Monday 8 April 2013

वेचलेली फुले...


(कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून...)




"कशास पाहिजे तुला परंपरा?
तुझीच तू परंपरा बनून जा"


मला आम मराठी माणसांनी आपला म्हटलेले आहे. मी उरलेल्यांची कशाला पर्वा करू? ज्याला जनता उराशी लावते, त्याला समीक्षकांच्या औषधाची किंवा दूध पावडरीची गरज नसते! ज्याच्यात भरपूर मार खाण्याची शक्ती असते, तोच सडकून मार देऊन शेवटी जिंकतो. मी वर्षानुवर्षे उपेक्षा, निंदानालस्ती व मानवी क्षुद्रपणाचा भरपूर मार खात आलेलो आहे. 

ज्या समाजात मी जन्मलो, त्याचा विचार केला तर भौतिकदृष्ट्या माझी मते मला परवडत नाहीत. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे एक यातनाच असते. पण जे हृदयाला पटते, त्याविरुद्ध वागणे म्हणजे त्याहून मोठी यातना असते. मी पहिली यातना निवडली !

संपादकांची पत्र आली म्हणून मी वाईट किंवा कमअस्सल लिहूच शकत नाही. माझ्याजवळ कवितांचा कारखाना नाही. ज्याला कवी म्हणू आपली स्वतःची  आणि मराठी भाषेची इज्जत राखायची असेल, त्याने कधीही "मागणी तसा पुरवठा" हे धोरण स्वीकारू नये. वर्षात फक्त ३-४ कविता झाल्या तरी चालतील, पण त्या १०० नंबरी सोनेच असाव्यात. जो कवी आपल्या कविता छापणाऱ्या दिवाळी अंकांच्या संख्येवरून आपला मोठेपणा ठरवतो, त्याच्यासारखा बेवकूफ इसम दुसरा नाही !

ह्या वेळी मला माझीच कविता आठवीत आहे--

असते ज्यांचे हृदय बॅंकेत सुरक्षित
इन्क्रिमेंट आणि प्रमोशन
वांझेच्या विटाळासारखे निश्चित
त्यांना सर्वच माहीत असते
-- कविताही 

मी  निवृत्तीच्या- वैराग्याच्या गोष्टी करीत नाही. माझे जीवनावर प्रेम आहे. म्हणून हे जग माणसांनी राहण्याच्या लायकीचे बनावे अशी माझी इच्छा आहे.  म्हणूनच मला सतत वाईटपणा पदरी घ्यावा लागतो.
मी स्वतःला हुतात्मा वगैरे समजत नाही. पण मला इतरांप्रमाणे महत्त्वाची "साहित्यिक" माणसे सांभाळता येत नाहीत, हे मात्र खरे. माझ्या चुकांवर मी पांघरूण घालत नाही. पण तो भूतकाळ झाला. 
माझ्या कवितेचा प्रवास सुरूच आहे. कविता व माणूस यांचा वेगवेगळा विचार करता येत नसतो. म्हणून मी एवढेच म्हणेन--

दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा
माझिया संगे उद्याची चालती संवत्सरे !

No comments:

Post a Comment