Monday, 21 October 2013

अजानवृक्षाच्या छायेत


‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर’ या उक्ती प्रमाणे ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मी पदरात पाडून घेतले आणि माउलींच्या भक्तिरसात न्हाहून निघाल्याची चैतन्यमय अनुभूती झाली. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि दिव्यतेने उजळून निघालेल्या त्यांच्या अलौकिक आयुष्याबद्दल, दोन ओळी देखील लिहिण्याची पात्रता माझ्यात नाही; हे पूर्णपणे जाणून प्रस्तुत लिखाण करीत आहे. ‘मोगरा फुलला’ ही विलक्षण कथा आणखी चार लोकांनी वाचावी एवढे सांगण्यासाठीचा हा केलेला अट्टाहास !! हे पुस्तक माझ्या हाती पडणे हा मी तरी एक शुभसंकेतच मानतो. ‘धर्म’ ह्या मानवनिर्मित संकल्पनेचा मूळ गाभा सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर असून सर्वत्र गोंधळाची व अविश्वासाची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्वयंघोषित बाबा आणि साधू लोकांनी सध्या धर्माचा बाजार मांडला आहे. जन-मानसामध्ये निवास करीत असणाऱ्या नकारात्मकतेचे आणि भयाचे भांडवल करून स्वतःच्या तुंबड्या भरण्याची सोय ह्या लोकांनी चतुराईने करून ठेवली आहे. ह्या एवढ्या पसाऱ्यात मोठ मोठी धार्मिक संस्थाने कशी काय मागे असणार? कुठलेही कष्ट न उचलता अमाप काळ्या पैशाचे ते धनी बनले आहेत. विविध राजकीय पक्षही धर्माची (आणि सर्वधर्मसमभावाची) पताका आम्हीच उंचावली आहे असे भासवीत आहेत. प्रत्येकवेळी विवेकाचा पराभव होत आहे. ‘स्व’त्व हरवलेल्या सामान्य माणसानी यातून कसा मार्ग काढावा यासाठी एकच तरणोपाय आहे आणि तो म्हणजे संत-साहित्याच्या ‘अभ्यासाचा’ व तद्नुसार आचरण करण्याचा... खासकरून ‘श्री ज्ञानेश्वरीचा’ !! महाराष्ट्राला संतांची आणि संत-साहित्याची विशाल परंपरा लाभली आहे. ‘ज्ञानेश्वरी’ तर सर्व ग्रंथांचा शिरोमणी... कालातीत महाग्रंथ... ज्ञानदेवांच्या स्वानुभूतीतून, प्रज्ञेतून, प्रतिभेतून, ज्ञानातून, वाग्यज्ञातून, जाणीव-नेणीवेतून प्रसवलेला महाग्रंथ... नुसतं पारायण करून गंध, फुले वाह्ण्यासाठीचा नव्हे तर त्यात लिहिलेलं प्रत्यक्ष जीवनात आचरण्याचा. ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी असे म्हणतात ते उगाच नाही.

‘मोगरा फुलला’ ही कहाणी त्या ज्ञानेश्वरीच्या राजमार्गाकडे नेणारी एक सुबक पाउलवाट आहे. गो. नि. दांडेकरांनी ही कादंबरी लिहून आपल्यासारख्यांचे एक प्रकारे पथ-प्रदर्शनच केले आहे. हे लिखाण पुन्हा आपल्याला त्या ‘ज्ञानियांच्या राजाची’ महती आणि गरज सांगून प्रकाशाची नवी कवाडे उघडी करते. ही गाथा आहे अवघ्या ब्रह्मांडाची ‘माउली’ झालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांची, त्यांच्या माता-पित्याची, त्यांच्या भावंडांची... त्यांनी सोसलेल्या अपरिमित हालअपेष्टांची... आणि ह्या सगळ्यांची आयुष्ये अगदी जवळून बघितलेल्या भट्टदेव व कावेरी या पात्रांची. सन्यस्त धर्माचे पालन करीत हिंडणारा भट्टदेव नावाचा जोगी आणि ज्ञानेश्वरांच्या मातेची सखी असलेली कावेरी ह्यांच्या मुखाद्वारे या कुटुंबाचा जीवनपट उलगडण्यात आला आहे.

ज्ञानेश्वरांचे पिता श्री विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणीदेवी ह्यांचे पुर्वायुष्य, विवाहोत्तर कष्टप्रद जीवन, विठ्ठलपंतांनी धरलेली विरक्तीची कास, ‘प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पडून मग परमार्थ साधावा’ असा त्यांच्या गुरूंनी दिलेला आदेश, संन्यासाश्रमातून पुन्हा गृहस्थाश्रमाकडे परतताना विठ्ठलपंतांना करावे लागलेले प्रायश्चित्त, धर्मशास्त्री आणि पांडित्याचा टेंभा मिरविणाऱ्या ब्राह्मणांकडून कुळकर्णी कुटुंबाला वाळीत टाकणे, चार अलौकिक पुत्रांचा जन्म, श्री निवृत्तीनाथांना त्र्यंबकेश्वर जवळ अकल्पित व अद्भूतपणे प्राप्त झालेली ‘नवनाथां’तील श्री. गहिनीनाथांची दीक्षा व ईश्वरानुभूती, “मुलांच्या भवितव्याची काळजी असेल तर देहत्याग करावा लागेल” असा विठ्ठलपंतांना आणि रुक्मिणीदेवीला ब्राह्मणांनी दिलेला आदेश, त्या दोघांचा देहत्याग, त्यानंतर उघड्यावर पडलेल्या चारही भावंडांची झालेली फरफट आणि वानवा, संन्याशाची पोरे म्हणून त्यांच्या वाटेला आलेला अपमान आणि घृणा, विपरीत परिस्थितीतही समाजाचेच हित चिंतण्याची ह्या भावंडांची वृत्ती, श्री सार्थ ज्ञानेश्वरीची निर्मिती आणि माउलींच्या संजीवन समाधी पर्यंत प्रत्येक घटनेचे रसाळ आणि हृदयस्पर्शी वर्णन गो.नि. दांडेकरांनी करून ठेवले आहे.

‘मोगरा फुलला’ चे निमित्त होऊन कालच आळंदीला माउलींच्या भेटीला जाऊन आलो. वेगळ्याच प्रसन्नतेचा अनुभव आला. किती पवित्र जागा !! ७००-८०० वर्षं उलटून गेलीत. आजही माउलींच्या प्रेमापोटी लोक इथे भक्तिभावाने येतात... आणि यायलांच हवं. जातीपातींच्या कक्षेत गुरफटलेल्या समाजात सगळे भेदभाव विरून ज्ञानाची गंगा वाहती व्हावी आणि ‘मनुष्य धर्म’ वृद्धिंगत व्हावा यासाठी किती सोसलंय माउलींनी !! विद्वत्ता, कर्तुत्व, मान-सन्मान, अश्रद्धा, अहंम ह्या प्रवृत्ती त्यागून त्यांच्या चरणी लीन व्हावं. ज्या अजानवृक्षाखाली माउलींनी संजीवन समाधी घेतली त्याच्या छायेत क्षणभर विसावलो. नाना विचारांचे मोहोळ उठले—

सुवर्णपिंपळाखाली विराजमान असलेले ज्ञानदेवांचे कुलदैवत श्री सिद्धेश्वर महादेव कितीतरी प्रसंगांचे साक्षीदार असतील !! कशी असतील ही भावंड?... कसे असतील यांचे माता-पिता?... किती अवहेलना आणि अपमान सहन केला त्यांनी !! घरात अठरा विश्वे दारिद्र्य... वडील भिक्षा मागत... निरुपण, प्रवचन करीत... असल्या अवघड परिस्थितीतही चारही मुलांना या माता-पित्याने सांख्य, उपनिषद, वेदांतापासून ते तर्क, मीमांसा, भगवद्-गीते पर्यंत अध्यात्मशास्त्राच्या सगळ्या विषयात पारंगत केले... उत्तम संस्कार केले... त्यावेळी ग्रंथ उपलब्ध नव्हते... जे पाठ केले ते सांगावे लागे... माता-पित्याच्या देहत्यागानंतर कसे काढले असतील या मुलांनी दिवस?... उन्हातान्हात, थंडी-पावसात एवढीशी ही पोरं माधुकरी मागत हिंडायची... काय दिलं समाजानी यांना?... उपेक्षा... छळ... बहिष्कार... ब्राह्मण वर्गाने वाळीत टाकले यांना... का? तर धर्म भ्रष्ट होईल म्हणून !! हा कुठला धर्म?... कर्मकांड आणि तथाकथित ब्रह्मवृन्दांच्या अहंकाराला पोषित ठेवणाऱ्या रूढी यांच्या आहारी जाऊन धर्म, शास्त्र आणि नीती च्या गफ्फा मारणाऱ्या ब्राह्मण वर्गाने केवढे मोठे पातक करून ठेवलेय... ती पोरं भिक्षा मागायला आलेली असताना ही लोकं त्यांच्या झोळीत शेण, कचरा इत्यादी टाकत असत... कुठलीही प्रतिक्रिया न देता, शांतपणे समस्त जनांच्या कल्याणाची कामना करीत ही पोरं पुढे चालू लागत... ह्या सगळ्याचा विचार करता करता, मन विषण्ण झाले. ज्या पापाला कुठलेही प्रायश्चित्त नाही असे काम आमच्या पूर्वजांनी करून ठेवले आहे हे खेदाने सांगावेसे वाटते... ह्यांचीच पापं आम्ही आता धुवत आहोत का?... खरोखर संताप येतो... बरीच लोकं संपूर्ण कुळातील मृतात्म्यांच्या मुक्तीसाठी वगैरे भव्य-दिव्य असे अनुष्ठान, पूजा-अर्चा, भंडारा वगैरे करतात... मनात एक असा प्रश्न उपस्थित झाला की, का म्हणून ‘अशा’ पूर्वजांसाठी वेळ वाया घालवायचा? महाराष्ट्राचा गेल्या हजार वर्षांचा इतिहास बघता; सोवळे ओवळे, जेवणावळी, मिथ्याहंकार, रूढी, स्पृश्य-अस्पृश्य भेदाभेद अशा भ्रामक कल्पनांमध्येच ब्राह्मणांनी आपल्या पिढ्यानपिढ्या खर्ची घातल्या आहेत...
माउलींनी मात्र अशा खल प्रवृत्तीच्या लोकांचा दुष्टपणा जाऊन त्यांच्या ठायी सत्कर्म करण्याची इच्छा होओ ही प्रार्थना करून त्यांना क्षमा केली आहे. ‘माउलीच’ ती !!

ही कादंबरी वाचता वाचता बरेच ठिकाणी थबकलो... एक प्रसंग असा--
समाजाने वारंवार ज्ञानदेवांच्या माता-पित्यास निंदिले... एके दिवशी क्षुब्ध होऊन ज्ञानदेवांनी कुटीची ताटी लावून घेतली आणि ते आसनस्थ झाले. काळजीपोटी निवृत्तीनाथ कुटीबाहेर येरझरा घालू लागले... तेव्हा मुक्ताईने ताटीचे अभंग म्हणून ज्ञानदेवांची समजूत घातली... “योगियांचा योगी तू... ज्ञानियांचा ज्ञाना... तू का म्हणून स्वतःस क्लेश करून घेत आहेस?”
ती भरभरून गाऊ लागली--
                               योगी पावन मनाचा |
                               साहे अपराध जनांचा ||
                               विश्व रागे झाले वन्ही |
                               संती सुखें व्हावे पाणी ||
                               शब्द-शस्त्रें झाले क्लेश |
                               संती मानावा उपदेश ||
                               विश्व पट, ब्रह्म दोरा |
                               ताटी उघडा ज्ञानेश्वरां ||

केवढीशी ही मुलगी !! आपल्या थोरल्या भावाला समजावत त्याला सांत्वनपर, प्रेमळपणे उपदेश देत आहे. कुठून स्फुरले तिला हे?... केवढी ही प्रगल्भता !! हा केवळ प्रतिभेचा अविष्कार नाही... हे स्वयंभू असे संचित आहे... आणि त्याचे उदात्त आणि सुंदर प्रकटीकरण आहे. हे कल्पनातीत आहे... कुठल्याही तर्काच्या आणि बुद्धीच्या तराजुतून हे तोलता येत नाही... प्रज्ञा, मेधा, प्रतिभेच्या पलीकडील आहे हे सर्व... ती म्हणतेय, ‘विश्व पट, ब्रह्म दोरा’... अचानक Quantum Physics मधील ब्रह्मांडाचे कोडे सोडवायच्या प्रयत्नांत असलेल्या ‘String Theory’ व त्या निगडीत framework ची आठवण झाली... आश्चर्यकारक अशी analogy... ७००-८०० वर्षांपूर्वी एवढे गूढ सत्य ही छोटीशी मुलगी बोलून जाते... काय म्हणावं याला?... पृथ:करण करणे आपल्या क्षमते बाहेरचे आहे !!

आणखी एक प्रसंग... निवृत्तीनाथ ज्ञानदेवांना जेव्हा संस्कृत भाषेत बंदिस्त असलेली ज्ञानगंगा सामान्य लोकांसाठी मुक्त करण्याचा आदेश देतात तो प्रसंग किती सुरेखपणे वर्णिला आहे !!
भोवताली जनसमुदाय. ज्ञानेश्वर निरुपणास सुरुवात करतात... मनुष्यात विद्यमान असलेल्या सामर्थ्याचे ते वर्णन करतात--
“जन्म मृत्युरूपी चक्रावर घातीलेले हें मृतीकापात्र- आगी लागल्यावरी ज्याची चिमुटभरी राख होवोन आकाशी उधळते- ऐसें हे शरीर-
मात्र त्यातील “प्रज्ञा”-
जिच्यामध्ये ब्रह्मांड कव घालायचे सामर्थ्य !
केवळ तिच्या बळावरी आकाशींच्या नक्षत्र तारकांचे वेध घेता येताती-
पृथ्वी म्हणजे काय... आप म्हणजे काय... तेजाचे रूप काय... वायू कैसा, केवढा?
हे सर्व आकळण्यायेवढा ज्या बुद्धीचा आवाका-
तिणे या आवघ्यातून थोर जो परमात्मा- त्याचे ध्यान काय म्हणोन न करावे?
मत्त गजास आकळण्याचे ज्याचे अंगी सामर्थ्य, त्याने मुखावर घोंगावणारी मुरकुटे काय मारीत बैसावे?
साती सागर पैल जाण्याऐसा जो बळीवंत त्याने थिल्लरातं काय म्हणोन तृप्तता अनुभवावी?
दाही दिशा ओलांडण्याची शक्ती ज्याच्या पंखांमध्ये त्याने येका पिंजऱ्यात काय म्हणोन संतुष्ट असावे?
जो सगुण आणि निर्गुणही आहे-
जो साकार आणि निराकार-
जो सूक्ष्म आणि स्थूल-
जो दृश्य आणि अदृश्य- किंबहुना जो परेपलीकडला, तो जर भक्तीमुळे वश करिता येतो, तर काय म्हणोन करू नये?”
अमोघ वाणी... ज्ञानामृत.

असेच एकदा, पंढरीच्या ‘नामदेव’ नामक वेड्या विठ्ठलभक्त भेटीला माउली स्वतः तिथे गेली... त्यास काही गुज बोलावयास.
ज्ञानदेव म्हणाले, “नामा, कुणीही कर्म त्यागू नये. देव, तीर्थयात्रा, भजन हे जाणत्याने सांडो नये. तीर्थयात्रा केल्याने प्रवास घडतो. जनलोकांचे कळते. कष्ट सोसावे लागताती. तितिक्षा अंगी बाणते.”
नामा म्हणाला, ”देव सर्वत्र येकच. हा पंढरीशच नानां रूपे नटला आहे. तीर्थयात्रेसी येवोन मी काय करू?”
“पण हे ध्यानी येण्यासाठी ती नानां रूपे डोळेभरी पाहिली पाहिजेती. ती अवलोकील्याविना त्याचे व्यापकपण नेटके ध्यानी-मनी येत नाही”.

संत नामदेवांचा अर्धवट डूचमळणारा कुंभ माउलींना पुर्ण भरावयाचा होता. 

‘देव सगळीकडे आहे’; पण हे नुसतं बोलून कसं भागेल !! 

विविध क्षेत्रांचे तीर्थाटन, तिथल्या दैवतांची, लोकांची नाना रूपे, विविधता, सहवास, कथा, श्रवण-कीर्तन हे अनुभवल्याशिवाय ही उक्ती सार्थ होत नाही. एकाच फळाच्या जशा वेगवेगळ्या प्रजाती आणि प्रत्येकाची वेगळी चव... तसेच हे आहे. प्रत्येक जागेचे एक स्थान-महात्म्य असते... एक इतिहास असतो... तो प्रवास, तो अनुभव गाठीशी बांधणे हे महत्वाचे असते. ‘वारी’ या संकल्पनेचे हेच मूळ आहे.

असे कितीतरी प्रसंग... कितीतरी घटना...
ज्ञानावर श्रद्धा ठेवून, ज्ञानोपासना करून, भक्तिमार्गाचे दीप प्रज्वलित करून अंतरीचे ‘स्व’त्व जाणून घ्या आणि विवेकबुद्धी सदैव जागृत ठेवा असा मोलाचा उपदेश माउलींनी आपल्या सगळ्यांना दिला आहे.
ज्ञानेश्वरीची सांगता करताना माउलींनी एक मागणं मागितलं... आपले गुरु असलेल्या विश्वेश्वररुपी श्री. निवृत्तीनाथांना. ही नुसती प्रार्थना नव्हे... नुसतं मागणं नव्हे, तर एक प्रसाद... फक्त तुमच्या-आमच्या कल्याणासाठीचा नव्हे, तर ‘विश्वकल्याणाचा’...

                        ‘दुरितांचे तिमिर जाओ | विश्व स्वधर्मसूर्ये पाहो |
                         जो जे वांछील, तो ते लाहो | प्राणिजात ||’

त्या विश्वात्मक निवृत्तीनाथांनी तात्काळ ‘हा होईल दान पसाओ’ असा आशीर्वाद देऊन ‘पसायदान’ सिद्ध केले.
‘पसायदान’... हाच तो मनुष्याला अभिप्रेत असलेला खरा ‘धर्म’... व्याख्या, रूढी, नियम, कर्मकांड व तत्वप्रणालीच्या निरुपयोगी परिघाला छेदून दशांगुळ उरलेला...
या व्यतिरिक्त उदात्त आणि निर्मळ असं काय असणार? काही नाहीच.
सत्य, शिव आणि सुंदरतेचे हेच ते ‘ज्ञानेश्वरीय’ अधिष्ठान.

आणखी काय बोलावें?
‘कहाणी मागची कहाणी’ या पुस्तकांत गो.नि. दांडेकर ‘मोगरा फुलला’ बद्दल सांगतात--
“अठराव्या वर्षी मी आळंदीस गेलो. तेथें अडीच वर्षे माधुकरी मागून राहिलो. त्या परमपित्याच्या छत्राखाली मी विसावलो. अन्याया विरुद्ध झगडावं, सत्याग्रह करावा, कारावास भोगावा, ही प्रेरणा मला ज्ञानदेवांनी दिली. हातून अनेक अपराध घडले; पण ज्ञानेश्वरीचं विस्मरण झाले नाही. अशी ज्ञानेश्वरी माझं सर्व अस्तित्व व्यापून दशांगुळ उरली आहे. अगदी बाल्यदशेत या मायबोलीला एक मधुर स्वप्न पडलं. त्याचं नावं ‘ज्ञानेश्वरी’. जोपर्यंत मराठी भाषा जिवंत राहील, तोपर्यंत ती या, अतिशय सोसांव लागलेल्या ‘लहानग्याच्या’(ज्ञानदेव) ऋणांत राहील.
मी वारकरी. मजवरचं ज्ञानदेवांचं तत्वज्ञान विषयक ऋण न फिटण्याजोगं आहे. अत्यंत उदार, सर्व समावेशक, कुणाचाही द्रोह न करणारा आणि प्रसंगी प्राणांची बाजी लावणारा असा हा धर्म- असं तत्वज्ञान. त्याचा आदिगुरु ज्ञानदेव आहे. त्यांचं आणखी एक ऋण आहे. आपलं नियोजित काम संपताक्षणी उठून बाजूला सरावं, तिथे रेंगाळू नये, हे ज्ञानोबांनी शिकवलं.
अशी ही ऋणं सांगू तरी किती? ती अंशतः फिटावीत, म्हणून मी ‘मोगरा फुलला’ लिहिली. तो दीड महिना माझा मी नव्हतो. एका तंद्रेंत होतो. झपाटल्यासारखा लिहित होतो. दुसरं कशाचं भान नव्हतं. ‘मोगरा फुलला’ हे एका अर्थें देवकृत्य आहे.”

मराठी सारस्वतात याहून सुंदर, लयबद्ध आणि भावोत्कट गद्य-लिखाण कुणीही केलं नाही आणि कुणी करणारही नाही. गो.नि. दांडेकर लिखित ‘मोगरा फुलला’ हे पुस्तक मराठी साहित्याचा कळससाध्य असा सर्वश्रेष्ठ मानबिंदू आहे. ज्ञानदेवांच्या आई-वडिलांच्या विवाहा आधीच्या जीवनापासून ते ‘माउलींच्या’ संजीवन समाधी पर्यंतचा हा प्रवास केवळ ‘कादंबरी’ न राहता खरोखर ‘अमृतानुभव’ होतो. दुरितांचे तिमिर जाण्यासाठी, परस्परांमध्ये ‘मैत्र जीवांचे’ जडण्यासाठी आणि लोकोद्धारासाठी ज्ञानदेवांनी ‘गुरु’रुपी विश्वात्मक विश्वेश्वराला पसायदान मागितले होते... त्याचे स्मरण करूनच; ‘मोगरा फुलला’ लिहून ‘गोनिदां’नी मराठी भाषेला अमूल्य साहित्याचे असेच एक दान दिले आहे. हे पुस्तक वाचून मनात पहिल्यांदाच कधी नव्हे ती ‘कृतार्थतेची’ आणि ‘धन्यतेची’ भावना दाटुन आली. कुठलेही पुस्तक वाचताना या आधी असे झाले नव्हते आणि पुढे होणारही नाही... कारण आता ‘अजानवृक्षाच्या छायेत’ मन अभुतपूर्व तृप्ततेने व समाधानाने भरले आहे. अधिक सांगण्यासारखे काहीच नाही... जे आहे, ते शब्दांपलीकडले आहे. ‘ज्ञानियांचा राजा’ या अभंगात श्री. तुकोबाराय जे म्हणतात ते स्मरून समारोप करतो.
                                   
                                    “मज पामरासीं काय थोरपण,

                                    पायींची वहाण, पायीं बरी |”



(संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी, आळंदी)

Monday, 23 September 2013

जिगरबाज




U.S. Open 2013 ची फायनल... रात्री अपरात्री झोप डोळ्याआड कुलुपबंद करणे आवश्यक होते... कारणही तसेच होते... नदाल vs. जोकोविक... दोघेही अप्रतिम खेळाडू... दोघेही माझे favourite, पण नदाल माझा सगळ्यात आवडता टेनिसपटू. त्या दिवशी match टाळण्याचा तर प्रश्नच नव्हता... गजर लावला होता... २ वाजता उठून TV समोर बसलो... कितीही नाही म्हटलं तरी झोपेचा अर्धवट अंमल होताच पण रंगतदार सामना पुढ्यात ठेवला असल्यावर कशाची तमा बाळगायची!!

नदाल व फेडरर टेनिस जगतात एकेकाळी most celebrated प्रतिद्वंदी म्हणून संबोधले जात असत परंतु नदाल-जोकोविक एकमेकांचे खरे arch-rivals आहेत कारण दोघांमधली ही तब्बल ३७ वी लढत होती. पुरुषांच्या टेनिस सामन्यांत कुठलेही दोन प्रतिस्पर्धी इतकेवेळा एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. दोघांची लढत पाहण्यात अतीव आनंद असतो. दोघांची खासियत अशी की court चा प्रत्येक इंच ते ‘cover’ करतात, मनगटाच्या जोरावर defensive to offensive होऊ शकतात, सलग शॉट्स खेळून प्रतिस्पर्ध्याला हैराण करतात, दोघेही उत्कृष्ट athletes आहेत आणि प्रत्येक point कमावण्यासाठी जीवाचं रान करतात.
दोघांच्या ह्या rivalry बद्दल जोकोविक म्हणतो, ‘"You just feel that there is the last drop of energy that you need to use in order to win the point. Sometimes I attempt winning those points; sometimes him. It's what we do when we play against each other, always pushing each other to the limit. That's the beauty of our matches and our rivalry."
सोमवारी (U.S. Time नुसार) एकदाचा सामना सुरु झाला. नदालची तयारी उत्तम वाटत होती. ४२ मिनिटे चाललेला पहिला सेट नदाल ने ६-२ जिंकल्यावर दुसऱ्या सेट मध्ये जोकोविकने तुफानी खेळ दाखवत ३ वेळा नदालला ‘Break’ केले. या सेट मधली ५४ शॉट्स ची ‘Rally’ डोळ्यांचे पारणे फेडून गेली. Flushing Meadows मध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण मुक्तपणे दाद आणि standing ovation देत होता. आतापावेतो माझी झोप पूर्ण उडाली होती. जोकोविक ने ४-२ अशी आघाडी घेतली होती आणि याच सेट मध्ये नदालला तिसऱ्यांदा ‘Break’ करत ५-३ पर्यंत मजल मारली. ५-३ चा आकडा ६-३ मध्ये बदलवत जोकोविकने दुसरा सेट आपल्या खिशात घातला होता. तिसऱ्या सेट मध्ये कधी नदाल तर कधी जोकोविक वरचढ ठरत होता. ३-३ असा सेट रंगात आला असताना महत्वाच्या वेळी जोकोविकने केलेले unforced errors त्याला महागात पडले. दोनदा त्याने serve drop केली. ४-४ अशी बरोबरी असताना नदालने पुढे आक्रमक खेळी केली आणि जबरदस्त चिकाटीचे प्रदर्शन करत तिसरा सेट ६-४ असा जिंकला. सामना संपल्यावर या सेट बद्दल नदाल म्हणाला “I thought to run for every point, fight for every ball and play aggressive. And that's what I did in the third set.” नदाल जोमात आला होता. चौथ्या सेट मध्ये जोकोविकला संपूर्ण हतबल करत त्याने ६-१ असा सेट जिंकला आणि U.S. Open Championship देखील... केवळ रात्री शेजारची लोकं जागी होऊ नयेत म्हणून मी आनंदाने उड्या मारणे टाळले होते. माझ्यासारख्या नदाल fan साठी तो जल्लोष करण्याचाच क्षण होता.

३ तास २१ मिनिटात नदालने सामना जिंकला होता. १३ वे Grand Slam, २ रे U.S. Open स्वतःच्या नावावर जमा केले. हे सारं अभूतपूर्व होतं. मागीलवर्षी नदाल U.S. Open ची फायनल TV समोर बघत होता. त्याच्या career वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या समस्त चाहत्यांना तो पुन्हा खेळू शकेल याची शाश्वती नव्हती. गुडघ्याच्या मोठ्या दुखापतीमूळे ७ महीने बेजार असलेल्या नदालनी या वर्षी जबरदस्त comeback केले आहे. गेली काही महीने नदाल कुठल्या दुखण्यातून जातोय आणि त्याला कुठली मानसिक अस्वस्थता जाणवत असेल ह्याचा विचारही मी करू शकत नाही. पण जिद्दीने त्याने या सर्व संकटांवर मात केलेली प्रत्ययास आले. नक्कीच खऱ्या champion ची ती लक्षणे आहेत. विम्बल्डनला पहिल्याच फेरीत बाद झाल्याचा अपवाद वगळता त्याचा या वर्षीचा रेकॉर्ड कौतुकास्पद आहे. एकूण १० Titles त्यांनी यंदा खिशात घातले आहेत. २०१३ चा त्याचा रेकॉर्ड ६०-३ असा आहे. 

या वर्षीच्या त्याच्या खेळाबद्दल नदाल म्हणतो “For a few reasons this season is probably the most emotional one in my career. This is much more than I could ever have dreamed of. Looking back, all this is a bonus, because I’ve done much more than I would have expected seven months ago”.  आश्चर्याची बाब म्हणजे Clay Court चा बादशाह म्हणून संबोधला जाणाऱ्या नदालने या वर्षी Hard Court वर कमाल केली आहे. २२-० असा त्याचा Hard Court वरचा रेकॉर्ड आहे. हे त्याच्या fans ला देखील अचंबित करणारे आहे. ह्या Season मध्ये, दुखापतीतून बाहेर पडल्यावर नदालने आपल्या खेळात जरा बदल केलेला जाणवला. Closer to Baseline खेळणे, Forehand चा अधिक वापर आणि one-handed backhands व त्याचे aggression केवळ अप्रतिम होते.
फायनल नंतर बोरिस बेकर आणि ७ Grand Slam विजतेपद पटकावलेला McEnroe च्या comments समर्पक होत्या.
बोरिस बेकर म्हणतो, “Nadal has performed at an unbelievably consistent level throughout the year, every match he has played he’s been close to perfection.”
“I think he’s a freak of nature,” McEnroe said. “I’ve seen videos of him when he was 13 or 14 and he had the same kind of energy and attitude, the way he played then. That was the way he was and when you talk to people who have gone to Majorca, and to Juan Monaco and different guys like that who have gone to train with him, he literally goes from playing four hours of tennis and then goes to play an hour or two hours of soccer. So clearly he’s got this incredible energy and this incredible athleticism and amazing desire. Let’s hope he stays healthy because it will be great for our sport.”
 वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात केल्यापासून नदालने बरेच चढ-उतार पाहिले आहेत. आठव्या वर्षी त्याने Under-12 Regional Championship जिंकली. त्यावेळी तो Football ही खेळत असे. त्याच्या काकांनी (टोनी नदाल) राफा ला छत्रछायेखाली घेऊन Training द्यायला सुरुवात केली. नदालच्या जडणघडणीत त्याच्या काकाची भूमिका महत्वपूर्ण आहे आणि नदाल हे कधीच विसरत नाही. १४ व्या वर्षी Spanish Tennis Federation ने नदालला Barcelona येथे Training चा पर्याय ठेवला होता पण नदाल व त्याच्या कुटुंबीयांनी तो साफ नाकारला. टोनी नदालचे असे म्हणणे होते की उत्तम खेळाडू व्हायला अमेरिका किंवा तत्सम मोठ्या शहरात अथवा देशात जायची गरज नाही. Passion असेल तर काहीपण साध्य करता येतं. (आजही नदाल ने त्याचे मूळ गाव सोडलेले नाही. फेडरर, मरे, जोकोविक या दिग्गजांनी अनुक्रमे दुबई, सरे आणि Monte Carlo ला आपले बस्तान हलवले आहे. नदाल हा सगळ्यात homely खेळाडू म्हणून ओळखला जातो. कुटुंबाशी जुळलेली नाळ त्याने कधी तोडली नाही. Twitter वर सतत दिसणारे त्याचे family photos कदाचित याचीच साक्ष देतात.) परिणामस्वरूप federation कडून हवी तशी आर्थिक मदत नदालला मिळाली नाही. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. १५ व्या वर्षी नदाल व्यायसायिक टेनिसपटू झाला होता. १७ व्या वर्षी त्याने फेडररला पराजित करून विम्बल्डन च्या तिसऱ्या round मध्ये प्रवेश मिळवण्याचे कर्तब दाखवले. नदालचा आलेख चढता होता. २००५ साली French Open च्या सेमी-फायनल मध्ये त्याने फेडररचा पराभव करत पहिल्यांदा Grand Slam च्या फायनल मध्ये प्रवेश केला आणि मारीयानो प्युरेटाला हरवून पहिले French Open Title व Grand Slam जिंकले. तेव्हापासून आतापर्यंत नदालने ८ वेळा French Open वर आपले नाव कोरले आहे. २००९ साली Australian Open, २००८ आणि २०१० साली विम्बल्डन आणि २०१०, २०१३ साली U.S. Open असे एकूण १३ Grand Slams त्याने आपल्या नावावर केले आहेत. दुखापत रहित राहिल्यास, नदालचे वय बघता आणखी काही Major Titles तो भविष्यात उंचावेल असे वाटते.

यंदाचे U.S. Open जिंकल्या जिंकल्या टेनिस विश्वात ‘नदाल फेडररचा सर्वाधिक Grand Slam चा विश्वविक्रम मोडेल का?’ ही चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झालीये. पण नदालला ह्या आकड्यांच्या खेळाचे सोयरसुतक नाही. तो म्हणतो, “The only thing I can say is what I say every time. I'm going to keep working hard. I'm going to keep doing my things to have more chances in the future to be competitive and to produce more chances to win tournaments like this one. You never know when you will win your last one.”

येणारा काळ नदाल साठी सत्वपरीक्षेचा असणार आहे.
कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या दुखापती त्याच्या करियरला मारक ठरल्या आहेत. अन्यथा आज काही वेगळेच आणि आणखी दिमाखदार चित्र बघायला मिळाले असते. जरी नदालने दुखापतींना चीतपट करून प्रत्येकवेळी धडाकेबाज comeback केले असले तरी त्याची गुडघ्याची दुखापत कधीही डोकं वर काढू शकते. ते टाळण्यासाठी बोरिस बेकरने तर जाहीरपणे नदालला Grass Court वर न खेळण्याचा सल्ला दिला आहे. पाच वेळा विम्बल्डन मध्ये प्रवेश करून आणि दोनदा जिंकूनही नदाल करिता Grass Court या पुढे कायमच दुखरी नस असणार यात शंका नाही. Hard Court वरचे हे सातत्य त्याने मात्र तसेच ठेवायला हवे.  तांत्रिकदृष्ट्या हे फार अवघड असेल.

भविष्यात टेनिस मध्ये कमालीचे बदल घडलेले दिसतील.
वय वर्ष २६ असलेला जोकोविक अग्रमानांकित आहे. त्याचा खेळ उत्कृष्ट असतो. येणारा काळ तो गाजवणार यात दुमत नाही. मरे, डेल पोट्रो, वावरिंका, गास्केट, फेरर कधीही धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता राखतात पण राफेल नदाल हा मला टेनिस मधला सगळ्यात ‘जिगरबाज’ व mentally toughest खेळाडू वाटतो. त्याचे Fighting Spirit, Adaptability आणि Problem Solving ability चे कौतुक करावे तेवढे कमीच !! सध्याचा काळ हा टेनिस चा सुवर्णकाळ सुरु आहे आणि तो अबाधित राहण्यासाठी राफेल नदाल तंदुरुस्त राहून त्याचा सर्वोत्तम खेळ खेळणे हे गरजेचे आहे. राफा... तुला ‘सलाम’ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !! ‘Vamos Rafa’.





Sunday, 22 September 2013

वेचलेली फुले...


(अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ मधून... )

जीवनाच्या या प्रवासात अनेक माणसं आली-गेली तरी मी एकाकी वाटेचा वाटसरू आहे असं मला कायम वाटतं. माझी माणसं, माझं घर, माझं गाव, माझा आणि जिथे फिरलो ते देश, भोवतालचा समाज, गाणं, खाणं, पुस्तकं, लिखाण, काही निसर्गरम्य तर काही तणावपूर्ण असे प्रवास, त्यात दिसलेला निसर्ग, दाहक आणि प्रेरक, जिवंत आणि भीषण अनुभव यात मी रमलेला होतो, असतो आणि राहीन. पण तो एकटेपणा, भटकेपणा मनातून क्षणभरही जात नाही. सगळं सुरळीत चालू असलं तरी काहीतरी राहिलंय अशी अपूर्णता मन खात असते. अपार प्रेम करणारी इतकी माणसं मिळूनही आयुष्यात एकटेपणा जाणवत राहतो.

अशा नैराश्याच्या दाट काळोखाच्या परिस्थितीत कुठूनतरी आशेचा किरण चमकतो आणि मग पुन्हा जगण्याची उमेद येतेच. जगात अंधारून काळवंडून जाण्यासारखं खूप काही असलं तरी जगण्यासारखंही खूप काही आहे...
मग मी कुठेतरी प्रवासाला निघतो... प्रवासात एखादा व्याकूळ करणारा निळासावळा ढग दिसतो. मेघदूत आठवतं... धारानृत्य पाहताना मन हरपतं... डोंगरकड्यावरून स्वच्छंद पणे खळाळते धबधबे दिसतात... कधी कधी रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य दिसतं... रानात इवली इवली मोहक रंगाची फुलं दिसतात... या सगळ्यात मी अगदी हरवून जातो.
कधी समुद्रावर गेलो तर उचंबळणाऱ्या लाटांचा आवेग पाहून त्या भिरभिरत्या हवेत सामावून जातो. समुद्राचं तर मला विलक्षण आकर्षण आहे. आयुष्यातल्या अनेक घडामोडी, गतस्मृती समुद्राकडे पाहताना आठवतात. विशेषतः आकाशात सावळे ढग असताना तर काहीशा गूढ, हुरहूर लावणाऱ्या आसमंतात समुद्र तुमच्याशी खूप काही बोलत असतो. लाटा पायाशी येऊन हितगुज करीत असतात. आणि आपल्याला पडलेले प्रश्न समुद्राकडे पाहून शुल्लक वाटायला लागतात. समुद्राकडे पाहिलं की या विश्वाच्या अगाधतेचं मला दर्शन होतं.

कधी कधी मन जरा संदिग्ध किंवा एकाकी असलं की माझ्या असंख्य आवडत्या गायक-वादाकांपैकी एखाद्याने घेतलेली लकेर किंवा वाद्याचा एखादा झंकार नव्यानं मनात उमटतो आणि ओठांवर अलगदपणे वाहवा येतं...

कधी एखादं जुनं परिचित पुस्तक नव्याने भेटतं... काही लोकांचे लेख वाचले, त्यांचं कार्य पाहिलं तर खरोखर मला दिलासा मिळतो... अशी लोकं आणि अशा चळवळी आहेत ज्या प्रस्थापितांनी दुर्लक्षित वा बदनाम करूनही खंबीरपणे तंबू ठोकून तळागाळातल्या लोकांच्या बाजूने उभे आहेत असं मी जेव्हा बघतो तेव्हा मनात आशा पल्लवित होते... काळोखात काही प्रकाशशलाका दिसतात... पाडगावकर म्हणतात तसं, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री गाणारा मी एक आनंदयात्री बनून जातो !

Friday, 16 August 2013

Celebrating Gulzar…



गुलज़ार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त...(१८ ऑगस्ट)


“जलते-बुझते, उगते-मुरझाते, सूखे-भीगे, सहलाते-चुभते अल्फ़ाज़
और साथ में आवाज़ की एक बूँद... या फिर बौछार...
सीने में अटकी नज़्म
होटों पे अटके मिसरे
आँखों के तले जलता सपना
आईने पर छपा हुआ चेहरा
चेहरे की नीचे कितनी कहानियाँ
गहरी ख़राशें... और गहरी निशानियाँ

फ़लक पे लटका हुआ चाँद 
चाँदनी से तोड़े हुए नूर के धागे
उफ़ुक से खडखडाता हुआ निकला सूरज
जमीं से फुटा दरिया
साहिल पे डूबा हुआ ख़ाली समंदर
आसमाँ का खुला कैनवस
सर पे चिल्लाती धूप
और घर की काँच के खिड़कियों पर संदेसे लिखने वाली बारिश...

वादियों में गूँजती हुई ख़ामोशी
हवाओं पे लिखा हुआ पैगाम
उड़ते पैरों के तले बहती जमीं
पानी से लिखा ख़ामोश सा अफ़साना
बर्फ से खेलते बादल
सनसेट के कच्चे रंग
धुंदलाई, अलसायी हुई शाम
और बहारों में मिलते पिछले मौसम के निशाँ...

किसीके बातों में किमाम की खुशबू
किसीके पैरों के कँवल
किसीके कमर के बल पर मुड़ी नदी
किसीकी मद्धम मद्धम गीली हसीं
किसीके जिगर से जलाई हुई बीडी
किसीके ‘कारे कारे कजरारे नैन’
माथे पर लगी हुई किसीके होटों की मोहर
और किसीके गालों पे पड़े हुए भँवर...

उड़ते उड़ते अँखियों के पेंच
ख़ाली सीने में बजती हुई साँस
ख़ता करने वाला पुराना ‘पापी’ इश्क
कलियों के बंद होटों पर बरसी हुई शबनम
इश्क पे पहनाया हुआ दिल का वो लिबास
दो नैना और वो एक कहानी
मुस्कुराने के वो कर्ज़
और ख़ाली हाथ आयी हुई शाम...

कभी ‘चाँद की उतारी हुई बालियाँ’
तो कहीं ‘एक सौ सोला चाँद की वो रातें’
वो ‘मेरा कुछ सामान’
मीलों से छोड़े हुए दिन
तकिये पे कभी कभी मिलने वाली रात
वो काँच के ख़्वाब
वक़्त की लम्बी जम्हाई
और रात को सुनाई हुई फिर उसी नींद की कहानी...

कतरा कतरा मिलने वाली ज़िन्दगी
दरिया तले ख्वाबों भरी ज़िन्दगी
धूप छाँव में बुनी हुई ज़िन्दगी
लम्बा सफ़र तय कर चुकी ज़िन्दगी
और सुस्त क़दम रस्तों से … उम्र से लम्बी सड़कों पर चलती-दौड़ती ज़िन्दगी
मिल जाएं गर कहीं...
तो बेशक आपकी जिंदगी ‘गुलज़ार’ है |”



|| _/\_ || जन्मदिन मुबारक हो गुलज़ार साहब || _/\_ ||

Tuesday, 23 July 2013

चांभार चौकशी

मॉन्सूनच्या काळात शहरामध्ये ‘पावसाच्या थेंबओल्या खुणा’ शोधायचा माझा (साहित्यिक) प्रयत्न बरेचदा फसला आहे. हा नाद मी आता सोडून दिला आहे. ‘सकाळी ऑफिसला जाताना पाऊस असेल का?’, ‘परत येताना traffic jam मुळे घरी जायला आज किती उशीर होणार?’, ‘weekend पावसाच्या पाण्यात वाहून तर नाही जाणार?’, ‘पावसामुळे आवश्यक ती कामं अपूर्ण तर नाही ना राहणार?’, ‘बाहेरचं काही खाल्याने पोट तर नाही ना बिघडणार?’ असले (अरसिक) प्रश्न आणि शंका कितीही नाही म्हटलं तरी मनात डोकावतातच! ‘पाऊस कधीचा पडतो...झाडांची हलती पाने’ अशी कविवर्य ग्रेस ह्यांची एक सुंदर कविता आहे. आजकाल पावसाची सतत सुरु असलेली रिपरिप बघता, ‘कधीचा पाऊस पडतो’ असे कंटाळून म्हणावेसे वाटते... परंतु याला इलाज नाही. तद्दन शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनोविश्वाचं हे पावसाळी प्रतिबिंब आहे. सुरुवातीच्या काळातला मृद्गंध श्वासात भरून घेणे, निळ्या नभात ढगांची चादर ओढली जाताना बघणे आणि फार फारतर weekend ला बाहेर पाऊस पडत असताना, कॉफीच्या झुरक्यासोबत ‘मल्हारातली’ प्रथितयश गायकाची एखादी बंदिश ऐकणे; एवढीच काय ती शहरातल्या पावसाळी सुखाची अनुभूती! इतरवेळी पाऊस म्हणजे अडथळाच! आणि या दिवसांत मला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटत असेल तर ती म्हणजे रस्त्यावर चालत असताना नेमकी चप्पल तुटणे किंवा हवेचा जोर सहन न झाल्याने छत्रीने स्वतःचा आकार बिघडवून घेणे. एकवेळ रेनकोट घरी विसरल्यामुळे भिजलेलं परवडेल पण नको त्या ठिकाणी, अवेळी चप्पल आणि छत्रीने दगा देणे मला नाकबूल आहे. हे प्रसंग ओढवले म्हणजे चेहरा खाड्कन उतरतो !!

मागच्या आठवड्यात चपलेनी धोका दिला. नशीब मी घराजवळ हिंडत होतो त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक चांभार बसतो. दोन छोटे बांबू आणि कम्पौंड च्या सहाय्याने त्यांना बांधलेला प्लास्टिकचा पत्रा एवढाच काय तो त्याचा जामानिमा. चपला-जोडे दुरुस्त करावयास लागणाऱ्या साहित्याची portable पेटी वेगळी. आतापावेतो चप्पल तुटण्याचा प्रसंग घराशेजारी न आल्याने त्या चांभाराच्या वाटेला जायची वेळ अद्याप आली नव्हती. तसेही माझ्या राशी-स्वभावानुसार मी आसपासचे दुकानदार, वाणी, मेडिकलवाला, भाजीवाला, धोबी ह्यांच्याशी गरजेपेक्षा जास्त संवाद साधल्याचे मला स्मरत नाही. चांभाराशी उगाच बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर समोरच्या दुकानदाराचे ‘नुकतेच’ लग्न कधी झाले आणि त्याच्या अनुपस्थितीत दुकान सांभाळणारी त्याची बायको गळ्यात कुठले दागिने घालते ह्याची देखील माहिती असते. ह्यांना दुसऱ्यांच्या बायकांमध्ये फारच इंटरेस्ट. घोर कलियुग!! माणसाची नजर कशावर खिळेल ह्याचा नेम नसतो. आमच्या सोसायटीतल्या त्या व्यक्तीही ‘दिव्य’ आहेत!!

तर त्यादिवशी एकदाचा पाय फरफटत कसाबसा त्या चांभारापाशी पोहोचलो. तो कामात गुंग होता. मान वर करून पाहायला त्याने मोजून एक मिनिट लावला. मी रीतसर चप्पल सोपवली.
‘वेळ लागंल भाऊ’ असं सांगून तो गप्प झाला. किती ते सांगितलंच नाही.
मी विचारलं ‘किती वेळ?’
‘अर्धा पाउन तास’, तो उत्तरला.
‘कुठं राहता?’, त्याचा लगेच प्रश्न.
‘इथेच... पाठीमागच्या बिल्डींगमध्ये’, मी.
‘या जाऊन निवांत’, तो म्हणाला.
‘असू द्या... थांबतो’, माझे उत्तर.

घर मागेच असूनही चिखल तुडवत अनवाणी जायची माझी काही इच्छा झाली नाही. बिना चपलेचं फिरणं जीवावर आलं होतं. इतका वेळ आता करायचं काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. तिथेच उभं राहून timepass करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. खिशातून मोबाईल काढून twitter चे updates आणि whatsapp चे मेसेजेस चेक करावे असा विचार मनात आलाच होता की एका (“भाऊ, तुमच्यासाठी कायपन” छाप) दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवून, गाडी थांबवत त्या चांभाराला हाक मारली.
‘ओ आढळराव, जमलं काय?’
‘सगळं जमते आण्णा... हे घ्या’ असे म्हणत त्याने polish लाऊन चकचकीत केलेले जोडे त्याच्या स्वाधीन केले आणि कामाचे पैसे घेतले. दुचाकीस्वार भर्रकन निघूनही गेला. चांभाराचे नाव आढळराव असल्याचे समजले. मग आढळरावांनी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली.
‘हा आपल्या नगरसेवकाचा बारका भाऊ... गाडी हाकत फिरत आसतो गावभर... काम ना धंदा... हे राजकारनी लोग सगळे एक जात... गळ्यात चैनी घालून फिरायचं नुसतं... स्वतःचं थोबाड बेकार असूनही पोस्टर चढवतात... काय म्हनावं आता!! आन मला तर वाटते ह्यांच्या घरात एवढा पैसा असेल का ही लोकं आंगनात झोपत असतील’, असं म्हणून ते जोरात हसायला लागले.

पुढचा प्रश्न मला उद्देशून होता.
‘कधीपासून राहता दादा इथं?’
‘झाले ४ वर्षं या एरियात’
‘हितले बरेच गिऱ्हाईक हायेत आपल्याकडं... सगळे हिकडं येतात... आपलं कामंच हाय तसं... थोडीशिबी चूक व्हत नाय... आन आपल्याला आख्खी माहिती हाये इथली... आत्ताच तुमच्या समोरच्या बिल्डींग मधला flat गेला... ऐंशी लाख... रेट तर आसले भिडलेत ना सध्या आभायाला... काई विचारू नका... तुमचं घर स्वतःचं की भाड्याचं?’
'भाड्याचं आहे... पण shift होऊ काही महिन्यात सिंहगड रोडला', मी पुस्ती जोडली.
'तिकडं घेतला काय flat?... तसा तो एरिया शहरातच आलाय आता... एकेकाळी जंगल व्हतं... आता पुन्यात मानसंच येवढी वाढतायेत भसाभसा... त्याला कोन काय करनार. हितं जमवायला पाहिजे व्हतं... C विंग मध्ये होता ना flat एक... ४५ लाखात गेला फक्त... मालक पंजाबी होता... रग्गड पैसा... अर्जंट मध्ये विकायचं होतं घर... हातोहात गेला flat तीन दिवसांत... तुमची चप्पल तेव्हा तुटली असती तर पत्ता लागला असता याचा माझ्याकडून... सौदा पक्का झाला असता... कोथरूडला ४५ लाख... कोन सोडते!... डोळे झाकून घ्यायचा item होता न राव'.
योग्य वेळी चप्पल तुटायला देखील भाग्य लागतं हे मला कळून चुकलंय.

‘तुम्ही कुठे राहता?’, मी विचारले.
‘पाच मिनिटांवर... सुतारदरा... म्हनून तर सगळी माहिती असते आपल्याला.’
आढळराव तसे सुदृढ. पावणे-सहा फुट उंची असावी. भरघोस मिशी. बसके नाक. कपाळावर हलक्या हाताने काढलेले उभे गंध. हातात तांब्याचे कडे. कुर्ता, पायजमा आणि टाळ मृदंगाने नटविल्यास थेट वारकरी शोभेल असे व्यक्तिमत्व. वय जवळपास पंचेचाळीस असावे. थोडक्यात, रेखाटनासाठी उत्तम caricature material !! माझ्या डोक्यात रेखाचित्रांची जुळवा-जुळव सुरु असताना गावठी वळणाचे म्हातारबुवा आणि एक म्हातारी तिथे अवतरले. मी भानावर आलो. त्या म्हातारीची चप्पल तुटली होती.
‘जोडून दे बरं दादा जरा हे... किती घेशील?’, म्हातारीने आढळरावास विचारले.
‘चाळीस रुपये’.
‘चाळीस?... काहीपन सांगतोय... नवी घेते मी चप्पल’, म्हातारी जरा उखडली.
‘ओ आजी... चाळीस रुपयात चप्पल येते काय कधी? शंभरच्या खाली येत नाही नवीन... कुठंपन जा’.
‘एक नग तर येईल... एकंच घेईन... कोन बघतोय म्हातारीच्या पायाकडं’, म्हातारीचं लॉजिक!!
‘आजीsss, निसती एक चप्पल कुनी विकल का?... उगा वाद करतीय... जाऊ दे, आन हिकडं’, आढळरावांच्या कपाळावर एव्हाना आठ्या पडायला सुरुवात झाली होती.
‘हां... राह्यलं आता ... आला मोठा’, असे फटकारत म्हातारी तरातरा निघून गेली. म्हातारबुवा तिच्या मागून काही न बोलता चालू लागले.
‘हे असंय बघा यांचं... शिस्तीत सांगाव तर आपल्यावर ओरडतात. लई येतात असे गिऱ्हाईक... रोजचं हाय हे’.
आढळराव पुन्हा नॉर्मल झाले आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

‘मी काय म्हनत होतो... कुनी दोस्त बिस्त किंवा ओळखीतल्या मानसाला rent वर flat बीट पाहिजे आसल ना तर बिनधास्त सांगा मला... आपले हायेत contacts. लोड नाई... आनी कसंय आपलं मानुस असलं म्हंजे फिकीर नाई. पोरं-पोरी नको. family पाहिजे. कमीजास्त करता येते deal च्यावेळी... नाई का !! बिल्डींग मध्ये पोरंपोरी आसली की सगळ्यांना tension. आता ती दोन फेमस कबुतरं ठाऊक असतीलच तुम्हाला’.
मी विचारात पडलो. एकतर कोथरूडच्या भागात कबुतरं भरपूर. खिडक्यांवरच्या टीन शेड्स वर कायम वास्तव्यास असलेली. आढळराव अचानक कबुतरांच्या मागे कसे काय धावू लागले ते काही कळेना. मी म्हणालो, ‘कुठली कबुतरं?’
‘दादा, ती नाय का पार्किंग मध्ये गुलुगुलू गप्पा मारीत बसतात दिवस-रात्र... त्रास नाई होत लोकांना?...कळायला पाहिजे आपन कुठं हाओत... काय करतोय... कशाची चाड नाय. परवा तर लई खेटून उभी व्हती दोघं. काय म्हंजे पोरं आजकालची...आन तेबी काय करनार!!...सारं जगच डान्स बार झालंय’.
आढळरावांची ही गुगली समजायला मला वेळ लागला पण नंतर tube पेटली.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही दोघं college going हीर-रांझा सतत बोलत बसलेली असतात. याबद्दल आढळराव सत्य तेच सांगत होते. त्यांना हे कळलंय म्हणजे या प्रेमीयुगुलाची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली असेल ह्याचा मी अंदाज बांधित होतो. आमच्या बिल्डींग मधली लोकं कुठवर झेंडे गाडतील हे सांगणे अवघड आहे.

आढळरावांची बडबड चालूच होती... आणि चप्पल दुरुस्तीचे कामही. मध्येच काहीतरी गुणगुणणे सुरु होते. एकदम मला विचारलं, ‘माहिती हाये का हा अभंग?’
‘कुठला?...नीट ऐकू नाही आला’, मी.
“सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे... “
राजकारण, Real Estate व प्रेमप्रकरणा वरून एकदम अभंगात त्यांनी gear shift केल्यामुळे मला तात्विक धक्का बसला.
‘तुमचं चांगलं पाठांतर दिसतेय’, मी उगाच म्हणालो.
‘हां मग... वारकरी आम्ही तसे... पनजोबा पासून वारी करायची परंपरा सुरु झाली घरी... कुनी ना कुनी दरवर्षी वारी करतोच... ह्या खेपेला मोठा भाऊ गेला व्हता’.
त्यांनी म्हटलेला तो अभंग कुणाचा आहे ते मला माहित नव्हते पण काही विचार करण्याआधीच आढळरावांचे न थांबणारे विलक्षण निरुपण चालू झाले.

‘कसंय माहितीये का... संत महंत खूप काई सांगून गेलेत... आपल्याला कुठं वेळ आसतो खोलात शिरायला... डोक्यात निसते पैशाचे विचार... मी म्हनतो मानसानं नेटका प्रपंच करावा. गरजूस जमल तेवढी मदत करावी. उगा वाह्यात गोष्टींवर पैसा खर्च करन्यापेक्षा जमा करून ठेवावा... अडीअडचनीला कामी येतो मग. हाये ती जबाबदारी प्रामानिकपने पार पाडावी. कमी जास्त तर नेहमीचं असते आयुष्यात... तुकोबाराय म्हनले ना ‘मन करा रे प्रसन्न...’ लाख मोलाची गोस्ट सांगून गेले... सगळं मनाशी निगडीत हाये... देहूला गेले व्हते का कधी?’
‘नाही’, माझे उत्तर.
‘जाऊन या. अधून मधून जात राहावं अशा ठिकानी... तुम्हाला सांगतो, तो विटेवरचा बघत असतो... चुकलं-माकलं, दुखलं-खुपलं की त्याच्यावरची भक्ती शक्ती देते... आनी आपलं काम चोख पायजे... वेव्हारच्या जागी वेव्हार... लबाडी आपल्याला खपत नाई... खऱ्याची दुनिया नाय हे मान्य... जशास तसं वागायचं पन आपला पाय वाकडा नाय पडला पाहिजे, हां’.
‘बरोबर आहे’ एवढेच मी म्हणालो. (कारण ह्या दोन शब्दांमध्येच माझी dictionary संपली होती.)

‘हे घ्या... झाली चप्पल... या पावसाळ्यात तर खराब होनारच नाई’. आढळरावांनी त्यांचं काम संपवलं होतं.
मी अजूनही त्यांच्या बोधपर आणि अनपेक्षित प्रवचनातून बाहेर आलो नव्हतो. मुकाट्याने पैसे दिले आणि ‘येतो’ असं म्हणून घरी परतलो. रस्त्यावरचा एक चांभार नकळत चार महत्वाच्या गोष्टी ऐकवून गेला होता. मला तरी कुठे ठाऊक होतं की चप्पल तुटण्याचं निमित्त होऊन “प्रपंच ते परमार्थ” असा प्रवास घडेल म्हणून!!

आयुष्यात पूर्वग्रहांना स्थान देऊ नये ही एक नवी शिकवण मिळाली. 
आता रोज ऑफिस मधून परतताना कामात गर्क असलेल्या आढळरावांकडे नजर जाते. त्यांचं लक्ष असेल तर राम-राम, नमस्कार इत्यादी सोपस्कार पार पडतात. रस्त्याच्या कडेला बसून काम करणाऱ्या त्या चांभाराकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन एव्हाना ‘डोळस’ झाला आहे. पु. ल. म्हणतात ते खरं आहे – स्वतःच्या लोकप्रियतेच्या, ज्ञान-अज्ञानाच्या, प्रतिभेच्या व सामर्थ्याच्या संकल्पना कधीही धुळीस मिळू शकतात.