Sunday 3 March 2013

२६ जानेवारी: एक विचार मंथन


अजिबात घाबरू नका...Title misleading आहे. २६ जानेवारी ही तारीख एकतर मागे पडलीये आणि उपदेश करणे माझा स्वभाव नाही. कुठलेही राष्ट्रीय आणि राजकीय भाष्य करण्याची माझी इच्छा नाही. प्रजासत्ताक दिनी आमच्या सोसायटीमध्ये या नावाचं एक नवं खूळ काढलं होतं. त्याबद्दल सांगायलाच हवं.

२५ जानेवारीला office मधून घरी आलो आणि कधी नव्हे ते लक्ष notice board वर गेलं. त्यावरच्या २६ जानेवारी: एक विचारमंथन या ठळक अक्षरांनी कुत्सितपणे माझ्यासाठी स्वागतपर पद्य म्हटल्याचा भास झाला आणि माझी पहिली प्रतिक्रिया उमटली आता ही काय नवीन कटकट आहे...हि लोकं सुखाने जगू देतील तर शप्पथ’!!!

तसं बघायला गेल्यास अशी प्रतिक्रिया मी सहसा देत नाही पण त्याला कारण वेगळेच आहे. मध्यंतरी वरच्या मजल्यावरचा flat विकल्या गेला. नवीन मालकाने रंगरंगोटी व डागडूजीचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला होता. हे काम नेमकं weekend लाच मोठ्या प्रमाणात व्हायचं. त्या घरात इतर दिवशी काय सुरु असायचं याचा मागमूस देखील लागत नसे. पण weekend ला धूमधडाका. एका अर्थी यात विशेष काही नाही कारण flat संस्कृतीत असे प्रसंग कमीअधिक प्रमाणात घडतातच. पण खरी गंमत पुढे आहे. वरती काम सुरु असताना समोरच्या विंग मधल्या पाळीव कुत्र्याने कशाला भुंकायला हवे?...त्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजात याचंही आपलं तारसप्तकात मिले सूर मेरा तुम्हारासुरु. बरं; या कुत्र्याचे मालक त्याला ग्यालरीत कोंडून बाहेर भटकायला जातात. त्यांना जाब विचारायला जावं तर यांचे फालतू विनोद. कुत्रा भूंकणारच...नाहीतर काय डरकाळी फोडणार !!”..वगैरे..वगैरे.. आता यावर काय बोलणार? आणि असल्या त्रासाला हुलकावणी देण्यासाठी आपण बाहेर तरी किती फिरायचं? तात्पर्य; गेले काही दिवस मै weekend कें बरबादीयोंका जश्न मनाता चला गयाअशी अवस्था झाली होती. सुटीच्या दिवशी असला छळ कुणाच्याही नशिबात न येवो. राशीला एखादा ग्रह वक्री जाणें म्हणजे हेच.

ही सगळी पार्श्वभूमी अगदी ताजी असताना हे विचार मंथननावाचे प्रकरण वैताग आणणार अशी साहजिकच भावना झाली होती.
एकतर सोसायटीत आमच्या सारख्या काही (अल्पसंख्यांक) मध्यमवर्गीय समाजाचा अपवाद वगळता; इतरांचे अतीशहाणे श्रीमंतआणि खुळे’ (हे सर्वत्र असतात) असे वर्गीकरण करता येईल. या लोकांपैकीच कुणाच्या तरी सुपीक डोक्यातून हे नसते पीक वाढीस लागले आहे असा माझा संशय होता आणि पुढे तो खरा ठरला. २६ जानेवारीला सकाळी उशिराच जाग आली कारण दिल्लीत परेड आटोपून राजपथवरील गर्दी ओसरली होती. काही वेळातच दारावरची बेल वाजली. एक कॅप घातलेला मनुष्य हातात एक पत्रक घेऊन उभा होता. Relay race मध्ये दुसर्याच्या हाती जशी baton सोपवतात तसं तो पत्रक माझ्या हाती सोपवून गेला...एकही शब्द न बोलता!! त्या पत्रकात बरेच सुविचार एकत्र केले होते आणि खाली संकलन या शब्दासमोर सोसायटीच्या सेक्रेटरीचे नाव होते. संध्याकाळच्या कार्यक्रमाचे आमंत्रण सुद्धा होते. नंतर असा शोध लागला कि तो माणूस खुद्द सेक्रेटरी होता. मी त्याला ओळखतो असा त्याचा गैरसमज झाला होता आणि त्याचमुळे त्याने माझ्यासोबत बोलायची तसदी घेतली नाही. मी मात्र सोसायटीचा सेक्रेटरी प्रत्यक्षपहिल्यांदा बघितला. यापूर्वी फक्त त्याचे नाव ठाऊक होते. गेल्या काही आठवड्यांमध्ये सोसायटीत अत्रंग घटना घडत असूनही meeting न बोलावणाऱ्या सेक्रेटरीचे मला कौतुक तरी कसे असणार!! मी मागे एकदाच meeting ला जायचा प्रयत्न केला होता. गच्चीवर मिणमिणत्या प्रकाशात; कामाचं सोडून वायफळ गप्पांचा फड जमलेला मी अनुभवलाय. तशा ambiance मध्ये प्रत्येक व्यक्ती कारस्थानी वाटू लागते. त्यानंतर पुन्हा meeting झालेली माझ्या ऐकिवात नाही. भांडणं मात्र खूप झाली सोसायटीच्या आवारात. पार्किंग आणि पाण्यावरून दात ओठ खाणारी हि लोकं, देश किंवा समाजापुढे प्रश्न म्हणून उभ्या असलेल्या वैश्विक विषयांवर काय बोलतात याचं मला औत्सुक्य होतं. फुकट मनोरंजन होणार असा ठाम विश्वास होता.

संध्याकाळी ठरल्या वेळेच्या १०-१५ मिनिटांनंतर मधल्या चौकात लोकं यायला सुरुवात झाली. तिथे खेळणाऱ्या लहान मुलांचा गोंधळ थांबवण्यात पुढची १० मिनिटे गेली. स्वयंपाकघराच्या खिडकीतून हा मधला चौक दिसतो त्यामुळे थोडी गर्दी वाढल्यावर निवांत जाऊया असा विचार केला. तेवढ्यात कधी नव्हे तो watchman ने सगळ्यांना gentle reminder द्यायला प्रत्येकाच्या घरात वर्दी लावली. मी खाली पोहचेपर्यंत बर्यापैकी बिऱ्हाडं सहकुटुंब सहपरिवार आले होते आणि सतरंजीवर आरामात बसले होते. मुलांचा थोडा बहुत गिलका सुरूच होता. सेक्रेटरी मुद्दाम celebrity सारखा late येऊन भाव खाणार याची मला खात्री होती. काही माणसं उभे रिंगण करून कार आणि त्यांचे latest models यावर चर्चा करण्यात मश्गुल झाली.

मी मात्र watchman बरोबर मागील महिन्यात भल्या पहाटे सोसायटीच्या आवारातून कार चोरीस गेलेल्या घटने बद्दल बोलत होतो. कान मात्र इतरांच्या गप्पांकडे जाणूनबुजून टवकारलेले. तेवढ्या एक काका आले. यांच्या कडे पाहिल्यावर मला या मराठी अक्षराची आठवण येते. कधीकधी येता जाता बोलत असतात. बाजूला येताच त्यांनी मला अरे काय म्हणतो, लग्न उरका आता या वर्षी...इत्यादी...इत्यादीअसे काहीतरी ऐकवले. अपरोक्ष टोला होता कि विशेष काळजी हे समजलं नाही परंतु मी लगेच नावात योगअसला तरी आयुष्यात हे योग यायचे तेव्हाच येतातअसे म्हणून वार परतवला. त्यांनी सुद्धा मग film festival ला तू जात असतोस...PIFF ला गेला होता का? असे प्रश्न विचारून विषय बदलवला. एव्हाना सेक्रेटरी साहेब आले होते...थोड्या वेळातच त्यांनी आजकाल देशाला व समाजाला भेडसावणारे प्रश्न याचा पाढा वाचून धकाधकीच्या जीवनात आपण कसे एकमेकांपासून दूर जात आहोत...माणुसकीचे झरे कसे आटत आहेत...जगणं दळभद्री होत चाललंय...आत्मा गुदमरतोय (कुणाचा ते सांगितलंच नाही) ...मूल्य विसरली जाताहेत...करुणेला कशी जागा नाही...कर्तव्य पार पाडायला वेळ नाही... शेजारी कोण राहतं याचा थांगपत्ता नसतो... याप्रकारचे निरुपण सुरु केले. हे सगळं सांगून झाल्यावर कुणा कुणाचं याबाबतीत काय मत आहे ते विचारले.

सुरुवातीचे थोडेबहुत आलापी चे सूर या प्रकारचे होते -
ते nucleus कि  nuclear family म्हणतात ना त्यामुळे problems होत आहेत!!!”; “नवीन पिढीला काही देणं-घेणं नाही”; “मुलींना शाळेपासूनच karate शिकवून trained करायला पाहिजे”; “पाकिस्तानला final धडा शिकवलाच पाहिजेकिंवा शेजार्यांच काय घेऊन बसलात, नवरा बायकोला गप्पा मारायला सुद्धा वेळ मिळत नाही”…अशा विविध विषयांवर एका ओळीतल्या प्रतिक्रिया होत्या. अपेक्षेप्रमाणे पुढे कुठलीच चर्चा न होता विलंबित गत मध्ये पलीकडच्या सोसायटीतला अमुक तमुक बिलंदर आणि पाताळयंत्री आहे”;“कायम आपल्याच रस्त्यावरून त्यांच्या कार जातात...ते आधी ban करा”;“मुद्दाम इथून गणपती मिरवणूक नेतात आणि तासभर ढोल वाजवतात आपल्या नाकावर टिच्चून”; “नक्कीच कार चोरी करण्याची सुपारी दिली असेल त्या सोसायटीतल्या कुणीतरीहे ऐकू येऊ लागलं.

माणूस पटकन वैश्विक पातळीवरून वैयक्तिक पातळीवर कसा येतो याचा मी आखों देखा हालत्या दिवशी बघितला. मुळात इथे विचार नसल्याने मंथनझालेच नाही. फक्त मतप्रदर्शन झाले.

भैरवीलामाझ्या श्रवण क्षमतेच्या टप्प्यात आलेले काही सुख-संवाद असे
काय हो...हा आकाशकंदील काढला नाही अजून?...उगाच बिल येतं याचं.
त्यावर उत्तर... आमच्यात रथसप्तमी पर्यंत ठेवतात...आणि तसंही reading घ्यायला कुणी येत नाही आजकाल असं ऐकलंय...सरळ average छापून print काढतात बिलाची.”

शनी-शिंगणापूर किती दूर आहे इथून?...bike वर जाता येईल का?” (नवीन avenger घेतलेल्या एकानी प्रश्न विचारला);

इथल्या लोकांना न बाई पुरणपोळी जमतच नाही...आत नुसता भुरका.” (नक्कीच काकू नॉन-पुणेरी असणार),

आम्ही नाही आणत विकत...घरीच करतो...सणासुदीला घरीच करावं...चांगलं वाटतं.”(शेरास सव्वाशेर);

धनश्रीचा साखरपुडा कधी आहे? यावर्षी लग्नाचेही मुहूर्त फेब्रुवारी नंतर जूनमध्ये आहे म्हणतात.”;

पण iPhone नि quality maintain ठेवलीये.”;

भाजपवाल्यांची तोंड दहादिशेला...मोदीला पुढे येऊ द्यावं ह्या बावळटांनी.”;

मागच्या लेन मधलं beauty parlouचांगलं आहे.”( अगं पोरी, तुला नाही गरज पार्लर फार्लरची हे कुणीतरी सांगायला हवं तुला.....जाऊ द्या )

BP बेस्ट आहे...भारीच बनवलाय.

बाजूच्या flat मधले आहेतच मुजोर...स्वतःचीच री ओढतात.

पिंपळे निलख कि पिंपळे सौदागर..आणि carpet area किती?”

त्याच कसंय की बोअर चे थोडे पाणी corporation च्या पाण्यात mix केले तरी चिंता नाही...इथल्या पाण्यात hardness फार कमी आहे.

सेक्रेटरीच्या छापील वाक्यांपासून सुरु झालेल्या मैफलीची सांगता आपआपसातील संभाषण’ यावर झाली. विचार मंथन आयोजित करण्यामागे सेक्रेटरी साहेबांचा हवा करणेहा एकमेव उद्देश होता असा सार्वत्रिक समज झाला आणि लोकं घरी परतली. दुसर्या दिवशी पुन्हा ये रे माझ्या मागल्यासुरु. सकाळी सकाळी तिसर्या  मजल्यावरच्या काकूंनी watchman ला पंप का नाही सुरु केला म्हणून भारदस्त आवाजात दमदाटी केल्याचे मला अर्धवट झोपेत समजले. म्हटलं चला routine सुरु झाले.

बटाट्याच्या चाळीतल्या पोम्बुर्पेकरानी तिथल्या जिवंत व्यक्तींबद्दल खरे लिहून स्वतःचे चाळीयअधःपतन ओढवून घेतले होते. हे लक्षात ठेऊनच मी कुणाचेही नाव/आडनाव लिहिलेले नाही हे सूज्ञांस सांगणे न लगे. अगदीच बाका प्रसंग आल्यास दुसर्या योगेश चे नाव पुढे करून मी नामानिराळा होईन.(तो पण लिहितो याची खातरजमा केली आहे). असो.

सांगायचा खरा मुद्दा असा की माणूस हा खरोखर unpredictable प्राणी आहे. कदाचित म्हणूनच कुणीतरी म्हटलंय

ए आसमां, तेरे खुदा का खौफ नहीं,
ए जमींतेरे आदमी से डर लगता है |“

No comments:

Post a Comment