाकारांच्या अद्भूत प्रतिभास्पर्शाने सजीव झालेला कागज के फुल’!!

या सिनेमा चा opening shot जेव्हा मी प्रथम पाहिला तेव्हाच गुरुदत्तनी मला खिशात टाकले. त्यानंतर कित्येकदा मी हा चित्रपट बघितलाय.त्याचे सगळेच सिनेमे असे झपाटून टाकतात... कागज के फुल मधलं वक्त ने किया क्या हंसी सितम हे गाणं अप्रतिम आहे कैफी आझमींचे सुरेख काव्य आणि गीता दत्त चा काळीज चिरून जाणारा आवाज बहुतेकांनी ते ऐकलं असेल पण ऐकण्यासोबत हे गाणं पाहावं सुद्धा! या गाण्याचे ज्या प्रकारे चित्रण झालंय तसे पूर्वी कधीच झाले नव्हते आणि पुढेही होणार नाही..केवळ एकमेवाद्वितीय! अफलातून प्रयोग होता तो !! फ्रेम च्या एका टोकाला गुरुदत्त उभा आहे तर दुसर्या टोकाला वहिदा रेहमान वरून उजेडाचा एक भारदस्त सलग झोत खाली तिरका सोडलायदु रून कॅमेरा दोघांभोवती मूव्ह होतो आपल्याला पाहताना असे वाटते की आपणच जणू कॅमेरा मूव्ह करतोयshear play of lights and shadows !! तीच गत बिछडे सभी बारी बारी.. या गाण्याची... याचे श्रेय cinematographer व्ही.के मूर्ती यांना द्यायलाच हवे. अजोड कल्पकता,कलात्मक दृष्टीकोन आणि प्रयोगशीलता एकत्र आले की सर्वोत्तम कलाकृती निर्माण होते याचे हे उत्तम उदाहरण !! उगाच नाही गुरूदत्तला क्लासिक सिनेमांचा बादशाह म्हणतात.

प्यासा ची पण अशीच कहाणी... अब्रार अल्विंच्या आयुष्यात आलेल्या खर्याखुर्या गुलाबो ची... समाजातला अप्पलपोटीपणा व ढासळणार्या व्यवस्थेवर प्यासा समर्पक भाष्य करतो. वेश्या वस्तीतली भयाणता बघून खिन्नतेने समाजाला जिन्हे नाझ है हिंद पर वो कहा है.. असा सवाल करणारा कवी विजय असो की थेटर मधे ये दुनिया अगर मिल भी जाये तो क्या है असे पुकारत एकूणच मतलबी प्रवृत्तीला कंटाळलेला विजय असो... गुरुदत्त ने तो उत्कृष्ट वठवलाय !! एकंदरीत त्याचे सगळे चित्रपट म्हणजे एक प्रकारची film institute आहे. गुरुदत्त ने त्याच्या सगळ्या चित्रपटांत पूर्वतयारी व्यतिरिक्त trial and error ची कास धरून कमालीचे प्रयोग केलेत आणि लोकांना ते दाखवून त्यांना तोंडात बोटे घालण्यास भाग पाडले. 100mm लेन्स चा क्लोज अप shot साठी त्याने पहिल्यांदा वापर केला. या चित्रपटांमध्ये त्याने उभारलेले सेट्सव्ही.के.मूर्ती यांची वाखाणण्याजोगी cinematographyरफी/गीता दत्त यांच्या आवाजातली कैफी/साहीर यांनी लिहिलेली गीते एस.डी/ओ.पी.नय्यर/हेमंत कुमार अशा मातब्बरांनी दिलेले संगीत बोलावं तेवढं कमीच आहे !! खर्या अर्थाने तो सिनेमाचा सुवर्णकाळ होता असे म्हणावे लागेल.

गुरुदत्त बद्दल बोलायचे झाल्यास ; सारस्वत कुटुंबात जन्मलेल्या गुरुदत्त ने सीने सृष्टीत येण्या- पूर्वी नृत्याचे शास्त्रोक्त धडे गिरवले होते. त्यानंतर तो पुण्यात प्रभात फिल्म कंपनीत आला. १९५१ साली त्याने पहिला चित्रपट दिग्दर्शित केला..बाझी’. नंतर CID वगळता आरपार, जाल, Mr. and Mrs. 55 ,प्यासा, कागज के फुल या चित्रपटांत दिग्दर्शनासोबत अभिनयही केला. कागज के फुल च्या अपयशानंतर गुरुदत्त पुरता खचला होता. आगामी चौदवी का चांद  साहब,बिवी और गुलाम या चित्रपटांचे दिग्दर्शन त्याने अनुक्रमे सादिक आणि अब्रार अल्वी यांवर सोपवले... तरीही गुरुदत्तलाच या सिनेमांचा ghost director म्हणतात...कारण प्रत्येक shot वर त्याचे बारीक लक्ष असायचे…’कागज के फुल ची कथा त्याच्या व्यक्तिगत जीवनाशी साधर्म्य दाखवणारी होती. गीता दत्त सारखी गुणवान पत्नी आणि वहिदा रेहमान सारखी लावण्यवती अभिनेत्रीदोघींमध्ये त्याचं मन गुंतलेलंत्यातच तो दुभंगला नी निराशेच्या खोल गर्तेत गटांगळ्या खात गेला पण आयुष्याची पुरती ४० वर्षे न बघितलेल्या गुरुदत्त ने रसिकांना अजरामर चित्रपट दिले. खंत एकच गोष्टीची वाटते की या अभिजात कलावंताच्या जीवनाची अशी शोकांतिका व्हावी. तो अजून काही वर्षे जगला असता तर आणखी उत्तम असे चित्रपट त्याने आपल्या पदरात टाकले असते. तरीही तो जे काही करून गेलाय त्यास तोड नाही !! ध्रुवतार्या सारखं असलेलं त्याचं अढळपद कुणीही हिरावू शकत नाही कधीच नाही !!
गुरुदत्त सारख्या अभिजात कलाकारांना दाद देताना गुलझार साहेब कायम असे म्हणतात 
 कितने सच्चे थे वो किरदार जो पर्दे पर थे;
 कितने फर्झी थे वो लोग जो Hall में बैठे थे | “
 गुरुदत्त तुला सलाम !!!

ग्रेस: एक काव्यानुभव






एखाद्या संध्यासमयी सूर्यास्त बघताना अनाहूतपणे 'यमन कल्याण' चे सूर कानी पडावे तशी मला 'ग्रेस' यांची कविता गवसली. माणूस कधी,कुणाच्या आणि कशाच्या प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. काही वर्षांपूर्वी मी असाच कवी 'ग्रेस' यांच्या साहित्याच्या प्रेमात पडलो.
ते प्रेम आजतागायत, केवळ टिकूनच नव्हे तर वृद्धींगत झालंय. काही गोष्टी अशा झपाटून टाकतात बघा!! ग्रेस यांची कविता याला अपवाद नाही...किंबहुना ग्रेस हा नुसता कवी नसून ती एक जगण्याची वृत्ती आहे असे मला कायम वाटत आलंय. काव्य हे फक्त माध्यम आहे त्यांच्यासाठी !!

ते स्वतःच म्हणतात ना - 'मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परि खोल...'. या नदीत त्यांनी काय काय दडवून ठेवलंय ते त्यांनाच ठाऊक.

An ancient man in ancient Times...but in modern World !!

ग्रेस हा जन्मजात अवलिया कलावंत आहे...शब्दप्रभू आहे...भाषाप्रभू आहे. For him Poetry is not just arrangement of words or thoughts...it is reflection of his mind which dwells on the cradle of creativity. त्यांचाच शब्द योजून लिहायचे झालं तर कवितेचे 'कपाळगोंदण' लेवून हा माणूस जन्माला आलाय. ग्रेसांची कविता सहजा सहजी हाती लागत नाहीच. उपमा द्यायची झालीच तर मी त्यांच्या कवितेला फुलपाखराची उपमा देईन. फुलपाखरू जसं मुक्तपणे पानाफुलांवर संचार करतं; तशी त्यांची कविता आहे. भल्या भल्या समीक्षकांनी जिथे नांगी टाकली तिथे आपण काय बोलणार असा विचार येतोही कधी कधी पण 'कविता' ही फक्त समजण्यापुरती किंवा आस्वाद घेण्यापुरती मर्यादित नसते हे मला त्यांच्या कविता वाचल्यावर कळलं... कारण त्यात 'अनुभूती' हा एक सुरेख प्रकार आहे !!

'गाय जशी हंबरते तैसे व्याकूळ व्हावे;

बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.'

ह्या ओळी तेच सांगतात. 

इंग्रजी, उर्दू,हिंदी या भाषांवर असामान्य प्रभुत्व असलेला हा माणूस आहे. Tolstoy पासून टागोरांपर्यंत आणि गालिब पासून शकील पर्यंत अफाट वाचन त्यांनी केलंय. मराठी तर विचारू नका...ती तर मायबोली.!! शब्दांमधून सुंदर अक्षरशिल्प निर्माण करणारा हा किमयागार आहे. !! शब्द सामर्थ्याचे कवच कुंडले घेऊनच हा 'कर्णया भूतलावर आलाय...पण कर्ण म्हट्ला की आपल्याला आठवते ते त्याचं 'अभागीपण'!! ग्रेसांच्या बाबतीत ही तेच झालं...त्यांच्या काव्यावर दुर्बोधतेचा शिक्का बसला तो कायमचा...हे खर तर त्यांच्या कविता न अनुभव घेणार्यांच दुर्दैव.! माझी त्यांच्या साहित्याशी कधी गाठभेट झाली ते नक्की नाही आठवत...कदाचित ५-६ वर्षांपूर्वी असेल...नाही...त्याही पूर्वी... दूरदर्शन वरील 'महाश्वेता' ही मालिका आई बघायची. ती संपल्यावर  शेवटी लागणारं लताजींच 'भय इथले संपत नाही...'  हे अप्रतिम गाणं कुठेतरी मनात घर करून होतं...तेव्हा कुणी लिहिलंय, ते मात्र माहित नव्हतं.


पुढे एका पुस्तक प्रदर्शनातून त्याचं 'मितवा' हे पुस्तक आणलं. त्यातले बरेचसे लेख डोक्यावरून गेले. मी त्या पुस्तकातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. भिंगरी सारखा मी त्यात आवर्तनं घेत फिरत राहिलो. पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाची मी पारायणं केली. मला नेहमी पडणाऱ्या प्रश्नाने तेव्हाही उचल खाल्ली होती की कसं काय कुणी एवढं सुंदर व गर्भित लिहू शकतं?... त्याचं उत्तर मला आजवर सापडले नाही...खरंच; बुद्धी पलीकडील गोष्ट आहे ती !!

त्या पुस्तकातले ललित लेख, कवितांच्या ओळी आणि विचित्र उखाणे वाचताना हळू हळू कळू लागलं की ग्रेस हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. पुढे मी त्यांचा 'संध्याकाळच्या कविता' हा कविता संग्रह वाचला आणि त्यांच्या कवितांची मोहिनी बसली ती कायमचीच. त्या कवितांमागील thought process काय असेल ते आपल्याला लगेच समजू शकत नाही पण 'काव्यानुभूती' विलक्षण !!

त्या कविता वाचताना माझ्या डोळ्यांसमोर प्रतिमा तयार होतात... एखाद्या photography किंवा क्यालेडीओस्कोप सारख्या...समोर चित्रांचा भव्य असा पट च्या पट उलगडला जातो.
हीच ओळ बघा -

'निळसर डोंगर घळीघळी तून धूर धुक्याचा निघत असे;

खेड्यामध्ये गाव पुरातन तसा  वसविला मला दिसे.'

किंवा

'निळ्याशार मंद पाउलवाटा,

धुक्याची निळी भूल लागे कुणा;

तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू,

निळ्या अस्तकालीन नारायणा'

अस्तान्चली सूर्याला अर्घ्य वाहणारा हा कमालीचा कवी आहे...अशी असंख्य  उदाहरणे देता येतील... अशा ओळी वाचल्यावर समोर प्रतिमा दिसू लागतात.


ग्रेस यांनी माझ्या पदरात काही दिले असेल तर हे प्रतिमा सृष्टींचे अद्भूत दान !!

त्यांच्या कवितांकडे एक कलाकृती म्हणून बघावं... त्यानंतरचे अनुभव हे विस्मित करणारे असतात. सांगायचे झाल्यास 'भय इथले…' बद्दल थोडे बोलता येईल. सगळ्याच साहित्य प्रकारात विरह गीते लिहिली गेली आहेत पण ग्रेस यांचे वेगळेपण या विरह गीतातून नजरेस पडते.


'स्तोत्रांत इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे;

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे'

एवढं सुंदर विरह गीत ग्रेसांशिवाय अजून कोण लिहिणार?... आणि लताजींनी जो स्वरसाज चढवलाय यावर तो केवळ अलौकिक !! संगीतातले सगळे तर्क...सगळ्या चिकित्सा आणि सगळ्या संज्ञा त्यापुढे फिक्या आहेत. हे विरह गीत आपलेच आहे असे उगाच नाही वाटत.! ग्रेसांनी लिहिलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली मी सगळी गाणी त्यानंतर ऐकली. त्यातली बरीच गाणी व्याकुळतेची किंवा विरहाचीच गीते आहेत.

'घरा घराला मरण फुलांची गंधित भूल जडे.' असे मृत्यूचे सुंदर वर्णन करणारा हा कवी आहे. !!

कितीही नाही नाही म्हटलं तरी उदासीनता आणि विमनस्क स्थिती आपल्याला कधी तरी छळतेच. या बाबतीत ग्रेसांचं लिखाण मोठं आहे. दुःख कुरवाळण्यापेक्षा त्याला वाट करून देण्याची ग्रेस यांची धडपड असते हे मला त्यांच्या काव्यातून जाणवलेय...एक outlet या अर्थाने...

                  ‘नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे ;

                दिक्काल धुक्याच्या वेळी, हृदयला स्पन्दविणारे.'


'नाद' हा त्यांच्या कवितेतला स्थायीभाव आहे. 'ते झरे चंद्रसजणांचे'; 'घनकंप मयूरा...घनदंग मयूरा'; 'जसे काळोखातही ऐकू यावे दूरच्या झऱ्याचे वाहणे...' यां सारख्या अनेक ओळींतून तो नाद प्रकट होतो. मला पूर्वी त्यांच्या कविता वाचल्यावर जश्या प्रतिमा दिसायच्या तसं आता उलटही होतं... सूर्यास्त, समुद्र, पाऊस, एखादे कोकणातील जुने घर पाहिले की त्यांच्या कवितांच्या ओळी आठवतात.

त्यांचा अजून एक मला चकित करणारा पैलू म्हणजे त्यांच्यात एक protagonist सदैव वास्तव्याला असतो.


'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ;

हलकेच जाग मज येई, दुःखाच्या मंद सुरांने'

असे म्हणणारा हा कवी

'काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे,

जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे'

असे देखील म्हणून गेलाय.

तसेच

'रात्र थांबवुनी असेच उठावे
तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!
डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी शब्द यावे.'

हे प्रेम काव्य ही तेच लिहू जाणे !


कुठलीही craftsmanship जाणून बुजून न करता देखील त्यांची कविता 'छंदोमयी' वाटते. हा माणूसच मुळी rebel...आपल्या कवितेनी मराठी साहित्याला काय दिले याचा जराही विचार न करणारा हा कवी आहे. आजकालच्या साहित्य संमेलनांच्या 'मानापमान' "नाटकांना" ते हजेरी लावत नाही. निर्भेळ साहित्य सेवेपेक्षा तिथे पुढे पुढे करण्याची सवय असलेले, अध्यक्ष बनण्यासाठी वादविवाद निर्माण करणाऱ्या लोकांचीच गर्दी जास्त...तिथे हा माणूस रमणार कसा.? उपटसुंभ समीक्षकांना 'कवितेचे स्पष्टीकरण द्यायला मी काही गुन्हेगार नाही' असे खडे बोल सुनावणारा हा माणूस आहे.

त्यांचा सच्चा वाचक वर्ग कधीच त्यांच्या बद्दल 'ही कविता कळली नाही हो' अशी तक्रार करणार नाही आणि ग्रेसांना पण माहितीये की आपण त्या वाचकांना काय दिलंय... स्वतःच्या काव्य निर्मिती प्रक्रियेकडे त्रयस्थ नजेरेने पाहताना त्यानी एवढे मात्र कबूल केलं की साहित्य जगतात त्यांच्या कवितांनी आणि ललित लेखांनी खळबळ मात्र उडवून दिली. 


'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या लेखात ते सांगतात की ही 'बेसरबिंदी' समीक्षकांना कधीच सापडणार नाही...ते शोधयला जातील...त्यांना काहीतरी मिळाल्याचे जाणवेल पण पुढच्या ओळींचे अर्थ लावता लावता ती बेसरबिंदी पुन्हा निसटून निघून जाईल. कवितांचे फक्त 'अर्थ' लावण्याचे काम करणाऱ्या समीक्षकांकडून अजून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा !!

आरती प्रभू, जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस यांनी मराठी भाषेवर सौंदर्याचे खूप अलंकार चढवलेय पण त्याची खबर विविध साहित्य मंडळातल्या तथाकथित समीक्षकांना झाली नाही.


'फेटेवाल्यांच्या' साहित्य संमेलनात अशा कितीतरी प्रतिभावान कवी/लेखकांना मानाची खुर्ची आजवर मिळाली नाही. हे त्या संमेलनांचे दुर्भाग्य.!! पण त्यांचे लिखाण वाचून असंख्य रसिक तृप्त झालेत हेही तेवढंच खरंय.


शेवटी, ग्रेस यांची कविता ही अनुभवण्याची चीज़ आहे एवढंच सांगून मी खालील ओळी उद्घृत करतो आणि रजा घेतो...


'ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी;
कुणासाठी कोणी
थांबू नये

ग्रेस ह्यांच्या कवितांवर आधारित चित्र काढण्याचा मानस आहे पण तोपर्यंत सहज सुचलेले आणि चितारलेले हे एक painting...



वेचलेली फुले...




माझी परमेश्वरावर अपार भक्ती आहे.
त्याने निर्माण केलेली सृष्टी पहा. 
तिथं सगळं अमाप आहे, विराट आहे, प्रचंड आहे.
इथं लहान काहीच नाही. 
एक माणूस पहा !
केवढी विराट निर्मिती.. माणूस म्हणजे पर्वतराशी जेवढ्या प्रचंड समुद्र जेवढा अमर्याद , वनश्री जेवढी गुढ , तसाच माणूस प्रत्येक माणूस -- प्रचंड,अमर्याद आणि गूढ.
माणसाला बहाल केलेली पंचेंद्रिये हीच त्याची साक्ष. नजरेची दुनिया ...नादाची दुनिया...स्पर्शाची दुनिया...
सगळं विराट आणि म्हणूनच नेहमी वाटतं कि ज्या परमेश्वराने
जीवन एवढं विराट केलं तो त्या विराट जीवनाचा शेवट जीवनापेक्षा लहान गोष्टीने करणार नाही.
माझी श्रद्धा आहे की परमेश्वराने निर्माण केलेला मृत्यू हा जीवनापेक्षा विराट आहे आणि तो जीवनापेक्षा लोभस असणार !!!

-    (व. पु. काळे)