Tuesday 12 March 2013

जीवन-मरण


(आवडत्या कथेचा अनुवाद करण्यात मजा असते असे मला कळून चुकलंय. गुलजार साहेबांच्या एका कथेचा हा स्वैर अनुवाद)


मेजर मानवेंद्रचा म्हातारा काका कुठेही कुणाचाही मृत्यू झाला की एकच पालुपद लावत असे – “अरे, मरणाला कुणीही टाळू शकलं नाहीये.”

पण मानवेंद्रनी जणूकाही पेटून उठून या म्हणीप्रचुर उद्गाराला शह दिला होता. मानवेंद्रच्या जीवनात इतक्या साऱ्या अघटित घटना घडल्यानंतरही तो सुखरूप असल्याचे बघून म्हातारा काका हे वाक्य बोलायला कचरत असे. मेजर मानवेंद्रच्या बाबतीत असं बोललं जायचं की एखादा माणूस घास खातो तसं त्याने मृत्यूला गिळून टाकलंय. मृत्यू आता त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. काही लोक तर असे म्हणत की मृत्युदेवता त्याच्याकडे कित्येकदा प्राणांचे दान मागायला आली... भिक्षेकरी म्हणून !! पण या महाशयांनी तिला हाकलून लावलं.

लहानपणी मानवेंद्रला कुठलातरी आजार जडला होता. जगण्याची कुठलीच आशा शिल्लक नव्हती. आई वडिलांनी डॉक्टर, हकीम, वैद्यापासून जादूटोणा करणाऱ्यां पर्यंत सगळे उपाय केले होते. कुणास ठाऊक, आईची माया होती की डॉक्टरांच्या औषधाचा परिणाम; मानवेंद्र बचावला. रिकाम्या हाताने मृत्यू परतला होता. कृश प्रकृतीच्या मानवेंद्रकडे पाहिल्यावर असे वाटे की हा वाचला तर खरं परंतु पुढे जगण्याची शाश्वती कमीच !! हे सत्य होतं कारण काही अवधी उलटताच मृत्यूने त्यावर पुन्हा एकदा हल्ला केला होता. शाळेतून घरी आल्यावर जवळच्या बागेत खेळताना त्याला सर्पदंश झाला. आजूबाजूची मुले घाबरली. कुणीतरी त्याच्या घरी येऊन बातमी कळवली. त्याची आई तडक तिकडे गेली... मुलाला उराशी कवटाळत, आक्रोश करत डॉक्टरकडे घेऊन गेली. विषाने आपले काम करावयास प्रारंभ केला होता. मानवेंद्र बेशुद्ध होता. जखम पाहून डॉक्टर म्हणाले, “एवढा उशीर का केला? साप फार विषारी होता.” डॉक्टरनी त्याचे हात, पाय घट्ट बांधले आणि इंजेक्शन दिले. सोळा तासां नंतर जेव्हा मानवेंद्र शुद्धीवर आला तेव्हा पुन्हा एकदा मृत्यू स्वगृही परतला होता. त्याच्या आईने तर या घटनेनंतर बरेच व्रत-वैकल्ये, नवस वगैरे केलेत.

सापाचं विष काय उतरलं, मानवेंद्रची तब्येत चांगलीच सुधारू लागली. काही वर्षातच तो सुदृढ, राजबिंडा व तरणाबांड दिसू लागला. यौवनाची झलक स्पष्ट दिसत होती. शहरातल्या रस्त्यांवर जेव्हा तो तोऱ्यात गाडी दामटत असे तेव्हा कित्येक तरुणी त्याचाकडे पुन्हा पुन्हा वळून बघत !! कुठलातरी म्हतारबुआ हे पाहून त्याला शिव्यांची लाखोली वाहत म्हणत असे- “च्यायला, मरेल हा एकदिवस लवकर”. पण जणूकाही हे उद्गार मानवेंद्र ऐवजी दुसऱ्याच कुणालातरी म्हटल्या सारखे वाटत.

एकदिवस असे शिव्या-शाप देणार्याचं भाकीत खरं ठरते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. त्याच्या मोटार सायकलचा जबरदस्त accident झाला होता... हातात जिलबीचा चुरा करावा तशी त्या गाडीची अवस्था झाली होती... ट्रकने जोरदार धडक दिली होती. त्या accident मध्ये दुर्दैवीरीत्या आडव्या आलेल्या सायकलस्वारचे शव बाजूलाच पडून होते. Ambulance आली. अर्धमेल्या स्थितीत मानवेंद्रला ICU मध्ये admit करण्यात आले. कृत्रिम श्वासोच्छवासावर त्याला ठेवण्यात आले होते. खूप रक्त गेलं होतं. पाच बाटल्या रक्त देऊनही डॉक्टर त्याचा जीव वाचवण्याबद्दल साशंक होते. त्यांनी सरळ सांगितलं होतं- “काही तास शिल्लक आहेत. आम्हाला अजिबात आशा नाही.”

सहा महिन्यानंतर मानवेंद्र घरी परतला होता. त्याच दिवशी त्याच्या म्हाताऱ्या काकाचे उद्गार पहिल्यांदा बदलले होते- “देवा, ह्या पोराला उदंड आयुष्य दे. ‘देव तारी त्याला कोण मारी’ हेच सत्य. !!”
वडिलांच्या निधना नंतर मानवेंद्र सैन्यात भरती झाला. दुसरे महायुद्ध सुरु झाले होते. परेड करता करता एक दिवस मानवेंद्र ‘फ्रंट’ वर पोहोचलाच. तो सैन्यात काय भरती झाला, बिनबोभटपणे मरणाच्या सापळ्यात वावरु  लागला !! मृत्यूदेवतेला तर आयता बळी पुढ्यात दिसत होता. शत्रूच्या गोटातून सुटलेली गोळी त्याच्या अगदी जवळून गेली... मागचा धारातीर्थी पडला... त्याच्या मृत शरीराला सांभाळता सांभाळता पन्नास एक मीटर वर एक बॉम्बगोळा फुटला... अख्खी फलटण कोसळली... पण मानवेंद्र –

काही दिवसांतच मेजर मानवेंद्र पुनश्च जखमेवरच्या पट्ट्या सोडून मृत्यूशी दोन-दोन हात करायला ‘फ्रंट’ कडे वाटचाल करू लागला... मृत्यूचे दात घशात घालण्यासाठी तो परत एकदा सज्ज झाला होता. पण यावेळेस फासा उलटा पडला.
मानवेंद्र शत्रूच्या हाती लागला. यमराज बहुतेक जाणून होते की ह्याला तुकड्या तुकड्याने मारणेच उचित ठरेल; हा सबंध काही आपल्या जाळ्यात अडकत नाहीये. शत्रूच्या camp मध्ये अर्थातच उपासमार, छळवणूक, अत्याचार इत्यादी विविध रूपांत मृत्यू थैमान घालत होता... यापेक्षा तत्काळ मरण बरे !!

एका camp मधून दुसरीकडे, तिथून आणखी वेगळ्या ठिकाणी असे करता करता त्याचे खूप हाल करण्यात आले. वेळोवेळी उभे ठाकणारे हे मरण या खेपेस विजयश्री खेचू पाहतच होते की ‘द्वितीय महायुद्ध संपुष्टात आले’. कैद्यांच्या झालेल्या स्थलांतरामूळे मानवेंद्रला पुन्हा जीवनदान मिळाले. तो सुखरूप घरी परतला. त्याचा आईला तर आकाश ठेंगणे झाले होते... 

काकांनी दान-धर्म केला... सोहळा साजरा केला, पार्ट्या दिल्या. अशाच एका पार्टीत नेमका फ्यूज उडाला. मानवेंद्र मीटर तपासत होता. विजेच्या अनावृत्त तारेला त्याने नकळत स्पर्श केला.... आणि ....इतकी वर्षं सततच्या हुलकावणीमूळे त्रस्त झालेल्या मृत्यूने एकदाचा सुटकेचा श्वास सोडला. मृत्युदेवतेने अखेर बाजी मारलीच.




-    गुलजार
‘जिंदगी और मौत’....(“रावी पार”)
(अनुवाद : योगेश)

1 comment: