Tuesday, 23 July 2013

चांभार चौकशी

मॉन्सूनच्या काळात शहरामध्ये ‘पावसाच्या थेंबओल्या खुणा’ शोधायचा माझा (साहित्यिक) प्रयत्न बरेचदा फसला आहे. हा नाद मी आता सोडून दिला आहे. ‘सकाळी ऑफिसला जाताना पाऊस असेल का?’, ‘परत येताना traffic jam मुळे घरी जायला आज किती उशीर होणार?’, ‘weekend पावसाच्या पाण्यात वाहून तर नाही जाणार?’, ‘पावसामुळे आवश्यक ती कामं अपूर्ण तर नाही ना राहणार?’, ‘बाहेरचं काही खाल्याने पोट तर नाही ना बिघडणार?’ असले (अरसिक) प्रश्न आणि शंका कितीही नाही म्हटलं तरी मनात डोकावतातच! ‘पाऊस कधीचा पडतो...झाडांची हलती पाने’ अशी कविवर्य ग्रेस ह्यांची एक सुंदर कविता आहे. आजकाल पावसाची सतत सुरु असलेली रिपरिप बघता, ‘कधीचा पाऊस पडतो’ असे कंटाळून म्हणावेसे वाटते... परंतु याला इलाज नाही. तद्दन शहरी संस्कृतीत वाढलेल्या मनोविश्वाचं हे पावसाळी प्रतिबिंब आहे. सुरुवातीच्या काळातला मृद्गंध श्वासात भरून घेणे, निळ्या नभात ढगांची चादर ओढली जाताना बघणे आणि फार फारतर weekend ला बाहेर पाऊस पडत असताना, कॉफीच्या झुरक्यासोबत ‘मल्हारातली’ प्रथितयश गायकाची एखादी बंदिश ऐकणे; एवढीच काय ती शहरातल्या पावसाळी सुखाची अनुभूती! इतरवेळी पाऊस म्हणजे अडथळाच! आणि या दिवसांत मला सगळ्यात जास्त भीती कुठल्या गोष्टीची वाटत असेल तर ती म्हणजे रस्त्यावर चालत असताना नेमकी चप्पल तुटणे किंवा हवेचा जोर सहन न झाल्याने छत्रीने स्वतःचा आकार बिघडवून घेणे. एकवेळ रेनकोट घरी विसरल्यामुळे भिजलेलं परवडेल पण नको त्या ठिकाणी, अवेळी चप्पल आणि छत्रीने दगा देणे मला नाकबूल आहे. हे प्रसंग ओढवले म्हणजे चेहरा खाड्कन उतरतो !!

मागच्या आठवड्यात चपलेनी धोका दिला. नशीब मी घराजवळ हिंडत होतो त्यामुळे जास्त त्रास झाला नाही. आमच्या सोसायटीच्या बाजूलाच एक चांभार बसतो. दोन छोटे बांबू आणि कम्पौंड च्या सहाय्याने त्यांना बांधलेला प्लास्टिकचा पत्रा एवढाच काय तो त्याचा जामानिमा. चपला-जोडे दुरुस्त करावयास लागणाऱ्या साहित्याची portable पेटी वेगळी. आतापावेतो चप्पल तुटण्याचा प्रसंग घराशेजारी न आल्याने त्या चांभाराच्या वाटेला जायची वेळ अद्याप आली नव्हती. तसेही माझ्या राशी-स्वभावानुसार मी आसपासचे दुकानदार, वाणी, मेडिकलवाला, भाजीवाला, धोबी ह्यांच्याशी गरजेपेक्षा जास्त संवाद साधल्याचे मला स्मरत नाही. चांभाराशी उगाच बोलण्याचा तर प्रश्नच नव्हता. आमच्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर समोरच्या दुकानदाराचे ‘नुकतेच’ लग्न कधी झाले आणि त्याच्या अनुपस्थितीत दुकान सांभाळणारी त्याची बायको गळ्यात कुठले दागिने घालते ह्याची देखील माहिती असते. ह्यांना दुसऱ्यांच्या बायकांमध्ये फारच इंटरेस्ट. घोर कलियुग!! माणसाची नजर कशावर खिळेल ह्याचा नेम नसतो. आमच्या सोसायटीतल्या त्या व्यक्तीही ‘दिव्य’ आहेत!!

तर त्यादिवशी एकदाचा पाय फरफटत कसाबसा त्या चांभारापाशी पोहोचलो. तो कामात गुंग होता. मान वर करून पाहायला त्याने मोजून एक मिनिट लावला. मी रीतसर चप्पल सोपवली.
‘वेळ लागंल भाऊ’ असं सांगून तो गप्प झाला. किती ते सांगितलंच नाही.
मी विचारलं ‘किती वेळ?’
‘अर्धा पाउन तास’, तो उत्तरला.
‘कुठं राहता?’, त्याचा लगेच प्रश्न.
‘इथेच... पाठीमागच्या बिल्डींगमध्ये’, मी.
‘या जाऊन निवांत’, तो म्हणाला.
‘असू द्या... थांबतो’, माझे उत्तर.

घर मागेच असूनही चिखल तुडवत अनवाणी जायची माझी काही इच्छा झाली नाही. बिना चपलेचं फिरणं जीवावर आलं होतं. इतका वेळ आता करायचं काय असा प्रश्न समोर उभा ठाकला. तिथेच उभं राहून timepass करण्यापलीकडे दुसरा पर्याय नव्हता. खिशातून मोबाईल काढून twitter चे updates आणि whatsapp चे मेसेजेस चेक करावे असा विचार मनात आलाच होता की एका (“भाऊ, तुमच्यासाठी कायपन” छाप) दुचाकीस्वाराने हॉर्न वाजवून, गाडी थांबवत त्या चांभाराला हाक मारली.
‘ओ आढळराव, जमलं काय?’
‘सगळं जमते आण्णा... हे घ्या’ असे म्हणत त्याने polish लाऊन चकचकीत केलेले जोडे त्याच्या स्वाधीन केले आणि कामाचे पैसे घेतले. दुचाकीस्वार भर्रकन निघूनही गेला. चांभाराचे नाव आढळराव असल्याचे समजले. मग आढळरावांनी स्वतःहूनच बोलायला सुरुवात केली.
‘हा आपल्या नगरसेवकाचा बारका भाऊ... गाडी हाकत फिरत आसतो गावभर... काम ना धंदा... हे राजकारनी लोग सगळे एक जात... गळ्यात चैनी घालून फिरायचं नुसतं... स्वतःचं थोबाड बेकार असूनही पोस्टर चढवतात... काय म्हनावं आता!! आन मला तर वाटते ह्यांच्या घरात एवढा पैसा असेल का ही लोकं आंगनात झोपत असतील’, असं म्हणून ते जोरात हसायला लागले.

पुढचा प्रश्न मला उद्देशून होता.
‘कधीपासून राहता दादा इथं?’
‘झाले ४ वर्षं या एरियात’
‘हितले बरेच गिऱ्हाईक हायेत आपल्याकडं... सगळे हिकडं येतात... आपलं कामंच हाय तसं... थोडीशिबी चूक व्हत नाय... आन आपल्याला आख्खी माहिती हाये इथली... आत्ताच तुमच्या समोरच्या बिल्डींग मधला flat गेला... ऐंशी लाख... रेट तर आसले भिडलेत ना सध्या आभायाला... काई विचारू नका... तुमचं घर स्वतःचं की भाड्याचं?’
'भाड्याचं आहे... पण shift होऊ काही महिन्यात सिंहगड रोडला', मी पुस्ती जोडली.
'तिकडं घेतला काय flat?... तसा तो एरिया शहरातच आलाय आता... एकेकाळी जंगल व्हतं... आता पुन्यात मानसंच येवढी वाढतायेत भसाभसा... त्याला कोन काय करनार. हितं जमवायला पाहिजे व्हतं... C विंग मध्ये होता ना flat एक... ४५ लाखात गेला फक्त... मालक पंजाबी होता... रग्गड पैसा... अर्जंट मध्ये विकायचं होतं घर... हातोहात गेला flat तीन दिवसांत... तुमची चप्पल तेव्हा तुटली असती तर पत्ता लागला असता याचा माझ्याकडून... सौदा पक्का झाला असता... कोथरूडला ४५ लाख... कोन सोडते!... डोळे झाकून घ्यायचा item होता न राव'.
योग्य वेळी चप्पल तुटायला देखील भाग्य लागतं हे मला कळून चुकलंय.

‘तुम्ही कुठे राहता?’, मी विचारले.
‘पाच मिनिटांवर... सुतारदरा... म्हनून तर सगळी माहिती असते आपल्याला.’
आढळराव तसे सुदृढ. पावणे-सहा फुट उंची असावी. भरघोस मिशी. बसके नाक. कपाळावर हलक्या हाताने काढलेले उभे गंध. हातात तांब्याचे कडे. कुर्ता, पायजमा आणि टाळ मृदंगाने नटविल्यास थेट वारकरी शोभेल असे व्यक्तिमत्व. वय जवळपास पंचेचाळीस असावे. थोडक्यात, रेखाटनासाठी उत्तम caricature material !! माझ्या डोक्यात रेखाचित्रांची जुळवा-जुळव सुरु असताना गावठी वळणाचे म्हातारबुवा आणि एक म्हातारी तिथे अवतरले. मी भानावर आलो. त्या म्हातारीची चप्पल तुटली होती.
‘जोडून दे बरं दादा जरा हे... किती घेशील?’, म्हातारीने आढळरावास विचारले.
‘चाळीस रुपये’.
‘चाळीस?... काहीपन सांगतोय... नवी घेते मी चप्पल’, म्हातारी जरा उखडली.
‘ओ आजी... चाळीस रुपयात चप्पल येते काय कधी? शंभरच्या खाली येत नाही नवीन... कुठंपन जा’.
‘एक नग तर येईल... एकंच घेईन... कोन बघतोय म्हातारीच्या पायाकडं’, म्हातारीचं लॉजिक!!
‘आजीsss, निसती एक चप्पल कुनी विकल का?... उगा वाद करतीय... जाऊ दे, आन हिकडं’, आढळरावांच्या कपाळावर एव्हाना आठ्या पडायला सुरुवात झाली होती.
‘हां... राह्यलं आता ... आला मोठा’, असे फटकारत म्हातारी तरातरा निघून गेली. म्हातारबुवा तिच्या मागून काही न बोलता चालू लागले.
‘हे असंय बघा यांचं... शिस्तीत सांगाव तर आपल्यावर ओरडतात. लई येतात असे गिऱ्हाईक... रोजचं हाय हे’.
आढळराव पुन्हा नॉर्मल झाले आणि तोंडाचा पट्टा सुरु केला.

‘मी काय म्हनत होतो... कुनी दोस्त बिस्त किंवा ओळखीतल्या मानसाला rent वर flat बीट पाहिजे आसल ना तर बिनधास्त सांगा मला... आपले हायेत contacts. लोड नाई... आनी कसंय आपलं मानुस असलं म्हंजे फिकीर नाई. पोरं-पोरी नको. family पाहिजे. कमीजास्त करता येते deal च्यावेळी... नाई का !! बिल्डींग मध्ये पोरंपोरी आसली की सगळ्यांना tension. आता ती दोन फेमस कबुतरं ठाऊक असतीलच तुम्हाला’.
मी विचारात पडलो. एकतर कोथरूडच्या भागात कबुतरं भरपूर. खिडक्यांवरच्या टीन शेड्स वर कायम वास्तव्यास असलेली. आढळराव अचानक कबुतरांच्या मागे कसे काय धावू लागले ते काही कळेना. मी म्हणालो, ‘कुठली कबुतरं?’
‘दादा, ती नाय का पार्किंग मध्ये गुलुगुलू गप्पा मारीत बसतात दिवस-रात्र... त्रास नाई होत लोकांना?...कळायला पाहिजे आपन कुठं हाओत... काय करतोय... कशाची चाड नाय. परवा तर लई खेटून उभी व्हती दोघं. काय म्हंजे पोरं आजकालची...आन तेबी काय करनार!!...सारं जगच डान्स बार झालंय’.
आढळरावांची ही गुगली समजायला मला वेळ लागला पण नंतर tube पेटली.
सोसायटीच्या पार्किंगमध्ये ही दोघं college going हीर-रांझा सतत बोलत बसलेली असतात. याबद्दल आढळराव सत्य तेच सांगत होते. त्यांना हे कळलंय म्हणजे या प्रेमीयुगुलाची कीर्ती कुठपर्यंत पोहोचली असेल ह्याचा मी अंदाज बांधित होतो. आमच्या बिल्डींग मधली लोकं कुठवर झेंडे गाडतील हे सांगणे अवघड आहे.

आढळरावांची बडबड चालूच होती... आणि चप्पल दुरुस्तीचे कामही. मध्येच काहीतरी गुणगुणणे सुरु होते. एकदम मला विचारलं, ‘माहिती हाये का हा अभंग?’
‘कुठला?...नीट ऐकू नाही आला’, मी.
“सुखाचे हे नाम आवडीने घ्यावे... “
राजकारण, Real Estate व प्रेमप्रकरणा वरून एकदम अभंगात त्यांनी gear shift केल्यामुळे मला तात्विक धक्का बसला.
‘तुमचं चांगलं पाठांतर दिसतेय’, मी उगाच म्हणालो.
‘हां मग... वारकरी आम्ही तसे... पनजोबा पासून वारी करायची परंपरा सुरु झाली घरी... कुनी ना कुनी दरवर्षी वारी करतोच... ह्या खेपेला मोठा भाऊ गेला व्हता’.
त्यांनी म्हटलेला तो अभंग कुणाचा आहे ते मला माहित नव्हते पण काही विचार करण्याआधीच आढळरावांचे न थांबणारे विलक्षण निरुपण चालू झाले.

‘कसंय माहितीये का... संत महंत खूप काई सांगून गेलेत... आपल्याला कुठं वेळ आसतो खोलात शिरायला... डोक्यात निसते पैशाचे विचार... मी म्हनतो मानसानं नेटका प्रपंच करावा. गरजूस जमल तेवढी मदत करावी. उगा वाह्यात गोष्टींवर पैसा खर्च करन्यापेक्षा जमा करून ठेवावा... अडीअडचनीला कामी येतो मग. हाये ती जबाबदारी प्रामानिकपने पार पाडावी. कमी जास्त तर नेहमीचं असते आयुष्यात... तुकोबाराय म्हनले ना ‘मन करा रे प्रसन्न...’ लाख मोलाची गोस्ट सांगून गेले... सगळं मनाशी निगडीत हाये... देहूला गेले व्हते का कधी?’
‘नाही’, माझे उत्तर.
‘जाऊन या. अधून मधून जात राहावं अशा ठिकानी... तुम्हाला सांगतो, तो विटेवरचा बघत असतो... चुकलं-माकलं, दुखलं-खुपलं की त्याच्यावरची भक्ती शक्ती देते... आनी आपलं काम चोख पायजे... वेव्हारच्या जागी वेव्हार... लबाडी आपल्याला खपत नाई... खऱ्याची दुनिया नाय हे मान्य... जशास तसं वागायचं पन आपला पाय वाकडा नाय पडला पाहिजे, हां’.
‘बरोबर आहे’ एवढेच मी म्हणालो. (कारण ह्या दोन शब्दांमध्येच माझी dictionary संपली होती.)

‘हे घ्या... झाली चप्पल... या पावसाळ्यात तर खराब होनारच नाई’. आढळरावांनी त्यांचं काम संपवलं होतं.
मी अजूनही त्यांच्या बोधपर आणि अनपेक्षित प्रवचनातून बाहेर आलो नव्हतो. मुकाट्याने पैसे दिले आणि ‘येतो’ असं म्हणून घरी परतलो. रस्त्यावरचा एक चांभार नकळत चार महत्वाच्या गोष्टी ऐकवून गेला होता. मला तरी कुठे ठाऊक होतं की चप्पल तुटण्याचं निमित्त होऊन “प्रपंच ते परमार्थ” असा प्रवास घडेल म्हणून!!

आयुष्यात पूर्वग्रहांना स्थान देऊ नये ही एक नवी शिकवण मिळाली. 
आता रोज ऑफिस मधून परतताना कामात गर्क असलेल्या आढळरावांकडे नजर जाते. त्यांचं लक्ष असेल तर राम-राम, नमस्कार इत्यादी सोपस्कार पार पडतात. रस्त्याच्या कडेला बसून काम करणाऱ्या त्या चांभाराकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन एव्हाना ‘डोळस’ झाला आहे. पु. ल. म्हणतात ते खरं आहे – स्वतःच्या लोकप्रियतेच्या, ज्ञान-अज्ञानाच्या, प्रतिभेच्या व सामर्थ्याच्या संकल्पना कधीही धुळीस मिळू शकतात.


 

Tuesday, 18 June 2013

'इमेजेस'... पावसाच्या.


मे महिना... शेवटचे ‘पर्व’.
नको नकोसे वाटणारे... कंटाळवाणे, रणरणते ऊन.
न संपणारे...
कधी नव्हे ते हवामानखात्याकडे लक्ष...
कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याच्या बातम्या...
अंदमानात ‘त्याने’ दिलेली वर्दी...
आणि थोड्याच दिवसांत त्याचा केरळात ‘गृहप्रवेश’.
प्रतीक्षा... प्रतीक्षा...
अंतहीन...

निळ्याशार नभात काळ्या-सावळ्या ढगांची गर्दी.
वळवाच्या सरी...
मातीमधला सुगंध... कुठल्याही अत्तर-कुपीत बंदिस्त न ठेवता येण्याजोगा...
चर्चा... त्याचीच...
सर्वत्र...
गावात, शेतात, पारावर, पाणवठ्यावर, शहरात, मैदानात, गल्ली-बोळांत, ऑफिस मध्ये, घराघरात...
डोंगरदऱ्यात... रानावनात देखील...
पेपरात फ्रंट पेजवर त्याने ‘रिझर्व’ केलेली जागा...
ट्रेलर... प्रोमो...
पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त...

अखेर त्याचे आगमन...
कोकणात जोरदार सलामी... दणकून !!
राज्यात त्याचा पहिला पाडाव...
तळकोकणात ‘तळ’ ठोकून गरज-बरस बरसणार ‘तो’...
साक्षात ‘मेघमल्हार’ !!

‘पश्चिम घाट’... त्याचा जिवलग मित्र...
तो तिथे ‘कोसळतो’...
बेभान... स्वैर... मुक्त.
अविरत वाहणारे धबधबे... बाळसं धरतात...
प्रारंभ... सृजन... नाविन्याचं.
सह्याद्रीच्या कडे-कपाऱ्या... ‘शिवकल्याण’ राजाचे ऐतिहासिक वैभव... सगळं सगळं तृप्त !!

पुढचा टप्पा... शहर.
मुंबई, पुणे, औरंगाबाद...
नंतर मुक्काम-पोस्ट नागपूर... ढोबळमानाने... त्याचा हा ‘प्रवास’...
प्रत्येक शहरात...
ढगांची आदळ-आपट... विजांचा लखलखाट...
रस्त्यावर पाणीच पाणी...
ओढे, नाले आणि गटारं तुडुंब...
डबकी...
चिखल...
बंद सिग्नल्स... traffic jam...
Electricity गायब...
उन्मळून पडलेल्या फांद्या... अस्ताव्यस्त तारा...
लोकांची तारांबळ...
bus stop, स्टेशनवर चिक्कार गर्दी...
सर्दी, पडसं, रोगराई...
वैताग...
पण सुख देखील.
रेनकोट... छत्र्या...
कणीस... ओले शेंगदाणे...
फुललेले कट्टे... कटींग ... गरम भजी...
शाळा... कॉलेजेस... नव्याने उघडलेले...
तरुण-तरुणी... चिंब भिजलेले... एकत्र... मुद्दाम... सहवास... वगैरे.. वगैरे...
सहल... मुळशी, माळशेज... तत्सम...
ट्रेकिंग...
मौज.

आषाढ चे अवतरण...
गजर हरिनामाचा... पालखी... एकादशी...
वैष्णवांचा मेळा... दिंड्या पताका नाचती...
काया पंढरी... आत्मा विठ्ठल.
श्रद्धा, भाव पांडुरंग चरणी...
मग श्रावण, भाद्रपद...
मंगळागौरी... जन्माष्टमी... गणेशोत्सव... इत्यादी... इत्यादी... अनेक सणवार...
उत्साह... आनंद...

मी... कुठे?
कोकणांत... (Subconsciously)
जुन्या घराच्या माडीवर... खिडकीपाशी...
बाहेर ‘तो’...
न थांबणारा...
हिरवीगार सृष्टी...
इच्छा... हे सगळं कॅमेऱ्यात बंदिस्त करण्याची.

मी...
कोकणात... (Subconsciously)
जुन्या घराच्या पडवीत... निवांत
बाहेर ‘तो’...
कौलारू छपरावरून निथळणारा...
सुख...
अनुभूती... गात्रागात्रांत !!

मी... कुठे?
त्याच घरात...
आजीच्या कुशीत...
आजीच्या तोंडून विविध कथांची मेजवानी...
भुताखेतांच्या... जिवंत माणसांच्या... देवादिकांच्या कथा... दंतकथा...
आजीबाईंचा अनमोल बटवाच जणू...
जेवणात चवीला कुरड्या-पापड्या-लोणची... घरगुती.
सोलकढी, उकडीचे मोदक...
सुख...
अपार...

मी...
घरात...
डोळे मिटून स्वस्थ पहुडलेला...
बाहेर... त्याचा ‘आवाज’...
सोबतीला... उस्ताद राशीद खान यांचे ‘गरजे घटा’...
स्वराभिषेक...
Background Score !!
सुख...
अद्भुत...

मी... कुठे?
ओल्या, शेवाळाने सजलेल्या पुरातन शिवालयात...
मंद दिव्याच्या प्रकाशाने उजळलेल्या गाभाऱ्यात...
शिवपिंडी समोर...
ध्यानस्थ...
सुख...
सत् चित् आनंद.

मी...
उधाणलेल्या समुद्रकिनारी...
क्षितिजावर दृश्यमान...
घसरलेल्या काळ्याकुट्ट महाकाय ढगांचा समूह...
माझ्या सोबतीला... ‘गुलजार’ ची कविता...
‘बारीश’...
किंवा ‘किसी मौसम का झोंका’...
सुख... पुन्हा...
शब्दांकित.

पण ‘तो’ म्हणजे ...कोण?
पाऊस... (अर्थातच)
उगाच एक विचार...
अधिक जवळचा कुठला?
खराखुरा... की अंतर्मनातला?... ठाऊक नाही...
पण नेत्रांतला... नक्कीच...
कधी आटणारा... कधी प्रवाहित होणारा...
तर कधी शांत... स्थिर... आणि निश्चल.

मी... आणि पाऊस...
असेच...
एकमेकांत गुंतलेले...

कायमचे.

Tuesday, 21 May 2013

Cinema Paradiso



८० च्या दशकातील इटली... सुप्रसिद्ध सिने-दिग्दर्शक Salvatore उशिरा घरी परतलाय... त्याच्या आईचा फोन आलेला त्याला समजतं... कुणीतरी Alfredo नावाचा इसम निधन पावल्याची खबर असते. गेली ३० वर्षं तो गावी गेला नाहीये... गावाकडील सर्व आठवणी आणि जुने संबंध जणूकाही त्याने पुरले आहेत. परंतु Alfredo मरण पावल्याच्या बातमीने त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा ताज्या व्हायला लागतात...
Flashback…!!! Giancaldo  नावाचे इटली मधील एक गाव... दुसरे विश्वयुद्ध नुकतेच संपले आहे... सहा वर्षाचा Salvatore अतिशय खोडकर व चुणचुणीत मुलगा... युद्धात त्याचे वडील शहीद झाले आहेत... छोट्या Salvatore ला सिनेमा बद्दल विलक्षण आकर्षण... गावातल्या एकमेव Cinema Paradiso नावाच्या चित्रपटगृहाभोवताली तो सदा घुटमळत असे... तिथे projectionist म्हणून काम करणाऱ्या Alfredo नामक व्यक्तीशी त्याची गट्टी जमते. Alfredo व Salvatore चे संबंध बाप-लेका सारखे असतात... म्हणूनच की काय, Projector Room मधून सिनेमा बघायची Salvatore ला पूर्ण मोकळीक असते. Cinema Paradiso ही लोकांसाठी फार जिव्हाळ्याची जागा... सिनेमा ह्या माध्यमावर त्या लोकांचे अतिशय प्रेम असतं परंतु तिथे प्रदर्शित झालेल्या कुठल्याही चित्रपटाला censor चे शुक्लकाष्ठ मागे लागलेलं असतं. चित्रपटाच्या रिळेतून romantic scenes काढून टाकण्याचे आदेश तिथल्या धर्मगुरूने दिलेले असतात. तसल्या रिळांचा room मध्ये खच पडून असतो. सुरुवातीला Alfredo ला Salvatore म्हणजे एक प्रकारची ब्यादच वाटत असते पण हळूहळू त्याला Projector कसा हाताळायचा ते शिकवायला Alfredo सुरुवात करतो.
एक दिवस दुर्दैवाने Cinema Paradiso ला आग लागते... Nitrate Film चा जमाना तो... film रीळ Alfredo च्या चेहऱ्या जवळ फुटल्याने त्यात त्याचे डोळे जातात. Salvatore त्याला कसाबसा वाचवतो. Cinema Paradiso आता पुन्हा कसं उभारायचं हा प्रश्न असतो... Lottery जिंकलेला Ciccio  नव्याने थिएटर बांधायचं ठरवतो... Salvatore जरी वयाने लहान असला तरी त्याची Projectionist म्हणून नेमणूक होते... कारण त्याच्याशिवाय दुसऱ्या कुणालाच त्याबाबत माहिती नसते.
अशीच वर्षं निघून जातात...
Salvatore आता तरुण झालाय... Film making निगडीत त्याचे काही ना काही प्रयोग सुरु असतात. म्हणून काम करता करता सिनेमा आणि ‘Romance’ बद्दलचे त्याचे आकर्षण वाढत जाते.
एकीकडे Salvatore च्या स्वतःच्या प्रेम कहाणीचा शुभारंभही झालेला असतो... Elena नावाच्या मुलीवर त्याचे प्रेम जडते... Elena ही गावातल्या अतिश्रीमंत व्यक्तीची मुलगी... अर्थातच तिच्या बापाचा या प्रेम प्रकरणाला विरोध असतो... काही कारणास्तव Elena व तिचे कुटुंब दुसऱ्या गावी स्थलांतरित होतात. Salvatore साहजिकच खजील होतो... त्याने लिहिलेली प्रेम पत्रं कधीच Elena पर्यंत पोहचत नाही... कायम ‘Undelivered’ असा शिक्का लावून परतवली जातात. Alfredo Salvatore ला हे गाव सोडून जाण्याचा सल्ला देतो... ‘तुझी स्वप्नं, आकांक्षा इथे कधीही पूर्ण होणार नसून तुला उंच भरारी घ्यायची असेल तर हे गाव सोडावे लागले... ह्या गावाची नुसती आठवण देखील येता कामा नये... इथल्या लोकांना विसरून जा... आणि मागे वळून न बघता तू येथून निघून जा... आयुष्य घडव’ अशा शब्दांत जणूकाही Alfredo आदेशच देतो.
Salvatore Alfredo चा शब्द न शब्द पाळतो... Salvatore गावी परततो तो ३० वर्षानंतर... Alfredo च्या अंत्य संस्काराच्या दिवशी... गुरु समान असणाऱ्या आवडत्या Alfredo ला शेवटचा निरोप देण्यासाठी...
Giancaldo गाव आता बऱ्या पैकी सुधारलंय... परंतु तरीही Salvatore ला हे पटतं की ह्या गावात राहून सिनेक्षेत्रात हवं तसं career आपण घडवू शकलो नसतो. Salvatore Alfredo च्या विधवा पत्नीस भेटायला जातो. Alfredo ची पत्नी जुन्या आठवणींना उजाळा देते आणि Salvatore ला सांगते की त्याच्या चित्रपट क्षेत्रातील यशाबद्दल Alfredo ला सदैव अभिमान वाटत असे. Alfredo ने Salvatore साठी एक विशेष भेट जपून ठेवली असते. त्याला ठाऊक असतं की कितीही नाही म्हटलं तरी एकदा Salvatore ह्या गावात येईलच. ती खास भेट म्हणजे Films ची जुनी रीळं... Alfredo ची बायको ती रीळं Salvatore ला सोपवते.
Salvatore गावात काही दिवस मुक्कामी असताना दोन महत्वाच्या घटना घडतात...
एका ठिकाणी तरुणपणीच्या Elena सारखीच दिसणारी मुलगी बघून तो स्तब्ध होतो... ती Elena ची मुलगी असते. तिच्या मार्फत Salvatore व Elena ची पुन्हा भेट होते आणि जुन्या romantic आठवणी पुन्हा जागवल्या जातात. एक चुकामूक... Salvatore व Elena च्या ताटातूटीस कारणीभूत झाली असते. गाव सोडायच्या अगोदर Elena ने Cinema Paradiso मध्ये Salvatore साठी एका handbill च्या मागे सगळं लिहून ठेवलं असतं... पण Salvatore ला हे कळू शकत नाही. दोघेही त्यांच्या आयुष्यात फार पुढे निघून आले असतात... मागे वळून पाहण्याचा काही प्रश्नच नसतो... थोडक्यात, त्यांचं प्रेम पूर्णत्वास पोहचू शकत नाही... नियतीचा खेळ... आणखी काय !!
दुसऱ्या दिवशी Cinema Paradiso च्या भग्न वास्तूत Salvatore प्रवेश करतो. Projector room मध्ये वेड्यासारखी जुनी handbills तपासतो... हवं ते handbill नी त्याच्या पाठीमागे लिहिलेला Elena चा संदेश तो वाचतो... पण आता अर्थातच वेळ निघून गेली असते...
याच काळात मोडकळीस आलेली Cinema Paradiso ची इमारत पाडण्यात येते... तिथली जागा Parking करिता म्हणून वापरण्यात येणार असते... त्या दिवशी Salvatore ही तिथे जातो... ओळखीचे (म्हातारे) चेहरे त्याला तिथे दृष्टीस पडतात... Cinema व Cinema Paradiso वर अमाप प्रेम करणारी ही माणसं !! अत्यंत कष्टी मनाने Cinema Paradiso ला शेवटचा निरोप देण्यात येतो... तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या मनात काय काय आठवणी जाग्या झाल्या असतील ते शब्दांत सांगणे अवघड !! कित्येक कडू-गोड घटनांची साक्षीदार असलेली ती इमारत अखेर भुईसपाट होते. खिन्न अंतःकरणाने Salvatore त्याच्या शहरात परततो.
थिएटर मध्ये Salvatore एकटा बसलाय... Alfredo ने त्याच्या साठी भेट दिलेली रीळं तो मोठ्या पडद्यावर बघतोय... ती रीळं म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एक montage असतो... Cinema Paradiso मध्ये प्रदर्शित झालेल्या विविध चित्रपटांतून कापलेल्या त्या romantic scenes चा... Alfredo ची अप्रतिम भेट!!
तो montage पडद्यावरच बघावा. ते पाहून Salvatore च्या चेहऱ्यावरील आनंद आणि धन्यता लपविण्यासारखी नसतेच मूळी !!
इति “Cinema Paradiso”... 
सिनेमा आणि अतूट नातेसंबंधांना वाहिलेला असा हा all-time क्लासिक... सिनेमाची सिनेमाला ‘भेट’.

Monday, 8 April 2013

वेचलेली फुले...


(कविवर्य सुरेश भट यांच्या लेखणीतून...)




"कशास पाहिजे तुला परंपरा?
तुझीच तू परंपरा बनून जा"


मला आम मराठी माणसांनी आपला म्हटलेले आहे. मी उरलेल्यांची कशाला पर्वा करू? ज्याला जनता उराशी लावते, त्याला समीक्षकांच्या औषधाची किंवा दूध पावडरीची गरज नसते! ज्याच्यात भरपूर मार खाण्याची शक्ती असते, तोच सडकून मार देऊन शेवटी जिंकतो. मी वर्षानुवर्षे उपेक्षा, निंदानालस्ती व मानवी क्षुद्रपणाचा भरपूर मार खात आलेलो आहे. 

ज्या समाजात मी जन्मलो, त्याचा विचार केला तर भौतिकदृष्ट्या माझी मते मला परवडत नाहीत. प्रवाहाविरुद्ध पोहणे म्हणजे एक यातनाच असते. पण जे हृदयाला पटते, त्याविरुद्ध वागणे म्हणजे त्याहून मोठी यातना असते. मी पहिली यातना निवडली !

संपादकांची पत्र आली म्हणून मी वाईट किंवा कमअस्सल लिहूच शकत नाही. माझ्याजवळ कवितांचा कारखाना नाही. ज्याला कवी म्हणू आपली स्वतःची  आणि मराठी भाषेची इज्जत राखायची असेल, त्याने कधीही "मागणी तसा पुरवठा" हे धोरण स्वीकारू नये. वर्षात फक्त ३-४ कविता झाल्या तरी चालतील, पण त्या १०० नंबरी सोनेच असाव्यात. जो कवी आपल्या कविता छापणाऱ्या दिवाळी अंकांच्या संख्येवरून आपला मोठेपणा ठरवतो, त्याच्यासारखा बेवकूफ इसम दुसरा नाही !

ह्या वेळी मला माझीच कविता आठवीत आहे--

असते ज्यांचे हृदय बॅंकेत सुरक्षित
इन्क्रिमेंट आणि प्रमोशन
वांझेच्या विटाळासारखे निश्चित
त्यांना सर्वच माहीत असते
-- कविताही 

मी  निवृत्तीच्या- वैराग्याच्या गोष्टी करीत नाही. माझे जीवनावर प्रेम आहे. म्हणून हे जग माणसांनी राहण्याच्या लायकीचे बनावे अशी माझी इच्छा आहे.  म्हणूनच मला सतत वाईटपणा पदरी घ्यावा लागतो.
मी स्वतःला हुतात्मा वगैरे समजत नाही. पण मला इतरांप्रमाणे महत्त्वाची "साहित्यिक" माणसे सांभाळता येत नाहीत, हे मात्र खरे. माझ्या चुकांवर मी पांघरूण घालत नाही. पण तो भूतकाळ झाला. 
माझ्या कवितेचा प्रवास सुरूच आहे. कविता व माणूस यांचा वेगवेगळा विचार करता येत नसतो. म्हणून मी एवढेच म्हणेन--

दूर आलो एवढा की थांबल्या मागे दिशा
माझिया संगे उद्याची चालती संवत्सरे !

Wednesday, 3 April 2013

'सतलज' च्या काठावर...(भाग-३)


रोपड मधला मुक्काम काही दिवसांत संपणार होता. तिसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीला आमचे Ranbaxy मधील project चे काम पूर्ण झाले होते. परतायचे reservation झाले होते. पण निघायला अजून ५ दिवस शिल्लक असल्याने एक दिवस अमृतसर आणि वाघा border ला जाऊन आलो. उरलेल्या चार दिवसांत संध्याकाळी नेमाने सतलजच्या त्या पूलावर आम्ही फिरायला जात असू. सतलजचे पात्र कायम धुक्यात हरवलेले असायचे. एके दिवशी पूलाच्या परिसरात नोकर एका व्यक्तीशी बोलताना आढळला. थोडं जवळ जाऊन बघितलं तर तो सरदारजी होता. ह्या सरदारजीला २-३ वेळा आम्ही guest house मध्ये येता जाताना पाहिलं होतं. ह्याच्या तथाकथित कारस्थानांत या सरदारजीचा पण हात आहे की काय असे वाटू लागले. आम्ही आल्यापासून दोन आठवडे उलटूनही ह्यांच्या ‘हवेलीत’ राहायला कुणी येत नव्हते. Advance booking ची तर गोष्टच नसावी तिथे. आम्हीच फक्त भुतासारखे त्या guest house मध्ये हिंडत असू. कधी कधी नोकर TV लावत असे. तो TV पण पुरातन वाटत होता.

निघायच्या एक दिवस आधी सगळे bill चुकते करावे असा विचार करून आम्ही नोकराला शोधत होतो. Guest house च्या छोट्या खोलीमध्ये त्याच्या खोकलण्याचा आवाज ऐकू येत होता. आम्ही दोघे कधी नव्हे ते आत शिरलो. आत एक टेबल मांडलं होतं. २-३ रजिस्टर आणि पावती पुस्तक होते. नोकराला आमच्या अचानक येण्याने त्रास झाला असावा. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव तेच सांगत होते. आम्ही मुकाट शिल्लक पैसे देऊन receipt घेतली. समोरच्या भिंतीवर लक्ष गेलं. आम्हाला एक-दोनदा जो सरदारजी दिसला होता त्याची तसबीर होती. हे कोण आहे असे विचारताच त्याने तो मालकाचा फोटो असल्याचे सांगितले. पुढे जे काही त्याने सांगितले ते ऐकून आमची टरकली. त्या मालकाचा मृत्यू होऊन ७ वर्षं झाली होती. आमचा विश्वासच बसत नव्हता कारण आम्ही त्याला पाहिले होते. नोकराने उलट आम्हाला वेड्यात काढले. तुम्हाला काहीतरी भास झाला असेल असे तो म्हणाला. तुम्हां बाहेरगावच्या लोकांना सगळे सरदारजी लोक जवळपास सारखेच दिसत असावेत अशी पुस्ती त्याने जोडली. आमच्या डोक्यात मात्र भलतेच विचारचक्र सुरु झाले होते. एक दिवस अजून बाकी होता. इतक्या दिवसांत एवढे सगळे रामायण, महाभारत घडल्यावर तिथे थांबणे आम्हाला अशक्य वाटत होते. त्या नोकराचा काही भरवसा नव्हता. तो कपटी होता असे आमचे ठाम मत होते; त्याबद्दल आमच्या मनात कुठलीही शंका नव्हती. तिथून लवकरात लवकर निघून दुसरे hotel गाठू असे ठरवून आम्ही लगेच pack-up ला सुरुवात केली. अर्ध्या तासात आम्ही तिथून निघालो. चंडीगढला एका मित्राकडे आज मुक्काम करून उद्या अंबाला स्टेशनला जाणार आहोत असे नोकराला सांगून आम्ही सटकलो.

जाताना medical चा chemist भेटला. त्याने आम्हाला हाक मारली. त्यादिवशी घाईत असल्याने व्यवस्थित बोलणे झाले नव्हते. राहायला कुठे होता असे विचारल्यावर आम्ही guest house बद्दल सांगितले. त्याचा आमच्या सांगण्यावर विश्वास बसेना कारण त्याच्या माहितीनुसार ते ७ वर्षांपासून बंद किंवा abandoned स्थितीत होते. मालकाचा सतलज नदीत बुडून मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून नोकर गजाआड होता. त्यानेच मालकाल पूलावरून नदीत ढकलले होते. रोपड मधली ती एकमेव ‘सनसनीखेज’ घटना होती. तसल्या थंडीत हे सर्व ऐकून आम्हाला जास्तच हुडहुडी भरली होती. Guest house मध्ये सध्या वास्तव्य करून असलेला माणूस पूर्वीचा नोकर आहे की अजून कुणी आहे याची खात्री करूया असा आग्रह chemist करू लागला. भुताटकी पेक्षा हा सगळा प्रकार केवळ भंपकपणा वाटत होता. मालक, नोकर आणि chemist हे तिघेही एकमेकांना सामील असावेत असा कयास बांधून आम्ही त्याच्या आग्रहाला बळी पडलो नाही. त्यांना आमच्याकडून नक्की काय हवे होते हे शेवटपर्यंत कळू शकले नाही. बोलण्यात किती तथ्य होते हेही आम्हाला समजले नाही. तो खरा होता की खोटारडा होता हे तेवढ्या कमी वेळात तपासून पाहणे अवघड होते.

आम्ही तिथून निघून रिक्षाने रोपडच्या मध्यवर्ती भागात प्रवेश केला. एकही hotel धड पसंतीस उतरत नव्हते. अखेरीस तिथल्या प्रसिद्ध गुरुद्वारा मध्ये आम्ही पोहचलो. हिंडून हिंडून पुरते थकलो होतो. एक दिवसा करिता मुक्काम करता येईल का असे विचारले. देव पावला. !!  त्यांनी संमती दिली. सकाळी फक्त ६ च्या आत उठावे लागेल अशी सूचनाही दिली. भक्तनिवास मध्ये एका खोलीत सामान नेऊन टाकले. हातपाय धुतले. लंगर मध्ये जेवलो. त्या प्रसादने भूक कुठल्या कुठे पळाली होती. संध्याकाळी वातावरण प्रसन्न वाटत होते. ज्या कुणाला आम्ही त्या guest house बद्दल विचारले त्यांनी हीच माहिती सांगितली की ते बंद आहे; तिथे कुणी जात नाही. रात्री झोपताना ते guest house, नोकर, मालक आणि chemist यांबद्दलचे विचार पुन्हा घोळू लागले. कदाचित मित्राच्या डोक्यात सुद्धा तेच विचार सुरु होते. सकाळी ६ च्या आत आम्हाला जाग आली. Loudspeaker वरून मधुर ‘गुरुबाणी’ ऐकू येत होती. अंघोळ उरकून आम्ही गुरुद्वार्यात दर्शन घेतले. दुपारी लंगर मध्ये जेवून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो.

नोकरी निमित्त घराबाहेर पडल्यावर आयुष्यात घडलेली ही ‘सतलजच्या काठावरील’ विचित्र घटना !! वेगळा अनुभव. वेळेअभावी म्हणा की आणखी कुठल्या कारणाने म्हणा; आजपावेतो ह्या घटनेचा उलगडा झालेला नाही. त्यापुढेचे प्रश्नार्थक चिन्ह आहे तसेच आहे. पुन्हा तिथे जाऊन उत्तर शोधण्याची तयारी आहे... पण ते जमेल की नाही ते आत्ताच नाही सांगू शकत.