Tuesday 18 June 2013

'इमेजेस'... पावसाच्या.


मे महिना... शेवटचे ‘पर्व’.
नको नकोसे वाटणारे... कंटाळवाणे, रणरणते ऊन.
न संपणारे...
कधी नव्हे ते हवामानखात्याकडे लक्ष...
कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याच्या बातम्या...
अंदमानात ‘त्याने’ दिलेली वर्दी...
आणि थोड्याच दिवसांत त्याचा केरळात ‘गृहप्रवेश’.
प्रतीक्षा... प्रतीक्षा...
अंतहीन...

निळ्याशार नभात काळ्या-सावळ्या ढगांची गर्दी.
वळवाच्या सरी...
मातीमधला सुगंध... कुठल्याही अत्तर-कुपीत बंदिस्त न ठेवता येण्याजोगा...
चर्चा... त्याचीच...
सर्वत्र...
गावात, शेतात, पारावर, पाणवठ्यावर, शहरात, मैदानात, गल्ली-बोळांत, ऑफिस मध्ये, घराघरात...
डोंगरदऱ्यात... रानावनात देखील...
पेपरात फ्रंट पेजवर त्याने ‘रिझर्व’ केलेली जागा...
ट्रेलर... प्रोमो...
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...

अखेर त्याचे आगमन...
कोकणात जोरदार सलामी... दणकून !!
राज्यात त्याचा पहिला पाडाव...
तळकोकणात ‘तळ’ ठोकून गरज-बरस बरसणार ‘तो’...
साक्षात ‘मेघमल्हार’ !!

‘पश्चिम घाट’... त्याचा जिवलग मित्र...
तो तिथे ‘कोसळतो’...
बेभान... स्वैर... मुक्त.
अविरत वाहणारे धबधबे... बाळसं धरतात...
प्रारंभ... सृजन... नाविन्याचं.
सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्या... ‘शिवकल्याण’ राजाचे ऐतिहासिक वैभव... सगळं सगळं तृप्त !!

पुढचा टप्पा... शहर.
मुंबई, पुणे, औरंगाबाद...
नंतर मुक्काम-पोस्ट नागपूर... ढोबळमानाने... त्याचा हा ‘प्रवास’...
प्रत्येक शहरात...
ढगांची आदळ-आपट... विजांचा लखलखाट...
रस्त्यावर पाणीच पाणी...
ओढे, नाले आणि गटारं तुडुंब...
डबकी...
चिखल...
बंद सिग्नल्स... traffic jam...
Electricity गायब...
उन्मळून पडलेल्या फांद्या... अस्ताव्यस्त तारा...
लोकांची तारांबळ...
bus stop, स्टेशनवर चिक्कार गर्दी...
सर्दी, पडसं, रोगराई...
वैताग...
पण सुख देखील.
रेनकोट... छत्र्या...
कणीस... ओले शेंगदाणे...
फुललेले कट्टे... कटींग ... गरम भजी...
शाळा... कॉलेजेस... नव्याने उघडलेले...
तरुण-तरुणी... चिंब भिजलेले... एकत्र... मुद्दाम... सहवास... वगैरे.. वगैरे...
सहल... मुळशी, माळशेज... तत्सम...
ट्रेकिंग...
मौज.

आषाढ चे अवतरण...
गजर हरिनामाचा... पालखी... एकादशी...
वैष्णवांचा मेळा... दिंड्या पताका नाचती...
काया पंढरी... आत्मा विठ्ठल.
श्रद्धा, भाव पांडुरंग चरणी...
मग श्रावण, भाद्रपद...
मंगळागौरी... जन्माष्टमी... गणेशोत्सव... इत्यादी... इत्यादी... अनेक सणवार...
उत्साह... आनंद...

मी... कुठे?
कोकणांत... (Subconsciously)
जुन्या घराच्या माडीवर... खिडकीपाशी...
बाहेर ‘तो’...
न थांबणारा...
हिरवीगार सृष्टी...
इच्छा... हे सगळं कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची.

मी...
कोकणात... (Subconsciously)
जुन्या घराच्या पडवीत... निवांत
बाहेर ‘तो’...
कौलारू छपरावरून निथळणारा...
सुख...
अनुभूती... गात्रागात्रांत !!

मी... कुठे?
त्याच घरात...
आजीच्या कुशीत...
आजीच्या तोंडून विविध कथांची मेजवानी...
भुताखेतांच्या... जिवंत माणसांच्या... देवादिकांच्या कथा... दंतकथा...
आजीबाईंचा अनमोल बटवाच जणू...
जेवणात चवीला कुरड्या-पापड्या-लोणची... घरगुती.
सोलकढी, उकडीचे मोदक...
सुख...
अपार...

मी...
घरात...
डोळे मिटून स्वस्थ पहुडलेला...
बाहेर... त्याचा ‘आवाज’...
सोबतीला... उस्ताद राशीद खान यांचे ‘गरजे घटा’...
स्वराभिषेक...
Background Score !!
सुख...
अद्भुत...

मी... कुठे?
ओल्या, शेवाळाने सजलेल्या पुरातन शिवालयात...
मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या गाभाऱ्यात...
शिवपिंडी समोर...
ध्यानस्थ...
सुख...
सत् चित् आनंद.

मी...
उधाणलेल्या समुद्रकिनारी...
क्षितिजावर दृश्यमान...
घसरलेल्या काळ्याकुट्ट महाकाय ढगांचा समूह...
माझ्या सोबतीला... ‘गुलजार’ ची कविता...
‘बारीश’...
किंवा ‘किसी मौसम का झोंका’...
सुख... पुन्हा...
शब्दांकित.

पण ‘तो’ म्हणजे ...कोण?
पाऊस... (अर्थातच)
उगाच एक विचार...
अधिक जवळचा कुठला?
खराखुरा... की अंतर्मनातला?... ठाऊक नाही...
पण नेत्रांतला... नक्कीच...
कधी आटणारा... कधी प्रवाहित होणारा...
तर कधी शांत... स्थिर... आणि निश्चल.

मी... आणि पाऊस...
असेच...
एकमेकांत गुंतलेले...

कायमचे.