Sunday 3 March 2013

कोकण



इंटरनेटवर कोकणासंबंधित लिखाण शोधणं आणि वाचणं हा अलीकडे मला जडलेला नवीन छंद. दिल ढुंढता है फिर वही फुरसत के रात दिनम्हणत अधून मधून कोकणात जाणं होत असतं. कोकण हे एक अजब रसायन आहे. कोकण म्हणताच डोळ्यांसमोर येतो तो विस्तीर्ण सागरतीर... समुद्राची गाज... सूर्यास्त... माडाची बनं... नारळा-पोफळीच्या बागा... हापूस... कोकमाचे गार सरबत... शंख-शिंपली... ओली वाळू... लाल माती... जलदुर्ग... नागमोडी वळणं... सुबक कौलारू घरे... शांत, प्रशस्त देवळे... नाखव्याच्या हाळी... आणि पाऊस. मला वेडावून टाकणारी ही खरी कोकणी श्रीमंती. !!


रूढार्थाने मी कोकणीनाही...कोकणस्थतर नाहीच नाही... पण तिथल्या स्थानिक माणसाइतकेच माझे कोकणावर प्रेम आहे. ते कायमच मला जिव्हाळ्याचं वाटत आलंय. कोकणी माणूस काटकसरी, व्यवहारी... पण त्याचं मन मात्र शहाळ्याच्या पाण्यासारखं निर्मळ. त्याच्या बोलण्यामधला इरसालपणा, एकेरी उल्लेख, शिव्या हे कोकणी बोलीभाषेचं वैभव. ते झोंबत नाही पण चिमटे मात्र काढतंच. तिथल्या निसर्गाचे, शिव मंदिरांचे तसेच कोकणी माणसांच्या स्वभावाचे, मनस्वीपणाचे दर्शन घेण्यासाठी पावलं कोकणाकडे वळतातच आणि मुख्यतः जेव्हा जेव्हा तिथला समुद्र आतल्यासमुद्राला साद घालतो तेव्हा मी कोकणात जातोच.



तिथे जाऊन photography करणे हा तर बहाणा असतो ...कोकणात जातो आहेयाचा आनंद जास्त असतो. रोजच्या कामाच्या कटकटी पासून काही काळ सुटका करून घेण्यासाठी break हवाच... पहिला पर्याय हा कोकणाचाच. तिथल्या विविधतेबद्दल नेहमीच आकर्षण राहिले आहे... खासकरून तिथल्या उत्सव-परंपरा बाबत. कोकणातल्या जत्रा, शिमगा, दशावतार, गौरी-गणपती, नारळी पौर्णिमा यांवर लिहायला गेलो तर स्वतंत्र लेख लिहून होईल. या सगळ्या परंपरा तिथे टिकून आहेत. सणवार व उत्सवाला बाजारी प्रवृत्तीची पुटं तिथे अजून चढली नाहीत. सणासुदीचे दिवस आले कि चाकरमाने कोकणातल्या घराची वाट धरतात. तिथे घरोघरी साध्या पद्धतीने परंतु भक्तीभावाने होत असलेल्या पूजा-अर्चांच मला जास्त कौतुक. देवळान्मधली कीर्तन-निरुपणं ऐकणं ही सुद्धा वेगळीच मजा असते.



कोकणातली खवय्येगिरीहि न्यारीच... उकडीचे मोदक, सोलकढी, ओल्या नारळाच्या वड्या, फणसपोळी, अस्सल हापूस किंवा रानमेवा चाखण्यासाठी कोकणातच जावे. मी मासे खात नाही; नाहीतर माश्यांचे प्रकार लिहिण्यात अर्धे पान खर्ची झाले असते. मासे खाणार्यांसाठी तर कोकण म्हणजे हक्काची जागा...


आणि कोकणातल्या पावसाबद्दल मी काय बोलावं
? तो मित्र आहे माझा. तो येतोच तिथे कोसळणाराहोऊन...पं. कुमार गंधर्वांच्या खणखणीत ताने सारखा... कडकडून भेटतो. !! बयोआणि गंधचित्रपटात दाखवलेलं कोकणातल्या पावसाचं चित्रण मी कधीच विसरू शकणार नाही. प्रत्यक्षात देखील; समुद्राकाठी उभं असताना अचानकपणे क्षितीज ढगांनी काळे होताना मी पाहिलंय... पावसाच्या सरी आणि सुरुच्या बनांमधून वेड्यासारखा धावणारा वारा अनुभवलाय. कौलारू छपरांवरून निथळणारे पावसाचे थेंब बघण्यासाठी आणि लाल-भुरकट मातीचा रंग,गंध अनुभवण्याकरिता तिथे हटकून जावे... हिरवीगार कोकणभूमी न्याहाळण्याकरीता जावे. आता हे लिहितानाही कविवर्य मंगेश पाडगावकरांचा वेंगुर्ल्याचा पाऊसमनात डोकावून गेलाच :

      
   बालपण माझं सगळं भिजवलं त्याने;
   आईसारखं मला थोपटूंन निजवलं त्याने;
   मला जाग येईल म्हणून हळूच निघून जायचा!

वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा...

   वाळूत रुतलि काळी होडकी डोळे मिटून न्हात;
   उंचाडे फकीर माड चिंब भिजून जात!
   झरयांनी धो धो हसत जांभळा डोंगर नहायचा!

वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा...

   लाल लाल कौलांवर थेम्बोणी फुलायची;
   हिरवी हिरवी गाणी होऊन झाडे सगळी झुळायची!
   ये रे ये रे पावसा  असं माझ्या सुरात गायचा!

वेंगुर्ल्याचा पाऊस कसा माया करीत यायचा...

सरींनी लाड करीत मला कुशीत घ्यायचा.



आजही एखाद्या निवांतक्षणी तिथले दिवस आठवतात... एखादे चौसोपी घर आठवते... जुन्या ग्रंथासारखे उभे असलेले... कितीतरी घटनांचं ते घर मूक साक्षीदार असेल; हरिहरेश्वरचे महादेवाचे प्राचीन देऊळ आठवतं ... तिथे मिळालेल्या प्रसादाच्या पेढ्याची चव अजूनही रेंगाळते आहे जिभेवर... आणि अशी कित्येक मंदिरे आठवतात... पुरातन शिवालयांत गार फरशांवर, दिव्याच्या मंद प्रकाशात उजळलेल्या शिवपिंडीसमोर डोळे मिटून स्वस्थ बसण्यात वेगळेच सुख आहे... मुरुडच्या किनार्यावर बसून ऐकलेली व कानात साठवलेली गाज मी नाही विसरू शकत... तीरावरचा तो सुंदर सूर्यास्तहि विसरू शकत नाही... प्रामाणिकपणे काम करणारी कोकणी माणसं कुठेतरी आत घर करून बसली आहेत... अंतू बर्व्याचीआठवण करून देणारे नमुने तिथे तुम्हाला भेटतातच... तसेच, रात्री जेवणं आटोपल्यावर; वाडीत मिणमीणत्या प्रकाशात, झाडाखाली कुण्यातरी आजोबांकडून भूता-खेतांच्या गोष्टीही ऐकल्या आहेत... भरपूर photography केली आहे... सुवर्णदुर्गच्या एका धोकादायक कड्यावरून केलेली photography नेहमी स्मरणात राहील... अशा खूप आठवणी... त्यांना पूर्णविराम नाहीच...


कधीकधी खिशातून नाणं खाली पडावं आणि आपल्याला त्याचा पत्ता नसावा त्याप्रमाणे स्वहरवत असतो... तो पुन्हा शोधायला मी कोकणाची वाट धरतो आणि सृष्टीसौंदर्याने नटलेलं ते कोकण येवा...कोंकण आपलाच आसा असे म्हणत नेहमीच स्वागत करत असते... तेही कुठल्या पाटीविना...


चला, पुढची कोकण यात्रा लवकरच प्रत्यक्षात उतरवायची आहे...  
तयारीला लागलं पाहिजे.

3 comments:

  1. http://archive.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=140769:2011-03-04-19-30-22&catid=44:2009-07-15-04-01-11&Itemid=212

    ReplyDelete