Tuesday 5 March 2013

कर्मयोगाचे माहेर



भगवद`गीतेतला कर्मयोग हा एव्हाना वाचून आणि ऐकून चोथा झालेला विषय आहे पण या कर्मयोगाचे मूर्तिमंत स्वरूप तुम्ही कधी बघितले आहे का? ‘शिवज्ञाने जीवसेवा‘ ही उक्ती जिथे सार्थ ठरली त्या जागेला तुम्ही कधी भेट दिली आहे? समाजाने ‘टाकाऊ’ म्हणून संबोधलेल्या लोकांना जिथे नव-संजीवनी दिल्या गेली तिथे कधी गेला आहात? दुर्धर रोगाने ग्रस्त झालेल्यांच्या मनगटांना जिथे सामर्थ्य बहाल करण्यात आले अशा जागी तुम्ही गेला आहात? उकिरडा आणि कचार्यासमान वागविलेल्या मनुष्यांना जिथे मायेचे घर मिळाले अशा तीर्थक्षेत्राची यात्रा तुम्ही केली आहे? कदाचित तुम्ही विचाराल “अशी जागा आहे या भूतलावर?”
होय...नक्कीच आहे. एक नव्हे तर अशा तीन ठिकाणी मी नुकताच जाऊन आलो.
आनंदवन, हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्प.

तिथे जाण्यापूर्वी हि एक ‘भेट’ होती पण तिथून परतल्यावर असे वाटतेय कि ती एक ‘वारी’ होती. कर्तुत्व, श्रम, धेय्य आणि धैर्य यांसमोर नियतीने देखील जिथे शरणागती पत्करली अशा या विलक्षण जागा...खूप पवित्र !! रंजल्या गांजलेल्यांचे आयुष्य सुखकर व्हावे,मंगल व्हावे,समृद्ध व्हावे हा विचार ज्या ठिकाणी जन्मतो आणि प्रत्यक्ष कृतीत उतरतो तिथे पावित्र्याची बीजे हि रुजलेलीच असतात. बाबा आमटे आणि साधनाताई आमटे या जोडप्याने स्वतःच्या आयुष्याचा होम करून येथे खर्या अर्थाने ‘आनंद’वन फुलविले आहे. तिथे ‘जाणें’ हे नुसतेच ‘जाणें’ नसते तर ती एक अनुभूती असते...एक शिक्षण असतं...एक प्रेरणा असते...आणि एक सणसणीत चपराक देखील असते. “आपण आत्तापर्यंत केले तरी काय?” हा प्रश्न जर तिथे गेल्यावर पडला नाही तर आपल्या संवेदना संपल्या आहेत असे समजून घ्यावे. बाबांनी, ताईंनी, त्यांच्या पिढ्यांनी व असंख्य सहकार्यांनी शून्यातून निर्माण केलेल्या त्या विश्वाची सुजाण माणसाने एकदातरी सफर करावी आणि शुचिर्भूत होऊन परतावे...मनातली जळमटं घालवायला यापेक्षा दुसरा उत्तम उपाय नाही.

मला याठिकाणी जाण्याचे भाग्य लाभले ते Deepastambha Charitable Trust मूळे. अतिशय नियोजनबद्ध आखलेल्या व साकारलेल्या या tour साठी DCT members चे कौतुक करावे तेवढे कमीच. जाणार्यांची संख्या होती ५०-५१ च्या घरात. Identification साठी वापरण्यात आलेल्या wrist bands पासून ते medical kit पर्यंत प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीची काळजी घेणे व ते manage करणे हे सोपे काम नव्हे. त्याकरिता लागणारे ingredients’ हे MBA च्या professional पुस्तकांतून न गवसता आपआपसातील साहचर्य व आत्मीयतेमधून मिळत असावेत यात शंका नाही. असो. एकूण प्रवासातील गमती-जमती(ज्या बहुदा होतातच),किस्से यांबद्दल लिहिणे मी टाळणार आहे कारण आनंदवन-हेमलकसा-सोमनाथ मध्ये काय काय अनुभवलं ते सांगणं जास्त सयुक्तिक ठरेल.


पुणे स्टेशनहून संध्याकाळी प्रस्थान केले होते. आनंदवनात पोहचलो ते दुसर्या दिवशी दुपारी. टळटळीत ऊन पसरले होते. विदर्भाच्या उन्हाची सवय असल्याने खास असे कौतुक काही वाटले नाही. अंघोळी,जेवणं उरकून प्रकल्प बघायला सुरुवात केली. Canteen बाहेर ‘जोडो भारत’ चा मोठा फलक लावलेला दिसला. मध्यवर्ती कार्यालयासमोरचा एक छोटा board नजरेस पडला. त्यावर ‘If you stand for something you will always find some people for you and some people against you. If you stand for nothing; you will find nobody against you and nobody for you- Bill Bernbach' हे दमदार वाक्य होते. बाबा आमटेंच्या जबरदस्त इंग्रजी व्यासंगाची हि झलक होती. बाजूलाच एका मोठ्या खडकावर कुण्या लहानग्याने ‘वारली style’ चे चित्र रेखाटले होते. House of Gratitude’ अशी पाटी असलेले ‘कृतज्ञता भवन’ लक्ष वेधून घेत होते. एकूणच आनंदवनात ‘प्रवेश’ झाला होता. जवळच असलेल्या एका छोट्या hall मध्ये सौ. भारतीताई आमटे यांची आम्ही सगळ्यांनी भेट घेतली. त्यांनी सांगितलेली माहिती ऐकताना आपण अनोख्या जगात आलो आहोत याची जाणीव होत होती.


थोड्याच वेळात अंध मुला-मुलींच्या शाळेपाशी येऊन थबकलो. एका झाडाजवळ तिथल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा घोळका दिसला. आत वर्ग सुरु होते. शाळेभोवतालचा तो वृक्षवल्लींनी नटलेला शांत परिसर बघून मला एकदम गुरुदेव टागोरांच्या ‘शांतीनिकेतन’ ची आठवण झाली. अंधत्वावर मात करून शिकून मोठे होण्याची जिद्द बाळगलेली हि सर्व मुले !! त्यांची ती शिकण्याची तळमळ माझ्या डोळ्यात मात्र चांगलेच अंजन घालून गेली. काही अंतरावर दलाई लामा यांनी रोपण केलेल्या वृक्षाचे दर्शन घडले. केवळ २ तासांच्या भेटीसाठी आलेला हा धर्मगुरू आनंदवनात ३ दिवस राहिला होता. बाबांच्या कार्याची जादूच अशी की इथे येणारा प्रत्येकजण विस्मयचकित,प्रभावित आणि नतमस्तक होऊन जातो. 


थोडं पुढे जाऊन कारागिरी विभागात डोकावून पाहिले. गुटख्यांच्या टाकाऊ पाकीटांपासून सुरेख कलाकुसर केली होती. या पाकीटांचा असाही वापर होऊ शकतो हे कधी माझ्या creative मनाला शिवले नव्हते. केळीच्या वाळलेल्या सालींपासून विविध portraits तयार केली होती. X-Ray sheets पासून आकाशकंदील बनवण्यात आले होते. माणसाच्या कल्पनेला सीमा नसतात हे जरी खरं असलं तरी कुष्ठरोगा सारख्या भयानक रोगाने ग्रस्त असलेल्यांनी या ‘हट के’ कलाकृती निर्माण केल्या आहेत याचं अप्रूप जास्त वाटतं.


आनंदवनात पावलोपावली तुम्हाला वेगवेगळ्या उद्योगांची किमया दिसेल. Tin-Can project, Renewable Solar energy project, प्लास्टिक पुनर्वापर युनिट, हातमाग, शिवणकाम, सुतारकाम, छापखाना असे कितीतरी उद्योग समर्थपणे चालविले जात आहेत. एवढेच नाही तर अंध-अपंग व्यक्तींचा Orchestra सुद्धा आहे. सराईत गायकांपेक्षा ही मंडळी कुठेही कमी नाहीत. व्याधी आणि व्यंग यांवर मात करून ताठ मानेने जगणाऱ्या या लोकांना बघून स्वतःच्या खुजेपणाची जाणीव होते. बाबांच्या प्रयत्नांना आलेले यश या ठिकाणी सर्वत्र दिसतं. 


इथला प्रत्येक माणूस श्रमाची भाकरी तोडतो. ‘श्रम ही है श्रीराम हमारा’ हे इथलं ब्रीद आहे आणि ते या लोकांनी सार्थ करून दाखवलंय. उगाच नाही या  लोकांना बाबांनी ‘श्रम-ऋषि’ म्हणून संबोधले !!

चालता चालता तिथून जवळ असलेल्या hospital मध्ये गेलो. कुष्ठरोगाबाबत माहिती नसलेल्या बर्याच facts तेव्हा समजल्या. कुष्ठरोग्यांना रोज औषधाचे dosage कशा प्रकारे दिल्या जातात ते ऐकल्यावर आनंदवनातल्या कर्मचार्यांच्या सेवाभावी वृत्तीला मनोमन नमन केले.


त्यानंतर पुढे गेल्यावर एका वसाहतीची पाटी दिसत होती. पुनर्वसन केलेले कुष्ठरोगी, परित्यकत्या, वयोवृध्द यांची हि वसाहत. आत शिरलो तर तिथले चित्र विदारक होते. खंगलेले आणि गलितगात्र झालेले ते वृध्द देह बघताना वेदना ‘सहन’ करणे म्हणजे काय याचं अनुमान लावायचा प्रयत्न करीत होतो. आशीर्वादासाठी जे हात उठायला हवे होते ते हात मला नमस्कार करीत होते. हे सगळ्यात जास्त असह्य होतं. कुणीतरी दुरून आपले फोटो काढायला आले आहेत, भेटायला आले आहेत याचा त्यांना थोडाबहुत आनंद झाला असेल पण मला मात्र ‘कारुण्य’ ह्या भावनेपुढे काही दिसलेच नाही. त्यांच्या समाधानार्थ २-३ फोटो काढून मी निघून आलो. बाहेर पडताना एकाच विचार मनात होता कि ‘समाजवाद’, ‘संस्कृती’ वगैरे सगळं खोटं आहे... या नावांचे फक्त पापुद्रेच तेवढे शिल्लक राहिले आहेत...बाकी सगळा बोलघेवडेपणा !! बाबांनी पु. लं. ना म्हटलेलं वाक्य मला तेव्हा आठवलं...’गुण गाईन आवडी’ या पुस्तकातल्या लेखातलं. ते म्हणतात “भाई, वेरुळची भग्न शिल्पं पाहताना फुटलेली नाकं आणि तोडलेले हात मनानं भरून काढता ना ? मग ह्या जिवंत भग्नावशेषांतलं मूळचं शिल्प तुम्हाला दिसत नाही?”

खरंच आपल्याला ते शिल्प दिसत नाही. दोष नजरेचा नाही ...दोष आहे तो मनोवृत्तीचा. एखाद्या बाबा आमटे सारख्या व्यक्तीलाच ते शिल्प दिसतं...सौंदर्य दिसतं आणि तो कष्टाने त्याठायी प्राणप्रतिष्ठा करतो... ती प्राण प्रतिष्ठा असते सन्मानाची...हिमतीची आणि स्वाभिमानाची !! सगळ्या सामाजिक प्रवाहा विरुद्ध जाऊन या लोकांसाठी आमटे कुटुंबानी जे काही कार्य केलं आहे त्याच्या विशालतेची मोजदाद होऊच शकत नाही.




मनात विचारांचे काहूर माजले होते...पावले चालत होती...त्याचे भान नव्हते. शेवटचा टप्पा होता तो बाबांच्या आणि साधनाताईंच्या समाधिस्थळी जाण्याचा. ‘श्रद्धावन’ असे सुंदर नाव असलेला हा रम्य परिसर आहे. दोघांनाही निसर्गाचे कमालीचे वेड होते. जगाचा निरोप घेतल्यावर या निसर्गाच्या सानिध्यातच शरीर दफन करावे अशी बाबांची इच्छा होती. साधनाताईंची समाधी देखील अगदी बाजूलाच आहे. आनंदवनाच्या जडणघडणीत या माउलीचा वाटा तेवढाच मोलाचा आहे. नकळत नतमस्तक झालो. दुपार कधीच ओसरली होती. जेवून Guest House ला परत येईस्तोवर अचानक नभ मेघांनी आक्रमिले होते. विजेच्या गडगडाटासह वरुणराजाचे आगमन झाले आणि धरतीवरची ‘वीज’ अंधारात हरवली. वातावरण गार झाले होते. अवकाळी पाऊस ‘अवकाळी’ वाटत नव्हता. निद्रेच्या अधीन कधी झालो ते कळलेही नाही. दुसर्या दिवशी हेमलकसा-सोमनाथला प्रयाण करायचे होते.




आनंदवनात दिवस सुरु होतो पहाटे ४ वाजता. ह्यावेळी रोज उठणे म्हणजे मला तरी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हेमलकसाला ५ वाजताच निघायचं होतं. ‘गजर’ लावावाच लागला. बस मध्ये बसताच झोपेचा अर्धवट राहिलेला अंमल सुरु झाला. काही तासातच बस चंद्रपूर मागे टाकून गडचिरोली जिल्ह्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली. चहा,कॉफी साठी काही अवधी थांबून पुढचा प्रवास सुरु झाला. निबिड अरण्यातून वाट काढत गाडी हेमलकसाच्या दिशेने लागली. आधल्या दिवशी पाऊस पडल्याने हवेत कमालीचा गारवा होता. गडचिरोलीमध्ये तसा पाऊस सरासरीपेक्षा जास्तच होतो. जंगल कधीच ओकंबोकं दिसत नाही. फोटोग्राफी च्या सोयीसाठी मी खिडकीतली जागा पकडून कॅमेरा On ठेवला होता. अहेरी सारख्या गावाचा अपवाद वगळता एकंदरीत सगळीकडे वस्ती विरळ होती. 




मधेच ७-८ लाकडी झोपड्या आणि पुन्हा दाट जंगल सुरु हे repeat mode वर सुरु होतं. आमच्या बस कडे त्या गावातली लोकं फार आश्चर्याने बघायची. प्रवासात अधून मधून सशस्त्र पहारा देणारे जवान गस्त घालताना दिसत होते. नक्षलवाद्यांचा जोर असलेल्या या भागामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो. सामान्य लोकांना जरी हे लोकं त्रास देत नसले तरी प्रशासकीय कर्मचारी किंवा पोलिसांविरुद्ध हे काहीही करू शकतात. तब्बल ५ तासांच्या प्रवासानंतर ‘हेमलकसा- लोकबिरादरी प्रकल्प’ अशी कमान दृष्टीस पडली आणि पुन्हा एकदा कुतुहलाचे भाव चेहऱ्यावर घेऊन; इथे काय अनुभवायला मिळणार आहे हा विचार करत मी बस मधून खाली उतरलो.




अथितीगृहाच्या वऱ्हांड्यात सूचनांचा एक फलक लावलेला दिसला. शहरातून येणाऱ्या लोकांनी इथे आहे त्या सोई सुविधांमध्ये समाधानी राहावे अशा अर्थाचे पहिलेच वाक्य होते...अगदी स्पष्ट शब्दात संकेत दिले होते. शहाण्यांना शब्दांचा मार पुरेसा असतो. जेवण झाल्यावर डॉ. दिगंत आमटे आणि जगन काका यांनी हेमलकसाच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या उभारणी मागची माहिती सांगितली. माडिया आणि गोंड या आदिवासी जमातींचा हा भाग आहे. माणूसबघून दूर पळणारे हे आदिवासी कुपोषण,शिक्षणाचा अभाव,अंधश्रद्धा, मुलभूत गरजांचा अभाव इत्यादी कित्येक समस्यांनी ग्रस्त होते. त्यांना वैद्यकीय सेवा पुरवणे, मुलांना शिक्षित बनवणे व मुख्यतः माणसात आणणे हे खूप मोठे आव्हान होते. बाबांनी ते पेलले.


त्यांनी लावलेल्या या रोपट्याचा डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदा आमटेंनी वटवृक्ष केला आहे. भामरागड सारख्या अतिशय दुर्गम भागात अहोरात्र झटून त्यांनी आदिवासींच्या जीवनात नवी ज्योत पेटवली आहे. आजूबाजूच्या गावांतील ५०-५५ हजार लोकांना इथल्या वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळतो आहे. सरकारी खात्यात हा प्रदेश अजूनही दुर्लक्षित. सरकारी सुविधा केवळ on paper आहेत. पावसाळ्यात हा भाग संपूर्णतः cut-off असतो. 
अशा ठिकाणी कायमचे वास्तव्य करून सेवाव्रताचे प्रामाणिकपणे पालन करणे हे फक्त आमटे कुटुंबीयच करू जाणे. हे इथे लिहिणं सोपं आहे पण करून दाखवणं तेवढेच अवघड. त्यांची पुढची पिढी ह्या कार्याचा वसा पुढे नेत आहे. आयुष्य ओवाळून टाकणे म्हणजे आणखी वेगळं काय असतं?








ह्या प्रकल्पात ‘प्राण्यांचा अनाथाश्रम’ आहे. हा अजब प्रकार दिसून येत होता. पक्षी,प्राणी मारून खाणे हा आदिवासींचा नित्यक्रम होता. मेलेल्या प्राण्यांच्या पिलांना सांभाळण्याचा आणि संरक्षण देण्याचा अभिनव उपक्रम डॉ. प्रकाश आमटे यांनी सुरु केला. पिलांना न मारता त्यांना इथे घेऊन यावे असे आवाहनही त्यांनी ह्या आदिवासी जमातींना केले. त्याला प्रतिसाद मिळू लागला. पक्षांची, प्राण्यांची संख्या वाढू लागली आणि अनाथालयाची निर्मिती झाली. प्राण्यांच्या अनाथाश्रमात बिबटे आहेत...अस्वल आहे...नीलगायी आहेत... हरणे, उदमांजरी, बंदर, मोर, साप, अजगर, घोरपड, बदकं, ससे, कासव, मगरी असे खूप पक्षी आणि प्राणी एकत्र नांदत आहेत...तेही त्यांच्या हक्काच्या घरी. बिबट्याच्या पिलांना तर डॉ. प्रकाश आमटेंनी पोटच्या मुलांप्रमाणे वाढवले आहे. भुतदयेचा हा नवीन परिपाठ बघायला मिळाला. आज कित्येक गावांत, शहरांत पोकळ प्रतिष्ठेच्या नावाखाली लोकं स्त्रीभ्रूणहत्या करतात, जन्माला येण्यापूर्वीच तो जीव खुडून टाकतात. आणि इथे हे वेगळेच जग. प्रचंड विरोधाभास !! एखादे जनावर माणसाळणे ह्या प्रक्रियेला वेळ लागत असेल परंतु माणसाचं जनावर होणे ह्याला जास्त वेळ लागत नाही हेच खरं.




निघावेसे वाटत नव्हते पण परतायची वेळ झाली होती. पावसाची हलकी सर सुरूच होती. आता सोमनाथ चे ‘दर्शन’ घ्यायचे होते. पुन्हा प्रवास सुरु झाला. भामरागडचे ते जंगल हळूहळू मागे पडू लागले. भूगोलाच्या पुस्तकात नकाशावर पाहिलेली आणि नाना पुस्तकांमधून वाचलेली ही जागा आज प्रत्यक्ष बघितली होती...अनुभवली होती. त्यातल्या परकेपणाची वस्त्रं कधीच गळून पडली होती.

सोमनाथला पोहचेपर्यंत संध्याकाळ उलटली होती. परिसर शांत होता. जेवणं आटोपल्यावर थोडं फिरून बिछान्यावर पहुडलो. कधी डोळा लागला ते कळलेही नाही. सकाळी गजरन लावता जाग आली होती. प्रवासाचा क्षीण कुठल्याकुठे पळाला होता. Breakfast करून आम्ही सगळे थेट प्रकल्प बघायला निघालो. हा प्रकल्प म्हणजे अद्भुत Success Story आहे.  

विज्ञानाची कास धरून बाबांनी याची आखणी केली होती. विविध कल्पना तंत्रज्ञानाच्या आधारे पूर्णत्वास नेण्याचा संकल्प सोडला होता. डॉ. विकास आमटे यांच्या अनुभवसिद्ध व कुशल देखरेखेखाली हे सोमनाथचं project अभिमानाने उभे आहे.  १२०० एकर चा हा विस्तीर्ण परिसर आहे. 





एकेकाळी ओसाड माळरान असलेली ही भूमी आज सुजलाम सुफलाम झाली आहे. एक दोन नव्हे तर जवळपास २७ पाण्याचे तलाव तुम्हाला तिथे दिसतील. सरकारने जिथे पाणी देणे नाकारले होते तिथे तंत्राच्या सहाय्याने पाण्याचा प्रश्न मिटवला आहे. कल्पनेला विज्ञानाची जोड देऊन अशक्य असलेले शक्य करून दाखवले आहे. 





आपण जे engineering ला  शिकतो ते त्याजागी प्रत्यक्ष कृतीत आणले होते. आपले engineering फक्त मार्कांपुरते आणि नोकरी मिळवण्यापुरते. Practical Implementation व त्याचा सबंध विरळाच. टायर, प्लास्टिक आणि कॉन्क्रीट पासून तयार केलेला बंधारा आयुष्यात पहिल्यांदाच बघत होतो. चहुबाजूला कोबी, भात, वांगी  इत्यादी पिकांची शेती दिसत होती. शेतांचे गालिचे अंथरल्यासारखे वाटत होते... न संपणारे!! 





बारा एकर च्या आमराई मध्ये होऊ घातलेल्या आंब्यावर पहिला हक्क असतो तो पक्षांचा, माकडांचा. त्यातून काही आंबे उरले  तरच ते उतरवले जातात. स्थानिक लोकांनी इथले आंबे २-३ वेळाच खाल्ले आहेत. ही माहिती अवाक करणारी होती. शेतांच्या, तळ्यांच्या मधे टुमदार घरे विसावली होती; वसाहती होत्या. सर्वार्थाने हे ग्राम आदर्श होते. हे model इतरत्र राबवल्यास शेतकीचे बरेच प्रश्न निकालात लागतील. एकेकाळी जगण्याची आशा गमावून बसलेल्यांनी परिश्रमाच्या व इच्छाशक्तीच्या बळावर अशिवाचे उच्चाटन केले होते. दरवर्षी होणारी श्रम-संस्कार शिबिरं हेही इथलं वैशिष्ट्य म्हणावे लागेल. भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन त्या अमलात आणा या बाबांनी दिलेल्या मंत्राचा प्रत्यय इथे सगळीकडे येतो. सोमनाथचे हे वैभव डोळ्यात साठवून पुण्याकडे परतीचा प्रवास सुरु केला. 






आनंदवन,हेमलकसा आणि सोमनाथ प्रकल्प ह्या तीनही जागा कर्मयोगाची विद्यापिठं आहेत... अपार कष्टांतून उभारलेली... करुणेला कृतीचे पंख जोडून निर्माण केलेली. !! ‘करुणेचा कलाम’ या काव्य संग्रहात बाबा आमटेंनी जणूकाही त्यांच्या जीवनाचे सारच खालील ओळीन्मधून व्यक्त केले आहे –

“काळ ही संपत्ती होती. कृतिशीलता हे जीवन मानले;
सार्या व्यथांचा वापर केला आणि कालापव्ययच तेवढा निरुपयोगी मानला;
एकवार लक्ष्यावर नजर खिळली की बाकी सारे दिसेनासे होते;
संपूर्ण विजयाखेरीज काहीच पटेनासे होते;
अंधाराची भीती नव्हती, अंधारात प्रकाश होता;
संकटाची धास्ती नव्हती, मनगटात मस्ती होती;
एकटा कधीच नव्हतो, माणूसच दैवत होते;
वेदना जाणवली नाही, तीच साधना झाली होती;
श्रमाने कधी शिणलो नाही, तोच श्रीराम झाला होता.”


मनुष्याच्या अंतहीन व्यथेला संधीसमजून माणुसकीच्यानात्याला नवा सुगंध देण्याचे अफाट कार्य बाबा आमटेंनी करून ठेवले आहे. ह्या कार्याची थोडीतरी अनुभूती होण्यासाठी तिथे अवश्य जावे. तो प्रवास जरूर एक ‘संस्कारहोईल.

No comments:

Post a Comment