Tuesday 19 March 2013

‘मेरा सब सामान... ‘


नागपूरातील एकेकाळची ही बहुचर्चित घटना आहे. ‘अपार्टमेंट’ किंवा ‘सोसायटी’ हा concept त्यावेळी बऱ्यापैकी प्रचलित होण्याच्या मार्गावर होता. नागपूर शहर मुळातच प्रशस्त. अजूनही तिथे जागोजागी independent घरं, बंगले, बगीचे, मैदानं दिसतील. परंतु हे सगळं ‘जैसे थे’ थोडीच राहणार आहे. !! वाढणारी लोकसंख्या, स्थलांतर, जागेची कमतरता या बाबी कोणत्याही शहरात कधी ना कधी flat संस्कृतीला जन्म देतातच. अशाच नुकत्याच निर्माण झालेल्या Lay-Out मधील एका अपार्टमेंट मध्ये घडलेली ही एक मजेशीर घटना.

आमच्या एका नातलगांनी नव्या कोऱ्या flat मध्ये ‘गृहप्रवेश’ केला होता. घरात एकूण सदस्यसंख्या पाच. मोठ्या कष्टाने ‘घरघर’ संपून एकदाचे घर झाले होते. वास्तुपूजा एवढ्यात न करता जरा ‘चांगला’ मुहूर्त पाहून निवांतपणे महिन्याभरात करू असा एक मतप्रवाह घरात वाहू लागला. कुठलाही मुहूर्त ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने चांगलाच असतो. कदाचित रामराज्याभिषेक याला अपवाद असेल पण ‘वाईट मुहूर्त’ हा शब्दप्रयोग माझ्यातरी ऐकीवात नाही. असो. तात्पर्य असे की ‘वास्तुशांती पुढे ढकलावी’ हा प्रस्ताव सरतेशेवटी एकमताने पारित करण्यात आला. घर ताब्यात घेतल्याच्या दोन-तीन दिवसांनंतर ‘शेजारी’ येऊन भेटून गेले. शेजाऱ्यांनी त्यांचा flat दोन वर्षांसाठी भाड्याने दिला आहे असे समजले. तेवढ्या वेळासाठी ते इथे राहणार नव्हते. त्यांची बदली भिलाई ला झाली होती. शेजाऱ्यांनी घराच्या किल्ल्या आमच्या नातेवाईकांना सुपूर्द केल्या आणि भाडेकरू आल्यास त्याला त्या देऊन टाकाव्यात असेही सांगितले. भाडेकरूची इत्यंभूत माहिती देखील दिली. भाडेकरू कुणीतरी ‘हरमीत सिंग भुट्टा’ नावाचा सरदारजी होता. Central Govt. चा employee होता. उच्च पदावर कार्यरत होता. घरचा श्रीमंत. पंजाबमध्ये कुठल्यातरी गावात मोठी शेतीवाडी होती. त्याची चंडीगढहून नागपूरात बदली झाली होती. एका मध्यस्था मार्फत ही deal पक्की झाली होती.

आठवड्याभरात सरदारजींचा फोन आला. परवा नागपूरला सामानासकट पोहचतो आहे असे त्यांनी आमच्या नातलगांना कळविले. फक्त काही formalities पूर्ण करायला ते यावेळी येणार होते. सामान dump करून सरदारजी पुन्हा ८ दिवसांकरीता चंडीगढला परतणार होते आणि पुढच्या खेपेस कुटुंबासहित येणार होते. अगदी सरळ सोपा plan होता.

सरदारजींच्या आगमनाचा दिवस उजाडला. आमच्या नातलगांमधल्या पुरुष वर्गाने मुद्दाम half day टाकला होता. ‘शेजारी’ दुसऱ्या राज्यातला असल्याने आमच्या नातलगांमध्ये ‘थोडी ख़ुशी थोडा गम’ असे वातावरण होते. तो आपल्याशी मिळून मिसळून वागेल का? की भांडकुदळ असले? सरदारजी चिडला तर आपल्याला काही धोका वगैरे असणार का? Govt. क्वार्टरर्स सोडून हा इथे का येतोअसे प्रश्न काही सदस्यांच्या डोक्यात गर्दी करू लागले तर काही सदस्य ‘सरदारजी लोक फार jolly असतात, खूप मदत करतात’ असे सांगून आणखी confusion वाढवत होते.

सकाळी ९-१० च्या दरम्यान दारावरची बेल वाजली. स्मित-हास्य करत सरदारजी दारात उभे होते. त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. हातात gift paper ने गुंडाळलेली फळांची टोपली होती. आमच्या नातलगांसाठी एक भेट म्हणून त्यांनी ती आणली होती. इतकी फळं आमच्या नातेवाईकांनी केवळ दुकानात किंवा पूजेनिमित्तच पाहिली होती. ही भेट पाहून कुटुंबातल्या सदस्यांचा जीव भांड्यात पडला आणि ‘चांगला दिसतोय बिचारा माणूस...’ असे प्रत्येकाने मनात म्हटले. या gift ला प्रत्युत्तर म्हणून सरदारजींसाठी नाश्त्याचा प्रबंध करण्यात आला. यथावकाश गप्पा आणि नाश्ता आटोपल्यावर सरदारजींनी चावी घेतली. तासाभरात सामान वाहून आणणारा एक truck खाली पोहोचला होता. Truck मध्ये driver सकट आणखी तीन माणसं होती. सरदारजींनी सगळे सामान उतरवून घेतले. संपूर्ण सामान वर चढवायला पाच तास लागले. देखरेखीला office मधून एक मदतनीस सरदारजींनी बोलावला होता. त्याला सूचना देऊन सरदारजी office साठी रवाना झाले. तिथे फक्त त्यांना हजेरी लावायची होती. फारसं काम नव्हतंच. रात्री त्यांची flight होती. कार्यालयीन औपचारिकता संपवून ते लगेच निघणार होते.

इकडे पंजाबहून आलेले ते अतिभव्य सामान बघून आमच्या नातलगांना ‘मध्यमवर्गीयपणाची’ खूपच जाणीव होऊ लागली. नवीन घरात अमुक तमुक वस्तू आता घ्यायचीच असा महिला सदस्यांनी चंग बांधला आणि त्याबद्दल चर्चा सुरु केली. ह्यातले गांभीर्य लक्षात घेऊन व प्रसंगावधान राखून पुरुषवर्गाने half day संपत आलाय अशी घोषणा देत आपआपल्या office कडे कूच केले.

सुमारे पाच वाजेपर्यंत सरदारजी परतले होते. एव्हाना सामान चढवून झाले होते. सरदारजींनी आमच्या नातेवाईकांकडे चावी दिली आणि पुन्हा लवकर भेटूच असे म्हणत विमानतळाकडे प्रस्थान केले. Truck निघाला होता. घरातली पुरुष मंडळी सात-साडेसात पर्यंत घरी परतली. त्या दिवशी रात्री जेवताना किंवा त्यानंतर, कुठलीही विशेष चर्चा न करता सगळे सदस्य, दिवसभराच्या धावपळीमुळे शांत झोपी गेले.

दोन-तीन दिवसांत सरदारजींचा पुन्हा फोन खणखणला. त्यांनी बदली cancel केल्याची बातमी होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले होते असे ते म्हणाले. लहान भावाला पाठवून ते सामान परत बोलावणार होते. दिवसांची थोडी चुकामुक झाली होती.
सरदारजींना दुप्पट भुर्दंड पडणार होता पण बदली cancel झाल्याने कदाचित ते आनंदात वाटत होते. आमच्या नातलगांचा मात्र इकडे हिरमोड झाला. शेजारधर्माचीसगळी स्वप्नं भंग पावली होती. पुरुष वर्गाने त्यातल्या त्यात पैसे चारून बदली cancel केली असेल त्या सरदारजीनीअसा शेरा मारून विषय बंद करायचा प्रयास केला. महिला वर्ग खजील होता. शेजारचे घर रिकामे म्हणजे दुपारच्या security चा प्रश्न आलाच. नवा भाडेकरू मिळेपर्यंत तरी ही चिंता कायम राहणार होती. पुन्हा एक सरदारजी सामान घ्यायला येणार, पुन्हा त्याची खातिरदारी करायची हा एकूणच प्रकार सगळ्यांना कंटाळवाणा वाटत होता. येणाऱ्या पाहुण्याला चहावर भागवाअसे आदेश पुरुष वर्गाकडून आले. त्यादिवशी Half day ची सुटी न टाकता Full day Office असणार होते. साहजिक आहे, त्या त्या प्रसंगाचाही एक perspective असतो अजून काय !!

दुसरा सरदारजी येण्याचा दिवस उजाडला. ठरल्या वेळेच्या अर्ध्या-एक तासानंतर सरदारजी आले. पहिल्या सरदारजींचे धाकटे बंधू हरजीत सिंग भुट्टा अशी त्यांनी ओळख करून दिली. पुरुषवर्ग कामावर गेला होता. स्त्रीवर्गाने आदेशानुसार चहा-बिस्किटांवर पाहुणचार निपटवला. हरजीत सिंग जरा जास्तच बडबडा होता. मोठा भाऊ हरमीत सिंगचे किस्से तो रंगवून सांगत होता. ऐकण्यात कुणालाच स्वारस्य नसल्याने समोरून ‘हो-हो’, ‘हो का?’ एवढाच प्रतिसाद येत होता. चार तासात सामान उतरवल्या गेले. सरदारजींनी चावी देऊन निरोप घेतला. संध्याकाळ व्हायच्या आत truck तिथून निघाला होता. पुरुषवर्ग कामाहून घरी आल्यावर दिवसा घडलेली सगळी कहाणी त्यांच्या कानावर आलीच. ‘जाऊ द्या... एकदाचं प्रकरण संपले’ असे समजून सगळे परत त्या रात्री शांत झोपी गेले.

तीन-चार दिवसांनी पुन्हा एका सरदारजींचा फोन आला. हरमीत सिंग म्हणजे पहिले सरदारजी; नागपूरला एक-दोन दिवसांत येत आहेत असे त्याने कळविले. तुम्ही कोण असे विचारताच त्याने हरमीत सिंगांचा लहान भाऊ हरबिंदर बोलत असल्याचे सांगितले आणि फोन ठेवूनही दिला. आता मात्र आमचे नातलग चांगलेच वैतागले. हे सरदारजी बंधू बदली करणे... ती cancel करणे... सामान पोहचवणे...दुसरीकडे ते उतरवणे हेच धंदे करतात कि काय असे सगळ्यांना वाटू लागले. कोण सतरा वेळा ह्यांच्या मागे राहणार !! आणि हे असं का करताहेत हे सुद्धा कळत नव्हते. कशाचाच छडा लागत नव्हता. जे होईल ते बघून घेऊ असे ठरवून आमचे नातलग रोजच्या कामाला लागले.

दोन दिवसांनी सकाळीच दारावरची बेल वाजली. हरमीत सिंग आणि कुटुंब दारात उभे होते. इच्छा नसताना केलेले औपचारिक स्वागत झाल्यावर हरमीत सिंगांनी चावी मागितली. आमच्या नातलगांकडून सरदारजींना ‘आता कशाला हवी आहे चावी?’ अशी शक्य तितक्या विनम्रतेने, चेहऱ्यावर त्रासिक भाव न दर्शविता विचारणा करण्यात आली. ‘कशाला म्हणजे काय, आजपासून सहकुटुंब राहायला आलो आहोत’ असे सरदारजींनी सांगताच इकडे सगळ्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. बदली cancel झाल्याने हरमीत सिंगांचा भाऊ हरजीत सिंग अगोदरच सामान घेऊन गेला आहे हे कळताच हरमीत सिंगांचे अवसान गळाले. त्यांची पत्नी तर ‘हाय रब्बा’ म्हणत मट्कन खालीच बसली. हरमीत सिंगांनी दार उघडून पाहिले. अर्थातच आत काहीच सामान शिल्लक नव्हते. हळूहळू सगळ्या कथेवरून पडदा सरू लागला. हरजीत सिंग असा कुणी पहिल्या सरदारजींचा भाऊ नव्हताच. चोरांनी कमालीचे planning करून अख्ख्या सामानावर डल्ला मारला होता... सरदारजीने सरदारजीचा पंजाबपासून कित्येक मैल दूर असलेल्या महाराष्ट्रात काटा काढला होता. हरमीत सिंग डोक्याला हात मारून बसले. वाहेगुरूंचा धावा करू लागले. आमच्या नातलगांची तर भंबेरी उडाली. थोडं सावरल्यावर कुणीतरी Police complaint करायला सांगितली. हरमीत सिंगांच्या office मध्ये कळवण्यात आले. Office ची काही लोकं गोळा झाली. Police complaint करण्यात आली. FIR मांडल्या गेला. चौकशी सुरु झाली. Flat च्या घरमालकांना बोलावले गेले. महाराष्ट्र आणि पंजाब दोन्ही राज्यांतले पोलीस शोध घेऊ लागले.

चौकशीअंती असे निष्पन्न झाले की हरजीत सिंग आणि हरमीत सिंग यांच्यामध्ये शेतीच्या जागेवरून भांडण होते. पंजाबच्या कोर्टात खटला सुरु होता. याचा फायदा घेत चोरट्यांनी हरजीत चे नाव पुढे करून सर्व कारस्थान रचले होते.
हरजीत सिंगचा या चोरीशी काहीएक संबंध नव्हता. त्याचे फक्त नाव वापरण्यात आले होते. भलत्याच सरदारजीने चोरी केली होती... तेही केवळ हरमीत आणि हरजीत सिंग बाबतच्या पूर्ण माहितीच्या आधारे. 

नागपूरात या घटनेबद्दल बरीच ‘पेपरबाजी’ झाली. जवळपास साडेचार महिन्यांनंतर चोरटे हरियाणा मधून पकडले गेले. हरमीत सिगांना त्यांचे सामान मिळू शकले की नाही ते मात्र समजले नाही. बहुदा चोरट्यांनी विकले असावे.

आमचे नातवाईक तर ‘फेमस’ झाले होते. लोकं त्यांना विविध प्रश्न विचारून हैराण करून सोडत. ते ह्या कथेचा भाग असल्या कारणाने त्यांना देखील पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी झिजवावी लागली. नसती उठाठेव होत होती. सगळं पूर्ववत व्हायला बराच वेळ लागला.

घडलेली ही घटना चांगलीच नाट्यमय होती.

पण एक मात्र मुद्दाम सांगावेसे वाटते; ज्या दिवशी चोरटे पकडल्या गेले त्याच्या दुसऱ्याच दिवशी आमच्या नातलगांनी घराच्या वास्तू-पूजनाचा ‘मुहूर्त’ पंचांग न बघता काढला होता.

2 comments: