Monday, 23 September 2013

जिगरबाज




U.S. Open 2013 ची फायनल... रात्री अपरात्री झोप डोळ्याआड कुलुपबंद करणे आवश्यक होते... कारणही तसेच होते... नदाल vs. जोकोविक... दोघेही अप्रतिम खेळाडू... दोघेही माझे favourite, पण नदाल माझा सगळ्यात आवडता टेनिसपटू. त्या दिवशी match टाळण्याचा तर प्रश्नच नव्हता... गजर लावला होता... २ वाजता उठून TV समोर बसलो... कितीही नाही म्हटलं तरी झोपेचा अर्धवट अंमल होताच पण रंगतदार सामना पुढ्यात ठेवला असल्यावर कशाची तमा बाळगायची!!

नदाल व फेडरर टेनिस जगतात एकेकाळी most celebrated प्रतिद्वंदी म्हणून संबोधले जात असत परंतु नदाल-जोकोविक एकमेकांचे खरे arch-rivals आहेत कारण दोघांमधली ही तब्बल ३७ वी लढत होती. पुरुषांच्या टेनिस सामन्यांत कुठलेही दोन प्रतिस्पर्धी इतकेवेळा एकमेकांसमोर उभे ठाकलेले नाहीत. दोघांची लढत पाहण्यात अतीव आनंद असतो. दोघांची खासियत अशी की court चा प्रत्येक इंच ते ‘cover’ करतात, मनगटाच्या जोरावर defensive to offensive होऊ शकतात, सलग शॉट्स खेळून प्रतिस्पर्ध्याला हैराण करतात, दोघेही उत्कृष्ट athletes आहेत आणि प्रत्येक point कमावण्यासाठी जीवाचं रान करतात.
दोघांच्या ह्या rivalry बद्दल जोकोविक म्हणतो, "You just feel that there is the last drop of energy that you need to use in order to win the point. Sometimes I attempt winning those points; sometimes him. It's what we do when we play against each other, always pushing each other to the limit. That's the beauty of our matches and our rivalry."
सोमवारी (U.S. Time नुसार) एकदाचा सामना सुरु झाला. नदालची तयारी उत्तम वाटत होती. ४२ मिनिटे चाललेला पहिला सेट नदाल ने ६-२ जिंकल्यावर दुसऱ्या सेट मध्ये जोकोविकने तुफानी खेळ दाखवत ३ वेळा नदालला ‘Break’ केले. या सेट मधली ५४ शॉट्स ची Rallyडोळ्यांचे पारणे फेडून गेली. Flushing Meadows मध्ये उपस्थित असलेला प्रत्येक जण मुक्तपणे दाद आणि standing ovation देत होता. आतापावेतो माझी झोप पूर्ण उडाली होती. जोकोविक ने ४-२ अशी आघाडी घेतली होती आणि याच सेट मध्ये नदालला तिसऱ्यांदा ‘Break’ करत ५-३ पर्यंत मजल मारली. ५-३ चा आकडा ६-३ मध्ये बदलवत जोकोविकने दुसरा सेट आपल्या खिशात घातला होता. तिसऱ्या सेट मध्ये कधी नदाल तर कधी जोकोविक वरचढ ठरत होता. ३-३ असा सेट रंगात आला असताना महत्वाच्या वेळी जोकोविकने केलेले unforced errors त्याला महागात पडले. दोनदा त्याने serve drop केली. ४-४ अशी बरोबरी असताना नदालने पुढे आक्रमक खेळी केली आणि जबरदस्त चिकाटीचे प्रदर्शन करत तिसरा सेट ६-४ असा जिंकला. सामना संपल्यावर या सेट बद्दल नदाल म्हणाला “I thought to run for every point, fight for every ball and play aggressive. And that's what I did in the third set.” नदाल जोमात आला होता. चौथ्या सेट मध्ये जोकोविकला संपूर्ण हतबल करत त्याने ६-१ असा सेट जिंकला आणि U.S. Open Championship देखील... केवळ रात्री शेजारची लोकं जागी होऊ नयेत म्हणून मी आनंदाने उड्या मारणे टाळले होते. माझ्यासारख्या नदाल fan साठी तो जल्लोष करण्याचाच क्षण होता.

३ तास २१ मिनिटात नदालने सामना जिंकला होता. १३ वे Grand Slam, २ रे U.S. Open स्वतःच्या नावावर जमा केले. हे सारं अभूतपूर्व होतं. मागीलवर्षी नदाल U.S. Open ची फायनल TV समोर बघत होता. त्याच्या career वर प्रश्न चिन्ह निर्माण झाले होते. त्याच्या समस्त चाहत्यांना तो पुन्हा खेळू शकेल याची शाश्वती नव्हती. गुडघ्याच्या मोठ्या दुखापतीमूळे ७ महीने बेजार असलेल्या नदालनी या वर्षी जबरदस्त comeback केले आहे. गेली काही महीने नदाल कुठल्या दुखण्यातून जातोय आणि त्याला कुठली मानसिक अस्वस्थता जाणवत असेल ह्याचा विचारही मी करू शकत नाही. पण जिद्दीने त्याने या सर्व संकटांवर मात केलेली प्रत्ययास आले. नक्कीच खऱ्या champion ची ती लक्षणे आहेत. विम्बल्डनला पहिल्याच फेरीत बाद झाल्याचा अपवाद वगळता त्याचा या वर्षीचा रेकॉर्ड कौतुकास्पद आहे. एकूण १० Titles त्यांनी यंदा खिशात घातले आहेत. २०१३ चा त्याचा रेकॉर्ड ६०-३ असा आहे. 

या वर्षीच्या त्याच्या खेळाबद्दल नदाल म्हणतो For a few reasons this season is probably the most emotional one in my career. This is much more than I could ever have dreamed of. Looking back, all this is a bonus, because I’ve done much more than I would have expected seven months ago.  आश्चर्याची बाब म्हणजे Clay Court चा बादशाह म्हणून संबोधला जाणाऱ्या नदालने या वर्षी Hard Court वर कमाल केली आहे. २२-० असा त्याचा Hard Court वरचा रेकॉर्ड आहे. हे त्याच्या fans ला देखील अचंबित करणारे आहे. ह्या Season मध्ये, दुखापतीतून बाहेर पडल्यावर नदालने आपल्या खेळात जरा बदल केलेला जाणवला. Closer to Baseline खेळणे, Forehand चा अधिक वापर आणि one-handed backhands व त्याचे aggression केवळ अप्रतिम होते.
फायनल नंतर बोरिस बेकर आणि ७ Grand Slam विजतेपद पटकावलेला McEnroe च्या comments समर्पक होत्या.
बोरिस बेकर म्हणतो, Nadal has performed at an unbelievably consistent level throughout the year, every match he has played he’s been close to perfection.”
“I think he’s a freak of nature,” McEnroe said. “I’ve seen videos of him when he was 13 or 14 and he had the same kind of energy and attitude, the way he played then. That was the way he was and when you talk to people who have gone to Majorca, and to Juan Monaco and different guys like that who have gone to train with him, he literally goes from playing four hours of tennis and then goes to play an hour or two hours of soccer. So clearly he’s got this incredible energy and this incredible athleticism and amazing desire. Let’s hope he stays healthy because it will be great for our sport.
 वयाच्या चौथ्या वर्षापासून टेनिस खेळायला सुरुवात केल्यापासून नदालने बरेच चढ-उतार पाहिले आहेत. आठव्या वर्षी त्याने Under-12 Regional Championship जिंकली. त्यावेळी तो Football ही खेळत असे. त्याच्या काकांनी (टोनी नदाल) राफा ला छत्रछायेखाली घेऊन Training द्यायला सुरुवात केली. नदालच्या जडणघडणीत त्याच्या काकाची भूमिका महत्वपूर्ण आहे आणि नदाल हे कधीच विसरत नाही. १४ व्या वर्षी Spanish Tennis Federation ने नदालला Barcelona येथे Training चा पर्याय ठेवला होता पण नदाल व त्याच्या कुटुंबीयांनी तो साफ नाकारला. टोनी नदालचे असे म्हणणे होते की उत्तम खेळाडू व्हायला अमेरिका किंवा तत्सम मोठ्या शहरात अथवा देशात जायची गरज नाही. Passion असेल तर काहीपण साध्य करता येतं. (आजही नदाल ने त्याचे मूळ गाव सोडलेले नाही. फेडरर, मरे, जोकोविक या दिग्गजांनी अनुक्रमे दुबई, सरे आणि Monte Carlo ला आपले बस्तान हलवले आहे. नदाल हा सगळ्यात homely खेळाडू म्हणून ओळखला जातो. कुटुंबाशी जुळलेली नाळ त्याने कधी तोडली नाही. Twitter वर सतत दिसणारे त्याचे family photos कदाचित याचीच साक्ष देतात.) परिणामस्वरूप federation कडून हवी तशी आर्थिक मदत नदालला मिळाली नाही. त्याच्या वडिलांनी स्वतःच्या खिशातून पैसे खर्च केले. १५ व्या वर्षी नदाल व्यायसायिक टेनिसपटू झाला होता. १७ व्या वर्षी त्याने फेडररला पराजित करून विम्बल्डन च्या तिसऱ्या round मध्ये प्रवेश मिळवण्याचे कर्तब दाखवले. नदालचा आलेख चढता होता. २००५ साली French Open च्या सेमी-फायनल मध्ये त्याने फेडररचा पराभव करत पहिल्यांदा Grand Slam च्या फायनल मध्ये प्रवेश केला आणि मारीयानो प्युरेटाला हरवून पहिले French Open Title Grand Slam जिंकले. तेव्हापासून आतापर्यंत नदालने ८ वेळा French Open वर आपले नाव कोरले आहे. २००९ साली Australian Open, २००८ आणि २०१० साली विम्बल्डन आणि २०१०, २०१३ साली U.S. Open असे एकूण १३ Grand Slams त्याने आपल्या नावावर केले आहेत. दुखापत रहित राहिल्यास, नदालचे वय बघता आणखी काही Major Titles तो भविष्यात उंचावेल असे वाटते.

यंदाचे U.S. Open जिंकल्या जिंकल्या टेनिस विश्वात ‘नदाल फेडररचा सर्वाधिक Grand Slam चा विश्वविक्रम मोडेल का?’ ही चर्चा पुन्हा एकदा जोरात सुरु झालीये. पण नदालला ह्या आकड्यांच्या खेळाचे सोयरसुतक नाही. तो म्हणतो, The only thing I can say is what I say every time. I'm going to keep working hard. I'm going to keep doing my things to have more chances in the future to be competitive and to produce more chances to win tournaments like this one. You never know when you will win your last one.”

येणारा काळ नदाल साठी सत्वपरीक्षेचा असणार आहे.
कमी अधिक प्रमाणात होणाऱ्या दुखापती त्याच्या करियरला मारक ठरल्या आहेत. अन्यथा आज काही वेगळेच आणि आणखी दिमाखदार चित्र बघायला मिळाले असते. जरी नदालने दुखापतींना चीतपट करून प्रत्येकवेळी धडाकेबाज comeback केले असले तरी त्याची गुडघ्याची दुखापत कधीही डोकं वर काढू शकते. ते टाळण्यासाठी बोरिस बेकरने तर जाहीरपणे नदालला Grass Court वर न खेळण्याचा सल्ला दिला आहे. पाच वेळा विम्बल्डन मध्ये प्रवेश करून आणि दोनदा जिंकूनही नदाल करिता Grass Court या पुढे कायमच दुखरी नस असणार यात शंका नाही. Hard Court वरचे हे सातत्य त्याने मात्र तसेच ठेवायला हवे.  तांत्रिकदृष्ट्या हे फार अवघड असेल.

भविष्यात टेनिस मध्ये कमालीचे बदल घडलेले दिसतील.
वय वर्ष २६ असलेला जोकोविक अग्रमानांकित आहे. त्याचा खेळ उत्कृष्ट असतो. येणारा काळ तो गाजवणार यात दुमत नाही. मरे, डेल पोट्रो, वावरिंका, गास्केट, फेरर कधीही धक्कादायक निकाल नोंदवण्याची क्षमता राखतात पण राफेल नदाल हा मला टेनिस मधला सगळ्यात ‘जिगरबाज’ व mentally toughest खेळाडू वाटतो. त्याचे Fighting Spirit, Adaptability आणि Problem Solving ability चे कौतुक करावे तेवढे कमीच !! सध्याचा काळ हा टेनिस चा सुवर्णकाळ सुरु आहे आणि तो अबाधित राहण्यासाठी राफेल नदाल तंदुरुस्त राहून त्याचा सर्वोत्तम खेळ खेळणे हे गरजेचे आहे. राफा... तुला ‘सलाम’ आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!Vamos Rafa’.





Sunday, 22 September 2013

वेचलेली फुले...


(अच्युत गोडबोले यांच्या ‘मुसाफिर’ मधून... )

जीवनाच्या या प्रवासात अनेक माणसं आली-गेली तरी मी एकाकी वाटेचा वाटसरू आहे असं मला कायम वाटतं. माझी माणसं, माझं घर, माझं गाव, माझा आणि जिथे फिरलो ते देश, भोवतालचा समाज, गाणं, खाणं, पुस्तकं, लिखाण, काही निसर्गरम्य तर काही तणावपूर्ण असे प्रवास, त्यात दिसलेला निसर्ग, दाहक आणि प्रेरक, जिवंत आणि भीषण अनुभव यात मी रमलेला होतो, असतो आणि राहीन. पण तो एकटेपणा, भटकेपणा मनातून क्षणभरही जात नाही. सगळं सुरळीत चालू असलं तरी काहीतरी राहिलंय अशी अपूर्णता मन खात असते. अपार प्रेम करणारी इतकी माणसं मिळूनही आयुष्यात एकटेपणा जाणवत राहतो.

अशा नैराश्याच्या दाट काळोखाच्या परिस्थितीत कुठूनतरी आशेचा किरण चमकतो आणि मग पुन्हा जगण्याची उमेद येतेच. जगात अंधारून काळवंडून जाण्यासारखं खूप काही असलं तरी जगण्यासारखंही खूप काही आहे...
मग मी कुठेतरी प्रवासाला निघतो... प्रवासात एखादा व्याकूळ करणारा निळासावळा ढग दिसतो. मेघदूत आठवतं... धारानृत्य पाहताना मन हरपतं... डोंगरकड्यावरून स्वच्छंद पणे खळाळते धबधबे दिसतात... कधी कधी रंगांची उधळण करणारं इंद्रधनुष्य दिसतं... रानात इवली इवली मोहक रंगाची फुलं दिसतात... या सगळ्यात मी अगदी हरवून जातो.
कधी समुद्रावर गेलो तर उचंबळणाऱ्या लाटांचा आवेग पाहून त्या भिरभिरत्या हवेत सामावून जातो. समुद्राचं तर मला विलक्षण आकर्षण आहे. आयुष्यातल्या अनेक घडामोडी, गतस्मृती समुद्राकडे पाहताना आठवतात. विशेषतः आकाशात सावळे ढग असताना तर काहीशा गूढ, हुरहूर लावणाऱ्या आसमंतात समुद्र तुमच्याशी खूप काही बोलत असतो. लाटा पायाशी येऊन हितगुज करीत असतात. आणि आपल्याला पडलेले प्रश्न समुद्राकडे पाहून शुल्लक वाटायला लागतात. समुद्राकडे पाहिलं की या विश्वाच्या अगाधतेचं मला दर्शन होतं.

कधी कधी मन जरा संदिग्ध किंवा एकाकी असलं की माझ्या असंख्य आवडत्या गायक-वादाकांपैकी एखाद्याने घेतलेली लकेर किंवा वाद्याचा एखादा झंकार नव्यानं मनात उमटतो आणि ओठांवर अलगदपणे वाहवा येतं...

कधी एखादं जुनं परिचित पुस्तक नव्याने भेटतं... काही लोकांचे लेख वाचले, त्यांचं कार्य पाहिलं तर खरोखर मला दिलासा मिळतो... अशी लोकं आणि अशा चळवळी आहेत ज्या प्रस्थापितांनी दुर्लक्षित वा बदनाम करूनही खंबीरपणे तंबू ठोकून तळागाळातल्या लोकांच्या बाजूने उभे आहेत असं मी जेव्हा बघतो तेव्हा मनात आशा पल्लवित होते... काळोखात काही प्रकाशशलाका दिसतात... पाडगावकर म्हणतात तसं, प्रकाशाचे गाणे अवसेच्या रात्री गाणारा मी एक आनंदयात्री बनून जातो !

Friday, 16 August 2013

Celebrating Gulzar…



गुलज़ार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त...(१८ ऑगस्ट)


“जलते-बुझते, उगते-मुरझाते, सूखे-भीगे, सहलाते-चुभते अल्फ़ाज़
और साथ में आवाज़ की एक बूँद... या फिर बौछार...
सीने में अटकी नज़्म
होटों पे अटके मिसरे
आँखों के तले जलता सपना
आईने पर छपा हुआ चेहरा
चेहरे की नीचे कितनी कहानियाँ
गहरी ख़राशें... और गहरी निशानियाँ

फ़लक पे लटका हुआ चाँद 
चाँदनी से तोड़े हुए नूर के धागे
उफ़ुक से खडखडाता हुआ निकला सूरज
जमीं से फुटा दरिया
साहिल पे डूबा हुआ ख़ाली समंदर
आसमाँ का खुला कैनवस
सर पे चिल्लाती धूप
और घर की काँच के खिड़कियों पर संदेसे लिखने वाली बारिश...

वादियों में गूँजती हुई ख़ामोशी
हवाओं पे लिखा हुआ पैगाम
उड़ते पैरों के तले बहती जमीं
पानी से लिखा ख़ामोश सा अफ़साना
बर्फ से खेलते बादल
सनसेट के कच्चे रंग
धुंदलाई, अलसायी हुई शाम
और बहारों में मिलते पिछले मौसम के निशाँ...

किसीके बातों में किमाम की खुशबू
किसीके पैरों के कँवल
किसीके कमर के बल पर मुड़ी नदी
किसीकी मद्धम मद्धम गीली हसीं
किसीके जिगर से जलाई हुई बीडी
किसीके ‘कारे कारे कजरारे नैन’
माथे पर लगी हुई किसीके होटों की मोहर
और किसीके गालों पे पड़े हुए भँवर...

उड़ते उड़ते अँखियों के पेंच
ख़ाली सीने में बजती हुई साँस
ख़ता करने वाला पुराना ‘पापी’ इश्क
कलियों के बंद होटों पर बरसी हुई शबनम
इश्क पे पहनाया हुआ दिल का वो लिबास
दो नैना और वो एक कहानी
मुस्कुराने के वो कर्ज़
और ख़ाली हाथ आयी हुई शाम...

कभी ‘चाँद की उतारी हुई बालियाँ’
तो कहीं ‘एक सौ सोला चाँद की वो रातें’
वो ‘मेरा कुछ सामान’
मीलों से छोड़े हुए दिन
तकिये पे कभी कभी मिलने वाली रात
वो काँच के ख़्वाब
वक़्त की लम्बी जम्हाई
और रात को सुनाई हुई फिर उसी नींद की कहानी...

कतरा कतरा मिलने वाली ज़िन्दगी
दरिया तले ख्वाबों भरी ज़िन्दगी
धूप छाँव में बुनी हुई ज़िन्दगी
लम्बा सफ़र तय कर चुकी ज़िन्दगी
और सुस्त क़दम रस्तों से उम्र से लम्बी सड़कों पर चलती-दौड़ती ज़िन्दगी
मिल जाएं गर कहीं...
तो बेशक आपकी जिंदगी ‘गुलज़ार’ है |”



|| _/\_ || जन्मदिन मुबारक हो गुलज़ार साहब || _/\_ ||

Tuesday, 23 July 2013

चांभार चौकशी

मॉन्सूनच्या काळात शहरामध्ये ‘पावसाच्या थेंबओल्या खुणा’ शोधायचा माझा (साहित्यिक) प्रयत्न बरेचदा फसला आहे. हा नाद मी आता सोडून दिला आहे. ‘सकाळी ऑफिसला जाताना पाऊस असेल का?’, ‘परत येताना traffic jam मुळे घरी जायला आज किती उशीर होणार?’, ‘weekend पावसाच्या पाण्यात वाहून तर नाही जाणार?’, ‘पावसामुळे आवश्यक ती कामं अपूर्ण तर नाही ना राहणार?’, ‘बाहेरचं काही खाल्याने पोट तर नाही ना बिघडणार?’ असले (अरसिक) प्रश्न आणि शंका कितीही नाही म्हटलं तरी मनात डोकावतातच! ‘पाऊस कधीचा पडतो...झाडांची हलती पाने’ अशी कविवर्य ग्रेस ह्यांची एक सुंदर कविता आहे. आजकाल पावसाची सतत सुरु असलेली रिपरिप बघता, ‘कधीचा पाऊस पडतो’ असे कंटाळून म्हणावेसे वाटते... परंतु याला इलाज नाही. तद्दन शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनोविश्वाचं हे पावसाळी प्रतिबिंब आहे. सुरुवातीच्या काळातला मृद्गंध श्वासात भरून घेणे, निळ्या नभात ढगांची चादर ओढली जाताना बघणे आणि फार फारतर weekend ला बाहेर पाऊस पडत असताना, कॉफीच्या झुरक्यासोबत ‘मल्हारातली’ प्रथितयश गायकाची एखादी बंदिश ऐकणे; एवढीच काय ती शहरातल्या पावसाळी सुखाची अनुभूती! इतरवेळी पाऊस म्हणजे अडथळाच! आणि या दिवसांत मला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटत असेल तर ती म्हणजे रस्त्यावर चालत असताना नेमकी चप्पल तुटणे किंवा हवेचा जोर सहन न झाल्याने छत्रीने स्वतःचा आकार बिघडवून घेणे. एकवेळ रेनकोट घरी विसरल्यामुळे भिजलेलं परवडेल पण नको त्या ठिकाणी, अवेळी चप्पल आणि छत्रीने दगा देणे मला नाकबूल आहे. हे प्रसंग ओढवले म्हणजे चेहरा खाड्कन उतरतो !!

मागच्या आठवड्यात चपलेनी धोका दिला. नशीब मी घराजवळ हिंडत होतो त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक चांभार बसतो. दोन छोटे बांबू आणि कम्पौंड च्या सहाय्याने त्यांना बांधलेला प्लास्टिकचा पत्रा एवढाच काय तो त्याचा जामानिमा. चपला-जोडे दुरुस्त करावयास लागणाऱ्या साहित्याची portable पेटी वेगळी. आतापावेतो चप्पल तुटण्याचा प्रसंग घराशेजारी न आल्याने त्या चांभाराच्या वाटेला जायची वेळ अद्याप आली नव्हती. तसेही माझ्या राशी-स्वभावानुसार मी आसपासचे दुकानदार, वाणी, मेडिकलवाला, भाजीवाला, धोबी ह्यांच्याशी गरजेपेक्षा जास्त संवाद साधल्याचे मला स्मरत नाही. चांभाराशी उगाच बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर समोरच्या दुकानदाराचे ‘नुकतेच’ लग्न कधी झाले आणि त्याच्या अनुपस्थितीत दुकान सांभाळणारी त्याची बायको गळ्यात कुठले दागिने घालते ह्याची देखील माहिती असते. ह्यांना दुसऱ्यांच्या बायकांमध्ये फारच इंटरेस्ट. घोर कलियुग!! माणसाची नजर कशावर खिळेल ह्याचा नेम नसतो. आमच्या सोसायटीतल्या त्या व्यक्तीही ‘दिव्य’ आहेत!!

तर त्यादिवशी एकदाचा पाय फरफटत कसाबसा त्या चांभारापाशी पोहोचलो. तो कामात गुंग होता. मान वर करून पाहायला त्याने मोजून एक मिनिट लावला. मी रीतसर चप्पल सोपवली.
‘वेळ लागंल भाऊ’ असं सांगून तो गप्प झाला. किती ते सांगितलंच नाही.
मी विचारलं ‘किती वेळ?’
‘अर्धा पाउन तास’, तो उत्तरला.
‘कुठं राहता?’, त्याचा लगेच प्रश्न.
‘इथेच... पाठीमागच्या बिल्डींगमध्ये’, मी.
‘या जाऊन निवांत’, तो म्हणाला.
‘असू द्या... थांबतो’, माझे उत्तर.

घर मागेच असूनही चिखल तुडवत अनवाणी जायची माझी काही इच्छा झाली नाही. बिना चपलेचं फिरणं जीवावर आलं होतं. इतका वेळ आता करायचं काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. तिथेच उभं राहून timepass करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. खिशातून मोबाईल काढून twitter चे updates आणि whatsapp चे मेसेजेस चेक करावे असा विचार मनात आलाच होता की एका (“भाऊ, तुमच्यासाठी कायपन” छाप) दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवून, गाडी थांबवत त्या चांभाराला हाक मारली.
‘ओ आढळराव, जमलं काय?’
‘सगळं जमते आण्णा... हे घ्या’ असे म्हणत त्याने polish लाऊन चकचकीत केलेले जोडे त्याच्या स्वाधीन केले आणि कामाचे पैसे घेतले. दुचाकीस्वार भर्रकन निघूनही गेला. चांभाराचे नाव आढळराव असल्याचे समजले. मग आढळरावांनी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली.
‘हा आपल्या नगरसेवकाचा बारका भाऊ... गाडी हाकत फिरत आसतो गावभर... काम ना धंदा... हे राजकारनी लोग सगळे एक जात... गळ्यात चैनी घालून फिरायचं नुसतं... स्वतःचं थोबाड बेकार असूनही पोस्टर चढवतात... काय म्हनावं आता!! आन मला तर वाटते ह्यांच्या घरात एवढा पैसा असेल का ही लोकं आंगनात झोपत असतील’, असं म्हणून ते जोरात हसायला लागले.

पुढचा प्रश्न मला उद्देशून होता.
‘कधीपासून राहता दादा इथं?’
‘झाले ४ वर्षं या एरियात’
‘हितले बरेच गिऱ्हाईक हायेत आपल्याकडं... सगळे हिकडं येतात... आपलं कामंच हाय तसं... थोडीशिबी चूक व्हत नाय... आन आपल्याला आख्खी माहिती हाये इथली... आत्ताच तुमच्या समोरच्या बिल्डींग मधला flat गेला... ऐंशी लाख... रेट तर आसले भिडलेत ना सध्या आभायाला... काई विचारू नका... तुमचं घर स्वतःचं की भाड्याचं?’
'भाड्याचं आहे... पण shift होऊ काही महिन्यात सिंहगड रोडला', मी पुस्ती जोडली.
'तिकडं घेतला काय flat?... तसा तो एरिया शहरातच आलाय आता... एकेकाळी जंगल व्हतं... आता पुन्यात मानसंच येवढी वाढतायेत भसाभसा... त्याला कोन काय करनार. हितं जमवायला पाहिजे व्हतं... C विंग मध्ये होता ना flat एक... ४५ लाखात गेला फक्त... मालक पंजाबी होता... रग्गड पैसा... अर्जंट मध्ये विकायचं होतं घर... हातोहात गेला flat तीन दिवसांत... तुमची चप्पल तेव्हा तुटली असती तर पत्ता लागला असता याचा माझ्याकडून... सौदा पक्का झाला असता... कोथरूडला ४५ लाख... कोन सोडते!... डोळे झाकून घ्यायचा item होता न राव'.
योग्य वेळी चप्पल तुटायला देखील भाग्य लागतं हे मला कळून चुकलंय.

‘तुम्ही कुठे राहता?’, मी विचारले.
‘पाच मिनिटांवर... सुतारदरा... म्हनून तर सगळी माहिती असते आपल्याला.’
आढळराव तसे सुदृढ. पावणे-सहा फुट उंची असावी. भरघोस मिशी. बसके नाक. कपाळावर हलक्या हाताने काढलेले उभे गंध. हातात तांब्याचे कडे. कुर्ता, पायजमा आणि टाळ मृदंगाने नटविल्यास थेट वारकरी शोभेल असे व्यक्तिमत्व. वय जवळपास पंचेचाळीस असावे. थोडक्यात, रेखाटनासाठी उत्तम caricature material !! माझ्या डोक्यात रेखाचित्रांची जुळवा-जुळव सुरु असताना गावठी वळणाचे म्हातारबुवा आणि एक म्हातारी तिथे अवतरले. मी भानावर आलो. त्या म्हातारीची चप्पल तुटली होती.
‘जोडून दे बरं दादा जरा हे... किती घेशील?’, म्हातारीने आढळरावास विचारले.
‘चाळीस रुपये’.
‘चाळीस?... काहीपन सांगतोय... नवी घेते मी चप्पल’, म्हातारी जरा उखडली.
‘ओ आजी... चाळीस रुपयात चप्पल येते काय कधी? शंभरच्या खाली येत नाही नवीन... कुठंपन जा’.
‘एक नग तर येईल... एकंच घेईन... कोन बघतोय म्हातारीच्या पायाकडं’, म्हातारीचं लॉजिक!!
‘आजीsss, निसती एक चप्पल कुनी विकल का?... उगा वाद करतीय... जाऊ दे, आन हिकडं’, आढळरावांच्या कपाळावर एव्हाना आठ्या पडायला सुरुवात झाली होती.
‘हां... राह्यलं आता ... आला मोठा’, असे फटकारत म्हातारी तरातरा निघून गेली. म्हातारबुवा तिच्या मागून काही न बोलता चालू लागले.
‘हे असंय बघा यांचं... शिस्तीत सांगाव तर आपल्यावर ओरडतात. लई येतात असे गिऱ्हाईक... रोजचं हाय हे’.
आढळराव पुन्हा नॉर्मल झाले आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

‘मी काय म्हनत होतो... कुनी दोस्त बिस्त किंवा ओळखीतल्या मानसाला rent वर flat बीट पाहिजे आसल ना तर बिनधास्त सांगा मला... आपले हायेत contacts. लोड नाई... आनी कसंय आपलं मानुस असलं म्हंजे फिकीर नाई. पोरं-पोरी नको. family पाहिजे. कमीजास्त करता येते deal च्यावेळी... नाई का !! बिल्डींग मध्ये पोरंपोरी आसली की सगळ्यांना tension. आता ती दोन फेमस कबुतरं ठाऊक असतीलच तुम्हाला’.
मी विचारात पडलो. एकतर कोथरूडच्या भागात कबुतरं भरपूर. खिडक्यांवरच्या टीन शेड्स वर कायम वास्तव्यास असलेली. आढळराव अचानक कबुतरांच्या मागे कसे काय धावू लागले ते काही कळेना. मी म्हणालो, ‘कुठली कबुतरं?’
‘दादा, ती नाय का पार्किंग मध्ये गुलुगुलू गप्पा मारीत बसतात दिवस-रात्र... त्रास नाई होत लोकांना?...कळायला पाहिजे आपन कुठं हाओत... काय करतोय... कशाची चाड नाय. परवा तर लई खेटून उभी व्हती दोघं. काय म्हंजे पोरं आजकालची...आन तेबी काय करनार!!...सारं जगच डान्स बार झालंय’.
आढळरावांची ही गुगली समजायला मला वेळ लागला पण नंतर tube पेटली.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही दोघं college going हीर-रांझा सतत बोलत बसलेली असतात. याबद्दल आढळराव सत्य तेच सांगत होते. त्यांना हे कळलंय म्हणजे या प्रेमीयुगुलाची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली असेल ह्याचा मी अंदाज बांधित होतो. आमच्या बिल्डींग मधली लोकं कुठवर झेंडे गाडतील हे सांगणे अवघड आहे.

आढळरावांची बडबड चालूच होती... आणि चप्पल दुरुस्तीचे कामही. मध्येच काहीतरी गुणगुणणे सुरु होते. एकदम मला विचारलं, ‘माहिती हाये का हा अभंग?’
‘कुठला?...नीट ऐकू नाही आला’, मी.
“सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे... “
राजकारण, Real Estate व प्रेमप्रकरणा वरून एकदम अभंगात त्यांनी gear shift केल्यामुळे मला तात्विक धक्का बसला.
‘तुमचं चांगलं पाठांतर दिसतेय’, मी उगाच म्हणालो.
‘हां मग... वारकरी आम्ही तसे... पनजोबा पासून वारी करायची परंपरा सुरु झाली घरी... कुनी ना कुनी दरवर्षी वारी करतोच... ह्या खेपेला मोठा भाऊ गेला व्हता’.
त्यांनी म्हटलेला तो अभंग कुणाचा आहे ते मला माहित नव्हते पण काही विचार करण्याआधीच आढळरावांचे न थांबणारे विलक्षण निरुपण चालू झाले.

‘कसंय माहितीये का... संत महंत खूप काई सांगून गेलेत... आपल्याला कुठं वेळ आसतो खोलात शिरायला... डोक्यात निसते पैशाचे विचार... मी म्हनतो मानसानं नेटका प्रपंच करावा. गरजूस जमल तेवढी मदत करावी. उगा वाह्यात गोष्टींवर पैसा खर्च करन्यापेक्षा जमा करून ठेवावा... अडीअडचनीला कामी येतो मग. हाये ती जबाबदारी प्रामानिकपने पार पाडावी. कमी जास्त तर नेहमीचं असते आयुष्यात... तुकोबाराय म्हनले ना ‘मन करा रे प्रसन्न...’ लाख मोलाची गोस्ट सांगून गेले... सगळं मनाशी निगडीत हाये... देहूला गेले व्हते का कधी?’
‘नाही’, माझे उत्तर.
‘जाऊन या. अधून मधून जात राहावं अशा ठिकानी... तुम्हाला सांगतो, तो विटेवरचा बघत असतो... चुकलं-माकलं, दुखलं-खुपलं की त्याच्यावरची भक्ती शक्ती देते... आनी आपलं काम चोख पायजे... वेव्हारच्या जागी वेव्हार... लबाडी आपल्याला खपत नाई... खऱ्याची दुनिया नाय हे मान्य... जशास तसं वागायचं पन आपला पाय वाकडा नाय पडला पाहिजे, हां’.
‘बरोबर आहे’ एवढेच मी म्हणालो. (कारण ह्या दोन शब्दांमध्येच माझी dictionary संपली होती.)

‘हे घ्या... झाली चप्पल... या पावसाळ्यात तर खराब होनारच नाई’. आढळरावांनी त्यांचं काम संपवलं होतं.
मी अजूनही त्यांच्या बोधपर आणि अनपेक्षित प्रवचनातून बाहेर आलो नव्हतो. मुकाट्याने पैसे दिले आणि ‘येतो’ असं म्हणून घरी परतलो. रस्त्यावरचा एक चांभार नकळत चार महत्वाच्या गोष्टी ऐकवून गेला होता. मला तरी कुठे ठाऊक होतं की चप्पल तुटण्याचं निमित्त होऊन “प्रपंच ते परमार्थ” असा प्रवास घडेल म्हणून!!

आयुष्यात पूर्वग्रहांना स्थान देऊ नये ही एक नवी शिकवण मिळाली. 
आता रोज ऑफिस मधून परतताना कामात गर्क असलेल्या आढळरावांकडे नजर जाते. त्यांचं लक्ष असेल तर राम-राम, नमस्कार इत्यादी सोपस्कार पार पडतात. रस्त्याच्या कडेला बसून काम करणाऱ्या त्या चांभाराकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन एव्हाना डोळसझाला आहे. पु. ल. म्हणतात ते खरं आहे स्वतःच्या लोकप्रियतेच्या, ज्ञान-अज्ञानाच्या, प्रतिभेच्या व सामर्थ्याच्या संकल्पना कधीही धुळीस मिळू शकतात.


 

Tuesday, 18 June 2013

'इमेजेस'... पावसाच्या.


मे महिना... शेवटचे ‘पर्व’.
नको नकोसे वाटणारे... कंटाळवाणे, रणरणते ऊन.
न संपणारे...
कधी नव्हे ते हवामानखात्याकडे लक्ष...
कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याच्या बातम्या...
अंदमानात ‘त्याने’ दिलेली वर्दी...
आणि थोड्याच दिवसांत त्याचा केरळात ‘गृहप्रवेश’.
प्रतीक्षा... प्रतीक्षा...
अंतहीन...

निळ्याशार नभात काळ्या-सावळ्या ढगांची गर्दी.
वळवाच्या सरी...
मातीमधला सुगंध... कुठल्याही अत्तर-कुपीत बंदिस्त न ठेवता येण्याजोगा...
चर्चा... त्याचीच...
सर्वत्र...
गावात, शेतात, पारावर, पाणवठ्यावर, शहरात, मैदानात, गल्ली-बोळांत, ऑफिस मध्ये, घराघरात...
डोंगरदऱ्यात... रानावनात देखील...
पेपरात फ्रंट पेजवर त्याने ‘रिझर्व’ केलेली जागा...
ट्रेलर... प्रोमो...
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...

अखेर त्याचे आगमन...
कोकणात जोरदार सलामी... दणकून !!
राज्यात त्याचा पहिला पाडाव...
तळकोकणात ‘तळ’ ठोकून गरज-बरस बरसणार ‘तो’...
साक्षात ‘मेघमल्हार’ !!

‘पश्चिम घाट’... त्याचा जिवलग मित्र...
तो तिथे ‘कोसळतो’...
बेभान... स्वैर... मुक्त.
अविरत वाहणारे धबधबे... बाळसं धरतात...
प्रारंभ... सृजन... नाविन्याचं.
सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्या... ‘शिवकल्याण’ राजाचे ऐतिहासिक वैभव... सगळं सगळं तृप्त !!

पुढचा टप्पा... शहर.
मुंबई, पुणे, औरंगाबाद...
नंतर मुक्काम-पोस्ट नागपूर... ढोबळमानाने... त्याचा हा ‘प्रवास’...
प्रत्येक शहरात...
ढगांची आदळ-आपट... विजांचा लखलखाट...
रस्त्यावर पाणीच पाणी...
ओढे, नाले आणि गटारं तुडुंब...
डबकी...
चिखल...
बंद सिग्नल्स... traffic jam...
Electricity गायब...
उन्मळून पडलेल्या फांद्या... अस्ताव्यस्त तारा...
लोकांची तारांबळ...
bus stop, स्टेशनवर चिक्कार गर्दी...
सर्दी, पडसं, रोगराई...
वैताग...
पण सुख देखील.
रेनकोट... छत्र्या...
कणीस... ओले शेंगदाणे...
फुललेले कट्टे... कटींग ... गरम भजी...
शाळा... कॉलेजेस... नव्याने उघडलेले...
तरुण-तरुणी... चिंब भिजलेले... एकत्र... मुद्दाम... सहवास... वगैरे.. वगैरे...
सहल... मुळशी, माळशेज... तत्सम...
ट्रेकिंग...
मौज.

आषाढ चे अवतरण...
गजर हरिनामाचा... पालखी... एकादशी...
वैष्णवांचा मेळा... दिंड्या पताका नाचती...
काया पंढरी... आत्मा विठ्ठल.
श्रद्धा, भाव पांडुरंग चरणी...
मग श्रावण, भाद्रपद...
मंगळागौरी... जन्माष्टमी... गणेशोत्सव... इत्यादी... इत्यादी... अनेक सणवार...
उत्साह... आनंद...

मी... कुठे?
कोकणांत... (Subconsciously)
जुन्या घराच्या माडीवर... खिडकीपाशी...
बाहेर ‘तो’...
न थांबणारा...
हिरवीगार सृष्टी...
इच्छा... हे सगळं कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची.

मी...
कोकणात... (Subconsciously)
जुन्या घराच्या पडवीत... निवांत
बाहेर ‘तो’...
कौलारू छपरावरून निथळणारा...
सुख...
अनुभूती... गात्रागात्रांत !!

मी... कुठे?
त्याच घरात...
आजीच्या कुशीत...
आजीच्या तोंडून विविध कथांची मेजवानी...
भुताखेतांच्या... जिवंत माणसांच्या... देवादिकांच्या कथा... दंतकथा...
आजीबाईंचा अनमोल बटवाच जणू...
जेवणात चवीला कुरड्या-पापड्या-लोणची... घरगुती.
सोलकढी, उकडीचे मोदक...
सुख...
अपार...

मी...
घरात...
डोळे मिटून स्वस्थ पहुडलेला...
बाहेर... त्याचा ‘आवाज’...
सोबतीला... उस्ताद राशीद खान यांचे ‘गरजे घटा’...
स्वराभिषेक...
Background Score !!
सुख...
अद्भुत...

मी... कुठे?
ओल्या, शेवाळाने सजलेल्या पुरातन शिवालयात...
मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या गाभाऱ्यात...
शिवपिंडी समोर...
ध्यानस्थ...
सुख...
सत् चित् आनंद.

मी...
उधाणलेल्या समुद्रकिनारी...
क्षितिजावर दृश्यमान...
घसरलेल्या काळ्याकुट्ट महाकाय ढगांचा समूह...
माझ्या सोबतीला... ‘गुलजार’ ची कविता...
‘बारीश’...
किंवा ‘किसी मौसम का झोंका’...
सुख... पुन्हा...
शब्दांकित.

पण ‘तो’ म्हणजे ...कोण?
पाऊस... (अर्थातच)
उगाच एक विचार...
अधिक जवळचा कुठला?
खराखुरा... की अंतर्मनातला?... ठाऊक नाही...
पण नेत्रांतला... नक्कीच...
कधी आटणारा... कधी प्रवाहित होणारा...
तर कधी शांत... स्थिर... आणि निश्चल.

मी... आणि पाऊस...
असेच...
एकमेकांत गुंतलेले...

कायमचे.