Wednesday 3 April 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-३)


रोपड मधला मुक्काम काही दिवसांत संपणार होता. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला आमचे Ranbaxy मधील project चे काम पूर्ण झाले होते. परतायचे reservation झाले होते. पण निघायला अजून ५ दिवस शिल्लक असल्याने एक दिवस अमृतसर आणि वाघा border ला जाऊन आलो. उरलेल्या चार दिवसांत संध्याकाळी नेमाने सतलजच्या त्या पूलावर आम्ही फिरायला जात असू. सतलजचे पात्र कायम धुक्यात हरवलेले असायचे. एके दिवशी पूलाच्या परिसरात नोकर एका व्यक्तीशी बोलताना आढळला. थोडं जवळ जाऊन बघितलं तर तो सरदारजी होता. ह्या सरदारजीला २-३ वेळा आम्ही guest house मध्ये येता जाताना पाहिलं होतं. ह्याच्या तथाकथित कारस्थानांत या सरदारजीचा पण हात आहे की काय असे वाटू लागले. आम्ही आल्यापासून दोन आठवडे उलटूनही ह्यांच्या ‘हवेलीत’ राहायला कुणी येत नव्हते. Advance booking ची तर गोष्टच नसावी तिथे. आम्हीच फक्त भुतासारखे त्या guest house मध्ये हिंडत असू. कधी कधी नोकर TV लावत असे. तो TV पण पुरातन वाटत होता.

निघायच्या एक दिवस आधी सगळे bill चुकते करावे असा विचार करून आम्ही नोकराला शोधत होतो. Guest house च्या छोट्या खोलीमध्ये त्याच्या खोकलण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही दोघे कधी नव्हे ते आत शिरलो. आत एक टेबल मांडलं होतं. २-३ रजिस्टर आणि पावती पुस्तक होते. नोकराला आमच्या अचानक येण्याने त्रास झाला असावा. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तेच सांगत होते. आम्ही मुकाट शिल्लक पैसे देऊन receipt घेतली. समोरच्या भिंतीवर लक्ष गेलं. आम्हाला एक-दोनदा जो सरदारजी दिसला होता त्याची तसबीर होती. हे कोण आहे असे विचारताच त्याने तो मालकाचा फोटो असल्याचे सांगितले. पुढे जे काही त्याने सांगितले ते ऐकून आमची टरकली. त्या मालकाचा मृत्यू होऊन ७ वर्षं झाली होती. आमचा विश्वासच बसत नव्हता कारण आम्ही त्याला पाहिले होते. नोकराने उलट आम्हाला वेड्यात काढले. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल असे तो म्हणाला. तुम्हां बाहेरगावच्या लोकांना सगळे सरदारजी लोक जवळपास सारखेच दिसत असावेत अशी पुस्ती त्याने जोडली. आमच्या डोक्यात मात्र भलतेच विचारचक्र सुरु झाले होते. एक दिवस अजून बाकी होता. इतक्या दिवसांत एवढे सगळे रामायण, महाभारत घडल्यावर तिथे थांबणे आम्हाला अशक्य वाटत होते. त्या नोकराचा काही भरवसा नव्हता. तो कपटी होता असे आमचे ठाम मत होते; त्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नव्हती. तिथून लवकरात लवकर निघून दुसरे hotel गाठू असे ठरवून आम्ही लगेच pack-up ला सुरुवात केली. अर्ध्या तासात आम्ही तिथून निघालो. चंडीगढला एका मित्राकडे आज मुक्काम करून उद्या अंबाला स्टेशनला जाणार आहोत असे नोकराला सांगून आम्ही सटकलो.

जाताना medical चा chemist भेटला. त्याने आम्हाला हाक मारली. त्यादिवशी घाईत असल्याने व्यवस्थित बोलणे झाले नव्हते. राहायला कुठे होता असे विचारल्यावर आम्ही guest house बद्दल सांगितले. त्याचा आमच्या सांगण्यावर विश्वास बसेना कारण त्याच्या माहितीनुसार ते ७ वर्षांपासून बंद किंवा abandoned स्थितीत होते. मालकाचा सतलज नदीत बुडून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून नोकर गजाआड होता. त्यानेच मालकाल पूलावरून नदीत ढकलले होते. रोपड मधली ती एकमेव ‘सनसनीखेज’ घटना होती. तसल्या थंडीत हे सर्व ऐकून आम्हाला जास्तच हुडहुडी भरली होती. Guest house मध्ये सध्या वास्तव्य करून असलेला माणूस पूर्वीचा नोकर आहे की अजून कुणी आहे याची खात्री करूया असा आग्रह chemist करू लागला. भुताटकी पेक्षा हा सगळा प्रकार केवळ भंपकपणा वाटत होता. मालक, नोकर आणि chemist हे तिघेही एकमेकांना सामील असावेत असा कयास बांधून आम्ही त्याच्या आग्रहाला बळी पडलो नाही. त्यांना आमच्याकडून नक्की काय हवे होते हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. बोलण्यात किती तथ्य होते हेही आम्हाला समजले नाही. तो खरा होता की खोटारडा होता हे तेवढ्या कमी वेळात तपासून पाहणे अवघड होते.

आम्ही तिथून निघून रिक्षाने रोपडच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केला. एकही hotel धड पसंतीस उतरत नव्हते. अखेरीस तिथल्या प्रसिद्ध गुरुद्वारा मध्ये आम्ही पोहचलो. हिंडून हिंडून पुरते थकलो होतो. एक दिवसा करिता मुक्काम करता येईल का असे विचारले. देव पावला. !!  त्यांनी संमती दिली. सकाळी फक्त ६ च्या आत उठावे लागेल अशी सूचनाही दिली. भक्तनिवास मध्ये एका खोलीत सामान नेऊन टाकले. हातपाय धुतले. लंगर मध्ये जेवलो. त्या प्रसादने भूक कुठल्या कुठे पळाली होती. संध्याकाळी वातावरण प्रसन्न वाटत होते. ज्या कुणाला आम्ही त्या guest house बद्दल विचारले त्यांनी हीच माहिती सांगितली की ते बंद आहे; तिथे कुणी जात नाही. रात्री झोपताना ते guest house, नोकर, मालक आणि chemist यांबद्दलचे विचार पुन्हा घोळू लागले. कदाचित मित्राच्या डोक्यात सुद्धा तेच विचार सुरु होते. सकाळी ६ च्या आत आम्हाला जाग आली. Loudspeaker वरून मधुर ‘गुरुबाणी’ ऐकू येत होती. अंघोळ उरकून आम्ही गुरुद्वार्यात दर्शन घेतले. दुपारी लंगर मध्ये जेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

नोकरी निमित्त घराबाहेर पडल्यावर आयुष्यात घडलेली ही सतलजच्या काठावरील विचित्र घटना !! वेगळा अनुभव. वेळेअभावी म्हणा की आणखी कुठल्या कारणाने म्हणा; आजपावेतो ह्या घटनेचा उलगडा झालेला नाही. त्यापुढेचे प्रश्नार्थक चिन्ह आहे तसेच आहे. पुन्हा तिथे जाऊन उत्तर शोधण्याची तयारी आहे... पण ते जमेल की नाही ते आत्ताच नाही सांगू शकत.   

No comments:

Post a Comment