Sunday 17 March 2013

दूरदर्शनचे दिवस




मागील आठवड्यात Crossword ला जाणे झाले. तिथे गेल्यावर खरेदी होतेच त्यामुळे मध्यंतरी मी Crossword ला जाणे टाळत होतो. या खेपेस देखील वेगळे काही झाले नाही. फिरता फिरता Malgudi Days च्या DVD Pack वर लक्ष गेलं. पुढच्या २ मिनिटात त्याची खरेदी झाली होती. DVD Cover वरील R. K. Laxman यांची ‘मालगुडी डेज’ मधील निरनिराळ्या पात्रांची व्यंगचित्रे बघून एकदम दूरदर्शनचा जुना बहराचा काळ डोळ्यांसमोर उभा ठाकला. एकेकाळी पुरलेला खजिना हाती लागावा आणि तो उघडल्यावर एकापेक्षा एक असे दागिने, हिरे- मोती-माणिक बाहेर काढले जावे असे झाले !!

भारतातल्या ८०-९० च्या दशकात झालेल्या खूप मोठ्या स्थित्यंतराचा दूरदर्शन हा महत्वाचा घटक आहे. अर्थव्यवस्था खुली झाली होती. घरांघरात TV चे पदार्पण होत होते. संध्याकाळी कामं आटोपून लोक TV पुढे विविध कार्यक्रम पाहायला हमखास बसू लागलेत. लहान-थोर सगळेच. मोहल्यात एक-दोन मंडळींकडे TV असला तरी आसपासची तमाम जनता विशिष्ट कार्यक्रम बघायला जमा होत असे. रविवारी रामायण किंवा महाभारत सुरु होण्याआधी TV ची साग्रसंगीत पूजा होऊन त्याला हारतुरे घालण्यात येत. रामायणातला एखादा दुखःद प्रसंग बघून वृद्धांच्या नेत्रकडा ओलावल्या नाही तर नवल !! रंगोली, चित्रहार आणि weekend ला दाखविल्या जाणाऱ्या सिनेमाची नित्यनेमाने व आतुरतेने वाट पाहीली जात असे. एखादा आवडीचा कार्यक्रम सुरु असताना अचानक वीज गेली की लोकांचा तीळपापड होणे साहजिक होते. क्रिकेट Match चा दृक-श्राव्य स्वरुपात मनमुराद आस्वाद घ्यायला सुरुवात झाली होती. जुने सिनेमे बघता येत होते. जगात कुठे काय सुरु आहे ते बातम्यांद्वारे पाहणे शक्य झाले होते. एकूणच काय, देशातल्या जनमानसाला TV बघण्याची ‘सवय’ जडत होती.

माझ्या बाबतीत म्हणाल तर ‘मालगुडी डेज’ ही माझी सगळ्यात प्रिय मालिका. अनमोल ठेवा आहे तो !! मालगुडीचे जनक R K Narayan हे किती थोर साहित्यिक आहेत हे नंतर कळलं. दक्षिण भारतातल्या मालगुडी नावाच्या एका छोट्या Townमध्ये वास्त्यव्याला असलेले स्वामी आणि त्याचे मित्र, जगन मिठाईवाला, नागराज, Talkative Man शेषाद्री, ज्योतिषी, पोस्टमन, नागराज, सिद्धा, ईश्वरन इत्यादी पात्रं अविस्मरणीय आहेत. ह्यातले स्वामी आणि त्याचे मित्र सर्वांत जास्त भाव खाऊन गेले. ही सगळी आपल्यासारखीच माणसं. मानवी नाते-संबंधांचे हळुवार पदर उलगडून दाखवणारी ही हलकी-फुलकी, सुंदर मालिका होती. आज ‘मालगुडी डेज’ वाचल्यावर कळतं की पुस्तकाबरहुकुम त्या मालिकेचे किती सुरेख दिग्दर्शन आणि चित्रीकरण केले होते.

‘फ्लॉप शो’ ही देखील माझी एक आवडती मालिका. जसपाल भट्टी नामक सरदारजी या मालिकेद्वारे घरोघरी प्रसिद्ध झाले होते. समाजात सुरु असलेल्या भ्रष्टाचार, फसवणूक, शासकीय कामांतील दिरंगाई इत्यादी कृष्णकृत्यांचा त्यांनी नर्मविनोदी शैलीत समाचार घेतला होता. बघताना हसून हसून पुरेवाट व्हायची. सुरुवातीच्या Titles मध्ये Misdirected by Jaspal Bhattiअसे दाखवणे आणि शेवटी त्या episode वर बेतलेलं विडंबन गीत सादर करणे ही कल्पना नवीन तर होतीच पण कौतुकास्पद सुद्धा होती. नाव जरी फ्लॉप शो असलं तरी मालिका Super hit होती. आजही DVD वर ते episodes पाहताना त्यातल्या ताजेपणाचा अनुभव येतो.

तसेच Jungle Bookने तर ‘बच्चा कंपनीला’ फार वेड लावले होते. गुलजार साहेबांच्या ‘जंगल जंगल बात चली आहे ...पता चला है... अरे चड्डी पहनके फुल खिला है... फुल खिला है’ या Title Song ला त्याचे श्रेय द्यावेच लागेल. जंगलातले प्राणी कार्टून किंवा animated स्वरुपात पाहण्याची ती पहिलीच वेळ होती. मोगली हिरो होता. शेरखान बद्दल उत्सुकता आणि भीती वाटायची... बगीरा मला खूप आवडायचा... बगीरा,भालू आणि मोगली मिळून त्याला एकदाचे ठार का नाही मारत असा प्रश्न पडायचा. पण तसं झालं असतं तर मालिका लगेच संपली असती हे माझ्या बाल-बुद्धीला कळण्यापलीकडे होते. लहानपणी घरी आलेल्या पाहुण्यांना मी मोगली सारखं धावून वगैरे दाखवत असे. मोगलीच्या त्या boomerang होणाऱ्या लाकडी शस्त्राचे नाव मी नेमके विसरलो आहे परंतु मी तेव्हा ते बनवल्याचे मला स्मरते. फरक एवढाच होता की एकदा ते फेकले की वापस येत नसे. जाऊन आणावे लागे. जंगलाची ही आगळी ‘सफारी’ न विसरता येण्यासारखी आहे. त्याचे videos आता Youtube वर बघता येतीलही पण डोळ्यातले किंवा चेहऱ्यावरचे त्यावेळचे ते कौतुकाचे व आनंदाचे भाव कुठून आणू ? वय वाढण्यापरत्वे innocence ही संपतो.

Prime Time ला लागणाऱ्या मालिकांमध्ये जवळपास सगळ्याच लोकप्रिय झाल्या होत्या. ‘हमलोग’ आणि ‘बुनियाद’ चा प्रत्येक घरात बोलबाला होता. ‘नुक्कड’ ने सगळ्यांना आपलेसे केले होते. लोकप्रियतेचे नवे परिमाण या मालिकांनी गाठले होते. ‘सुरभि’ माहितीचे भांडार उपडे करत होती. ‘भारत एक खोज’ पुन्हा एकदा इतिहासातून फिरवून आणत होती. मध्यमवर्गीयाच्या रोजच्या ओढाताणीचे चित्रण ‘वागले की दुनिया’ मध्ये पाहायला मिळत होते. ‘किरदार’ मध्ये गुलजार साहेबांनी मानवी व्यक्तिमत्वांचे उत्तम नमुने पेश केले होते. नसिरुद्दीन शहांनी अभिनयाच्या ताकदीवर ‘मिर्झा गालिब’ जिवंत केला होता. ‘देख भाई देख’ खऱ्या अर्थाने हसवत होते. ‘तहकिकात’ मधली detective जोडगोळी TV समोर बसायला भाग पडत असे. कठपुतळ्यांच्या माध्यमातून कथा सादर करणारी ‘पोटली बाबा की’, ‘Jungle Book’, ‘He-Man’,’Spiderman’,’Duck Tales’,’Talespin’ सारख्या cartoon serials लहान मुलांसाठी special होत्या.

बंगाली साहित्याचे तर दूरदर्शनच्या मालिका घडवण्यात विशेष योगदान आहे. गुरुदेव टागोरांच्या कथांवर आधारित ‘विविधा’, शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या कादंबरींवर बेतलेल्या ‘श्रीकांत’ आणि ‘अरक्षणीया’ ह्या धारावाहिक पाहिल्याचे मला आठवते. तेव्हा त्या तितक्याशा समजत नसल्या तरी त्यातला drama लक्ष वेधून घ्यायचा. कुठेतरी हे संस्कार झाले असतील त्यावेळी; म्हणूनच कि काय मी बंगाली साहित्याच्या प्रेमात पडलो. शरदिंदू बंधोपाध्याय यांच्या रहस्य कथांवर आधारलेली ‘व्योमकेश बक्षी’ ही आणखी एक माझी आवडती मालिका. शेवटपर्यंत रहस्यावरून पडदा हटत नसे आणि अंदाज बांधता बांधता episode संपतही असे.

मराठी मालिकांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास याकुब सईद यांच्या ‘पुणेरी-पुणेकर’ चा उल्लेख अगोदर करावा लागेल. जातिवंत पुणेकरांच्या खास प्रवृत्तीचे दर्शन घडवणारी ही मालिका बघताना मजा वाटायची. त्याचबरोबर ‘महाश्वेता’ ही दुपारी लागणारी मालिका आई नियमित पाहत असे. मी फक्त त्यातले शेवटचे ‘भय इथले संपत नाही ...’ हे गाणं कधी लागतं त्याची वाट बघत असे. हे गाणं आणि ते लिहिणारा पुढे जाऊन आपल्या मनावर एवढं गारुड करेल असे तेव्हा नक्कीच वाटले नव्हते. टिळक आणि आगरकर यांच्यातले वादविवाद, मतभेद यांवर आधारित ‘मर्मबंध’ ही मालिका डोक्यावरून जात असे. ‘गोट्या’ हे मालिकेचे आता फक्त नाव आठवतंय. त्यातला content विस्मृतीत गेला आहे. नववर्षानिमित्ताच्या मराठी कार्यक्रमात दिलीप प्रभावळकर यांचा स्त्री वेषातला अभिनय अजूनही आठवतो. मुलांच ‘किलबिल’ आठवतं. पु.लं च एखाद दुसरं कथाकथन पाहिल्याचे स्मरते. ‘बोक्या सातबंडे’ बऱ्यापैकी आठवतो.

हे सगळं विषद करताना ‘क्रिकेट’ ला कसं वगळू शकतो आपण? दूरदर्शनमूळे क्रिकेटचे सामने घरबसल्या ‘बघता’ येऊ लागले. सचिन तेंडूलकर अद्वितीय कर्तुत्वाच्या जोरावर घराघरात पोहचला होता. त्याला batting करताना बघणे म्हणजे पर्वणी होती (आणि आहे)... एकत्र येऊन कुठल्यातरी दुकानासमोर किंवा घरी match पाहणे आणि six/four मारल्यावर शिट्ट्या, टाळ्या वाजवणे, आरोळ्या ठोकणे ह्याचा आनंद अपरिमित असतो. हा प्रकार क्रिकेटवेड्या भारतीय जनमानसात रुजवण्यास दूरदर्शनचा मोठा हातभार आहे. ९० च्या दशकातल्या त्या World Cup च्या matches... शारजा च्या matches आठवून ‘जाने कहां गये वो दिन..’ असेच म्हणावेस वाटते.

पोतडीतून एकेक खेळणं बाहेर काढावं तसं झालं आहे. लिहावं तेवढं कमी !!

थोडक्यात सांगायचे झाल्यास उत्तम कार्यक्रमांचा पूर्वी सुकाळ व सुवर्णकाळ होता. हमलोग, बुनियाद, रामायण, महाभारत, पोटली बाबा की, किले का रहस्य, नुक्कड, मालगुडी डेज, रहने दो जी, मिर्जा गालिब, वागले की दुनिया, सर्कस, अजनबी, फौजी, तेनाली रामा, Talespin, Duck Tales, बिक्रम और बेताल, मिट्टी कें रंग, गुल गुलशन गुलफाम, भारत एक खोज, किरदार, करमचंद, चाणक्य, CIET तरंग, जुनून, सुरभि, रिपोर्टर, टिपू सुलतान, द ग्रेट मराठा, देख भाई देख, तहकिकात, शांती, अलिफ लैला, तहरीर- प्रेमचंद की, चंद्रकांता, सुराग इतकेच नव्हे तर शक्तिमान देखील TV समोर खिळवून ठेवत. कालांतराने सततचे वाढणारे channels आणि उपलब्ध पर्याय बघता दूरदर्शन स्पर्धेत मागे पडत गेले. पुढे केबल फोफावू लागलं. आता तर गावोगावी Dish/Tata sky दिसू लागलंय. सुमार Entertainment आणि TRP चा नुसता सुळसुळाट झाला आहे. Reality Shows, Comedy Shows आणि विचित्र जाहिरातींचा भडीमार सुरु आहे. बातम्या तर दुथडी भरून वाहत असतात. जेवणं आटोपल्यावर कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र TV बघताहेत हे चित्र इतिहासजमा झाले आहे. कुटुंबसंस्थाच जिथे विस्कटू लागली आहे तिथे आणखी काय बोलावं. !! ‘तनहाई में दिल यादें संजोता है’ ह्या गाण्याच्या ओळीप्रमाणे दूरदर्शनचे ते सुगीचे दिवस कधी कधी आठवतात आणि मन चिंब करून जातात. आमची पिढी तर दूरदर्शन सोबतच मोठी होत गेली. आता रिमोटच्या बटणांवर जगभरातली माहिती क्षणात आणि सहज मिळू लागली आहे पण Life ‘जिंगालाला’ करण्याच्या नादात, Charm मात्र हरवल्यासारखा वाटतो.

शेवटी काय, “कालाय तस्मै नमः” हे सगळीकडे लागू होतंच.

No comments:

Post a Comment