Thursday 28 February 2013

ग्रेस: एक काव्यानुभव






एखाद्या संध्यासमयी सूर्यास्त बघताना अनाहूतपणे 'यमन कल्याण' चे सूर कानी पडावे तशी मला 'ग्रेस' यांची कविता गवसली. माणूस कधी,कुणाच्या आणि कशाच्या प्रेमात पडेल ते सांगता येत नाही. काही वर्षांपूर्वी मी असाच कवी 'ग्रेस' यांच्या साहित्याच्या प्रेमात पडलो.
ते प्रेम आजतागायत, केवळ टिकूनच नव्हे तर वृद्धींगत झालंय. काही गोष्टी अशा झपाटून टाकतात बघा!! ग्रेस यांची कविता याला अपवाद नाही...किंबहुना ग्रेस हा नुसता कवी नसून ती एक जगण्याची वृत्ती आहे असे मला कायम वाटत आलंय. काव्य हे फक्त माध्यम आहे त्यांच्यासाठी !!

ते स्वतःच म्हणतात ना - 'मी महाकवी दुःखाचा, प्राचीन नदी परि खोल...'. या नदीत त्यांनी काय काय दडवून ठेवलंय ते त्यांनाच ठाऊक.

An ancient man in ancient Times...but in modern World !!

ग्रेस हा जन्मजात अवलिया कलावंत आहे...शब्दप्रभू आहे...भाषाप्रभू आहे. For him Poetry is not just arrangement of words or thoughts...it is reflection of his mind which dwells on the cradle of creativity. त्यांचाच शब्द योजून लिहायचे झालं तर कवितेचे 'कपाळगोंदण' लेवून हा माणूस जन्माला आलाय. ग्रेसांची कविता सहजा सहजी हाती लागत नाहीच. उपमा द्यायची झालीच तर मी त्यांच्या कवितेला फुलपाखराची उपमा देईन. फुलपाखरू जसं मुक्तपणे पानाफुलांवर संचार करतं; तशी त्यांची कविता आहे. भल्या भल्या समीक्षकांनी जिथे नांगी टाकली तिथे आपण काय बोलणार असा विचार येतोही कधी कधी पण 'कविता' ही फक्त समजण्यापुरती किंवा आस्वाद घेण्यापुरती मर्यादित नसते हे मला त्यांच्या कविता वाचल्यावर कळलं... कारण त्यात 'अनुभूती' हा एक सुरेख प्रकार आहे !!

'गाय जशी हंबरते तैसे व्याकूळ व्हावे;

बुडता बुडता सांजप्रवाही, अलगद भरुनी यावे.'

ह्या ओळी तेच सांगतात. 

इंग्रजी, उर्दू,हिंदी या भाषांवर असामान्य प्रभुत्व असलेला हा माणूस आहे. Tolstoy पासून टागोरांपर्यंत आणि गालिब पासून शकील पर्यंत अफाट वाचन त्यांनी केलंय. मराठी तर विचारू नका...ती तर मायबोली.!! शब्दांमधून सुंदर अक्षरशिल्प निर्माण करणारा हा किमयागार आहे. !! शब्द सामर्थ्याचे कवच कुंडले घेऊनच हा 'कर्णया भूतलावर आलाय...पण कर्ण म्हट्ला की आपल्याला आठवते ते त्याचं 'अभागीपण'!! ग्रेसांच्या बाबतीत ही तेच झालं...त्यांच्या काव्यावर दुर्बोधतेचा शिक्का बसला तो कायमचा...हे खर तर त्यांच्या कविता न अनुभव घेणार्यांच दुर्दैव.! माझी त्यांच्या साहित्याशी कधी गाठभेट झाली ते नक्की नाही आठवत...कदाचित ५-६ वर्षांपूर्वी असेल...नाही...त्याही पूर्वी... दूरदर्शन वरील 'महाश्वेता' ही मालिका आई बघायची. ती संपल्यावर  शेवटी लागणारं लताजींच 'भय इथले संपत नाही...'  हे अप्रतिम गाणं कुठेतरी मनात घर करून होतं...तेव्हा कुणी लिहिलंय, ते मात्र माहित नव्हतं.


पुढे एका पुस्तक प्रदर्शनातून त्याचं 'मितवा' हे पुस्तक आणलं. त्यातले बरेचसे लेख डोक्यावरून गेले. मी त्या पुस्तकातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही. भिंगरी सारखा मी त्यात आवर्तनं घेत फिरत राहिलो. पुन्हा पुन्हा त्या पुस्तकाची मी पारायणं केली. मला नेहमी पडणाऱ्या प्रश्नाने तेव्हाही उचल खाल्ली होती की कसं काय कुणी एवढं सुंदर व गर्भित लिहू शकतं?... त्याचं उत्तर मला आजवर सापडले नाही...खरंच; बुद्धी पलीकडील गोष्ट आहे ती !!

त्या पुस्तकातले ललित लेख, कवितांच्या ओळी आणि विचित्र उखाणे वाचताना हळू हळू कळू लागलं की ग्रेस हे काहीतरी वेगळंच रसायन आहे. पुढे मी त्यांचा 'संध्याकाळच्या कविता' हा कविता संग्रह वाचला आणि त्यांच्या कवितांची मोहिनी बसली ती कायमचीच. त्या कवितांमागील thought process काय असेल ते आपल्याला लगेच समजू शकत नाही पण 'काव्यानुभूती' विलक्षण !!

त्या कविता वाचताना माझ्या डोळ्यांसमोर प्रतिमा तयार होतात... एखाद्या photography किंवा क्यालेडीओस्कोप सारख्या...समोर चित्रांचा भव्य असा पट च्या पट उलगडला जातो.
हीच ओळ बघा -

'निळसर डोंगर घळीघळी तून धूर धुक्याचा निघत असे;

खेड्यामध्ये गाव पुरातन तसा  वसविला मला दिसे.'

किंवा

'निळ्याशार मंद पाउलवाटा,

धुक्याची निळी भूल लागे कुणा;

तुला प्रार्थनांचे किती अर्घ्य वाहू,

निळ्या अस्तकालीन नारायणा'

अस्तान्चली सूर्याला अर्घ्य वाहणारा हा कमालीचा कवी आहे...अशी असंख्य  उदाहरणे देता येतील... अशा ओळी वाचल्यावर समोर प्रतिमा दिसू लागतात.


ग्रेस यांनी माझ्या पदरात काही दिले असेल तर हे प्रतिमा सृष्टींचे अद्भूत दान !!

त्यांच्या कवितांकडे एक कलाकृती म्हणून बघावं... त्यानंतरचे अनुभव हे विस्मित करणारे असतात. सांगायचे झाल्यास 'भय इथले…' बद्दल थोडे बोलता येईल. सगळ्याच साहित्य प्रकारात विरह गीते लिहिली गेली आहेत पण ग्रेस यांचे वेगळेपण या विरह गीतातून नजरेस पडते.


'स्तोत्रांत इंद्रिये अवघी, गुणगुणती दुःख कुणाचे;

हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे'

एवढं सुंदर विरह गीत ग्रेसांशिवाय अजून कोण लिहिणार?... आणि लताजींनी जो स्वरसाज चढवलाय यावर तो केवळ अलौकिक !! संगीतातले सगळे तर्क...सगळ्या चिकित्सा आणि सगळ्या संज्ञा त्यापुढे फिक्या आहेत. हे विरह गीत आपलेच आहे असे उगाच नाही वाटत.! ग्रेसांनी लिहिलेली आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी स्वरबद्ध केलेली मी सगळी गाणी त्यानंतर ऐकली. त्यातली बरीच गाणी व्याकुळतेची किंवा विरहाचीच गीते आहेत.

'घरा घराला मरण फुलांची गंधित भूल जडे.' असे मृत्यूचे सुंदर वर्णन करणारा हा कवी आहे. !!

कितीही नाही नाही म्हटलं तरी उदासीनता आणि विमनस्क स्थिती आपल्याला कधी तरी छळतेच. या बाबतीत ग्रेसांचं लिखाण मोठं आहे. दुःख कुरवाळण्यापेक्षा त्याला वाट करून देण्याची ग्रेस यांची धडपड असते हे मला त्यांच्या काव्यातून जाणवलेय...एक outlet या अर्थाने...

                  ‘नाहीच कुणी अपुले रे, प्राणांवर नभ धरणारे ;

                दिक्काल धुक्याच्या वेळी, हृदयला स्पन्दविणारे.'


'नाद' हा त्यांच्या कवितेतला स्थायीभाव आहे. 'ते झरे चंद्रसजणांचे'; 'घनकंप मयूरा...घनदंग मयूरा'; 'जसे काळोखातही ऐकू यावे दूरच्या झऱ्याचे वाहणे...' यां सारख्या अनेक ओळींतून तो नाद प्रकट होतो. मला पूर्वी त्यांच्या कविता वाचल्यावर जश्या प्रतिमा दिसायच्या तसं आता उलटही होतं... सूर्यास्त, समुद्र, पाऊस, एखादे कोकणातील जुने घर पाहिले की त्यांच्या कवितांच्या ओळी आठवतात.

त्यांचा अजून एक मला चकित करणारा पैलू म्हणजे त्यांच्यात एक protagonist सदैव वास्तव्याला असतो.


'पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने ;

हलकेच जाग मज येई, दुःखाच्या मंद सुरांने'

असे म्हणणारा हा कवी

'काळोख उजळण्यासाठी जळतात जीवाने सगळे,

जो वीज खुपसतो पोटी, तो एकच जलधर उजळे'

असे देखील म्हणून गेलाय.

तसेच

'रात्र थांबवुनी असेच उठावे
तुझ्यापाशी यावे क्षणासाठी!
डोळियांच्या व्हाव्या वेड्या गाठीभेटी
आणि दिठी दिठी शब्द यावे.'

हे प्रेम काव्य ही तेच लिहू जाणे !


कुठलीही craftsmanship जाणून बुजून न करता देखील त्यांची कविता 'छंदोमयी' वाटते. हा माणूसच मुळी rebel...आपल्या कवितेनी मराठी साहित्याला काय दिले याचा जराही विचार न करणारा हा कवी आहे. आजकालच्या साहित्य संमेलनांच्या 'मानापमान' "नाटकांना" ते हजेरी लावत नाही. निर्भेळ साहित्य सेवेपेक्षा तिथे पुढे पुढे करण्याची सवय असलेले, अध्यक्ष बनण्यासाठी वादविवाद निर्माण करणाऱ्या लोकांचीच गर्दी जास्त...तिथे हा माणूस रमणार कसा.? उपटसुंभ समीक्षकांना 'कवितेचे स्पष्टीकरण द्यायला मी काही गुन्हेगार नाही' असे खडे बोल सुनावणारा हा माणूस आहे.

त्यांचा सच्चा वाचक वर्ग कधीच त्यांच्या बद्दल 'ही कविता कळली नाही हो' अशी तक्रार करणार नाही आणि ग्रेसांना पण माहितीये की आपण त्या वाचकांना काय दिलंय... स्वतःच्या काव्य निर्मिती प्रक्रियेकडे त्रयस्थ नजेरेने पाहताना त्यानी एवढे मात्र कबूल केलं की साहित्य जगतात त्यांच्या कवितांनी आणि ललित लेखांनी खळबळ मात्र उडवून दिली. 


'दुर्बोधतेची बेसरबिंदी' या लेखात ते सांगतात की ही 'बेसरबिंदी' समीक्षकांना कधीच सापडणार नाही...ते शोधयला जातील...त्यांना काहीतरी मिळाल्याचे जाणवेल पण पुढच्या ओळींचे अर्थ लावता लावता ती बेसरबिंदी पुन्हा निसटून निघून जाईल. कवितांचे फक्त 'अर्थ' लावण्याचे काम करणाऱ्या समीक्षकांकडून अजून दुसरी काय अपेक्षा करणार म्हणा !!

आरती प्रभू, जी.ए.कुलकर्णी आणि ग्रेस यांनी मराठी भाषेवर सौंदर्याचे खूप अलंकार चढवलेय पण त्याची खबर विविध साहित्य मंडळातल्या तथाकथित समीक्षकांना झाली नाही.


'फेटेवाल्यांच्या' साहित्य संमेलनात अशा कितीतरी प्रतिभावान कवी/लेखकांना मानाची खुर्ची आजवर मिळाली नाही. हे त्या संमेलनांचे दुर्भाग्य.!! पण त्यांचे लिखाण वाचून असंख्य रसिक तृप्त झालेत हेही तेवढंच खरंय.


शेवटी, ग्रेस यांची कविता ही अनुभवण्याची चीज़ आहे एवढंच सांगून मी खालील ओळी उद्घृत करतो आणि रजा घेतो...


'ज्याचे त्याने घ्यावे
ओंजळीत पाणी;
कुणासाठी कोणी
थांबू नये

ग्रेस ह्यांच्या कवितांवर आधारित चित्र काढण्याचा मानस आहे पण तोपर्यंत सहज सुचलेले आणि चितारलेले हे एक painting...



1 comment: