Thursday 28 February 2013

बयो






कोकणातल्या नीरव दुपारी घुमत जाणार्या नाखव्याच्या हाळीसारखं लहानपण गेलं माझं... झाडामाडाच्या झावळ्या-फाट्यांना चुकवून जमिनी पर्यंत पोहोचलेल्या त्या कवडश्यांसारखं... किनार पट्टीवर पसरलेली ओळी वाळू अजून जाणवते तळव्यांना मधेच... एकदम पोकळ पोकळ होऊन जातं आत काहीतरी... अजून कुठूनतरी कवड्या घातलेल्या वासुदेवाची घुंगुर किणकिण ऐकू येते... पांगीर्याच्या बिया... त्या जाणवतात हातात... खाचा-पाणी, बिल्लर, शंख शिंपली.... केवढी संपत्ती होती...सारं सुटलं...कुठेतरी हरवलं.
दरवेळी कोकणात जाताना ही वाक्य आठवतात मला... बयोह्या चित्रपटातलं हे एक मनोगत पिच्छा पुरवतेय अजून...३ वर्षं झाली हा चित्रपट पहिल्यांदा बघून... आतापावेतो ११ वेळा बघितलाय... इतक्यावेळा मी पाहिलेला हा एकमेव मराठी सिनेमा...काही चित्रपट असे असतात की त्यांच भुत मानगुटीवर जे बसतं ते कायमचं. गजेंद्र अहिरे दिग्दर्शित बयोहा असाच एक अप्रतिम चित्रपट. ह्यातल्या कथानकाची तुलना गो. नि. दांडेकरांच्या शितूया कादंबरीशी करता येईल.

१९४० ची पार्श्वभूमी...कोकणात कुठेतरी बयो नावाची एक वेडसर पोर कुण्या विश्वनाथची कित्येक वर्षं वाट पाहत आहे...विश्वनाथवर तिचे निर्व्याज प्रेम...तो यायचे काबुल करून गेला पण परत आला नाही...तो आज किंवा उद्या येईल या आशेवर ती जगतेय...रोजची मीठ भाकर मिळायची भ्रांत... तिला पर्वा नाही त्याची... ती विश्वनाथ च्या प्रेमात आकंठ बुडालेली...वेड लागेपर्यंत...त्याला नियमित पत्र पाठवणारी...त्याच्या पत्रोत्तराची रोज वाट पाहणारी...स्वतःच्या मनोराज्यात गुरफटलेली...त्याने एकही पत्र पाठवलं नाही...तो विसरला तिला
? ...तो अजूनही आलाच नाहीये...
बयो अनाथ असते...जन्माने मुस्लीम... बाळपणी गावात दंगल घडली असताना शिक्षक असलेले आप्पा तिला आसरा देतात... पोटच्या पोरीप्रमाणे वागवतात... तिला शिकवतात... शास्त्रीय संगीतातही तरबेज करतात... विश्वनाथ हा आप्पांचा दत्तक मुलगा... शिकून कोकणात परत येतो...बयो वर प्रेम जडते... स्वातंत्र्याचे वारे वाहत असतात... ते प्रथम कर्तव्य समजून ब्रिटीश सरकार विरोधात वेगवेगळे छुपे कारस्थानं पूर्णत्वास नेण्याची मनीषा तो बाळगून असतो...

आप्पांच्या नजरेतून हे सगळं सुटत नाही... ते त्याला शपथ घालून विलायतेस पुढील शिक्षणासाठी पाठवतात...मी परत येईन असे बयोला आश्वासन देऊन तो हा देश सोडतो... इकडे आप्पांविरुद्ध कट रचून ब्रिटीश सरकार त्यांना जेलमध्ये टाकतं... त्यातच ह्रदय विकाराच्या झटक्याने ते निवर्ततात... बयो एकटी पडते... सोबतीला असतो तो बाबुल नावाचा आप्पांचा गडी... दारिद्र्याचे शुक्लकाष्ठ मागे लागले असतानासुद्धा तिला सांभाळण्याची जबाबदारी स्वतःकडे घेणारा... पण तोही दुर्दैवाने नारळाच्या झाडावरून पाठीच्या भारावर पडतो... बयोची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत जाते... मिळेल ते काम तिला करावे लागते... रोज विश्वनाथची वाट पाहता पाहता ती वेडीपिशी होते... त्याला भेटायला जायला म्हणून वायफळ प्रयत्न देखील करते...

बयोची ही कहाणी तिच्या पत्रांच्या माध्यमातून उलगडत जाते ...रावी समोर...

रावी आणि प्रसाद हे इंग्लंड मध्ये काही काळासाठी स्थलांतरित झालेलं जोडपं... नवा देश
, नवी माणसं, नवी आव्हानं यांची ओढ असलेला प्रसाद त्याच्या कामात अधिकाधिक व्यस्त होत जातो... रावीला एकटेपण खायला उठतं... तिला कोकण आठवू लागतं... कोकणातला निसर्ग, पाऊस, समुद्र किनारा, सणवार... ह्या सगळ्या आठवणींनी ती व्याकूळ होत जाते... घरी एकटी असताना तिला काही जुनी पत्र सापडतात...असंख्य !! ...बयोने विश्वनाथला लिहिलेली... विश्वनाथ याच घरात आधी राहत होता... ती पत्र रावीला आणखी अस्वस्थ करतात... रावी विश्वनाथचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न करते... बयोला भेटण्यासाठी म्हणून प्रसादला मुंबईला स्थलांतर करण्यास भाग पाडते... अखेर कोकणात जाऊन ती बयोला हुडकून काढण्यात यशस्वी होते... बयो अजूनही तशीच... शून्यात कुठेतरी हरवलेली... विश्वनाथच्या येण्याकडे आस लाऊन बसलेली... बयोच्या या आयुष्यावर रावी कादंबरी लिहिते... पुढे तिला खूप प्रसिद्धी मिळते... ओघाने विश्वनाथच्या वाचनात ही कादंबरी येते आणि तो रावीला भेटायला जातो... रावी त्याच्यावर खूप चिडते... बयोच्या पत्रांना का नाही उत्तर दिलंस ते खडसावून विचारते... विश्वनाथला ती पत्रं मिळालीच नसतात... ब्रिटीश सरकार विरोधी कारवायांत सहभागी असल्याने त्याला तिकडे अटक झालेली असते...

रावी विश्वनाथला बयोला भेटावयास सांगते... पण तोपर्यंत उशीर झाला असतो...ह्या
बदललेल्याविश्वनाथला बयो वेडसरपणामुळे ओळखू शकत नाही... हाच तिचा विश्वनाथ आहे हे तिच्या गावीही नसतं... तोविश्वनाथ एकदिवस नक्की येईल हे ती सतत सांगत असते... समुद्राकडे नजर लाऊन ती त्याची आतुरतेने वाट बघत असते... अखेरीस विश्वनाथ तिला तिथून आपल्यासोबत घेऊन जातो... प्रेमात वेड्याझालेल्या बयो ची ही मन हेलावून टाकणारी अशीही एक प्रेमकथा...

चित्रपटाचे चित्रीकरण अतिशय सुंदर आहे... पावसातल्या हिरव्यागार कोकणाचे... तिथल्या टुमदार कोकणी घरांचे... फेसाळलेल्या समुद्राचे सुरेख छायाचित्रण केले आहे... पुर्णगडाच्याआसपास पावसाळ्यात हे चित्रीकरण केलंय... काही संवाद आणि स्वगत साहित्यिकदृष्ट्या उच्च दर्जाचे आहेत... पार्श्वसंगीत सुद्धा जमेची बाजू... शास्रीय संगीताच्या काही श्रवणीय बंदिशी अधेमधे पेरल्या आहेत... सगळ्यांचा अभिनय उत्तम... खासकरून बयोची भूमिका साकारलेल्या मृण्मयी लागूचा अभिनय उत्कृष्ट !!! पटकथा आणि दिग्दर्शन फारच उजवे... चित्रपटाचा वेगही नियंत्रित...

अभिजातचित्रपटांच्या चाहत्यांना हा सिनेमा नक्की आवडेल. कायम स्मरणात राहील असा हा नात्यांचे भावबंध दर्शवणारा नितांत सुंदर चित्रपट !!

No comments:

Post a Comment