Sunday 22 September 2013

वेचलेली फुले...


(अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ मधून... )

जीवनाच्या या प्रवासात अनेक माणसं आली-गेली तरी मी एकाकी वाटेचा वाटसरू आहे असं मला कायम वाटतं. माझी माणसं, माझं घर, माझं गाव, माझा आणि जिथे फिरलो ते देश, भोवतालचा समाज, गाणं, खाणं, पुस्तकं, लिखाण, काही निसर्गरम्य तर काही तणावपूर्ण असे प्रवास, त्यात दिसलेला निसर्ग, दाहक आणि प्रेरक, जिवंत आणि भीषण अनुभव यात मी रमलेला होतो, असतो आणि राहीन. पण तो एकटेपणा, भटकेपणा मनातून क्षणभरही जात नाही. सगळं सुरळीत चालू असलं तरी काहीतरी राहिलंय अशी अपूर्णता मन खात असते. अपार प्रेम करणारी इतकी माणसं मिळूनही आयुष्यात एकटेपणा जाणवत राहतो.

अशा नैराश्याच्या दाट काळोखाच्या परिस्थितीत कुठूनतरी आशेचा किरण चमकतो आणि मग पुन्हा जगण्याची उमेद येतेच. जगात अंधारून काळवंडून जाण्यासारखं खूप काही असलं तरी जगण्यासारखंही खूप काही आहे...
मग मी कुठेतरी प्रवासाला निघतो... प्रवासात एखादा व्याकूळ करणारा निळासावळा ढग दिसतो. मेघदूत आठवतं... धारानृत्य पाहताना मन हरपतं... डोंगरकड्यावरून स्वच्छंद पणे खळाळते धबधबे दिसतात... कधी कधी रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य दिसतं... रानात इवली इवली मोहक रंगाची फुलं दिसतात... या सगळ्यात मी अगदी हरवून जातो.
कधी समुद्रावर गेलो तर उचंबळणाऱ्या लाटांचा आवेग पाहून त्या भिरभिरत्या हवेत सामावून जातो. समुद्राचं तर मला विलक्षण आकर्षण आहे. आयुष्यातल्या अनेक घडामोडी, गतस्मृती समुद्राकडे पाहताना आठवतात. विशेषतः आकाशात सावळे ढग असताना तर काहीशा गूढ, हुरहूर लावणाऱ्या आसमंतात समुद्र तुमच्याशी खूप काही बोलत असतो. लाटा पायाशी येऊन हितगुज करीत असतात. आणि आपल्याला पडलेले प्रश्न समुद्राकडे पाहून शुल्लक वाटायला लागतात. समुद्राकडे पाहिलं की या विश्वाच्या अगाधतेचं मला दर्शन होतं.

कधी कधी मन जरा संदिग्ध किंवा एकाकी असलं की माझ्या असंख्य आवडत्या गायक-वादाकांपैकी एखाद्याने घेतलेली लकेर किंवा वाद्याचा एखादा झंकार नव्यानं मनात उमटतो आणि ओठांवर अलगदपणे वाहवा येतं...

कधी एखादं जुनं परिचित पुस्तक नव्याने भेटतं... काही लोकांचे लेख वाचले, त्यांचं कार्य पाहिलं तर खरोखर मला दिलासा मिळतो... अशी लोकं आणि अशा चळवळी आहेत ज्या प्रस्थापितांनी दुर्लक्षित वा बदनाम करूनही खंबीरपणे तंबू ठोकून तळागाळातल्या लोकांच्या बाजूने उभे आहेत असं मी जेव्हा बघतो तेव्हा मनात आशा पल्लवित होते... काळोखात काही प्रकाशशलाका दिसतात... पाडगावकर म्हणतात तसं, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री गाणारा मी एक आनंदयात्री बनून जातो !

No comments:

Post a Comment