Monday 21 October 2013

अजानवृक्षाच्या छायेत


‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या उक्ती प्रमाणे ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मी पदरात पाडून घेतले आणि माउलींच्या भक्तिरसात न्हाहून निघाल्याची चैतन्यमय अनुभूती झाली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि दिव्यतेने उजळून निघालेल्या त्यांच्या अलौकिक आयुष्याबद्दल, दोन ओळी देखील लिहिण्याची पात्रता माझ्यात नाही; हे पूर्णपणे जाणून प्रस्तुत लिखाण करीत आहे. ‘मोगरा फुलला’ ही विलक्षण कथा आणखी चार लोकांनी वाचावी एवढे सांगण्यासाठीचा हा केलेला अट्टाहास !! हे पुस्तक माझ्या हाती पडणे हा मी तरी एक शुभसंकेतच मानतो. ‘धर्म’ ह्या मानवनिर्मित संकल्पनेचा मूळ गाभा सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून सर्वत्र गोंधळाची व अविश्वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वयंघोषित बाबा आणि साधू लोकांनी सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. जन-मानसामध्ये निवास करीत असणाऱ्या नकारात्मकतेचे आणि भयाचे भांडवल करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सोय ह्या लोकांनी चतुराईने करून ठेवली आहे. ह्या एवढ्या पसाऱ्यात मोठ मोठी धार्मिक संस्थाने कशी काय मागे असणार? कुठलेही कष्ट न उचलता अमाप काळ्या पैशाचे ते धनी बनले आहेत. विविध राजकीय पक्षही धर्माची (आणि सर्वधर्मसमभावाची) पताका आम्हीच उंचावली आहे असे भासवीत आहेत. प्रत्येकवेळी विवेकाचा पराभव होत आहे. ‘स्व’त्व हरवलेल्या सामान्य माणसानी यातून कसा मार्ग काढावा यासाठी एकच तरणोपाय आहे आणि तो म्हणजे संत-साहित्याच्या ‘अभ्यासाचा’ व तद्नुसार आचरण करण्याचा... खासकरून ‘श्री ज्ञानेश्वरीचा’ !! महाराष्ट्राला संतांची आणि संत-साहित्याची विशाल परंपरा लाभली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ तर सर्व ग्रंथांचा शिरोमणी... कालातीत महाग्रंथ... ज्ञानदेवांच्या स्वानुभूतीतून, प्रज्ञेतून, प्रतिभेतून, ज्ञानातून, वाग्यज्ञातून, जाणीव-नेणीवेतून प्रसवलेला महाग्रंथ... नुसतं पारायण करून गंध, फुले वाह्ण्यासाठीचा नव्हे तर त्यात लिहिलेलं प्रत्यक्ष जीवनात आचरण्याचा. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात ते उगाच नाही.

‘मोगरा फुलला’ ही कहाणी त्या ज्ञानेश्वरीच्या राजमार्गाकडे नेणारी एक सुबक पाउलवाट आहे. गो. नि. दांडेकरांनी ही कादंबरी लिहून आपल्यासारख्यांचे एक प्रकारे पथ-प्रदर्शनच केले आहे. हे लिखाण पुन्हा आपल्याला त्या ‘ज्ञानियांच्या राजाची’ महती आणि गरज सांगून प्रकाशाची नवी कवाडे उघडी करते. ही गाथा आहे अवघ्या ब्रह्मांडाची ‘माउली’ झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची, त्यांच्या माता-पित्याची, त्यांच्या भावंडांची... त्यांनी सोसलेल्या अपरिमित हालअपेष्टांची... आणि ह्या सगळ्यांची आयुष्ये अगदी जवळून बघितलेल्या भट्टदेव व कावेरी या पात्रांची. सन्यस्त धर्माचे पालन करीत हिंडणारा भट्टदेव नावाचा जोगी आणि ज्ञानेश्वरांच्या मातेची सखी असलेली कावेरी ह्यांच्या मुखाद्वारे या कुटुंबाचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरांचे पिता श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीदेवी ह्यांचे पुर्वायुष्य, विवाहोत्तर कष्टप्रद जीवन, विठ्ठलपंतांनी धरलेली विरक्तीची कास, ‘प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडून मग परमार्थ साधावा’ असा त्यांच्या गुरूंनी दिलेला आदेश, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमाकडे परतताना विठ्ठलपंतांना करावे लागलेले प्रायश्चित्त, धर्मशास्त्री आणि पांडित्याचा टेंभा मिरविणाऱ्या ब्राह्मणांकडून कुळकर्णी कुटुंबाला वाळीत टाकणे, चार अलौकिक पुत्रांचा जन्म, श्री निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर जवळ अकल्पित व अद्भूतपणे प्राप्त झालेली ‘नवनाथां’तील श्री. गहिनीनाथांची दीक्षा व ईश्वरानुभूती, “मुलांच्या भवितव्याची काळजी असेल तर देहत्याग करावा लागेल” असा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीदेवीला ब्राह्मणांनी दिलेला आदेश, त्या दोघांचा देहत्याग, त्यानंतर उघड्यावर पडलेल्या चारही भावंडांची झालेली फरफट आणि वानवा, संन्याशाची पोरे म्हणून त्यांच्या वाटेला आलेला अपमान आणि घृणा, विपरीत परिस्थितीतही समाजाचेच हित चिंतण्याची ह्या भावंडांची वृत्ती, श्री सार्थ ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि माउलींच्या संजीवन समाधी पर्यंत प्रत्येक घटनेचे रसाळ आणि हृदयस्पर्शी वर्णन गो.नि. दांडेकरांनी करून ठेवले आहे.

‘मोगरा फुलला’ चे निमित्त होऊन कालच आळंदीला माउलींच्या भेटीला जाऊन आलो. वेगळ्याच प्रसन्नतेचा अनुभव आला. किती पवित्र जागा !! ७००-८०० वर्षं उलटून गेलीत. आजही माउलींच्या प्रेमापोटी लोक इथे भक्तिभावाने येतात... आणि यायलांच हवं. जातीपातींच्या कक्षेत गुरफटलेल्या समाजात सगळे भेदभाव विरून ज्ञानाची गंगा वाहती व्हावी आणि ‘मनुष्य धर्म’ वृद्धिंगत व्हावा यासाठी किती सोसलंय माउलींनी !! विद्वत्ता, कर्तुत्व, मान-सन्मान, अश्रद्धा, अहंम ह्या प्रवृत्ती त्यागून त्यांच्या चरणी लीन व्हावं. ज्या अजानवृक्षाखाली माउलींनी संजीवन समाधी घेतली त्याच्या छायेत क्षणभर विसावलो. नाना विचारांचे मोहोळ उठले—

सुवर्णपिंपळाखाली विराजमान असलेले ज्ञानदेवांचे कुलदैवत श्री सिद्धेश्वर महादेव कितीतरी प्रसंगांचे साक्षीदार असतील !! कशी असतील ही भावंड?... कसे असतील यांचे माता-पिता?... किती अवहेलना आणि अपमान सहन केला त्यांनी !! घरात अठरा विश्वे दारिद्र्य... वडील भिक्षा मागत... निरुपण, प्रवचन करीत... असल्या अवघड परिस्थितीतही चारही मुलांना या माता-पित्याने सांख्य, उपनिषद, वेदांतापासून ते तर्क, मीमांसा, भगवद्-गीते पर्यंत अध्यात्मशास्त्राच्या सगळ्या विषयात पारंगत केले... उत्तम संस्कार केले... त्यावेळी ग्रंथ उपलब्ध नव्हते... जे पाठ केले ते सांगावे लागे... माता-पित्याच्या देहत्यागानंतर कसे काढले असतील या मुलांनी दिवस?... उन्हातान्हात, थंडी-पावसात एवढीशी ही पोरं माधुकरी मागत हिंडायची... काय दिलं समाजानी यांना?... उपेक्षा... छळ... बहिष्कार... ब्राह्मण वर्गाने वाळीत टाकले यांना... का? तर धर्म भ्रष्ट होईल म्हणून !! हा कुठला धर्म?... कर्मकांड आणि तथाकथित ब्रह्मवृन्दांच्या अहंकाराला पोषित ठेवणाऱ्या रूढी यांच्या आहारी जाऊन धर्म, शास्त्र आणि नीती च्या गफ्फा मारणाऱ्या ब्राह्मण वर्गाने केवढे मोठे पातक करून ठेवलेय... ती पोरं भिक्षा मागायला आलेली असताना ही लोकं त्यांच्या झोळीत शेण, कचरा इत्यादी टाकत असत... कुठलीही प्रतिक्रिया न देता, शांतपणे समस्त जनांच्या कल्याणाची कामना करीत ही पोरं पुढे चालू लागत... ह्या सगळ्याचा विचार करता करता, मन विषण्ण झाले. ज्या पापाला कुठलेही प्रायश्चित्त नाही असे काम आमच्या पूर्वजांनी करून ठेवले आहे हे खेदाने सांगावेसे वाटते... ह्यांचीच पापं आम्ही आता धुवत आहोत का?... खरोखर संताप येतो... बरीच लोकं संपूर्ण कुळातील मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी वगैरे भव्य-दिव्य असे अनुष्ठान, पूजा-अर्चा, भंडारा वगैरे करतात... मनात एक असा प्रश्न उपस्थित झाला की, का म्हणून ‘अशा’ पूर्वजांसाठी वेळ वाया घालवायचा? महाराष्ट्राचा गेल्या हजार वर्षांचा इतिहास बघता; सोवळे ओवळे, जेवणावळी, मिथ्याहंकार, रूढी, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद अशा भ्रामक कल्पनांमध्येच ब्राह्मणांनी आपल्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या आहेत...
माउलींनी मात्र अशा खल प्रवृत्तीच्या लोकांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या ठायी सत्कर्म करण्याची इच्छा होओ ही प्रार्थना करून त्यांना क्षमा केली आहे. ‘माउलीच’ ती !!

ही कादंबरी वाचता वाचता बरेच ठिकाणी थबकलो... एक प्रसंग असा--
समाजाने वारंवार ज्ञानदेवांच्या माता-पित्यास निंदिले... एके दिवशी क्षुब्ध होऊन ज्ञानदेवांनी कुटीची ताटी लावून घेतली आणि ते आसनस्थ झाले. काळजीपोटी निवृत्तीनाथ कुटीबाहेर येरझरा घालू लागले... तेव्हा मुक्ताईने ताटीचे अभंग म्हणून ज्ञानदेवांची समजूत घातली... “योगियांचा योगी तू... ज्ञानियांचा ज्ञाना... तू का म्हणून स्वतःस क्लेश करून घेत आहेस?”
ती भरभरून गाऊ लागली--
                               योगी पावन मनाचा |
                               साहे अपराध जनांचा ||
                               विश्व रागे झाले वन्ही |
                               संती सुखें व्हावे पाणी ||
                               शब्द-शस्त्रें झाले क्लेश |
                               संती मानावा उपदेश ||
                               विश्व पट, ब्रह्म दोरा |
                               ताटी उघडा ज्ञानेश्वरां ||

केवढीशी ही मुलगी !! आपल्या थोरल्या भावाला समजावत त्याला सांत्वनपर, प्रेमळपणे उपदेश देत आहे. कुठून स्फुरले तिला हे?... केवढी ही प्रगल्भता !! हा केवळ प्रतिभेचा अविष्कार नाही... हे स्वयंभू असे संचित आहे... आणि त्याचे उदात्त आणि सुंदर प्रकटीकरण आहे. हे कल्पनातीत आहे... कुठल्याही तर्काच्या आणि बुद्धीच्या तराजुतून हे तोलता येत नाही... प्रज्ञा, मेधा, प्रतिभेच्या पलीकडील आहे हे सर्व... ती म्हणतेय, ‘विश्व पट, ब्रह्म दोरा’... अचानक Quantum Physics मधील ब्रह्मांडाचे कोडे सोडवायच्या प्रयत्नांत असलेल्या String Theory व त्या निगडीत framework ची आठवण झाली... आश्चर्यकारक अशी analogy... ७००-८०० वर्षांपूर्वी एवढे गूढ सत्य ही छोटीशी मुलगी बोलून जाते... काय म्हणावं याला?... पृथ:करण करणे आपल्या क्षमते बाहेरचे आहे !!

आणखी एक प्रसंग... निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जेव्हा संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांसाठी मुक्त करण्याचा आदेश देतात तो प्रसंग किती सुरेखपणे वर्णिला आहे !!
भोवताली जनसमुदाय. ज्ञानेश्वर निरुपणास सुरुवात करतात... मनुष्यात विद्यमान असलेल्या सामर्थ्याचे ते वर्णन करतात--
“जन्म मृत्युरूपी चक्रावर घातीलेले हें मृतीकापात्र- आगी लागल्यावरी ज्याची चिमुटभरी राख होवोन आकाशी उधळते- ऐसें हे शरीर-
मात्र त्यातील “प्रज्ञा”-
जिच्यामध्ये ब्रह्मांड कव घालायचे सामर्थ्य !
केवळ तिच्या बळावरी आकाशींच्या नक्षत्र तारकांचे वेध घेता येताती-
पृथ्वी म्हणजे काय... आप म्हणजे काय... तेजाचे रूप काय... वायू कैसा, केवढा?
हे सर्व आकळण्यायेवढा ज्या बुद्धीचा आवाका-
तिणे या आवघ्यातून थोर जो परमात्मा- त्याचे ध्यान काय म्हणोन न करावे?
मत्त गजास आकळण्याचे ज्याचे अंगी सामर्थ्य, त्याने मुखावर घोंगावणारी मुरकुटे काय मारीत बैसावे?
साती सागर पैल जाण्याऐसा जो बळीवंत त्याने थिल्लरातं काय म्हणोन तृप्तता अनुभवावी?
दाही दिशा ओलांडण्याची शक्ती ज्याच्या पंखांमध्ये त्याने येका पिंजऱ्यात काय म्हणोन संतुष्ट असावे?
जो सगुण आणि निर्गुणही आहे-
जो साकार आणि निराकार-
जो सूक्ष्म आणि स्थूल-
जो दृश्य आणि अदृश्य- किंबहुना जो परेपलीकडला, तो जर भक्तीमुळे वश करिता येतो, तर काय म्हणोन करू नये?”
अमोघ वाणी... ज्ञानामृत.

असेच एकदा, पंढरीच्या ‘नामदेव’ नामक वेड्या विठ्ठलभक्त भेटीला माउली स्वतः तिथे गेली... त्यास काही गुज बोलावयास.
ज्ञानदेव म्हणाले, “नामा, कुणीही कर्म त्यागू नये. देव, तीर्थयात्रा, भजन हे जाणत्याने सांडो नये. तीर्थयात्रा केल्याने प्रवास घडतो. जनलोकांचे कळते. कष्ट सोसावे लागताती. तितिक्षा अंगी बाणते.”
नामा म्हणाला, ”देव सर्वत्र येकच. हा पंढरीशच नानां रूपे नटला आहे. तीर्थयात्रेसी येवोन मी काय करू?”
“पण हे ध्यानी येण्यासाठी ती नानां रूपे डोळेभरी पाहिली पाहिजेती. ती अवलोकील्याविना त्याचे व्यापकपण नेटके ध्यानी-मनी येत नाही”.

संत नामदेवांचा अर्धवट डूचमळणारा कुंभ माउलींना पुर्ण भरावयाचा होता. 

‘देव सगळीकडे आहे’; पण हे नुसतं बोलून कसं भागेल !! 

विविध क्षेत्रांचे तीर्थाटन, तिथल्या दैवतांची, लोकांची नाना रूपे, विविधता, सहवास, कथा, श्रवण-कीर्तन हे अनुभवल्याशिवाय ही उक्ती सार्थ होत नाही. एकाच फळाच्या जशा वेगवेगळ्या प्रजाती आणि प्रत्येकाची वेगळी चव... तसेच हे आहे. प्रत्येक जागेचे एक स्थान-महात्म्य असते... एक इतिहास असतो... तो प्रवास, तो अनुभव गाठीशी बांधणे हे महत्वाचे असते. ‘वारी’ या संकल्पनेचे हेच मूळ आहे.

असे कितीतरी प्रसंग... कितीतरी घटना...
ज्ञानावर श्रद्धा ठेवून, ज्ञानोपासना करून, भक्तिमार्गाचे दीप प्रज्वलित करून अंतरीचे ‘स्व’त्व जाणून घ्या आणि विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवा असा मोलाचा उपदेश माउलींनी आपल्या सगळ्यांना दिला आहे.
ज्ञानेश्वरीची सांगता करताना माउलींनी एक मागणं मागितलं... आपले गुरु असलेल्या विश्वेश्वररुपी श्री. निवृत्तीनाथांना. ही नुसती प्रार्थना नव्हे... नुसतं मागणं नव्हे, तर एक प्रसाद... फक्त तुमच्या-आमच्या कल्याणासाठीचा नव्हे, तर ‘विश्वकल्याणाचा’...

                        ‘दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
                         जो जे वांछील, तो ते लाहो | प्राणिजात ||’

त्या विश्वात्मक निवृत्तीनाथांनी तात्काळ ‘हा होईल दान पसाओ’ असा आशीर्वाद देऊन ‘पसायदान’ सिद्ध केले.
‘पसायदान’... हाच तो मनुष्याला अभिप्रेत असलेला खरा ‘धर्म’... व्याख्या, रूढी, नियम, कर्मकांड व तत्वप्रणालीच्या निरुपयोगी परिघाला छेदून दशांगुळ उरलेला...
या व्यतिरिक्त उदात्त आणि निर्मळ असं काय असणार? काही नाहीच.
सत्य, शिव आणि सुंदरतेचे हेच ते ‘ज्ञानेश्वरीय’ अधिष्ठान.

आणखी काय बोलावें?
‘कहाणी मागची कहाणी’ या पुस्तकांत गो.नि. दांडेकर ‘मोगरा फुलला’ बद्दल सांगतात--
“अठराव्या वर्षी मी आळंदीस गेलो. तेथें अडीच वर्षे माधुकरी मागून राहिलो. त्या परमपित्याच्या छत्राखाली मी विसावलो. अन्याया विरुद्ध झगडावं, सत्याग्रह करावा, कारावास भोगावा, ही प्रेरणा मला ज्ञानदेवांनी दिली. हातून अनेक अपराध घडले; पण ज्ञानेश्वरीचं विस्मरण झाले नाही. अशी ज्ञानेश्वरी माझं सर्व अस्तित्व व्यापून दशांगुळ उरली आहे. अगदी बाल्यदशेत या मायबोलीला एक मधुर स्वप्न पडलं. त्याचं नावं ‘ज्ञानेश्वरी’. जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत ती या, अतिशय सोसांव लागलेल्या ‘लहानग्याच्या’(ज्ञानदेव) ऋणांत राहील.
मी वारकरी. मजवरचं ज्ञानदेवांचं तत्वज्ञान विषयक ऋण न फिटण्याजोगं आहे. अत्यंत उदार, सर्व समावेशक, कुणाचाही द्रोह न करणारा आणि प्रसंगी प्राणांची बाजी लावणारा असा हा धर्म- असं तत्वज्ञान. त्याचा आदिगुरु ज्ञानदेव आहे. त्यांचं आणखी एक ऋण आहे. आपलं नियोजित काम संपताक्षणी उठून बाजूला सरावं, तिथे रेंगाळू नये, हे ज्ञानोबांनी शिकवलं.
अशी ही ऋणं सांगू तरी किती? ती अंशतः फिटावीत, म्हणून मी ‘मोगरा फुलला’ लिहिली. तो दीड महिना माझा मी नव्हतो. एका तंद्रेंत होतो. झपाटल्यासारखा लिहित होतो. दुसरं कशाचं भान नव्हतं. ‘मोगरा फुलला’ हे एका अर्थें देवकृत्य आहे.”

मराठी सारस्वतात याहून सुंदर, लयबद्ध आणि भावोत्कट गद्य-लिखाण कुणीही केलं नाही आणि कुणी करणारही नाही. गो.नि. दांडेकर लिखित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मराठी साहित्याचा कळससाध्य असा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे. ज्ञानदेवांच्या आई-वडिलांच्या विवाहा आधीच्या जीवनापासून ते ‘माउलींच्या’ संजीवन समाधी पर्यंतचा हा प्रवास केवळ ‘कादंबरी’ न राहता खरोखर ‘अमृतानुभव’ होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, परस्परांमध्ये ‘मैत्र जीवांचे’ जडण्यासाठी आणि लोकोद्धारासाठी ज्ञानदेवांनी ‘गुरु’रुपी विश्वात्मक विश्वेश्वराला पसायदान मागितले होते... त्याचे स्मरण करूनच; ‘मोगरा फुलला’ लिहून ‘गोनिदां’नी मराठी भाषेला अमूल्य साहित्याचे असेच एक दान दिले आहे. हे पुस्तक वाचून मनात पहिल्यांदाच कधी नव्हे ती ‘कृतार्थतेची’ आणि ‘धन्यतेची’ भावना दाटुन आली. कुठलेही पुस्तक वाचताना या आधी असे झाले नव्हते आणि पुढे होणारही नाही... कारण आता ‘अजानवृक्षाच्या छायेत’ मन अभुतपूर्व तृप्ततेने व समाधानाने भरले आहे. अधिक सांगण्यासारखे काहीच नाही... जे आहे, ते शब्दांपलीकडले आहे. ‘ज्ञानियांचा राजा’ या अभंगात श्री. तुकोबाराय जे म्हणतात ते स्मरून समारोप करतो.
                                   
                                    “मज पामरासीं काय थोरपण,

                                    पायींची वहाण, पायीं बरी |”



(संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी)