Monday 25 March 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-१)



७ जानेवारी २००६. अंबाला स्टेशनला पहाटे उतरलो... कडाक्याची थंडी जाणवत होती. २ डिग्री तापमान. !! स्वेटर, कानटोपी, मफलर प्रभावहीन झाले होते. सोबतीला ऑफिसचे आणखी दोन जण होते. त्यातला एक मित्र होतातिथून आम्हाला पंजाब मधल्या रोपड या ठिकाणी जायचे होते. रोपडला Ranbaxy मध्ये तीन आठवड्यांचा project मार्गी लावायचा होता. नवी नोकरी असल्याने जाणं भाग होतं. तसेही नवीन जागा, नवी माणसं, नवा अनुभव याबद्दल उत्सुकता होती. चंडीगढला जाणाऱ्या बस सकाळी ६ वाजल्यानंतर असल्यामुळे तोपर्यंत स्टेशनवरच थांबणे भाग होते. नेमका पाऊसही सुरु झाला होता. रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रूम मध्ये शिरलो. आत कुणीच नव्हतं. वाटलं इथे थोडी थंडी कमी जाणवेल. पण कसलं काय !! थंडी आणि पाऊस दोघांनीही युती केली होती आणि थैमान मांडले होते.

एकदाचे ६ वाजले. पाऊस बऱ्यापैकी ओसरला होता. चहाच्या टपरीवर चार-दोन माणसे उभी दिसली. चहा उकळत होता. स्टेशन बाहेर सहा-सात बस उभ्या होत्या. चौकशी करून चंडीगढ चे तिकीट काढले. चहा घेतल्यावर बसमध्ये जाऊन बसलो. बाहेर अजूनही अंधार होता. अंबाला ते चंडीगढ आणि तिथून बस बदलून रोपड; असा प्रवास होता. चंडीगढला पोहचेपर्यंत उजाडलं होतं. सिमेंटचे स्वच्छ रस्ते, मोठे चौक, नीटनेटकेपणा आणि sectors ही त्या शहराची खासियत आहे. Planned शहर कसे असावे याचे ते कदाचित उत्तम उदाहरण असेल. तिथे उतरल्यावर breakfast करून आम्ही पुन्हा bus stand वर आलो आणि रोपड ला जाणाऱ्या बस मध्ये बसलो. काही वेळात शहरी भाग मागे पडला. हिरव्यागार शेतांनी बहरलेला पंजाब आता दृष्टीस येत होता. ओसाड जमीन कुठे दिसलीच नाही. पाण्याची मुबलकता दिसून येत होती. यशराज च्या सिनेमांत दाखवल्याप्रमाणे लांबच लांब ‘सरसों कें खेत’ आणि कुरणं पसरली होती. त्या शेतांत मधेच दोन-तीन दुमजली घरं दिसायची. धुकं अजून विरळ झालं नव्हतं. पाऊस पुन्हा सुरु झाला होता.

रोपड च्या bust stand ला पोहचायला १० वाजले. हा bus stand अगदी वेशीवर आहे. त्यापुढे गेल्यावर विस्तीर्ण सतलज नदीचे पात्र विखुरलेले दिसते. नदीवरचा पूल अरुंद व बराच लांब आहे. बस मधून उतरल्यावर आम्ही guest house कुठे आहे त्याची चौकशी केली. कंपनीने guest house चा पत्ता वगैरे सांगितला होता. त्याठिकाणी booking करायची गरज नसते हेही सांगितले होते. एक रूम आपल्या कंपनीकरीता नेहमीच राखीव ठेवतात अशी माहिती दिली होती; तरीही आम्ही तिघे “जागा मिळेल का?” या चिंतेत होतो. !! सायकल-रिक्षा करून guest house वर पोहचलो. आश्चर्य म्हणजे stand वर एकमेव सायकल-रिक्षा उभा होता. थंडीत कुणी घराबाहेर जात नसावे असा आम्ही अंदाज बांधला. Bus stand कडून सतलज नदीकडे जाताना हे guest house लागत होते. सतलजच्या काठावर ते विसावले आहे असे म्हटले तरी हरकत नाही. अंतर पायी कापता येण्यासारखे होते परंतु प्रवासाचा क्षीण बोलू लागला होता. त्यावर मात करणे अशक्य होते. 

ते guest house म्हणजे एक प्रकारचा भूत-बंगला वाटत होता. Horror TV serial किंवा film च्या shooting साठी तर तो perfect set होता. एकाट बंगला... धुकं... पावसाच्या हलक्या सरी... निर्मनुष्य रस्ता... फक्त कमतरता होती ती अमावस्येच्या रात्रीची. !!

बेल वाजवली. रामसेच्या सिनेमात दरवाज्याचा जसा आवाज येतो तसा आवाज ऐकू आला. नोकराने दार उघडले. माणूस विचित्र वाटत होता. आम्ही त्याला कुठून आलो, कशासाठी आलो वगैरे माहिती सांगितली. आत गेल्यावर त्याने रूम मधून रजिस्टर आणले आणि सगळे टिपून घेतले. त्याने मागितल्या प्रमाणे आम्ही दहा दिवसांचे  advance payment करून टाकले. तिथे फक्त राहायची सोय होती. त्यानंतर त्याने आमची रूम दाखवली. गरम पाणी करण्यासाठी boiler कसे वापरावे इत्यादी सूचना तो देऊ लागला. Bus stand च्या अलीकडे जेवणाची उत्तम सोय होईल असेही त्याने सांगितले. आम्हाला तो बंगला नसून मोठी हवेली वाटत होती. ‘इथे आणखी कुणीच दिसत नाही आहे’ हे विचारल्यावर त्या नोकराने off season चे कारण पुढे केले. तुम्ही निश्चिंत राहा असे आश्वासन देऊन तो नोकर निघून गेला. आमचे मात्र त्याच्या बोलण्यावर समाधान झाले नाही. एकंदरीत मामला ‘गडबड’ वाटत होता...

दुपारी जेवणासाठी hotels ची शोधाशोध सुरु झाली. Bus stand च्या आसपास hotels आणि धाबे होते. एका धाब्यावर गरमागरम आलूपराठे आणि लोणी यांवर भरपूर ताव मारून आम्ही guest house ला परतलो. काहीवेळ विश्रांती घेतली. संध्याकाळी ६ च्या दरम्यान जाग आली. बाहेर अंधार पडला होता. पुन्हा धुके दाटले होते. उशिरा जेवण झाल्याने रात्री कुणीच जेवणार नव्हते त्यामुळे जरा आजूबाजूला फिरून येऊ असे ठरवत आम्ही guest house बाहेर पडलो. नोकर खाली दारापाशी विडी ओढत बसला होता. त्याने अंधारात नदीपात्राकडे जाऊ नका असा सल्ला दिला. रस्त्यावरचे मिणमिणते लाईट्स, धुकं यामुळे गूढ वातावरण निर्माण झाले होते. क्वचित एखाद-दुसरे वाहन त्या रस्त्यावरून जाताना दिसत. 

(क्रमशः)

No comments:

Post a Comment